Pages

Saturday, 30 September 2017

॥ विचारवेध ॥ लहानग्यांचे प्राणी प्रेम


॥ विचारवेध ॥ 

-दशरथ ननावरे ( श्रीमंत ) , इतिहास अभ्यासक

लहानग्यांचे प्राणी प्रेम ..

प्राणीमात्रांवर दया करा ... लहान मुलांना प्राण्यांचे आकर्षण असतेच त्याप्रमाणे माझी कन्या मानसी हिला सुद्धा प्राण्यांविषयी मोठी आवड , आपल्या घरात कुत्रा , मांजर , ससा असं काहीतरी पाळायचंच असं तिनं पक्क मनात ठरवलेलं ! पण माझा थोडा विरोध असायचा कारण घरी कुणी नसल्यावर उगीच त्यांची आबाळ नको असं वाटायचं , पण तिने कधी हट्ट सोडला नाही . आमच्या दारात एक मोठं कुत्रं नेहमी यायचं . खरं तर मी सारखच त्याला हाकलायचो पण ते कुत्र पण भारी जिद्दीच होतं , शेपूट वाकडं करून तिथंच फिरकायचं . मला माहितच नव्हतं की मानसी त्याला भाकरी खाऊ घालायची . शेवटी मीच कंटाळलो अन् त्याच्याकडे दुर्लक्ष केले . मग ते कायमचं घराच्या दारात बसून राहायचं . राणी ! अशी हाक मारताच शेपटी हालवत धावतच यायची . दोन पाय वर करुन अंगावर झेप घ्यायची . तिलाही लळा लागलेला . मग काय सकाळ संध्याकाळ आमच्या स्वयंपाकाबरोबर तिची ही स्वतंत्र भाकरी , चपाती घरात बनू लागली. घरचा एक सदस्य असल्यासारखी ती राहू लागली . आता तिच्याशिवाय कन्यांना करमतच नव्हतं . पण एके दिवशी ती घरी लंगडतचं आली . तोंडातून आवाजही येत नव्हता . बहुधा डांबरी रस्त्यावर एखादया गाडीने धडक दिली असावी . दोन दिवस घरासमोर रेंगाळत होती . काहीच खात नव्हती . अखेर दुसऱ्या दिवशी ती कुठेतरी निघुन गेली . गेली कुठलं ... ती कायमची सोडून गेली . या जगाचा निरोप घेऊन . आता तिच्या नसण्यानं मनाला हुरहुर वाटत होती .
              मानसी तर दुसरं कुत्रं आणण्यासाठी मागेच लागलेली पण आता धाडसच करावं वाटत नव्हतं . पण एके दिवशी मैत्रिणींबरोबर खेळायला गेली अन् येताना कुत्र्याचं छोटसं पिल्लूच घेऊन आली मग काय पुन्हा त्याचा थाटमाट सुरु झाला . प्लेटमध्ये दूध पाजण्यापासून उबदार कापडावर झोपवण्यापर्यंत ! आणलं त्या दिवशी रात्रभर ओरडून घर डोक्यावर घेतलेलं . पण दोनच दिवस कसंबसं राहिलं अन् दोन दिवसांनी निघून गेलं . भरपूर शोध घेतला पण सापडलचं नाही .
           काही दिवस असेच निघून गेले . आणि एके दिवशी रात्री रस्त्यावरून फेरफटका मारत असताना आमच्या सौभाग्यवतींना एक मांजराच  छोटं पिल्लू आढळलं , त्यांनी लगेच उचलून घरी आणलं . मग काय आमची मानसी एकदम खूश ! लगेचच त्याला दुधाची वाटी समोर ठेवली , त्यानही ताव मारला . सकाळी उठून पाहिलं तर त्यालाही वाहनाची टक्कर लागून मानेला जखम झालेली , एक पाय आदू झालेला . आता ते ठेवावं की सोडावं असा प्रश्न पडला पण मानसी त्याच्यावर उपचार करु असं म्हणतेयं , हवं तर शस्त्रक्रिया करू . पण त्याचा सांभाळ करायचाच असा हट्टच करुन बसलीय . बघूया त्याला पशुवैदयास दाखवून सल्ला घेतो .
   पण प्राण्यांबद्दल मानसीचं वेड खरच वेडं आहे .

                         - श्रीमंत दशरथ ननावरे ( सर )
                    इतिहास अभ्यासक , लेखक , व्याख्याते