Pages

Wednesday, 11 October 2017

॥ विचारवेध ॥ कडजाई देवी -हरळी



॥ विचारवेध ॥ 

-दशरथ ननावरे ( श्रीमंत ) , इतिहास अभ्यासक 

कडजाई - हरळी शाळा सहल 


हरळी हे गाव तसं सहयाद्रीच्या डोंगररांगेच्या कुशीत वसलेलं छोटसं गाव . हिरव्यागार वनराईनं नटलेलं . याच गावच्या पश्चिमेकडे असणाऱ्या उंच डोंगरावर माता कडजाई देवीचं मंदीर आहे . वास्तविक गतवर्षी या गावात आल्यापासून या मंदीराविषयी भलतंच आकर्षण वाढलेलं . पण मंदीरात जाण्याचा योग आलाचं नाही . आज मुलांनीच आग्रह धरला आणि ठरवलं डोंगर यंगून मंदीरावर डोकं टेकवायचं .
     साधारणपणे अकरा वाजण्याच्या सुमारास आम्ही मुलांसमवेत निघालो . लहान मुलं वरती चढतील का? याविषयी मनात शंका होती त्यामुळे पहिलीतील अनुष्काला तर शाळेतचं ठेवण्याचं ठरवलं . डोंगर पायथ्याला पोहचल्यावर एकदा डोंगराकडे पाहिलं . आणि कडजाईचा जयघोष करीत नव्या दमानं पाऊल पुढे पडू लागलं . डोंगराच्या पहिल्या टप्प्यावर गेल्यावर देवीचं खालचं मंदीर लागलं, थोडा विसावा घेतला . देवीचं दर्शन घेऊन वरच्या मंदिराकडे आगेकूच केलं . खर तरं हा टप्पा थोडा बिकट वाटेचा होता . ही अवघड वाट दमा दमानं चालत होतो मध्येच पाठीमागं वळून पाहिलं तर अनुष्का डोंगर चढून येताना दिसली . मनात आश्चर्य वाटलं . जन्मापासूनच्या कसल्याशा आजाराने तिच्या हातापायातलं बळ गेलेलं , रोजच्या शाळेलाच कशीबशी ती यायची म्हणूनच तिला शाळेत ठेवलं होतं . पण सगळे बाल सवंगडी परिसर सहलीला गेलेतं म्हटल्यावर तिला वाईट वाटलं . तिच्या आईने तीची समजूत घातली पण ती ऐकेना ,शेवटी आईचं मन पोरीसाठी हेलावलं अन् त्या अनुष्काला घेऊन डोंगर चढत आल्या . डोंगराचा शेवटचा टप्पा चढून आम्ही सर्वजण मंदीरात पोहोचलो . डोंगर चढताना इथली झाडं , गवत , रानफुलं ,काटेरी वनस्पती , दगडांचे प्रकार , टेकडी , डोंगर ,डोंगरातले पक्षी , प्राणी, दरी , झरे , ओढा ,तलाव , ढग , धुकं  याविषयी मुलांना माहिती दिली .
        डोंगराच्या मोठया कड्याच्या बाजूला मंदीर उभारण्यात आले होते . कडयावरची देवी म्हणूनच 'कडजाई ' असे संबोधले जात असावे . खर तरं प्रत्येक मंदीरात प्रवेश करताना आधी कासवाचं दर्शन होतं पण इथे मंदीराच्या कडेला असणाऱ्या पाण्याच्या टाक्यात जिवंत कासवाचंच दर्शन घडलं . हे पाणी खंबाटकी घाटातील खामजाई मंदारातील खामटाक्यातून पोहचते असे सांगितले जाते . मंदीरातील घंटेचा निनाद करून गाभाऱ्यात प्रवेश केला देवीचं मनोभावे दर्शन घेतलं .
वर्षभरानंतर इच्छापूर्ती झाल्याचा आनंद झाला . आणि मुलांची इच्छा पूर्ण केल्याचं समाधानही .
       सर्वांनी वनभोजनाचा आस्वाद घेतला . मुलांनी गाणी , गोष्टी , कविता म्हटल्या . आजचा दिवसच सर्वार्थाने आनंदी आनंद देणारा ठरला . आता परतीचा प्रवास सुरु करणार तेवढयात डोंगरातला वारा अन् पावसाच्या धारा सुरु झाल्या . पावसाच्या शिडकाव्याने अंगावर शहारा आला पण मुलांचा उत्साह दांडगा होता . पावसाने वाटा निसरडया झाल्या होत्या . मुलांना सावधपणाने सावकाश उतरण्याच्या सूचना केल्या . पाऊस कमी झाल्यावर डोंगर उतरायला सुरुवात केली. तास दीड तासाच्या उतरणीनंतर पुन्हा शाळेची वाट धरुन शाळेत पोहोचलो . परीसर सहलीतून मुलांना वेगळा अनुभव घेता आला . आजचा दिवस सार्थकी लागल्याचे समाधान मात्र वाटलं .
     .............. दशरथ ननावरे ( श्रीमंत )
                     इतिहास- अभ्यासक , व्याख्याते
                       9922815133