Pages

Sunday, 27 December 2020

॥ रानवाटा ॥ जोर -बहिरीची घुमटी - आर्थरसीट

 


॥ रानवाटा ॥ सफर निर्भिड जंगलाची 

- दशरथ ननावरे [ श्रीमंत ] , इतिहास अभ्यासक 

जन्नीमाता ( जोर ) - बहिरीची घुमटी ते आर्थरसीट 


सह्याद्रीचा उपरांगा मधील डोंगरांच्या दऱ्याखोऱ्यातील आडवाटेने मार्गक्रमण करायचं म्हणजे एक मोठी पर्वणीच असते . सह्याद्रीच्या माथ्यावर असलेलं निसर्ग सौदर्यं, डोंगराच्या कुशीतील धार्मिक ठिकाणे आणि घनदाट जंगलातील प्रवास यातून मिळणारा अफलातून आनंद हा केवळ स्वर्गसुखच !  आमचे मार्गदर्शक आणि ट्रेकर्स समूहाचे सर्वेसर्वा श्रीपाद जाधव साहेबांनी साद घातली आणि आम्ही लगेच तयारी केली .  जोर ( जन्नी माता ) - बहिरीची घुमटी ते आर्थरसीट महाबळेश्वर ट्रेक पूर्ण  करण्याचे निश्चित केले होते. 

      ठरल्याप्रमाणे आम्ही तयारीनिशी सकाळी सहा वाजता खंडाळा सोडून वाईकडे प्रस्थान केले . पुण्यावरून अभिजीत गोरे सर आणि त्यांचे मित्र ऋषीकेश दोघे आले होते . त्यांच्याच गाडीत बसून वाईकडे गेलो .  वाई विश्रामगृहावरून नाष्टा करून श्रीपाद जाधव साहेब , अभिजीत गोरे , मिलिंद दगडे , ऋषीकेश , कृष्णा तिकोणे , निखिल यादव  आणि मी जीपमधून जोर गावाच्या दिशेने निघालो . सकाळच्या थंड आणि मंद वाऱ्यात दीड तासाभराचा प्रवास करून जोर गावात पोहचलो . जाताना बलकवडी धरणाचा रम्य परिसर पहायला मिळाला . डोंगराच्या भोवतीने पसरलेलं अथांग पाणी आणि सकाळच्या सूर्यप्रकाशाने उजाळलेला परिसर डोळयाचे पारणे फेडून गेला . गावात पोहचल्यावर तेथून मार्ग दाखवणारे वाटाडे सोबत आले .  

        जोरच्या जन्नी माता मंदिरात दर्शन घेऊन ट्रेकला सुरुवात करायची होती पण फोटो काढल्याशिवाय कसा होणार ? मग काय एक क्लिक झालाच . सगळयांनी पाणी बॉटल बॅगमध्ये घेतली . सोबत छोटा चाकू , ट्रेकसाठी गॉगल अशा विषयावर चर्चा झाली . आणि ट्रेकला सुरुवात झाली . 



      मनी चंग बांधूनी वळली पाऊले जंगलात , 

       वेडात मराठे वीर दौडले सात ...     

हो आम्ही सात जण एका ध्येयाने प्रेरीत होऊन सह्याद्रीच्या वाटा शोधत निर्भिड अरण्याला भिडणार होतो . छोट्या रस्त्याला एक वळसा घालून कृष्णा नदीच्या लहान पुल ओलांडुन उजव्या हाताला वळण घेत पुढे निघालो . भाताच्या खाचरात आता गव्हाचे पीक डोलत होते . पाणी नसताना केवळ दवबिंदूवर नैसर्गिकरित्या गहू पिकवणाऱ्या या  शेतीच्या बांधावरून जाताना प्रसन्न वाटत होते . डाव्या बाजूला पाण्याचा मोठा डोह पण बहुतांशी रिता झाला आहे . शेताच्या बांधावरुन उडया घेत  जंगलात प्रवेश केला . आता दाट जंगल सुरु झाले होते . सकाळच्या प्रहरी पक्षांचा किलकिलाट फक्त ऐकू येत होता . हिरव्यागार झाडीतून जाताना मन प्रसन्न झाले . काही तासांचाच प्रवास असल्याने फोटो काढायला बराचसा अवधी मिळत होता . 



गेल्यावेळी पावसाळी ट्रेकला या जंगलात 'जळवांचा जलवा ' चांगलाच अनुभवला होता . पण ती भिती आता नव्हती . मजल दरमजल करीत डोंगराच्या कुशीतून आणि दाट झाडीतून ओढया ओघळीच्या पात्रातून पुढे मार्गक्रमण करत होतो .  या  प्रवासात  निसर्गाचे विहंगम दृष्य नजरेस पडत होतं . सूर्यकिरणं कशीबशी धरणीला स्पर्श करीत होते . चालण्याचा थकवा जाणवावा असं काहीच वाटत नव्हतं . मध्येच फोटो काढण्यात मजा येत होती . एका ठिकाणी झाडांच्या वेलींचे विळखे असे काही पडले होते की त्यांचा मजबूत झुला तयार झाला होता . मिलिंद सरांनी झोक्याचा आस्वादही घेतला . पुढे थोडी चढण चढून गेल्यावर सुमारे दोन अडीच तासाच्या पायपीटीनंतर बहिरीचं जंगलातील देवस्थान आलं . उंच डोंगरावर स्थित असलेलं हे ठिकाण . एका मोठ्या दगडाच्या आडोशाला देवांच्या मूर्ती विराजमान झाल्या होत्या . समोरचा परिसर छोटाच पण स्वच्छ होता . स्थानिक ग्रामस्थ येथे नियमित दर्शनाला येतात . आम्ही सगळयांनी बॅगा बाजूला ठेवल्या . देवाचं दर्शन घेतलं . पाठीमागच्या बाजूला एका खडकावरून कोकणातील परिसर दृष्टीस पडत होता . दूरवर दिसणारा मोहनगड , रायरेश्वराचा नाकिंडा , अस्वल खिंडीचा परिसर , पश्चिमेकडे बळकट आणि उंच उंच असणारा चंद्रगड , सापूळ खिंड , गडाकडे जाणारी अवघड वाट , दक्षिण - पश्चिमेला असणारा प्रतापगड आणि खोल दरीत विसावलेली कोकणातील छोटी गावे असा परिसर न्याहाळता येतो . थोडा विसावा घेऊन पुढे निघायच होतं . दुसऱ्या एका ग्रुपला वाट मार्गी लावून विठ्ठलराव आणि बाळू कदम दोघे समोरून आलेच होते . त्यांनाही सोबत घ्यायचं ठरलं  . पुढे घुमटीचा खडा डोंगर चढून जायचं होतं . पण त्यांच्यात कोणी जायचं यावर निर्णय होत नव्हता . जाधव साहेबांनी खिशातील दोन रुपयाचं नाणं काढून छापा काटा करायचं ठरवलं . दोनचा आकडा आला तर दोघांनी यायचं आणि छापा पडला तर पुन्हा नाणं टाकून दोघांपैकी कोण ते ठरवू असं सांगीतलं . खर तर यामागचं गोडबंगाल त्या दोघांच्या ध्यानी आलं नाही . नाण्यानं क्षणार्धात उंच भरारी घेतली आणि ते जमिनीवर विसावलं . छापा मातीमध्ये चितपट झाला होता . दोनचा काटा अभिमानानं आभाळाच्या दिशेनं पहात होता . मग काय दोघांना येणं भागच पडलं . आणि पुढचा प्रवास सुरु झाला . 



      रस्त्यात पुढे चांगलीच चढण होती . त्यातून पुढे दाट झाडीतून अडचणीचा रस्ता होता . कुठे कार्वी तर कुठे बांबूची दाट झाडीतून वाकून चालावे लागत होते .  पुढे झाडातून एका जागी दगडी पायऱ्यांची चढण पार करून  निसर्गाचा आनंद घेत पुढे चालते झालो . आणखी काही अंतर वर चढून गेल्यानंतर एका उंच दगडी पॅच जवळ पोहचलो . 



       इथे थोडी विश्रांतीची गरज होतीच . मागून हळू हळू चढणारे सहकारी टप्पा जवळ करीत होते . इथून खोल दरीतील आणि डोंगरामधील दाट झाडीचे विहंगम दृश्य दिसत होते . उत्तरेला कोळेश्वराचे पठार , शेजारील कमळगडाचा कडा नजर खेळवून ठेवत होता .  तेवढयात कोणीतरी म्हणाले , अरे हॅलीकॉप्टर बघा .... सगळ्यांच्या नजरा आकाशाकडे वळल्या . पण आवाज नाही आणि तेही नाही , कृष्णा तर मोबाईल कॅमेरा काढून फोटोसाठी तयारच होता . अभिजीत सरांनी आकाशात उडणारी घार दाखवली तेव्हा गमतीचा भाग उलगडला .  मध्येच ही घार उंच भरारी घेऊन जात होती . तीच्या पसरलेल्या पंखांखाली अख्खं जंगल सामावलेच्या आवेशात ती फिरत होती . येथेही थोडे फोटो काढण्यात वेळ गेला .  तेवढयात खाली खोल जंगलात वाटाड्याला कसलीतरी हालचाल जाणवली . दाट झाडीतून एंका गवताच्या भागात एक प्राणी बाहेर येत होता . ते सांबर आहे असं वाटाड्याने सांगितलं . पण काहीच कळून येत नव्हते . जाधव साहेब म्हणाले , लांडगा आहे . पण जेव्हा ते आणखी पुढे सरकलं तेव्हा भलं मोठं सांबर असल्याचं दिसून आलं . त्याचाही फोटो घ्यायला सगळे सरसावले . बराच वेळ गेला . पुढे एक दगडी कडा चढून जायचं होतं . कपारीला हात घालून हळू हळू एक एक जण वर चढू लागला . थोडं अवघड पण धाडसं आणखी बळावणारा हा पॅच होता . सगळे वर चढून गेले . तेथील मोठ्या दगडी कडयाजवळ फोटो काढून आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली .   



        काही अंतर गेल्यावर आर्थरसीट पॉईंट दिसू लागला . सर्वांनी गगनभेदी ललकारी दिली . आसमंतात तो जयघोष घुमला . वर असणारे पर्यटकांच्या नजरा खाली आवाजाचा शोध घेऊ लागल्याचे आमच्या लक्षात आले . पर्यटक या ठिकाणाहून खोल दरीतील सहयाद्रीचं वैभव पाहण्यात दंग असतात . पाहूनच भीती वाटावी असा हा प्रचंड अवघड परिसर आणि वाटा चढून कोणी वरती येईल हे त्यांच्या ध्यानीमनीही नसावे . पण आम्ही ते धाडस केलं होतं . उर्वरीत टप्पा पार करुन ठरलेल्या ठिकाणी पोहचलो . ट्रेक पूर्ण करण्याचा संकल्प तडीस नेल्याचा आनंद मोठा होता . 



   गाडीत बसून विश्रामगृहावर पोहचल्यावर जेवणाचा मस्त बेत केला होता . चपाती , डाळीचे वरण , मटकीची आणि बटाटा वाटाण्याची सुकी भाजी , श्रीखंड , भजी , भात , पापड असा मस्त मेनू होता . सर्वानी यथेच्छ जेवण केलं .  आम्ही सर्वजण पुन्हा गाडीत बसलो आणि थेट वाई गाठले . 

       जोर ते आर्थर सीट हा छोटेखानी पण निसर्गाने भारलेला मार्ग ट्रेकर्सना निश्चित आनंद देणारा आहे . 


- दशरथ ननावरे ( श्रीमंत )

  इतिहास अभ्यासक