॥ पावनखिंड - स्वराज्याचा लढा ॥
छत्रपती शिवाजी महाराज आणि ६०० बांधल मावळे पन्हाळगडाच्या वेढ्यातून निसटले. ३६४ वर्षापूर्वी पन्हाळ्याला सिद्धी जौहरचा वेढा पडला होता. तर दुसरीकडे पुण्यात शाहिस्तेखान येऊन बसला होता. स्वराज्य जर जिवंत ठेवायचे असेल तर महाराजांना या वेढ्यातून बाहेर पडणे गरजेचे होते. म्हणून महामूर पावसातील १२ जुलैची ती रात्र महाराजांनी निवडली. आषाढ महिना विजा कडकडत होत्या मुसळधार पाऊस कोसळत होता. अशा पावसामध्ये महाराजांनी पन्हाळगड पासून विशाळगड पर्यंतची दौड केली. मराठ्यांंच्या इतिहासातीलच न्हवे तर जगातील ज्या अद्वितीय सुटका गणल्या गेल्या आहेत त्यामध्ये पावनखिंडच युद्ध, पांढरपाण्याच युद्ध नावाजलेले आहेत. पावनखिंडची लढाई हि मराठ्यांच्या इतिहासातील महत्वाची लढाई आहे. महाराज आणि महाराजांच्या बरोबरचे ६०० मावळे, यातील ३०० मावळे बाजीप्रभू देशपांडे आणि बांधल वीर हे महाराजांच्या पाठीमागून येणाऱ्या शत्रूंना थांबवण्यासाठी खिंडीतच थांबले. आणि महाराज ३०० पधाती घेऊन विशाळगडाचा वेढा फोडून विशाळगड 'जवळ' करण्यास गेले. १२ जुलैला सुटलेली ही फौज १३ जुलैच्या रात्रीपर्यंत लढत होती. २४ तासाची ही लढाई आहे. या लढाईचा जो हेतू होता कि छत्रपतींंना, स्वराजाच्या संंस्थापकांना. लाखांच्या पोशिंद्याला सही सलामत विशाळगडावर पोहचवणे आणि हा हेतू साध्य झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय कर्तृत्वाने महाराष्ट्राच्या भूमीवर स्वतंत्र साम्राज्य उभे राहिले. मात्र यासाठी त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. स्वराज्याच्या रक्षणासाठी कित्येकदा स्वतःचे प्राण संकटात घालून योजना आखल्या आणि तेवढ्याच पराक्रमाने त्या यशस्वी केल्या. शिवरायांच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांनी महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील लोकांना प्रेरित केलं आहे. शिवइतिहासातील अनेक प्रसंगांनी शिवाजी महाराजांच्या धैर्याची प्रचिती येते तसेच ते रोमांचकही आहेत.पन्हाळगड ते विशाळगड हा महामूर पावसात रात्रीच्या अंधारातील केलेला प्रवास आणि त्यानंतरची पावनखिंडीत घनघोर लढाई म्हणजे इतिहासातील अविस्मरणीय दिन होय.
प्रतापगडाच्या पायथ्याशी १० नोव्हेंबर १६५९ रोजी अफजलखानाचा वध केल्यानंतर विजापूरच्या सैन्याची दाणादाण उडाली. महाराजांना खूप मोठा विजय मिळाला. एक मोठा शत्रू तर संपलाच परंतु शिवाजी महाराजांच्या सैन्याला शस्त्रास्त्रे मिळाली. अनेक प्रकारची मोठी लूट प्राप्त झाली. स्वराज्याला बळकटी देणारी ही घटना होती.
या लढ्यानंतर शिवाजी महारांजांनी आदिलशाहीच्या प्रांतात आणि कोकणात मोठी मजल मारायला सुरुवात केली. अफजलखानाच्या मृत्यूनंतर लगेच पुढची मोहीम हाती घेऊन केवळ एकवीस दिवसात १८ किल्ले आणि सुमारे २०० मैलाचा प्रदेश काबीज केला. यामध्ये शिवाजी महाराजांनी कोल्हापूर, पन्हाळा आणि कोकणात मोठा प्रदेश आपल्या ताब्यात घेतला.
शिवाजी महाराजांकडून हा प्रदेश आणि लूट परत मिळवण्यासाठी आलेल्या आदिलशाहीने पाठवलेल्या रुस्तुम-ए-जमान आणि अफजलखानाचा मुलगा फाजलखान यांचाही पराभव शिवाजी महाराजांनी केला. हे सगळं यश अगदी कमी काळात मिळालं होतं.
अफजलखानाच्या पराभवानंतर आदिलशाहाच्या साम्राज्याला मोठा धक्का बसला होता. त्यातच उर्वरित दक्षिणेकडील प्रदेश बळकावून एका पाठोपाठ एक जबर धक्के देण्याचं काम महाराजांनी केलं होतं. साहजिकच शिवाजी महाराजांना रोखणे गरजेचे होते. शिवाय गमावलेला मुलुख परत मिळवण्याचा प्रयत्न आदिलशहा करणार होता.
आदिलशहाने शिवाजी महाराजांवर हल्ला करण्यासाठी सिद्दी जौहरची नेमणूक केली होती. त्याच्याबरोबर अफजलखानाचा मुलगा फाजलखान, रुस्तुम- ए-जमान , सिद्धी मसूद आणि इतर सरदारांना पाठवलं. सिद्दीच्या फौजेत मराठा सरदारही होते. शिवाजी महाराजांनी जिंकून घेतलेली ठाणी पुन्हा जिंकून घेत सिद्दी पुढे सरकू लागला. अशा वेळेस शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्ल्यावर थांबण्याचा निर्णय घेतला. आणि सिद्धीने हीच संधी साधत पन्हाळ्याला वेढा देण्याचे ठरविले. हा काळा साधारणतः मार्च एप्रिल महिन्याचा होता. पुढे तोंडावर असलेला पावसाळा लक्षात घेता सिद्दीने वेढा दिल्यास थांबण्याचं योग्य केंद्र म्हणून महाराजांनी पन्हाळ्याची निवड केली असावी. वास्तविक सिद्धी पावसाळा सुरु होईपर्यंतच वेढा देऊ शकतो असा अंदाज होता. शिवाय गडावर भरपूर दारुगोळा आणि दाणागोटा भरून तयार होता. शिवाय पन्हाळा हा किल्ला स्वराज्याच्या सीमेवर असल्याने एकप्रकारे हे युद्ध आदिलशाही मुलखातच खेळले जाणार होते. त्यामुळे स्वराज्याच्या रयतेला तोशीस आजिबात दिली जाणार नव्हती.
नियोजित मोहीमेप्रमाणे एकेक ठाणी जिंकत सिद्दी जौहर पन्हाळ्याजवळ आला आणि त्याने किल्ल्याला वेढा दिला तसंच ५० ते ६० किमी अंतरावरील विशाळगड किल्ल्यालाही वेढा देऊन ठेवला होता. त्यामुळे महाराजांची सर्व बाजूने कोंडी झाली. सिद्दी जौहरने राजापूरच्या इंग्रजांकडून तोफ आणि दारुगोळाही मिळवला त्यामुळे त्याची बाजू अधिकच भक्कम झाली होती.
औरंगजेब मुघल साम्राज्याच्या बादशहा पदावर आल्यावर मुघल आणि आदिलशहा यांच्यात करार झाला.
पूर्वीच्या निजामशाहीतील अहमदनगरचा परिसर मुघलांच्या ताब्यात आला. शाहिस्तेखान त्यावेळेस दख्खनच्या सुभेदारीवर होता. शिवाजी महाराज पन्हाळा आणि कोल्हापूर परिसरात अडकल्यावर त्याने नगरमधून पुण्यावर स्वारी करायला सुरुवात केली. अनेक ठाणी जिंकूनही घेतली त्यामुळे महाराजांच्या राज्यावर मोठं संकट निर्माण झालं.
एकीकडे शाहिस्तेखान आणि दुसरीकडे सिद्दी जौहर अशा संकटात अडकलेल्या शिवाजी महाराजांना सोडवण्यासाठी नेताजी पालकर स्वतः सिद्दी हिलाल, सिद्दी वाहवाह यांना घेऊन महाराजांची सूटका करायला आले पण त्यांना यश आलं नाही. सिद्दी जौहरने पन्हाळ्याच्या जवळच झालेल्या लढाईत त्यांना माघारी परतवून लावलं.
शिवाजी महाराज मार्चपासून साधारणतः चार महिने पन्हाळ्यावर अडकून पडले होते. जुलै महिन्यातला जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे वेढा फुटेल असं वाटतं होतं पण तो आणखी कडक करण्यात आला. पण स्वराज्य दोन्ही बाजूने संकटात असताना आपण अडकून पडणे योग्य नाही असा विचार करून राजांनी हालचाली सुरु केल्या. मुसळधार पावसाचा फायदा उठवून वेढ्यातून बाहेर पडण्यास जागा शोधण्याचे ठरविले.
सिद्धीच्या सैन्याला गाफील ठेवण्यासाठी महाराजांनी आपण स्वतः स्वाधीन होत आहोत असा निरोप पाठवला. प्रत्यक्षात राजांनी स्वतःसारखा हुबेहूब दिसणार्या शिवा काशीद या मावळ्यास स्वतःचा वेश परिधान करून सिध्दीच्या भेटीला पाठविण्याचे ठरविले. खरं तरं महाराज आणि शिवा काशीद यांची फक्त जानेवारी पासूनची ओळख मात्र तरीही स्वराज्य कार्यात हा मावळा सहभागी झाला. या सर्व घडामोडीसाठी १२ जुलै १६६० ची भरपावसाळ्याची रात्र निवडली.
एकीकडे शिवा काशीद एका पालखीतून भेटीसाठी निघाले तर दुसरीकडे राजे स्वतः पन्हाळ्याच्या पश्चिमेस साधारणतः ६० किमी अंतरावर असलेल्या खेळणा म्हणजेच विशाळगडाकडे जाण्याचा निर्णय घेतला.
धो धो कोसळणारा पाऊस, त्यात आपल्या शरण येण्याच्या नाटकामुळे वेढ्यात तयार झालेली ढिलाई याचा त्यांना फायदा निश्चितपणे उठवता आला. पन्हाळ्याच्या पश्चिमेस असणाऱ्य़ा एका वाटेने ते सहाशे मावळ्यांसह राजे बाहेर पडले. तरीही या मोहिमेची चाहूल सिद्दी जौहरला लागलीच. सिद्दी जौहरने त्यांना थांबवण्यासाठी मोठं दळ पाठवलं. सुरुवातीला त्यांनी शिवा काशीद या महाराजांसारख्याच दिसणाऱ्या व्यक्तीस पालखीसह पकडले. राजे सापडल्याची खबर छावणीत पसरली. त्यांना सिद्धी जौहारपुढे हजर करण्यात आले. मात्र हे खरे महाराज नाहीत हे फाजलखानाच्या लक्षात आले. स्वराज्यासाठी शिवा काशीद यांनी बलिदान दिले. महाराज निसटले हे लक्षात आल्यावर त्यांनी त्वेषाने पाठलाग सुरू केला.
शिवाजी महाराजांनी विशाळगडावर जाऊ नये यासाठी वाटेत शृंगारपूरचे सुर्वे नेमले होतेच. हे अडथळे तसेच एकीकडे कोसळणारी अस्मानी आणि पाठलाग करणारी सुलतानी असं संकट पार करत त्यांना विशाळगडावर पोहोचायचं होतं. रात्रभर चिखलराडीतून केलेली धावाधाव आणि पाठीवर असणारा शत्रू यामुळे अखेर सिद्दीच्या सैन्याला रोखण्यासाठी एका ठिकाणी थांबण्याचा निर्णय झाला. पांढरपाणी नावाच्या जागेवरील गजापूरच्या खिंडीत बाजीप्रभू देशपांडे व बंधू फुलाजी देशपांडे यांचे हिरडस मावळातील निवडक आणि इतर सैन्य सिद्दी जौहरच्या सैन्याला रोखण्य़ासाठी थांबले आणि तिकडे शिवाजी महाराज निम्म्या शिबंदीनिशी विशाळगडाच्या दिशेने गेले.
या लढाईत बाजी प्रभू देशपांडे यांनी आपल्या असीम शौर्याचं दर्शन घडवलं. राजे गडावर पोहचून तोफांची इशारद देत नाहीत तोपर्यंत शत्रूला खिंड ओलांडू द्यायची नाही हा पण बाजींनी केला आणि तो तडीस नेला. परंतु बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे भाऊ फुलाजी प्रभू देशपांडे यांचे या लढाईत प्राण गेले. त्यांची विशाळगडावर समाधी बांधण्यात आली. १२ जुलै १६६० रोजी शिवाजी महाराज पन्हाळ्यावरुन निसटले आणि १३ जुलै रोजी विशाळगडावर पोहोचले. पण त्यासाठी गजापूरच्या खिंडीत मावळ्यांनी प्राणाची बाजी लावली. तो आजचा दिवस ऐतिहासिक प्रेरणा देणारा आहे.
दशरथ ननावरे सर
इतिहास अभ्यासक