"का जडला हा रोग मजला, का जडली ही विदीर्ण व्याधी ।
दिसले माझे मरणच मजला, जीवन जगण्या आधी ॥ "
कुष्ठरोग्यांच्या आयुष्याची होणारी वाताहत अन् दैनंदिन जीवन जगण्यातली व्यथा इतक्या अल्प शब्दात मांडणारे आणि त्यांचे जीवन आपल्या परिसस्पर्शाने बदलवून टाकणारे एक महान व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. विलास वरे. खरं तरं कणभर करून मणभर गाजावाजा करणारे स्वयंघोपित अनेक समाजसेवक गावोगावी दिसतात. पण कुष्ठरोग्यांच्या आयुष्याचं सोनं करण्यासाठी आपल्या संपत्तीसह अखंड आयुष्य खर्ची घालणारे , त्यांच्या पूनर्वसनासाठी अहोरात्र झटून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करून जीवनाचा नवा मार्ग दाखविणारे डॉ. वरे मला थोर समाजसेवक बाबा आमटे, डॉ. प्रकाश आमटे यांच्यासारखेच भासतात. पडद्याआड राहिलेले त्यांचे खरे कार्य त्यांनी साकारलेल्या ' बहिष्कृतांचे अंतरंग ' या पुस्तकामुळे जगापुढे आले.
'बहिष्कृतांचे अंतरंग' हे त्यांचे पुस्तक महाराष्ट्र शासनाच्या कुष्ठरोग निर्मूलन योजनेअंतर्गत कुष्ठतंत्रज्ञ या पदावर कार्यरत असताना त्यांच्याकडून अनेक कुष्ठरुग्णांची उत्तम सेवा घडून गेली. त्यांना रोगातून बरे केले. कुष्ठ रुग्णांचा सर्वे करून शोध घेणे, तपासणी करणे, आवश्यक उपचार करून त्यांना रोगमुक्त करणे. एवढेच त्यांचे शासकीय काम होते. पण वरे सरांनी अनेक बहिष्कृत आणि निराधार कुष्ठरुग्णांना रोगमुक्त करून समाजाअंतर्गत पुनर्वसनही केले. हे त्यांचे कार्य खूपच मोठे आहे. या पुनर्वसन कार्यासाठी त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुनिता वरे यांनी खूप मोठे सहकार्य केले. त्या माऊलीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. प्रसिद्धीचा कोणताही सोस न बाळगता अबोलपणे त्यांनी केलेले कार्य हे राष्ट्र पातळीवर नव्हे तर जागतिक पातळीवर सुद्धा दखल घेण्यासारखेच आहे. कुष्ठरुग्णांना घडविताना उपसलेले कष्ट आणि केलेला त्याग पुस्तकातून वाचताना पुस्तकाच्या अनेक पानांवर माझे अश्रू ठिबकले.
स्वतःच्या कुटुंबाने, समाजाने ठोकरलेल्या अनेक बहिष्कृत कुष्ठरुग्णांना त्यांनी स्वतःच्या घरी आश्रय देण्याचे धाडस दाखवले. बहिष्कृतांच्या अंतरंग मध्ये त्यांनी त्यावर सविस्तरपणे लिहिलेले आहे. स्वतःच्या घरातून हाकलून दिलेल्या उदय आणि विठू या दोन किशोरवयीन कुष्ठरुग्णांना त्यांनी स्वतः घरात आश्रय दिला. स्वतःच्या लेकरांसारखे सांभाळले. नुसतेच सांभाळले नाही तर या दोन्ही बहिष्कृत विस्थापित लेकरांना समाजात स्वावलंबी करून त्यांना इतर नागरिकांसारखे प्रस्थापित जीवन प्राप्त करून दिले. तेही स्वतःच्या वेतनातला खर्च करून आणि इतर कोणाचीही मदत न घेता. निस्वार्थीपणे समाजसेवेचं हे द्योतक आहे.
उत्तर भारतातला सेंट्रींगचे काम करणारा एक महेंद्र नावाचा कुष्ठरोगी कामगार डॉ. वरे यांच्या संपर्कात येतो. त्यांच्या कठीण कौटुंबिक परिस्थितीत वरे यांची त्याला मदत होते आणि नंतर मात्र त्या महेंद्रच जीवनच बदलून जाते. कारण नंतरच्या काळात तो एक मोठा कलावंत होतो. माधव सारख्या एका कुष्ठरोग्यास ते पूर्णपणे स्वावलंबी करतात. अलका , गोविंदा , हरिबा या कुष्ठरोग्यांचेही ते समाजाअंतर्गत पुनर्वसन करतात आणि त्यांचे आयुष्य उजळून टाकतात. स्वतःच्या घरी मिक्सर आणण्याकरता जमवलेले पैसे हे दाम्पत्य श्रीपती सारख्या एका बहिष्कृत कुष्ठरुग्णाच्या नव्या पुनर्वसन कार्या करता देऊन टाकतात. त्यावेळी मात्र त्यांच्या त्यागाचे कौतुक करावे तेवढे थोडेच वाटते.
स्वतःच्या कर्तृत्वावर गावच्या पिण्याच्या पाण्याची सोय करणारा दादू. याला कुष्ठरोगाची बाधा झाल्यावर मात्र स्वतःच्याच गावातून आणि कुटुंबातून जेव्हा बहिष्कृत होऊन एका विराण अशा माळरानावर आपलं बहिष्कृत जीवन जगू लागतो. तेव्हा मन हेलावतं. लेखकाच्या आयुष्यात कुष्ठरोगी म्हणून आलेल्या संगीता नावाच्या तमाशा कलावंतीनीची कहाणी तर खूपच हृदयस्पर्शी आहे. तिच्या शापित जीवनाचा खराखुरा उद्धार या दांपत्यांनीच केला. तिला नवे आयुष्य प्राप्त करून दिले. सुमारे वर्षभर तिला आर्थिक मदत तर केलीच पण तिला तिची हरवलेली नृत्यकला परत मिळवून दिली. एका निस्पृह देशभक्त अशा कुष्ठरोगी स्वातंत्र्यसैनिकाचे त्यांनी आपल्यापुढे ठेवलेले एक अल्पसे चरित्र मनाला चटका लावून जाते. देशाचं रक्षण करणाऱ्या एका सैनिकाचे घर त्याच्या वडिलांना कुष्ठरोग झाल्यामुळे वाळीत टाकलं आणि त्या कुटुंबाला बहिष्कृत जीवन जगायला भाग पाडलं. त्यावेळी विचारी माणसाच्या मनाला नक्कीच वेदना होतात. दिनेश सारख्या एकाकी अविवाहित आयुष्य जगत असलेल्या मूक कुष्ठरुग्णाला वरे दांपत्य आपल्या घरच्या माणसांसारखं सांभाळतात. परंतु त्याचा दुर्दैवी अंत होतो. तेव्हा मात्र तो कुष्ठरोगी असल्याने त्याच्या अंत्यसंस्कारासाठी त्याचे जवळचे नातेवाईक येत नाहीत. डॉ. वरे यांनीच त्यांचा अंत्यसंस्कार केला. त्याच्या चितेला त्यांनीच अग्नी दिला. त्याच्या अस्थी त्यांनी दुःखी भावनेने निरा नदीत विसर्जित केल्या. अंत्यसंस्कारासाठी त्यांचे जवळचे नातेवाईक आले नाहीत परंतु त्याच्या मालकीच्या घरावर हक्क दाखविण्यासाठी मात्र ते हजर राहतात. त्यावेळी मात्र मन सुन्न होतं. उंटाची सवारी करणाऱ्या एका कुष्ठरुग्णाचे पुनर्वसन करताना डॉ. सदाशिव शिवदे यांची वरे सरांना झालेली मदत एका त्यागी मैत्री पर्वाचे दर्शन घडविते. स्वतःच्या बहिष्कृत जीवनाला कंटाळून नानी जेव्हा मरण स्वीकारते. तेव्हा माझ्या डोळ्यातले पाणी दीर्घ वेळेपर्यंत वाहत होते. पुस्तकाच्या अनेक ओळी वाचताना तसे तर माझ्या डोळ्यातून अनेकदा पाणी आले. अंतःकरण अनेकदा विदीर्ण झाले. अनेकांच्या आयुष्याची परवड वाचताना डोळ्यातून पाणी आल्या वाचून कसे राहील.
मला आणखी दोन प्रसंगांचा इथे उल्लेख करावाच लागेल. एक म्हणजे या देशाचे निस्पृह , थोर लोकनेते दिवंगत यशवंतराव चव्हाण आणि वरे दाम्पत्य यांची झालेली अविस्मरणीय भेट. यशवंतरावांनी त्यांना दिलेला कुष्ठरोग्यांच्या समाजांतर्गत पुनर्वसनाचा सल्ला. डॉ.वरे यांना पुढील समाजसेवेच्या आयुष्यात अत्यंत उपयुक्त ठरला. सौ. सुनीता वरे यांचे खूप मोठे भाग्य की स्वतः यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्या माऊलीची ओटी भरली. एका थोर लोकनेत्याने त्या समाजसेवी दाम्पत्यांचा केलेला सन्मान एका मोठ्या अपूर्व अशा मानसिकतेचे लक्षण आहे. आणि दुसरा प्रसंग म्हणजे पुलंची आणि लेखक विलास वरे यांची झालेली भेट. त्यांच्या साहित्याला पुलंची प्रस्तावना मिळणार होती पण दुर्दैवाने ती मिळाली नाही. नशिबात काहीतरी चांगले यावे आणि दुर्दैवाने ते हिरावून न्यावे असेच काहीतरी झाले. परीस भेटला पण स्पर्श राहून गेला. हा प्रसंग वाचताना माझ्या मनाला हुरहुर वाटली.
चंदर या पूर्वाश्रमीच्या कुष्ठरोगी तमाशा कलावंतास कोरोना काळात लेखकाने केलेली मदत मनाला भावनात्मकतेचा स्पर्श करते. बहिष्कृतांच्या अंतरंग मधला तो शेवटचा प्रसंग देखील भावनात्मक असाच आहे.
बहिष्कृत यांचे अंतरंग वाचताना मला असेही अनेक वेळा जाणवले की श्री विलास वरे हे लेखक म्हणून जेवढे महान आहेत तेवढेच ते एक समाजसेवक म्हणूनही महान आहेत. कुष्ठरुग्णांचे समाजांतर्गत पुनर्वसन करणारा त्यांच्यासारखा कोणी दुसरा असेल असे मला वाटत नाही. मी एवढंच म्हणेन की, मराठीतल्या समीक्षकांनी विलास वरे यांची बहिष्कृतांच्या अंतरंग ही साहित्यकृती मराठी समीक्षेपासून बहिष्कृत कधी ठेवू नये. कारण ही साहित्यकृती केवळ पुस्तक नाही तर निस्वार्थी समाजसेवेचं व्रत आहे. एका वेगळ्या विषयावरचा एक खूप मोठा दस्ताऐवज आहे. बहिष्कृतांच्या वेदनेचा तो एक इतिहास आहे. हा वास्तववादी इतिहास काळाच्या विस्मरणात कधीही जाऊ नये अशीच अपेक्षा आहे.
या साहित्यकृतीची दखल राज्य , राष्ट्र पातळीवर तर जरूर घ्यावी पण जागतिक पातळीवर पण त्याचा विचार व्हावा इतका दर्जा त्या साहित्यकृतीस नक्कीच आहे. त्यागाचं मूर्तिमंत उदाहरण असलेलं हे पुस्तक प्रत्येकाच्या घरी असलंच पाहिजे. नव्या पिढीला समाजाप्रती दातृत्वाची आणि कर्तव्याची शिकवण देणारे हे आत्मकथन आणि वरे दाम्पत्यांचं कार्य आहे. त्यांच्या कार्याला त्रिवार सलाम !
दशरथ ननावरे सर ( श्रीमंत )
इतिहास अभ्यासक, प्रेरणादायी वक्ते
( लेखक विलास वरे - संपर्क - 9960352050 )