व्रतस्थ लोकसेवक - संभाजीराव साळुंखे ( आण्णा )
सातारा जिल्हा हा क्रांतीकारकांचा मानला जातो आणि राजकीय क्रांतीची मशाल बनलेल्या जिल्ह्यात नवं अढळ स्थान बनविण्यासाठी गेले एक तप अविरत काम करणारे, गावासाठी नवचैतन्याची उमेद घेऊन आलेले, आणि पुन्हा एकदा जनसेवेचा झंझावात निर्माण करण्यासाठी स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेऊन लोक परिवर्तनाची नवी चळवळ निर्मिण्यासाठी सज्ज झालेले व्रतस्थ लोकसेवक म्हणून संभाजीराव साळुंखे ( आण्णा ) हे नवं नेतृत्व पुढे येऊ लागले आहे .
मणभर चर्चा करण्यापेक्षा कणभर आचरण श्रेष्ठ असते. आपल्या कर्तत्वाच्या बळावर अल्पावधित खंडाळा तालुक्यातील भादे गावातील लोकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. गावात विकासाच्या नव्या दिशा दाखविण्यासाठी परिवर्तनाचा ध्यास घेऊन समाजकारणाचा नवा अध्याय मांडणारे, शांत, संयमी, सुसंस्कृत, अभ्यासू आणि मनमिळावू व्यक्तिमत्व असलेले संभाजीअण्णा यांनी पुन्हा एकदा लोकपरिवर्तनाचा ध्यास घेऊन नवे पर्व सुरू केले आहे.
आधुनिक युगात राजकारणाचे स्वप्न मनात बाळगून समाजकारणाचा पुळका आणणाऱ्या नेत्यांची वाणवा दिसत नाही. पण कष्टाच्या कमाईवर समाजाच्या कल्याणासाठी झगडणारे आण्णासाहेबांसारखे क्वचितच पहायला मिळतात. खंडाळ्यासारख्या दुष्काळी भागात जन्म झालेले मात्र विचारांचा सुकाळ जवळ बाळगून स्वकर्तृत्वावर मोठे झालेले हे नवे नेतृत्व उदयास येत आहे. माझ्यासह माझी जनता मोठी व्हावी ही वृत्ती त्यांना समाजकारणात घेऊन आली. गोरगरीब जनतेचे अश्रू पुसून सर्वसामान्यांच्या विकासाला प्राधान्य देण्याची आणि माणसांची जगण्याची उमेद कायम ठेवण्यात त्यांनी धन्यता मानून काम सुरू केले आहे.
खंडाळा तालुक्यातील भादे जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण विकासासाठी मजबूत संघटन पाहिजे ही काळाची गरज ओळखून संभाजीआण्णा साळुंखे प्रतिष्ठानची स्थापना केली. खेळाडूंना प्रोत्साहन , वारकऱ्यांचा सन्मान, लोकांच्या अर्थार्जनासाठी व्यावसायिक मार्गदर्शन, दिव्यांगांना मदत, आरोग्य शिबिरे, गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार, ग्रामदैवतांच्या मंदिरांचे जिर्णोद्धार, व्यायाम शाळा उभारणी, ग्रामवाचनालय, कुस्ती आखाडे, अनाथ व रुग्णांना मदत, शैक्षणिक साहित्यांचे वाटप, वारकऱ्यांना साहित्य भेट, निवासस्थानांसाठी आर्थिक सहकार्य अशी एक ना अनेक कामे स्वतःच्या हिमतीवर करून दाखविली.
'बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले ' या उक्तीप्रमाणे दिलेला शब्द पूर्ण करणे ही त्यांची खासियत राहिली आहे, सत्तेवर पोहचल्यावर शासनाच्या निधीतून कामे करून स्वतःच्या कार्याचा दिंडोरा पिटणाऱ्या नेत्यांची यादी कमी नाही, पण कोणतीही सत्तास्थाने हाती नसताना लाखो रुपयांची कामे करण्याची किमया त्यांनी साधली. आता भविष्यात आला सत्तेची जोड मिळाली तर मतदारसंघात अमुलाग्र बदल घडविणे अशक्य नाही याची खात्री जनतेच्या मनात निर्माण होऊ लागली आहे.
लोकांच्या कामांसाठी सरकार दरबारी जाणीव करून देऊन उठाव करणे गरजेचे असते. आण्णांनी नेहमीच याकडे कटाक्षाने लक्ष पुरविले. त्यासाठी सर्वप्रथम गावात परिवर्तन घडविणे काळाची गरज ओळखून ग्रामपंचायत रिंगणात आपल्या शिलेदारांना घेऊन परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून यशस्वी लढा दिला. गावची सत्ता काबीज करून प्रत्येक माणसांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्या दारापर्यंत विकासकामे नेण्याचा दृढनिश्चय पूर्ण केला. ग्रामपंचायत निवडणूकीत गावाला दिलेला प्रत्येक शब्द खरा करून दाखविण्याची किमया त्यांनी साधली.
स्वतःच्या फायदयापेक्षा जनतेचे कल्याण डोळ्यासमोर ठेवून काम करणारा धडाडीचा कार्यकर्ता कधीतरी तयार होत असतो. आजवर जे सत्ता भोगणाऱ्यांना जमले नाही ते स्वबळावर करण्याची धमक त्यांनी दाखवून दिली.
राजकीय प्रवासात अनेक चढउतार सहन करीत त्यांनी जनसेवेचे व्रत अखंडपणे जोपासले आहे. खरं तर गावची जबाबदारी स्विकारल्यावर लोकांमध्ये आलेली मरगळ दूर करून कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देऊन त्यांच्या पंखात नवे बळ दिले. राजकारण होत राहिल पण समाजाच्या प्रश्नांसाठी मागे हटायचे नाही ही भूमिका घेऊन काम केले. सार्वजनिक जीवनात सत्ता, पैसा, वेळ आणि निष्ठा यांना बगल देणारे अनेक लोक आण्णांच्या जीवनात आले मात्र असेही अनुभव गाठीशी बांधून नव्या उमेदीने काम केले. सार्वजनिक जीवनात वावरण्याचं भान बाळगणाऱ्या या नेतृत्वाची जनसामान्यांच्या विकासासाठी नवी झेप घेण्याची दृढ इच्छा आहे. भादे गटाला स्वतःच्या खांदयावर पेलण्याची क्षमता बाळगून असलेल्या या नेतृत्वाला लोकांचं बळ मिळालं तर गावोगावी विकासकामांचं नवं पर्व उभं राहिल हे मात्र निश्चित आहे.
आण्णांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा !
अभिष्टचिंतन !!
दशरथ ननावरे सर (श्रीमंत)
इतिहास अभ्यासक, प्रेरणादायी वक्ते
