Pages

Saturday, 22 March 2025

बहिष्कृतांचे अंतरंग - एका त्यागी जीवनाची कहाणी

 


"का जडला हा रोग मजला, का जडली ही विदीर्ण व्याधी ।

दिसले माझे मरणच मजला, जीवन जगण्या आधी ॥ "

कुष्ठरोग्यांच्या आयुष्याची होणारी वाताहत अन् दैनंदिन जीवन जगण्यातली व्यथा इतक्या अल्प शब्दात मांडणारे आणि त्यांचे जीवन आपल्या परिसस्पर्शाने बदलवून टाकणारे एक महान व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. विलास वरे. खरं तरं कणभर करून मणभर गाजावाजा करणारे स्वयंघोपित अनेक समाजसेवक गावोगावी दिसतात. पण कुष्ठरोग्यांच्या आयुष्याचं सोनं करण्यासाठी आपल्या संपत्तीसह अखंड आयुष्य खर्ची घालणारे , त्यांच्या पूनर्वसनासाठी अहोरात्र झटून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करून जीवनाचा नवा मार्ग दाखविणारे डॉ. वरे मला थोर समाजसेवक बाबा आमटे, डॉ. प्रकाश आमटे यांच्यासारखेच भासतात. पडद्याआड राहिलेले त्यांचे खरे कार्य त्यांनी साकारलेल्या ' बहिष्कृतांचे अंतरंग ' या पुस्तकामुळे जगापुढे आले. 

       'बहिष्कृतांचे अंतरंग' हे त्यांचे पुस्तक महाराष्ट्र शासनाच्या कुष्ठरोग निर्मूलन योजनेअंतर्गत कुष्ठतंत्रज्ञ या पदावर कार्यरत असताना त्यांच्याकडून अनेक कुष्ठरुग्णांची उत्तम सेवा घडून गेली. त्यांना रोगातून बरे केले. कुष्ठ रुग्णांचा सर्वे करून शोध घेणे, तपासणी करणे, आवश्यक उपचार करून त्यांना रोगमुक्त करणे. एवढेच त्यांचे शासकीय काम होते. पण वरे सरांनी अनेक बहिष्कृत आणि निराधार कुष्ठरुग्णांना रोगमुक्त करून समाजाअंतर्गत पुनर्वसनही केले. हे त्यांचे कार्य खूपच मोठे आहे. या पुनर्वसन कार्यासाठी त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुनिता वरे यांनी खूप मोठे सहकार्य केले. त्या माऊलीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. प्रसिद्धीचा कोणताही सोस न बाळगता अबोलपणे त्यांनी केलेले कार्य हे राष्ट्र पातळीवर नव्हे तर जागतिक पातळीवर सुद्धा दखल घेण्यासारखेच आहे. कुष्ठरुग्णांना घडविताना उपसलेले कष्ट आणि केलेला त्याग  पुस्तकातून वाचताना पुस्तकाच्या अनेक पानांवर माझे अश्रू ठिबकले. 

      स्वतःच्या कुटुंबाने, समाजाने ठोकरलेल्या अनेक बहिष्कृत कुष्ठरुग्णांना त्यांनी स्वतःच्या घरी आश्रय देण्याचे धाडस दाखवले. बहिष्कृतांच्या अंतरंग मध्ये त्यांनी त्यावर सविस्तरपणे लिहिलेले आहे. स्वतःच्या घरातून हाकलून दिलेल्या उदय आणि विठू या दोन किशोरवयीन कुष्ठरुग्णांना त्यांनी स्वतः घरात आश्रय दिला. स्वतःच्या लेकरांसारखे सांभाळले. नुसतेच सांभाळले नाही तर या दोन्ही बहिष्कृत विस्थापित लेकरांना समाजात स्वावलंबी करून त्यांना इतर नागरिकांसारखे प्रस्थापित जीवन प्राप्त करून दिले. तेही स्वतःच्या वेतनातला खर्च करून आणि  इतर कोणाचीही मदत न घेता. निस्वार्थीपणे समाजसेवेचं हे द्योतक आहे. 

             उत्तर भारतातला सेंट्रींगचे काम करणारा एक महेंद्र नावाचा कुष्ठरोगी कामगार डॉ. वरे यांच्या संपर्कात येतो. त्यांच्या कठीण कौटुंबिक परिस्थितीत वरे यांची त्याला मदत होते आणि नंतर मात्र त्या महेंद्रच जीवनच बदलून जाते. कारण नंतरच्या काळात तो एक मोठा कलावंत होतो. माधव सारख्या एका कुष्ठरोग्यास ते पूर्णपणे स्वावलंबी करतात. अलका , गोविंदा , हरिबा या कुष्ठरोग्यांचेही ते समाजाअंतर्गत पुनर्वसन करतात आणि त्यांचे आयुष्य उजळून टाकतात. स्वतःच्या घरी मिक्सर आणण्याकरता जमवलेले पैसे हे दाम्पत्य श्रीपती सारख्या एका बहिष्कृत कुष्ठरुग्णाच्या नव्या पुनर्वसन कार्या करता देऊन टाकतात. त्यावेळी मात्र त्यांच्या त्यागाचे कौतुक करावे तेवढे थोडेच वाटते. 

            स्वतःच्या कर्तृत्वावर गावच्या पिण्याच्या पाण्याची सोय करणारा दादू. याला कुष्ठरोगाची बाधा झाल्यावर मात्र स्वतःच्याच गावातून आणि कुटुंबातून जेव्हा बहिष्कृत होऊन एका विराण अशा माळरानावर आपलं बहिष्कृत जीवन जगू लागतो. तेव्हा मन हेलावतं. लेखकाच्या आयुष्यात कुष्ठरोगी म्हणून आलेल्या संगीता नावाच्या तमाशा कलावंतीनीची कहाणी तर खूपच हृदयस्पर्शी आहे. तिच्या शापित जीवनाचा खराखुरा उद्धार या दांपत्यांनीच केला. तिला नवे आयुष्य प्राप्त करून दिले. सुमारे वर्षभर तिला आर्थिक मदत तर केलीच पण तिला तिची हरवलेली नृत्यकला परत मिळवून दिली. एका निस्पृह देशभक्त अशा कुष्ठरोगी स्वातंत्र्यसैनिकाचे त्यांनी आपल्यापुढे ठेवलेले एक अल्पसे चरित्र मनाला चटका लावून जाते. देशाचं रक्षण करणाऱ्या एका सैनिकाचे घर त्याच्या वडिलांना कुष्ठरोग झाल्यामुळे वाळीत टाकलं आणि त्या कुटुंबाला बहिष्कृत जीवन जगायला भाग पाडलं. त्यावेळी विचारी माणसाच्या मनाला नक्कीच वेदना होतात. दिनेश सारख्या एकाकी अविवाहित आयुष्य जगत असलेल्या मूक कुष्ठरुग्णाला वरे दांपत्य आपल्या घरच्या माणसांसारखं सांभाळतात. परंतु त्याचा दुर्दैवी अंत होतो. तेव्हा मात्र तो कुष्ठरोगी असल्याने त्याच्या अंत्यसंस्कारासाठी त्याचे जवळचे नातेवाईक येत नाहीत.  डॉ. वरे यांनीच त्यांचा अंत्यसंस्कार केला. त्याच्या चितेला त्यांनीच अग्नी दिला. त्याच्या अस्थी त्यांनी दुःखी भावनेने निरा नदीत विसर्जित केल्या. अंत्यसंस्कारासाठी त्यांचे जवळचे नातेवाईक आले नाहीत परंतु त्याच्या मालकीच्या घरावर हक्क दाखविण्यासाठी मात्र ते हजर राहतात. त्यावेळी मात्र मन सुन्न होतं. उंटाची सवारी करणाऱ्या एका कुष्ठरुग्णाचे पुनर्वसन करताना डॉ. सदाशिव शिवदे यांची वरे सरांना झालेली मदत एका त्यागी मैत्री पर्वाचे दर्शन घडविते. स्वतःच्या बहिष्कृत जीवनाला कंटाळून नानी जेव्हा मरण स्वीकारते. तेव्हा माझ्या डोळ्यातले पाणी दीर्घ वेळेपर्यंत वाहत होते. पुस्तकाच्या अनेक ओळी वाचताना तसे तर माझ्या डोळ्यातून अनेकदा पाणी आले. अंतःकरण अनेकदा विदीर्ण झाले. अनेकांच्या आयुष्याची परवड वाचताना डोळ्यातून पाणी आल्या वाचून कसे राहील.

      मला आणखी दोन प्रसंगांचा इथे उल्लेख करावाच लागेल. एक म्हणजे या देशाचे निस्पृह , थोर लोकनेते दिवंगत यशवंतराव चव्हाण आणि वरे दाम्पत्य यांची झालेली अविस्मरणीय भेट. यशवंतरावांनी त्यांना दिलेला कुष्ठरोग्यांच्या समाजांतर्गत पुनर्वसनाचा सल्ला. डॉ.वरे यांना पुढील समाजसेवेच्या आयुष्यात अत्यंत उपयुक्त ठरला. सौ. सुनीता वरे यांचे खूप मोठे भाग्य की स्वतः यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्या माऊलीची ओटी भरली. एका थोर लोकनेत्याने त्या समाजसेवी दाम्पत्यांचा केलेला सन्मान एका मोठ्या अपूर्व अशा मानसिकतेचे लक्षण आहे.  आणि दुसरा प्रसंग म्हणजे पुलंची आणि लेखक विलास वरे यांची झालेली भेट. त्यांच्या साहित्याला पुलंची प्रस्तावना मिळणार होती पण दुर्दैवाने ती मिळाली नाही. नशिबात काहीतरी चांगले यावे आणि दुर्दैवाने ते हिरावून न्यावे असेच काहीतरी झाले. परीस भेटला पण स्पर्श राहून गेला. हा प्रसंग वाचताना माझ्या मनाला हुरहुर वाटली.

            चंदर या पूर्वाश्रमीच्या कुष्ठरोगी तमाशा कलावंतास कोरोना काळात लेखकाने केलेली मदत मनाला भावनात्मकतेचा स्पर्श करते. बहिष्कृतांच्या अंतरंग मधला तो शेवटचा प्रसंग देखील भावनात्मक असाच आहे.

       बहिष्कृत यांचे अंतरंग वाचताना मला असेही अनेक वेळा जाणवले की श्री विलास वरे हे लेखक म्हणून जेवढे महान आहेत तेवढेच ते एक समाजसेवक म्हणूनही महान आहेत. कुष्ठरुग्णांचे समाजांतर्गत पुनर्वसन करणारा त्यांच्यासारखा कोणी दुसरा असेल असे मला वाटत नाही. मी एवढंच म्हणेन की, मराठीतल्या समीक्षकांनी विलास वरे यांची बहिष्कृतांच्या अंतरंग ही साहित्यकृती मराठी समीक्षेपासून बहिष्कृत कधी ठेवू नये. कारण ही साहित्यकृती केवळ पुस्तक नाही तर निस्वार्थी समाजसेवेचं व्रत आहे. एका वेगळ्या विषयावरचा एक खूप मोठा दस्ताऐवज आहे. बहिष्कृतांच्या वेदनेचा तो एक इतिहास आहे.  हा वास्तववादी इतिहास काळाच्या विस्मरणात कधीही जाऊ नये अशीच अपेक्षा आहे. 

                या साहित्यकृतीची दखल राज्य ,  राष्ट्र पातळीवर तर जरूर घ्यावी पण जागतिक पातळीवर पण त्याचा विचार व्हावा इतका दर्जा त्या साहित्यकृतीस नक्कीच आहे. त्यागाचं मूर्तिमंत उदाहरण असलेलं हे पुस्तक प्रत्येकाच्या घरी असलंच पाहिजे. नव्या पिढीला समाजाप्रती दातृत्वाची आणि कर्तव्याची शिकवण देणारे हे आत्मकथन आणि वरे दाम्पत्यांचं कार्य आहे. त्यांच्या कार्याला त्रिवार सलाम ! 

                

       दशरथ ननावरे सर ( श्रीमंत )

      इतिहास अभ्यासक, प्रेरणादायी वक्ते 

( लेखक विलास वरे - संपर्क - 9960352050 )


Friday, 12 July 2024

पावनखिंड - स्वराज्याचा लढा

     ॥ पावनखिंड - स्वराज्याचा लढा ॥ 



 छत्रपती शिवाजी महाराज आणि ६०० बांधल मावळे पन्हाळगडाच्या वेढ्यातून निसटले. ३६४ वर्षापूर्वी पन्हाळ्याला सिद्धी जौहरचा वेढा पडला होता.  तर दुसरीकडे पुण्यात शाहिस्तेखान येऊन बसला होता. स्वराज्य जर जिवंत ठेवायचे असेल तर महाराजांना या वेढ्यातून बाहेर पडणे गरजेचे होते. म्हणून महामूर पावसातील १२ जुलैची ती रात्र महाराजांनी निवडली. आषाढ महिना विजा कडकडत होत्या मुसळधार पाऊस कोसळत होता. अशा पावसामध्ये महाराजांनी पन्हाळगड पासून विशाळगड पर्यंतची दौड केली. मराठ्यांंच्या इतिहासातीलच न्हवे तर जगातील ज्या अद्वितीय सुटका गणल्या गेल्या आहेत त्यामध्ये पावनखिंडच युद्ध, पांढरपाण्याच युद्ध नावाजलेले आहेत. पावनखिंडची लढाई हि मराठ्यांच्या इतिहासातील महत्वाची लढाई आहे. महाराज आणि महाराजांच्या बरोबरचे ६०० मावळे, यातील ३०० मावळे बाजीप्रभू देशपांडे आणि बांधल वीर हे महाराजांच्या पाठीमागून येणाऱ्या शत्रूंना थांबवण्यासाठी खिंडीतच थांबले. आणि महाराज ३०० पधाती घेऊन विशाळगडाचा वेढा फोडून विशाळगड 'जवळ' करण्यास गेले. १२ जुलैला सुटलेली ही फौज १३ जुलैच्या रात्रीपर्यंत लढत होती. २४ तासाची ही लढाई आहे. या लढाईचा जो हेतू होता कि छत्रपतींंना, स्वराजाच्या संंस्थापकांना. लाखांच्या पोशिंद्याला सही सलामत विशाळगडावर पोहचवणे आणि हा हेतू साध्य झाला. 


         छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय कर्तृत्वाने महाराष्ट्राच्या भूमीवर स्वतंत्र साम्राज्य उभे राहिले. मात्र यासाठी त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. स्वराज्याच्या रक्षणासाठी कित्येकदा स्वतःचे प्राण संकटात घालून योजना आखल्या आणि तेवढ्याच पराक्रमाने त्या यशस्वी केल्या. शिवरायांच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांनी महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील लोकांना प्रेरित केलं आहे. शिवइतिहासातील अनेक प्रसंगांनी शिवाजी महाराजांच्या धैर्याची प्रचिती येते तसेच ते रोमांचकही आहेत.पन्हाळगड ते विशाळगड हा महामूर पावसात रात्रीच्या अंधारातील केलेला प्रवास आणि त्यानंतरची पावनखिंडीत घनघोर लढाई म्हणजे इतिहासातील अविस्मरणीय दिन होय. 

     प्रतापगडाच्या पायथ्याशी १० नोव्हेंबर १६५९ रोजी अफजलखानाचा वध केल्यानंतर  विजापूरच्या सैन्याची दाणादाण उडाली. महाराजांना खूप मोठा विजय मिळाला. एक मोठा शत्रू तर संपलाच परंतु शिवाजी महाराजांच्या सैन्याला  शस्त्रास्त्रे मिळाली. अनेक प्रकारची मोठी लूट प्राप्त झाली. स्वराज्याला बळकटी देणारी ही घटना होती. 

          या लढ्यानंतर शिवाजी महारांजांनी आदिलशाहीच्या प्रांतात आणि कोकणात मोठी मजल मारायला सुरुवात केली. अफजलखानाच्या मृत्यूनंतर लगेच पुढची मोहीम हाती घेऊन केवळ एकवीस दिवसात १८ किल्ले आणि सुमारे २०० मैलाचा प्रदेश काबीज केला. यामध्ये शिवाजी महाराजांनी कोल्हापूर, पन्हाळा आणि कोकणात मोठा प्रदेश आपल्या ताब्यात घेतला.

      शिवाजी महाराजांकडून हा प्रदेश आणि लूट परत मिळवण्यासाठी आलेल्या आदिलशाहीने पाठवलेल्या रुस्तुम-ए-जमान आणि अफजलखानाचा मुलगा फाजलखान यांचाही पराभव शिवाजी महाराजांनी केला. हे सगळं यश अगदी कमी काळात मिळालं होतं.

       अफजलखानाच्या पराभवानंतर आदिलशाहाच्या साम्राज्याला मोठा धक्का बसला होता. त्यातच उर्वरित दक्षिणेकडील प्रदेश बळकावून एका पाठोपाठ एक जबर धक्के देण्याचं काम महाराजांनी केलं होतं. साहजिकच शिवाजी महाराजांना रोखणे गरजेचे होते. शिवाय गमावलेला मुलुख परत मिळवण्याचा प्रयत्न आदिलशहा करणार होता. 

     आदिलशहाने शिवाजी महाराजांवर हल्ला करण्यासाठी सिद्दी जौहरची नेमणूक केली होती. त्याच्याबरोबर अफजलखानाचा मुलगा फाजलखान, रुस्तुम- ए-जमान , सिद्धी मसूद आणि इतर सरदारांना पाठवलं. सिद्दीच्या फौजेत मराठा सरदारही होते. शिवाजी महाराजांनी जिंकून घेतलेली ठाणी पुन्हा जिंकून घेत सिद्दी पुढे सरकू लागला. अशा वेळेस शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्ल्यावर थांबण्याचा निर्णय घेतला. आणि सिद्धीने हीच संधी साधत पन्हाळ्याला वेढा देण्याचे ठरविले. हा काळा साधारणतः मार्च एप्रिल महिन्याचा होता. पुढे तोंडावर असलेला पावसाळा लक्षात घेता सिद्दीने वेढा दिल्यास थांबण्याचं योग्य केंद्र म्हणून महाराजांनी पन्हाळ्याची निवड केली असावी. वास्तविक सिद्धी पावसाळा सुरु होईपर्यंतच वेढा देऊ शकतो असा अंदाज होता. शिवाय गडावर भरपूर दारुगोळा आणि दाणागोटा भरून तयार होता. शिवाय पन्हाळा हा किल्ला स्वराज्याच्या सीमेवर असल्याने एकप्रकारे हे युद्ध आदिलशाही मुलखातच खेळले जाणार होते. त्यामुळे स्वराज्याच्या रयतेला तोशीस आजिबात दिली जाणार नव्हती.

     नियोजित मोहीमेप्रमाणे एकेक ठाणी जिंकत सिद्दी जौहर पन्हाळ्याजवळ आला आणि त्याने किल्ल्याला वेढा दिला तसंच ५० ते ६० किमी अंतरावरील विशाळगड किल्ल्यालाही वेढा देऊन ठेवला होता. त्यामुळे महाराजांची सर्व बाजूने कोंडी झाली. सिद्दी जौहरने राजापूरच्या इंग्रजांकडून तोफ आणि दारुगोळाही मिळवला त्यामुळे त्याची बाजू अधिकच भक्कम झाली होती.

            औरंगजेब मुघल साम्राज्याच्या बादशहा पदावर आल्यावर मुघल आणि आदिलशहा यांच्यात करार झाला.

पूर्वीच्या निजामशाहीतील अहमदनगरचा परिसर मुघलांच्या ताब्यात आला. शाहिस्तेखान त्यावेळेस दख्खनच्या सुभेदारीवर होता. शिवाजी महाराज पन्हाळा आणि कोल्हापूर परिसरात अडकल्यावर त्याने नगरमधून पुण्यावर स्वारी करायला सुरुवात केली. अनेक ठाणी जिंकूनही घेतली त्यामुळे महाराजांच्या राज्यावर मोठं संकट निर्माण झालं.

     एकीकडे शाहिस्तेखान आणि दुसरीकडे सिद्दी जौहर अशा संकटात अडकलेल्या शिवाजी महाराजांना सोडवण्यासाठी नेताजी पालकर स्वतः सिद्दी हिलाल, सिद्दी वाहवाह यांना घेऊन महाराजांची सूटका करायला आले पण त्यांना यश आलं नाही. सिद्दी जौहरने पन्हाळ्याच्या जवळच झालेल्या लढाईत त्यांना माघारी परतवून लावलं.

          शिवाजी महाराज मार्चपासून साधारणतः चार महिने पन्हाळ्यावर अडकून पडले होते. जुलै महिन्यातला जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे वेढा फुटेल असं वाटतं होतं पण तो आणखी कडक करण्यात आला. पण स्वराज्य दोन्ही बाजूने संकटात असताना आपण अडकून पडणे योग्य नाही असा विचार करून राजांनी हालचाली सुरु केल्या. मुसळधार पावसाचा फायदा उठवून वेढ्यातून बाहेर पडण्यास जागा शोधण्याचे ठरविले. 

  सिद्धीच्या सैन्याला गाफील ठेवण्यासाठी महाराजांनी आपण स्वतः स्वाधीन होत आहोत असा निरोप पाठवला. प्रत्यक्षात राजांनी स्वतःसारखा हुबेहूब दिसणार्‍या शिवा काशीद या मावळ्यास स्वतःचा वेश परिधान करून सिध्दीच्या भेटीला पाठविण्याचे ठरविले. खरं तरं महाराज आणि शिवा काशीद यांची फक्त जानेवारी पासूनची ओळख मात्र तरीही स्वराज्य कार्यात हा मावळा सहभागी झाला.  या सर्व घडामोडीसाठी १२ जुलै १६६० ची भरपावसाळ्याची रात्र निवडली. 

          एकीकडे शिवा काशीद एका पालखीतून भेटीसाठी निघाले तर दुसरीकडे राजे स्वतः पन्हाळ्याच्या पश्चिमेस साधारणतः ६० किमी अंतरावर असलेल्या खेळणा म्हणजेच विशाळगडाकडे जाण्याचा निर्णय घेतला.

    धो धो कोसळणारा पाऊस, त्यात आपल्या शरण येण्याच्या नाटकामुळे वेढ्यात तयार झालेली ढिलाई याचा त्यांना फायदा निश्चितपणे उठवता आला. पन्हाळ्याच्या पश्चिमेस असणाऱ्य़ा एका वाटेने ते सहाशे मावळ्यांसह राजे बाहेर पडले. तरीही या मोहिमेची चाहूल सिद्दी जौहरला लागलीच. सिद्दी जौहरने त्यांना थांबवण्यासाठी मोठं दळ पाठवलं. सुरुवातीला त्यांनी शिवा काशीद या महाराजांसारख्याच दिसणाऱ्या व्यक्तीस पालखीसह पकडले. राजे सापडल्याची खबर छावणीत पसरली. त्यांना सिद्धी जौहारपुढे हजर करण्यात आले. मात्र हे खरे महाराज नाहीत हे फाजलखानाच्या लक्षात आले. स्वराज्यासाठी शिवा काशीद यांनी बलिदान दिले. महाराज निसटले हे लक्षात आल्यावर त्यांनी त्वेषाने पाठलाग सुरू केला.

        शिवाजी महाराजांनी विशाळगडावर जाऊ नये यासाठी वाटेत शृंगारपूरचे सुर्वे नेमले होतेच. हे अडथळे तसेच एकीकडे कोसळणारी अस्मानी आणि पाठलाग करणारी सुलतानी असं संकट पार करत त्यांना विशाळगडावर पोहोचायचं होतं. रात्रभर चिखलराडीतून केलेली धावाधाव आणि पाठीवर असणारा शत्रू यामुळे अखेर सिद्दीच्या सैन्याला रोखण्यासाठी एका ठिकाणी थांबण्याचा निर्णय झाला. पांढरपाणी नावाच्या जागेवरील गजापूरच्या खिंडीत बाजीप्रभू देशपांडे व बंधू फुलाजी देशपांडे यांचे हिरडस मावळातील निवडक आणि इतर सैन्य सिद्दी जौहरच्या सैन्याला रोखण्य़ासाठी थांबले आणि तिकडे शिवाजी महाराज निम्म्या शिबंदीनिशी विशाळगडाच्या दिशेने गेले.

         या लढाईत बाजी प्रभू देशपांडे यांनी आपल्या असीम शौर्याचं दर्शन घडवलं. राजे गडावर पोहचून तोफांची इशारद देत नाहीत तोपर्यंत शत्रूला खिंड ओलांडू द्यायची नाही हा पण बाजींनी केला आणि तो तडीस नेला. परंतु बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे भाऊ फुलाजी प्रभू देशपांडे यांचे या लढाईत प्राण गेले. त्यांची विशाळगडावर समाधी बांधण्यात आली. १२ जुलै १६६० रोजी शिवाजी महाराज पन्हाळ्यावरुन निसटले आणि १३ जुलै रोजी विशाळगडावर पोहोचले. पण त्यासाठी गजापूरच्या खिंडीत मावळ्यांनी प्राणाची बाजी लावली. तो आजचा दिवस ऐतिहासिक प्रेरणा देणारा आहे. 

                               दशरथ ननावरे सर

                                इतिहास अभ्यासक

Tuesday, 26 January 2021

॥ रानवाटा ॥ जोर - कोळेश्वर -असानेश्वर


 ॥ रानवाटा ॥ सफर निर्भिड जंगलाची 

- निखिल काशिद / कृष्णा तिकोणे 

जोर - कोळेश्वर - कुंभळजाई - असानेश्वर - जननीमाता - उळुंब

 एक अध्यात्मिक ट्रेक...

🧘🏻‍♂️🧘🏻‍♂️


सकाळची वेळ होती मी, निखिल यादव आणि कृष्णा निघालो पहाटे पाच वाजता श्रीपाद जाधव साहेबांकडे वाईला. एक अध्यात्मिक ट्रेक करायचं एवढंच माहित होत. रेस्ट हाऊसला त्यांच्या घरी पोहचताच त्यांनी वजनकाटा समोर आणून ठेवला. समोर असलेल्या पोत्यांतून वेगवेगळ्या जातीचे तांदूळ पाच पाच किलो वेगवेगळ्या पिशव्यांत काढायला लावले. हे साहित्य कोळेश्वर पठारावरील जंगम वस्तीवरील किसन अप्पांच्या घरी द्यायला घेतले होते. कृष्णाने पटकन पिशव्यांवर नावे टाकली. काळी कुसळ , काळी साळ आणि तांबसाळ अश्या 3 जातीचे ते तांदूळ होते. बोडके अण्णांनी पटापट वजन करून पिशव्या बांधून घेतल्या. बोलता बोलता लक्षात आलं आजच्या ट्रेक मध्ये एवढेच पाचजण आहेत. साहेबांनी पटकन बाहेर येऊन विचारलं चहा कोण कोण घेणार. आम्ही घेणार म्हणून होकार दिला. निखिल यादव चहा पित नाही त्यांने नको म्हणून सांगितले. तोच साहेब त्याला म्हणाले चालेल तुझ्या साठी मस्त काढा आणतो. पण त्याला ठाऊक होत घरी आलं की साहेब नेहमी आयुर्वेदिक कडवट वनस्पती खायला लावतात. क्षणात तो बोलला साहेब मला चहाच द्या. त्याच बोलणं लक्षात आलं , त्यामुळे साहेब त्याला बोलले असुदे तुला दोन्ही थोडं थोडं देतो. सोबत बोडके अण्णांनी सुद्धा काढा घेतला. साहेबांच्या हातचा एकदम कडक आयुर्वेदिक चहा पिऊन घेतला. आता तिघे आम्ही तरुण वर्ग प्रत्येकाच्या बॅगेत 5-5 किलो तांदूळ दिला.वरून अजून 1-2 पाण्याच्या बाटल्या आणि प्रत्येकाच्या बागेत किमान 1 किलो गूळ. आमच्या तिघांच्या बॅग आता जवळपास 9-10 किलो वाजनापर्यंत पोहचल्या. 

सोनावणे मामांनी आम्हाला जोर पर्यंत गाडीने सोडलं. 

   


        जाता जाता बलकवडी धरणाशेजारी आम्हाला लागोपाठ 12 मोर दिसले. दिवसाची सुरुवात मस्त झाली. उगवतीचा सूर्य त्याबरोबर बलकवडी धरणाचे निळेशार अथांग पाणी आणि त्यापाठी दिसणारा एलिफन्ट पॉईंट च्या साक्षीने आम्ही एक फोटो घेतला. जोर मध्ये येऊन नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा अध्यक्षांच्या घरी चहा झाला. आमच्या बरोबर वाटाड्या म्हणून जोरचे पांडुरंग मामा आले. वेळ वाया न घालवता लगेच आम्ही पठाराकडे धाव घेतली. फोटो विडिओ काढत आम्ही अर्धा च्यावर चढ चढलो. वाटेत साहेबांनी हँड स्लीव्ह घालायला त्यांची बॅग कृष्णा ला दिली. त्यांच्या डोक्यात काय आलं त्यांनी कृष्णा ला विचारलं , आपण toss करू छापा आला तर ही पण बॅग उरलेला चढ संपेपर्यंत तूच घ्यायची आणि काटा पडला तर मीच घेणार. त्यांनी टॉस करायला नाणं मागितलं. मी विचार केला माझं काय जातंय बॅग तर कृष्णा घ्यावी लागेलं. मी पटकन नाणं काढलं अन दिल. छापा पडला बॅग कृष्णा ने घ्यायची होती. पण मी नाणं दिल म्हणून कृष्णाच्या अन माझ्यात परत टॉस उडवायच ठरलं , मनातल्या मनात मी विचार करायला लागलो उगाच दिलं नाणं. टॉस उडवला आणि मी वाचलो. मग पुन्हा दुसरा निखिल अन कृष्णा मध्ये टॉस उडवला गेला आणि निखिलला बॅग घ्यावी लागली. स्वतःची जवळपास 10 किलोची बॅग घेऊन वरून हि सुद्धा बॅग घायची होती. निखिल ने थोडा वेळ घेतली त्यानंतर कृष्णा आणि पुन्हा माझ्याकडे अशी तिघांत बॅग फिरली शेवटी माझ्याकडे आली. नाणं देऊन भयंकर मोठी चूक केली एवढंच माझ्या मनांत चालू होत. माझी 9 किलोची बॅग आणि त्यात हि साहेबांची 4 किलोची बॅग एवढं ओझं झालं होतं ना. त्यात मधून मधून जँगल सम्पयच मोठा चढ वरती उन पण लागायला सुरवात. एक एक पाऊल टाकणं कठीण जात होत. या दोघांपॆक्षा जास्त अंतर बॅग माझ्याकडे आली. कधी साहेब स्वतःहून बॅग घेतात असं वाटत होत. पण दुसऱ्याला त्रास व्हावा म्हणून चुकूनही कोणाला प्रतिसाद द्यायचा नाही हे आता कायमस्वरूपी लक्षात राहील. 

   


  

या आधी एका झाडावर STF हि अक्षरे खडूने कोणीतरी लिहिली होती. त्यांचा अर्थ साहेबांना माहित होता पण बाकीच्या कोणाला तो समजेना आज ट्रेक च्या शेवटपर्यंत आठवून सांगा असं त्यांनी सांगितलं. ते शेवंतपर्यंत कोणी सांगितलं नाही. पण थोड्या वेळात मला पण ती अक्षरे उमगली होती. त्याच एवढा मोठा काही अर्थ न्हवता तर रस्ता चुकू नये म्हणून कोण्या ट्रेकर ने StraightForward हेच थोडक्यात लिहिलं होतं. आज आपण आध्यत्मिक ट्रेक साठी आलो होतो त्यामुळे सुरवातीलाच ,चालणे सुरु होतानाच आम्हाला जाधव साहेबांनी तीन प्रश्न देऊन ठेवले होते ते खालील प्रमाणे...

१) तुम्ही कोण आहात?

२) तुम्ही का जगताय?

३) तुमच्या जीवनाचं उद्दिष्ट्य काय?

याची उत्तर दुपारी जेवण झाल्यावर द्यायची होती त्यामुळं डोक्यात कायम यांची निरनिराळी उत्तर डॊक्यात घुमत होती. मस्त पक्षांचा किलबिलाट ऐकत जंगलवाटेने आम्ही कोळेश्वराला पोहचलो. आत्तापर्यंत चार की मी अंतर झाले होते .हे इथल स्वयंभू जागृत देवस्थान आहे. इथलं शिवलिंग नऊ फूट लांब आणि 6 फूट रुंद एवढं मोठं आहे बाजूला दगडी चौथरा आहे डोक्यावरती छत नाही पण जंगलातील झाडांनी नैसर्गिक छत तयार झाले आहे. या ठिकाणी खूप पालापाचोळा जमा झाला होता. सर्वांनी ठरवून तिथली स्वच्छता केली. त्या ठिकाणी दोन मिनिटं शांत बसलो , मन एकाग्र करण्याचा प्रयत्न केला. मग जाधव साहेब म्हणाले आपण आता ध्यान करू या , त्यांनी सांगितले मी व्यंकटेश स्तोत्र म्हणतो ते संपेपर्यंत सर्वांनी ध्यान करा ( डोळे बंद करून दोन्ही भुवयांच्या मध्यभागी लक्ष केंद्रीत करायला सांगितले ) . साहेबांनी व्यंकटस्रोत म्हणायला सुरवात केली. डोळे बंद करून सर्वांचे लक्ष त्यांच्या आवाजाकडे होते. सर्वजण मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. डोक्यात बरेच विचार येत होते. हळू हळू ते बाजूला होऊन मन एकाग्र होऊ लागले. पक्षांचा किलबिलाट पण बंद झाला जणू ते सुद्धा द्यान लावून ऐकत होते. थोड्या वेळानंतर सगळ्यांना डोळे उघडायला लावले. खरं तर डोळे उघडायची इच्छाच होत न्हवती. पण तेव्हा समजलं आपण एक दोन पाच मिनिटं न्हवे तर चक्क अर्धा तास ध्यान लावून बसलो होतो. मला तर स्वतःवर एवढा विश्वास बसत न्हवता एवढा वेळ आपण असे बसूच शकत नाही वाटत होत. जाधव साहेबानी प्रत्येकला ध्यानाचा अनुभव विचारला परंतु कोणीच काहिच बोलले नाही.......सर्वजण एका वेगळ्याच तनदरी मध्ये होते कोणालाच ध्याना मधून मिळालेली वेगळीच अशी शांतता तोडण्याची इच्छा होत न्हवती . काही वेळाने प्रत्येकाचे अनुभव घेण्यात आले सगळेजण शांत झाले होते. 



बोडके अण्णांनी कोलेश्वराला गुळाचा नैवेद्य दाखवला आणि सगळ्यांनी  प्रसाद म्हणून गूळ खायला दिला , नाश्ता केलेला नसल्या मुळे सर्वांनी गुळाच्या छोट्या ढेपा खाऊन पाणी पिले.तिथून जंगम वस्तीवर विठ्ठल अप्पांच्या घरि जायचं होत. कृष्णा ला तर सकाळपासूनच खूप भूक लागली होती. वस्तीवर ताक प्यायला मिळेल का हा त्याचा प्रश्न वारंवार आमच्या कानावर पडत होता. जंगमवस्तीवर जाताना वाटेत एक कुंभळजाई देवीचे मंदिर लागते दर्शन घेऊन पुढे निघताच जाधव साहेबांच्या पायाखालून एक फुरसे जातीचा साप जोरात वळवळत बाहेर आला. त्यांच्या पावलावर पाय ठेवत मी मागे चाललो होतो. माझा पाय त्यावर पडणार तोच मला जाणवलं. आणि मी जोरात ओरडून पाय हवेतच फिरून बाजूला टाकला. कृष्णा अन बोडके अण्णांनी त्याच निरीक्षण करून घेतलं. अश्या प्राण्यांपासून आपली काळजी घेण्यासाठी डोंगरावर आपल्या पायांत चांगले बूट आणि फुल पॅन्ट असावी. पुढं समोरून 3 आजीबाई चालत येत होत्या त्यांच्या मनात आमच्याबद्दल काय विचार आले असंतील काय माहित. पण जाधव साहेबांनी त्यांची विचारपूस केली. ते लोक गवत आणण्यासाठी चालले होते. आम्ही आणलेल्या तांदळातून एक पाच किलोची पिशवी आणि एक किलो सेंद्रिय गूळ त्यांना दिला. पण त्यांना ओझं होईल म्हणून जंगम वस्तीवर ठेवतो सांगून त्यांच्याबरोबर ग्रुप फोटो घेतला. सगळे जण त्यांच्या पाया पडले आणि जंगम वस्तीकडे पाऊले टाकायला सुरवात केली. त्या तीन आजीबाई बऱ्याच भावुक झालेल्या दिसल्या. त्यानंतर आम्ही भुके च्या पोटी सपासप पावले टाकत एकूण सात ते आठ की मी चालून कोळेश्वर ते किसन जंगमआप्पांचे घर हा टप्पा पार केला .



           मुख्य पठारावर्ती दाट जंगलाच्या मधोमध जंगम वस्तीजवळ किसन अप्पांच घर आणि भलेमोठे गव्हाचे शेत होते.अद्याप किसन आप्पांच्या घरी लाईट पोहोचली नाही . खरं तर येथील गहू अत्यंत चविष्ट आणि उत्तम प्रतीचा असतो हा फक्त दवबिंदुवर पिकवला जातो (म्हणजे बिन पाण्याचा , पठार उंचावर असल्यामुळे सकाळी पडणाऱ्या दवा वर ते उगवतात ). अप्पांच्या घरी पोहचताच त्यांचा कुत्रा बंटी आमच्यावर जोरदार आवाज चढून भुंकत होता. त्यांच्या घरासमोर मोठं शेणाने सरावलेले अंगण आहे. गेल्या गेल्या हात पाय तोंड धून घेतले आणि झऱ्याचे मस्त थंडगार पाणी पिऊन मन तृप्त करून घेतले. तेवढ्यात माझी नजर कृष्णकडे गेली हा तिथंच अंगणात आडवा झाला होता. त्याची भुकेची तीव्रता पाहून त्याला ताकाचे आश्वासन देण्यात आले. जंगम कुटुंबियांसाठी आणलेला सेंद्रिय गूळ, काकवी आणि वेगवेगळे तांदूळ त्यांना देऊन टाकले आणि उत्तम जेवणावर ताव मारला. जेवण उत्तम झाले होते स्वयंपाकघरातून एकामागोमाग एक अश्या गरम गरम नाचणीच्या भाकरी आणि अप्रतिम गव्हाच्या चपात्या येत होत्या. सगळेजण फुल्ल जेवले. आणि अंगणात येऊन झोपून गेले. 


जाधव साहेब मात्र झोपले न्हवते ते आत बसून जोर ते महादेवाचा मुरा या पुढील ट्रेक चे नियोजन करत होते .मला तर खूप गाढ झोप लागली होती. वेळ खूप झाली होती खाली तुपेवाडीत उतरायचं होत साडेचार वाजले.  पण ज्या कारणासाठी ट्रेकचं नियोजन केलं होतं त्या विषयावर चर्चा बाकी होती. आप्पांच्या घराशेजारीच असनेश्वराचे मंदिर होत तिथं जाऊन चर्चा करायची असं ठरल मग आम्ही चौघेही डोळे चोळत आवरु लागलो, पटकन बुट घातले नि तोंडावर पाणी मारून मंदिराच्या दिशेने निघालो...किसन अप्पा जंगम जाधव साहेबाना म्हणाले ,सर आपण खपली गहू बघून मंदिरात जाऊ या . हे खपली गव्हाचे बी जाधव साहेबानी किसन अप्पां ना दिले होते , आणि साहेबाना सुद्धा खपली गहू कसा आला आहे हे पहायची उत्सुकता होती . मग आम्ही त्यांच्या शेता ला पूर्ण वेडा मारून मंदिरात गेलो . जंगम अप्पानी शेतामध्ये गहू हेच मुख्य पीक पेरले होते त्या मध्ये साहेबांनी दिलेला खपली गहू थोड्या प्रमाणात आणि त्यांचा नेहमी चा गहू  सगळीकडे होता .या त्यांच्या नेहमी च्या गव्हाचे एक वैशिष्ट्य होते ते म्हणजे त्याला इतर गव्हा प्रमाणे तूस न्हवते . ते त्यांचे परंपरागत चालत आलेले देशी गव्हाचे बी होते . गव्हा व्यतिरिक्त त्यांनी थोडी ज्वारी , हरबरा ,पावटा ,असे थोडे थोडे खान्या पुरते त्यांनी पेरले होते......कारण कोणतीही गष्ट आणायची म्हंटले तर त्यांना दीड तास खाली जायची आणि दीड तास परत यायची पायपीट फक्त खालच्या गावात जायला करायाला लागते , आणि वाई सारख्या ठिकाणी यायची पायपीट वेगळीच . त्यामुळे त्यांना छोट्या छोट्या गोष्टी आणण्यासाठी होणाऱ्या त्रासाची जाणीव आम्हाला प्रकर्षांने झाली .आणि रोज किसनाप्पांचा मुलगा अनिकेत दूध घेऊन डेरी मधे घालण्यासाठी एकूण तीन तासाची उतर-चढ करून वाशिवली मध्ये येतो हे ऐकल्यावर आश्चर्याचा धक्काच बसला .



                मग आम्ही पूर्ण शेताचा फेर फटका मारला ,आणि मंदिरा जवळ आलो . फेरफटका मारत असताना किसनाप्पां म्हणाले की या वर्षी निसर्गाने साथ दिली नाही त्या मुळे गहू जोमात आला नाही , त्यात माकडे ,खारुताई , रानडुकरे नुकसान करतात ती वेगळीच .त्यांनी नुकसान करू नये म्हणून दिवसरात्र डोळ्यात तेल घालून त्यांना राखण करायला लागते .किसन अप्पानी आणि आम्ही असनेश्वराच्या मंदिरात प्रवेश केला नि पुन्हा शांततेचा अनुभव आला अगदी सकाळी कोळेश्वराच्या मंदिरात आला तसा, विचारचक्र पुर्ण थांबलं होत मनात विचार येतच नव्हते तिथं असनेश्वराचं दर्शन घेऊन विषयावर चर्चा सुरू केली. 


*हि चर्चा आपण कृष्णा च्या शब्दांतून पाहू ....*

कृष्णा : - [पुन्हा एकदा प्रश्न सांगितले गेले आता चर्चेत तिघांचा समावेश झाला होता (किसन अप्पा आणि त्यांची मूल)

काकांनी (जाधव साहेबानी )विचारले "सांग निखिल तु कोण आहेस, तु का जगतोय आणि तुझ जगण्याचे उद्दिष्ट काये?" निखिल म्हणाला "मी या पृथ्वीतलावर एक जिव आहे, मी जगतोय कारण माझ्याकडून लोकांची कामे व्हावीत, समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे व माझे उद्दिष्ट आहे की माझ्यामुळे कोणालाही त्रास नाही झाला पाहिजे उलट लोक माझ्यासोबत आनंदी असावीत आणि त्यांचा फायदा व्हावा. " काकांना निखिलचे उत्तर फार आवडले व ते म्हणाले सांग निखिल (यादव) तु बोल आता तर निखिल (यादव) म्हणाला "साहेब मी सगळ्यात शेवटी बोलतो अजून विचार केला नाही मी" यानंतर नंबर आला माझा मी म्हणालो कि, " मी शून्य आहे, मी का जगतोय याचे उत्तर नाही माहिती आणि उद्दिष्ट अजून ठरले नाही" पुढे बाकी सगळ्यांनी निखिलची (काशिद) वाक्ये आहे तशी forward केली नि सगळे शांत झाले... एकूणच महाभारतातील अर्जुनाप्रमाने आमची अवस्था होती, काकांनी सगळ्यांवरूण नजर फिरवत श्रीकृष्णाप्रमाने अध्यात्मिक चर्चेचा प्रारंभ केला, यापूर्वीही वरचेवर काकांनी अध्यात्मिक विषय मांडले होते आणि तसा सरावही करून घेतला होता.  काका सांगू लागले, "पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे, मी आत्मा आहे, ना शरीर, ना हा चेहरा, ना मन, ना बुद्धी मी ईश्वर किंवा परमात्म्याचा एक अत्यंत सुक्ष्म भाग आहे, मी एक आत्मा आहे. आता दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर मी जगतोय कारण एक ना एक दिवस मला परमात्म्याचे दर्शन होईल किंवा व्हावे यासाठी भले मग ते या जन्मात होईल पुढच्या होईल येत्या हजारो, लाखो जन्मात होईल पण ते होणारच आणि यासाठीच ईश्वरप्राप्तीसाठीच आपण जगत असतो. प्रश्न तीनचे उत्तर माझं उद्दिष्ट आहे कि आत्मसाक्षात्कार घडावा, ईश्वरप्राप्ती व्हावी थोडक्यात मोक्ष हे अंतिम आणि एकमेव उद्दिष्ट आहे."

      ईश्वर प्राप्ती , मोक्ष ही गोष्ट मिळवण्या साठी स्वामी विवेकानंदांनी सांगीतलेल्या कर्मयोग , भक्तियोग ,राजयोग आणि ज्ञानयोग या चार मार्गांविषयी काकांनी थोडक्यात आम्हाला प्रत्येक मार्गाबद्दल माहीती दिली .

तीन्ही प्रश्नांची उत्तरे देवून झाली होती आता कळू लागले कि रोजची धावपळ, क्लेश, थकवा, अपेक्षा, पैसा, सुख-दु:ख, जन्म आणि मृत्यू ह्या सगळ्या क्षणीक गोष्टी आहेत, तरी जीवन जगत असताना ते कसे जगावे याबद्दल काका सांगणार होते. तीन प्रश्नांची उत्तरे दिली पण उद्दिष्टाकडे जाण्याचा मार्गही माहिती असावा आणि तो मार्ग आहे अष्टांगयोग. मला याआधी काकांनी अष्टांगयोगाबद्दल सांगितले होते त्यामुळे आता बाकी लोकांना ते मी सांगावे असे त्यांचे म्हणणे होते, आणि मी सांगु लागलो, अष्ट म्हणजे आठ, याचा अर्थ असा नाही कि आठ मार्ग आहेत मार्ग हा एकच आहे आणि या मार्गामध्ये आठ पाय-या आहेत त्या म्हणजे *यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी* हे अष्टांगयोग आहेत. यांपैकी पहिलं म्हणजे यम यामध्ये अहिंसा , सत्य , अस्तेय , ब्रह्मचर्य आणि अपरिग्रहचा समावेश होतो .

 अहिंसा म्हणजे कुठल्याही परिस्थितीत कोणत्याही जिवाला तन मन आणि वचनाने त्रास झाला नाही पाहिजे,      सत्य म्हणजे कुठल्याही परिस्थितीत माणसानं सत्यच बोलल पाहिजे .

चोरीने, लाबाडीने किंवा बलपूर्वक कोणाचीही वस्तु न घेणे म्हणजे अस्तेय .

सर्व अवस्थेत तन, मन, वचनाने मैथूनचा त्याग करणे म्हणजे ब्रह्मचर्य , त्याच्या विचाराचा, बोलण्याचा त्याग म्हणजे ब्रम्हचर्य .

गरज असो किंवा कोणतीही परिस्थिती असो कोणाकडूनही कुठलीही वस्तू न स्वीकारने म्हणजे अपरिग्रह

 हे यम आहेत यानंतर नियम यामध्ये तप, स्वाध्याय, शौच, संतोष आणि ईश्वर प्राणिधान यांचा समावेश होतो,    तप म्हणजे व्रत, उपवास इत्यादीने शरीर संयम करणे .

मंत्रउच्चारण-वेदपठण इ. स्वाध्याय मध्ये येते मंत्रउच्चारणाचे तीन प्रकार असतात वाचिक, उपाशु, मानस यामध्ये मानस जप हा उत्तम मानला जातो, वाचिक म्हणजे इतरांना ऐकु जाईल असा स्वर, उपाशु म्हणजे पुटपुटने व मानस म्हणजे सतत मनातल्या मनात जप करणे. 

बाह्य आणि अभ्यंतर शौच असे शौचचे दोन प्रकार आहेत, बाह्य म्हणजे शरीर शुद्धता आणि अभ्यंतर म्हणजे मनाची शुद्धता, 

ईश्वकृपेने जे काही प्राप्त झाले आहे यातच समाधान शोधणे म्हणजे संतोष .

आणि सतत ईश्वर नामस्मरण करणे ईश्वर चिंतन करणे म्हणजे ईश्वर प्राणिधान. 

हे झाले यम आणि नियम या दोनच योगामध्ये थोडी जरी प्रगती झाली तरी आयुष्य बदलेल कर्म सुधारणा होईल असे काकांचे सांगणे असते, पुढे 

आसन म्हणजे पाठीचा कणा ताठ, मान सरळ व कोणत्याही आसन प्रकारात बसून राहणं,

 प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण करणे, प्राणायामचा नियमित सराव करणे, 

प्रत्याहार म्हणजे आपले इंद्रिये तसेच मन बहिर्मुख आहेत (जी सतत बाहेर कार्य करीत असतात ) त्यांना खेचून घेऊन नियमित करून ठेवणे म्हणजेच अंतर्मुख करणे . 

धारणा म्हणजे डोळे मिटून मन दोन भुवयांच्यामध्ये धारण करून ठेवणे यापुढे ध्यान येते ध्यान म्हणजे दोन भुवयांच्यामध्ये असलेल्या मनाला बाकी विचारातून मुक्त करून एकाग्र करणे.

 व सगळ्यात शेवटी येते समाधी, मन पूर्णपणे एकाग्र झालं कि चित्त स्थीर होते आणि जी निश्चल निरामय अवसंघ येते , त्याच अवस्थेत  कायमस्वरूपी रहाण्याच्या क्रियेला समाधी म्हणतात.

 अशाप्रकारे अष्टांगयोगबद्दल चर्चा झाली आणि थोडक्यात कर्मयोग, ध्यानयोग, राजयोग आणि ज्ञानयोगबद्दल सांगितले व इथे आमच्या अध्यात्मिक चर्चेची सांगता झाली.]


 Yogeshvoice नावाच्या youtube chanel वरती ह्याबाबत सविस्तर वर्णन, चर्चा, माहिती असून काकांनी सगळ्यांना link share करतो असे सांगितले व आम्ही पुन्हा दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो.



दर्शन घेऊन आम्ही अप्पांच्या दारातील जंगली केळी पाहिली हि खूप उंच आणि थोडी आगळीवेगळी असतात. अजून चिवचिव असे नाव असलेले फळ पाहायला मिळाले.  हि वेलवर्गीय वनस्पती आहे. दिसायला पेरू सारखं आणि यावर अलगत कोवळे काटे असतात. याची भाजी पण करता येते आणि काकडी सारखे चिरून सुद्धा खाऊ शकतो. आणखी म्हणजे दत्तोपंत सपकाळ यांनी बनवलेली आगळी वेगळी शेलीची केरसुणी पाहायला मिळाली. पावणेसहा वाजले होते तुपेवाडीत उतरायला दीड तास लागणार होता. म्हणून थोडी जवळची वाट उलूम्ब गावात उतरते त्याने जायचं ठरलं. हि वाट तीव्र उताराची आहे. या वाटेने बलकवडी धरणाच्या भिंतीजवळच आपण पोहचतो. 



सूर्यास्त झाला फोटो काढले. तीव्र उतार असल्याने उतरताना पाय घसरत होते त्यात अंधार पडणार होता त्याआधी खाली जाण्यासाठी प्रयत्न चालू होते. लवकर घरी पोहचणार म्हणून आम्ही टॉर्च पण सोबत ठेवले न्हवते. अर्ध्या पर्यंत उतरताच अंधार झाला. आता मोबाईल चे टॉर्च काढून आमची पायपीट चालू होती. समोर पाचगणी महाबळेश्वर चे दिवे चमकत होते. काळीकुट्ट रात्र त्यात चांदण्यांचा मंद प्रकाश. अंधारात सुद्धा खाली लक्ष वेधून घेणारे मनमोहक बलकवडी धरणाचे पाणी चमकत होते. त्यामुळे उतरताना कोणताही थकवा जाणवत न्हवता. तेवढ्यात कृष्णाला मोरपीस सापडले त्यालाच कसे सापडले ते पण अंधारात यावर थोडा वेळ मजेशीर चर्चा रंगली. आणि आम्ही खाली बलकवडी धरणाच्या जवळ असणाऱ्या उलूम्ब गावातील दत्त मंदिराजवळ येऊन पोचलो. एकूण जवळ जवळ चौदा की मी चा ट्रेक आमचा पूर्ण झाला होता .मंदिरा जवळ गाडी आमची वाट पाहताच होती .

      अश्या रीतीने आमचा हा एक अविस्मरणीय अध्यात्मिक दिवस ठरला. इतर ट्रेक पेक्षा काहीतरी वेगळं समाधान मिळालं होतं. एक शांत , सुखद ,अविस्मरणीय अनुभव घेतल्याची जाणीव होत होती . सकाळपासून तब्बल १४ किलोमीटर अंतर कापल होत. 

      प्रत्येक ट्रेकला श्रीमंत दशरथ ननावरे सर हे सविस्तर लेख लिहीत असतात. माझ्याकडे विडिओ बनवणे हेच काम आले पण ते या ट्रेक ला आले नसल्याने मला हे लिहिणे होते तरी ननावरे सरांनी हा ब्लॉग त्यांच्या ब्लॉगस्पॉट मध्ये घेतला तर  आम्हाला प्रचंड आंनद आहे.


                         - निखिल काशिद आणि कृष्णा तिकोने

Wednesday, 20 January 2021

॥ रानवाटा ॥ - किल्ले रायरेश्वर ते शिवथरघळ

 


॥ रानवाटा ॥ सफर निर्भिड जंगलाची 

- दशरथ ननावरे [श्रीमंत ] , इतिहास अभ्यासक 

किल्ले रायरेश्वर ते शिवथरघळ


राकट देशा , कणखर देशा , दगडांच्या देशा .... ' असे महाराष्ट्राचे वर्णन अभिमानाने केले जाते . सहयाद्रीच्या दऱ्याखोऱ्यात पसरलेल्या पर्वतरांगातून सामावलेली महाराष्ट्राची भूमी म्हणजे एक स्वर्गच ! स्वराज्य संकल्पनेची शपथ ज्या भूमीवर गर्जली तो किल्ले रायरेश्वर ते 

सह्यशिखरातील पौराणिक पवित्र ठिकाण असलेले क्षेत्र शिवथरघळ हा निर्भिड अरण्यातील एक साहसी , शारीरिक कस लावणारा , विलोभणीय निसर्गाचे दर्शन घडवणारा रेंज ट्रेक .  

       सह्याद्रीचा पर्वत असो वा त्याच्या उपरांगा मधील विविध डोंगरांच्या दऱ्याखोऱ्यातील आडवाटा असो , त्या वाटेने मार्गक्रमण करायचं .सह्याद्रीच्या माथ्यावर विराजमान झालेले ऐतिहासिक गड किल्ले , डोंगराच्या कुशीतील धार्मिक ठिकाणे अथवा जंगलाच्या आडवाटा असो त्याच्याशी आपलेपणाचं नातं जोडायचं हा 'शिवसह्याद्री पायदळ ' ट्रेकर्सचा छंदच . आमचे मार्गदर्शक आणि ट्रेकर्स समूहाचे सर्वेसर्वा श्रीपाद जाधव साहेबांनी साद घातली आणि आम्ही प्रतिसाद दिला नाही असं आजवर तरी घडलं नाही . नेहमीप्रमाणे त्यांनी ही मोहिम करण्याचे निश्चित केले . 

      ठरल्याप्रमाणे आम्ही तयारीनिशी पहाटे साडेतीन वाजता खंडाळा सोडून वाईकडे प्रस्थान केले . पहाटे चार वाजता वाई विश्रामगृहात जमवाजमव झाली . घाईगडबडीतही अभिजीत सरांनी यामा बाईक राईडची हौस पूर्ण करून घेतली . तसं सरांना विविध प्रकारच्या बाईक आणि सायकल राईडची भारी हौस . मौजमजा आणि जीवनाचा आस्वाद अशा छोट्या छोट्या गोष्टीतूनही घेता येतो हे त्यांच्याकडे पाहून जाणवते . पटापट आवराआवर करून श्रीपाद जाधव साहेब , पुण्याहून आवर्जुन आलेले अभिजीत गोरे , मिलिंद दगडे , कपील दगडे , सचिन देशमुख , अतुल गाढवे, निखिल , अभिजीत आणि मी जीपमधून रायरेश्वराच्या दिशेने निघालो . पहाटेच्या थंड आणि मंद वाऱ्यात तासाभराचा प्रवास करून खावली मार्गे खिंडीत पोहचलो . 



 गडाच्या पायथ्याला थंड वाऱ्यानं अंगावर शहारा आला . अंधार दाटलेलाच होता तरीही गाडीच्या प्रकाशझोतात फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही . थंड हवेचा गारवा अंगाला झोंबत होता . तशातच रायरेश्वराचा डोंगर चढायला सुरुवात केली . थोडया चालीनंतर मुरमाड मातीच्या पायऱ्या चढुन छोटी वळणे घेत लोखंडी सीडीच्या पायऱ्या चढू लागलो . मी पटपट वरती पोहचलो इतरांचा व्हीडीओ करायचा होता . अंधारातच तो केला . सर्वजण गडाच्या माथ्यावर पोहचलो . थंड हवेचा गारवा आणखी जाणवला . पण पहाटेचा गार वारा , कुठून तरी येणारा पक्षांचा आवाज , प्रसन्न आणि आल्हादायक वातावरण यामुळे सर्वाचेच मन तल्लीन झाले . 

         आजूबाजूचा हिरवागार परिसर न्याहाळत रमत गमत पुढे चालत होतो . वाऱ्याने हिरव्यागार गवताची पाती डुलत होती . चवर, सोनके , मिकीमाऊस, लालटाका यासह अनेक प्रकारची रानफुल आता सुकलेली होती .बघता बघता तलावाच्या बाजूने वळसा घालून पुढे गेलो . काही अंतरावर पाण्याचे टाके होते . गोमुखातून टाक्यात पाणी पडत होते . स्वच्छ , निर्मळ पाण्यात टाक्याचा तळ दिसत होता . आमची चाहूल लागताच खेकड्यांनी दगडाच्या कपारीकडे पळ काढला आणि आम्ही मंदिराकडे ! 

     रायरेश्वर देवालयाच्या प्रांगणात प्रवेश केला . शिवालयाचे  दगडी बांधकाम आजही मजबूत आहे . पूर्वीच्या छताची जागा पत्र्याने घेतली आहे . मंदिराच्या गाभाऱ्यात दगडी शिवलिंग व पिंड आहे . शेजारी दगडी पणतीचा दिवा तेवत होता . अगरबत्तीचा वास सर्वत्र दरवळत होता . 'ओम नमः शिवाय ' चा जप आतून कानावर पडत होता . सर्वानी नतमस्तक होऊन मनोभावे दर्शन घेतले . शंकराची आरती सर्वांनी म्हटली याबाबतीत जाधव साहेब मोठे तरबेज !  मंदिरात शिवकालीन इतिहासाची जुजबी माहिती आणि शिवरायांच्या स्वराज्य शपथेचा फोटो लावलेला आहे . मंदिराच्या समोरच एका चौथऱ्यावर छत्रपती शिवाजी राजांचा अर्धपुतळा बसवलेला आहे. शेजारीच छोटेखानी शाळेची इमारत आहे . 

         दर्शन घेऊन पश्चिमेच्या दिशेने पायवाटेने चालू लागलो . भाताच्या शेतीची जागा गव्हाच्या पिकाने घेतलेली . त्याला वळसा घालून पुढे गेल्यावर रायरेश्वरावरील वस्ती आहे . इथे काही मोजकीच घरे आहेत .पावसामुळे ती झावळयांनी व कुडांनी झाकलेली तशीच होती . कुत्र्यांच्या आवाजाने आम्ही आल्याची कानकून वस्तीवाल्यांना झाली . जाता जाता सोमनाथ जंगमांना आवाज देऊन पुढे चालतो झालो . तेथेच गोपाळरावांच्या घरी चहा घेतला . गरमागरम पोहे खात चर्चा झडल्या .  तेवढयात भोरवरून तीघे सहकारी पोहचले . मग मागच्या ओघळीच्या वाटेने रस्त्यावरची माती तुडवत आणि मागच्या ट्रेकच्या वेळी कोणत्या रस्त्याने गेलो याचा अंदाज लावत चाललो होतो . सोबत वस्तीवरचा एक कुत्रा होताच . केसाळ शरीर अन् झुबकेदार शेपटी यामुळे गडयाचा रुबाब वाढला होता . नेहमीप्रमाणे गडाच्या टोकापर्यत हा सोबत करणार याची खात्री होती . बरेच अंतर चालल्यानंतर एका मोठ्या शिळेवर उभे राहून फोटो काढले .  तासाभराच्या अंतरात रायरेश्वराचे भले मोठे पठार मागे टाकले होते . 

    


 वाटेत कार्वीच्या झाडांनी वेढा टाकला होता . त्यातून मार्ग काढायचा म्हणजे मोठे दिव्य . गतवेळी कार्वीच्या झाडांमुळेच अंगावर फोडया उमटल्या होत्या . त्याचा चांगलाच त्रास जाणवला होता . त्यामुळे भीती वाटत होतीच . रस्त्यात उगीच कार्वी उगवली असा विचार राहून राहून डोक्यात येत होता . कसाबसा रस्ता काढीत वाट मागे सारत होतो . अनेक वेडीवाकडी वळणे घेत , चढ उतार पायाखाली घेऊन पुढे सरकत राहिलो . आता यापुढे खरी कसोटी होती . भला मोठा डोंगर उतार तोही खडा उतार उतरून अस्वल खिंडीत पोहचायचे होते . ट्रेकच्या पहिल्या दिवसाचा हा टप्पा म्हणजे जीवघेणाच ! कापशीचा बदर म्हणून ओळखली जाणारी ही वाट म्हणजे अंगावर काटा आणणारी होती . एकमेकांच्या साथीने कुठं सरळ , कुठं वाकडं तर कुठं उलटं होऊन खाली उतरावं लागत होतं तेही अतिशय संथगतीने . या तीव्र उतारावरील निसरड्या वाटेवर पाय घसरला तर थेट दरीच्या तळाशी पोहचणार हे निश्चित होतं . त्यामुळे ज्या कार्वीचा तिटकारा वाटत होता ती कार्वीच आता आधाराला धावून आली होती . तीच्या साथीनं सांभाळूनच पाऊल पुढे पडत होतं . तास अर्धा तास नव्हे तर तब्बल चार तास हा बदर उतरायला लागले . शेवटचा एक टप्पा तर मोठा अवघड होता . छोट्या झुडपांच्या आधाराने तोही उतरला आणि पुढील जंगलातून वाट काढीत अस्वल खिंडीत पोहचण्यासाठी आतुरतेने चालत होतो . खालून पुढचे वाटाडे आवाज देत होतेच . सकाळी दहा वाजता खिंड गाठू असा बांधलेला अंदाज पुरता खोटा ठरला होता . दुपारचे एक वाजता खिंडीत पोहचलो . थोडा वेळ थांबून पाणी प्राशन केले . एका मोठया दगडी शिळावर बसून फोटो घेतले . जास्त वेळ घालवून चालणार नव्हते . पुढचा बराच लांबचा पल्ला गाठायचा होता . त्यामुळे रायरेश्वरावरील वाटाडेस्वामींचा निरोप घेऊन खिंडीतील जंगलातून चालते झालो . 



       या ट्रेकला भोरचे तीन शिक्षक सहभागी झाले होते . रस्त्याने गमतीजमती करीत त्यांचा ठरलेला डायलॉग कानी पडायचा ... ' जिलेबी देऊ पण खाल्लीच पाहीजे ' मला तर त्याचा मतितार्थ कळतच नव्हता . पण मनोरंजन भारीच झाले . वास्तविक हे तीघे पहिल्यांदाच आमच्या सोबत ट्रेकला आले होते . पण तग धरून चालत होते हे विशेष . अजूनही तास दीड तास प्रवास करून मानटवस्तीत दुपारच्या जेवणाचे नियोजन होते . जंगलाचा भाग उतरून नदीच्या कडेने चालत राहिलो . आता शिब्रा टोक डाव्या हाताला टाकून चालू लागलो . पुढे नदीच्या पात्रात थंड पाण्याने हातपाय धुवून फ्रेश झालो . लोक दमले होते पण पुढे जाण्याशिवाय पर्याय नव्हता . आता एक मोठी टेकडी चढून जायचे होते . खडी चढण होती कशीबशी पाऊले पुढे टाकत होतो . वरच्या टप्प्यावर जाऊन मागच्या सहकाऱ्यांची वाट पहात बसलो . सर्वजण आल्यावर पुढे चालते झालो . 



आता मोहन गडाच्या पायथ्याशी मानटवस्ती दिसू लागली होती . टेकडीच्या उताराने पटापट उतरू लागलो . खरं तर सगळेच कंटाळले होते . जेवण करून पुढे निघायला चार वाजले तर मोहनगड करून उंबर्डेला मुक्कामी पोहचणे अशक्य असल्याने जाधव साहेबांनी माझ्याशी चर्चा केली . सर , पुढचं नियोजन काय करायचं . मानटवस्तीत मुक्काम करून पहाटे लवकर उठून शिवथरघळला पोहचू असाही विचार समोर आला . मी म्हटलं सर्वांचा विचार घेऊन ठरवू . साहेबांनी तिथेच गवतात मांडी घालून ठाण मांडलं . मोहनगडावर येणारा माणूस आलाय का?  यासाठी फोन करू लागले . पण फोन लागत नव्हता . तेवढयात सर्वजण आलेच . आता मुक्काम जर अलिकडे झालाच तर बरच झालं म्हणून मलाही खूप आनंद वाटत होता . पण साहेबांनी दमलेल्या लोकांच्या नावाच्या यादीत अभिजीत सरांचे पहिले नाव घेतले अन् सगळा डाव इस्कटला . हार मानतील ते अभिजीत सर कसले ? या माणसात नेहमी वेगळच रसायन पहायला मिळतं . प्रचंड झच्छाशक्ती ओतप्रोत भरलेली मला दिसली . आणि साहेबांनी त्यांचेच नाव घेतल्याने सरांनी आता काही झालं तरी ठरलेल्या ठिकाणीच मुक्कामी जायचं अशी स्पष्ट भूमिका घेतली . ठरल्याप्रमाणे ट्रेक करायचा असा जोर धरला . त्यामुळे मुक्काम अलिकडे होणार या आमच्या आनंदावर विरजन पडले . गपगुमान झपाझप पाऊले टाकत मानटवस्ती गाठली . जेवण तयारच होतं . चपाती, भाजी , वरण ,भात मस्त ताव मारला . यथेच्छ जेवण झालं . बाहेर अंगणात अंब्याच्या झाडाखाली सहज आडवं पडलो . बघता बघता सगळयांची वामकुक्षी लागली . चार कसे वाजले कळलच नाही . 



     मोहनगडाकडे आगेकूच करायचे होते . रात्री मुक्कामी जाण्यासाठी अर्धा पल्ला गाठायचा होता. त्यामुळे सर्वांना पटापट आटपायला सांगीतलं . थंडीचे दिवस असल्याने झोरे कुटुंबियांसाठी आणलेले स्वेटर त्यांच्या सूपूर्त केले . सर्वानी मोहनगडाच्या चढणीला सुरुवात केली . हा गड पहायला सोपा वाटतो मात्र वाट वळणा वळणाने असल्याने चांगलाच घाम निघतो . मावळतीच्या दिशेने आम्ही वर चढलो . डोंगराला गवत कापणीची कामे सुरुच होती . भारा बांधण्यासाठी झाडाखाली एक जण कळकाच्या पातळ कांब्या काढत बसले होते . शेजारीच झाडाच्या खोबणीत लगोर अडकवलेली होती . मी उगीचच हातात घेऊन झाडावरच्या पक्षावर नेम धरला . शेजारी उभ्या असलेल्या गणेशाला फोटो काढायला लावला . वास्तविक त्यात पकडलेला दगड चार फूट पण लांब गेला नाही पण मोठ्या शिकाऱ्याचा आव आणला होता . पुढे मजल दरमजल करीत जंगलातील रस्ता तुडवत गडाकडे धाव घेत होतो . सर्वानाच घाई झाली होती . अंधार पडेपर्यंत गड जवळ केला होता . जननी मातेचे दर्शन घेऊन पुढे जाणे गरजेचे होते . पण आता अंधारातून मार्ग काढायचा होता . रस्ता दाखविण्यासाठी येणारा माणूस आलाच नव्हता . त्यामुळे मानटवस्तीतीलच वाटाडयांना सोबत घ्यायचे ठरले . किमान पाथरटाक्यापर्यंत पोहचता आले तर तिथेही मुक्काम करता येईल यावरही विचार झाला . पण उंबर्डे मुक्कामी त्याची खबर देणे गरजेचे होते . तसा प्रयत्न केला मात्र प्रकाश रावांचा फोन लागला नाही . 



        साहेबांनी सर्वांना सोबत चालण्याच्या सूचना केल्या . प्रत्येकाला बॅटरी काढायला लावली . काहींनी डोक्याला तर काहींनी हातात बॅटरी घेतली . काजवे चमकावे तशा विजेऱ्या रात्रीच्या अंधारात चमकू लागल्या . त्याच्या उजेडातच गड उतरायला सुरुवात केली . एव्हाना पाय चांगलेच भरून आले होते पण इलाज नव्हता . काही करून मुक्कामाला पोहचणे गरजेचे होते . एकमेकांशी कुजबुज करीत गड मागे टाकण्याचे काम सुरु होते . रस्त्याच्या बाजूच्या कळकाच्या बेटातून पानांची सळसळ ऐकू येत होती . मागे गडावर मुक्कामी गेलेल्या पथकातील काही जण आपल्या सहकार्‍यांना आवाज देत होते पण खालून वर चाललेले आम्हाला कोणीच भेटले नाही . तासाभराने खाली उतरुन जंगलाचा भाग संपला . आता नदी पार करून पुन्हा उंबर्डेच्या दिशेने डोंगर चढणे भाग होते . आता तर पायाचे तुकडे पडणेच उरले होते . मनात आले एखादी गाडी आली तर बरं होईल पण साहेबांपुढे हा विषय काढणे म्हणजे अवघडच . तसं मी अतुल जवळ बोललो पण त्याचही साहेबांना बोलण्याचं धारिष्ठय झाले नाही . खालच्या उतरणीला एक गाडी आली . कपील सरांसह कंटाळलेले काही जीव त्यात विसावले . बाकीच्यांनी पुढचा रस्ता धरला . रात्रीच्या अंधारात मजल दरमजल करीत रात्री साडेदहा वाजता उंबर्डे गावात पोहचलो . ओसरीला अक्षरशः अंग टाकून दिले . पाच मिनिटांच्या विश्रांतीनंतर पाण्याने स्वच्छ हातपाय धुतले . सुरजने पायाचे स्ट्रेचिंग केले त्यामुळं थोडं मोकळं मोकळं वाटलं . ताटं वाढायला घेतली आणि सर्वाची पंगत झडली . चविष्ट जेवणाचा आस्वाद सगळयांनी मनसोक्त घेतला . ओसरीला चटईवरच सर्वजण पहुडले.  डोंगरदऱ्यातून सुमारे तीस किलोमीटरची पायपीट करून दमलेले जीव धरणीमायच्या कुशीत कधी निद्रीस्त झाले कळलच नाही . 



       ट्रेकचा दुसरा दिवस तसा उशीराच सुरु झाला . कारण सगळेच उशीरा उठले . सर्वाचा चहा नाष्टा झाला . साडेनऊला निघण्याची तयारी झाली . एका घरासमोर मालक असल्यासारखे रुबाबदार फोटो काढले . पाळे दऱ्यातून खोल दरीत उतरायचे होते . वाट खूप अवघड आहे हे अगोदरच निखिलने सांगीतले होते . पण उत्सुकता लागली होती . सुरुवातच दाट झाडीतून झाली . वाट काढीत पुढे चाललोच होतो . एका वळणावरुन ओढयात उतरलो . हा मोठया धबधब्याचा भाग होता . इथं फोटोसेशन होणार नाही असं झालच नसतं . ती हौस पूर्ण केली आणि छोट्या चढणीने पुन्हा जंगलात प्रवेश केला पण एकदम दरीच्या कडेने . सावकाश पुढे चालते झालो . आणि पुढे अतिशय अवघड टप्पा समोर आला . एकतर एका बाजूला खोल दरी , त्यात वाट निसरडी होती . खाली नजर टाकली तर डोळे गरगर फिरत होते . मुळात या ठिकाणावरुन उतरणार कसे असा यक्ष प्रश्न पडला होता . पायवाटेच्या बाजूच्या छोटया झुडपांना पकडून एक एक पाय पुढे टाकत होतो . आता एक मोठी सरळ उतरण उतरायची होती . अक्षरशः बुड टेकून हळूहळू सर्वजण पुढे सरकू लागले . प्रत्येकाची नजर पुढचा गडी पाय कुठे ठेवतो , हात कुठे पकडतो याकडे होती . पुढच्याची कृती मागचा करीत होता . हा जीवघेणा खेळ सुमारे तासभर सुरू होता . माझ्या माहितीने स्थानिक लोक सोडले तर या जागेवरून कोणीही जाण्याचे धाडस केलेले नसावे . एवढा अवघड रस्ता आहे . दोन तास कसरत करुन शेवटी नदीपात्रात खोल दरीत उतरलो . आता पुढे पात्रातील मोठे दगडगोटे तुडवत चालणे भाग होते . 



       नदीच्या पात्रातून काही प्रमाणात पाणी वाहत होते . एका ठिकाणी सुंदर धबधबा पहायला मिळाला . सर्वानी हातपाय धुतले . काहींनी अंघोळ केली . अर्थात फोटो काढायला कुणाला सांगावे लागले नाही . बराच वेळ घालवला . सुरजची तर एक चांगली झोप झाली . पुढचा प्रवास सुरू झाला. अभिजीत सर व मी पुढे गेलो होतो . आम्हाला एक नैसर्गिक घसरगुंडी व पाण्याचा डोह दिसून आला . सरांनी ट्रेकर्स या जागी कसा आनंद घेतात हे सांगितलं . मग काय सुरजने पहिली उडी घेतली . मग पाठोपाठ अतुल , निखील , अभिजीत सर , मिलिंद सर आणि अन्य जणांनी त्याचा आनंद घेतला . साहेबांची गगनभेदी ललकारी आणि मनमुराद घसरगुंडी हा मिलाप चांगलाच जुळला होता .  सर्वाचे व्हीडीओ करण्याचे भाग्य मला लाभलं . अर्धा पाऊण तासाचा वेळ गेल्यानंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात केली 



        नदीतील दगड गोटे मागे टाकीत उडया घेत घेत चालू लागलो . मध्येच रामकुंडाकडे जाणारी दरी लागली . पुढच्या ट्रेकचे नियोजन येथेच ठरले . नदीत ठिकठिकाणी खेकडे पकडायचे टोपली दिसून आली . त्याचा आकार फुलदाणीसारखा होता . याचे काही तरी सुशोभिकरण करता येईल असे वाटल्याने तो घेण्याचा मोह आवरता आला नाही . आता आभाळात ढग तरळले होते . पावसाची झिरझिर पडू लागली त्यामुळे दगडांवरचे पाय सटासट घसरू लागले . त्यामुळे चालण्याचा वेग मंदावला . बरचसं अंतर चालून गेल्यावर नदीचे पात्र सोडून जंगलाची वाट धरली . अर्धा तासातच शिवथरघळीत पोहचलो . सर्वजण समर्थ रामदास स्वामीच्या वास्तव्याच्या ठिकाणी पोहचलो . आरती व मनाचे श्लोक म्हटले . ध्यानधारणा झाली आणि सर्वजण माघारी फिरलो . 



एव्हाना गाडया आल्या होत्या त्यातून पुन्हा उंबर्डेत आलो . तोपर्यंत चार वाजले होते . हातपाय धुवून सर्वच तयार झाले . एका गाडीचे चाक पंक्चर झाले होते . मामांना मी मदत केली . दुसरे चाक बसवले . तोपर्यंत जेवण तयार होतेच . पंगती पडल्या . सर्वजण मनसोक्त जेवले . जेवतानाच सर्वांनी ट्रेकचे अनुभव व्यक्त केले . जाधव  साहेबांच्या नियोजनामुळे ट्रेक पूर्णत्वाला गेला होता . सर्वात शेवटी माझे अनुभव व्यक्त करुन सर्वाचे आभार मानून एका अतिशय अवघड पण यशस्वी ट्रेकची सांगता झाली . 


- दशरथ ननावरे ( श्रीमंत )

  इतिहास अभ्यासक


Sunday, 27 December 2020

॥ रानवाटा ॥ जोर -बहिरीची घुमटी - आर्थरसीट

 


॥ रानवाटा ॥ सफर निर्भिड जंगलाची 

- दशरथ ननावरे [ श्रीमंत ] , इतिहास अभ्यासक 

जन्नीमाता ( जोर ) - बहिरीची घुमटी ते आर्थरसीट 


सह्याद्रीचा उपरांगा मधील डोंगरांच्या दऱ्याखोऱ्यातील आडवाटेने मार्गक्रमण करायचं म्हणजे एक मोठी पर्वणीच असते . सह्याद्रीच्या माथ्यावर असलेलं निसर्ग सौदर्यं, डोंगराच्या कुशीतील धार्मिक ठिकाणे आणि घनदाट जंगलातील प्रवास यातून मिळणारा अफलातून आनंद हा केवळ स्वर्गसुखच !  आमचे मार्गदर्शक आणि ट्रेकर्स समूहाचे सर्वेसर्वा श्रीपाद जाधव साहेबांनी साद घातली आणि आम्ही लगेच तयारी केली .  जोर ( जन्नी माता ) - बहिरीची घुमटी ते आर्थरसीट महाबळेश्वर ट्रेक पूर्ण  करण्याचे निश्चित केले होते. 

      ठरल्याप्रमाणे आम्ही तयारीनिशी सकाळी सहा वाजता खंडाळा सोडून वाईकडे प्रस्थान केले . पुण्यावरून अभिजीत गोरे सर आणि त्यांचे मित्र ऋषीकेश दोघे आले होते . त्यांच्याच गाडीत बसून वाईकडे गेलो .  वाई विश्रामगृहावरून नाष्टा करून श्रीपाद जाधव साहेब , अभिजीत गोरे , मिलिंद दगडे , ऋषीकेश , कृष्णा तिकोणे , निखिल यादव  आणि मी जीपमधून जोर गावाच्या दिशेने निघालो . सकाळच्या थंड आणि मंद वाऱ्यात दीड तासाभराचा प्रवास करून जोर गावात पोहचलो . जाताना बलकवडी धरणाचा रम्य परिसर पहायला मिळाला . डोंगराच्या भोवतीने पसरलेलं अथांग पाणी आणि सकाळच्या सूर्यप्रकाशाने उजाळलेला परिसर डोळयाचे पारणे फेडून गेला . गावात पोहचल्यावर तेथून मार्ग दाखवणारे वाटाडे सोबत आले .  

        जोरच्या जन्नी माता मंदिरात दर्शन घेऊन ट्रेकला सुरुवात करायची होती पण फोटो काढल्याशिवाय कसा होणार ? मग काय एक क्लिक झालाच . सगळयांनी पाणी बॉटल बॅगमध्ये घेतली . सोबत छोटा चाकू , ट्रेकसाठी गॉगल अशा विषयावर चर्चा झाली . आणि ट्रेकला सुरुवात झाली . 



      मनी चंग बांधूनी वळली पाऊले जंगलात , 

       वेडात मराठे वीर दौडले सात ...     

हो आम्ही सात जण एका ध्येयाने प्रेरीत होऊन सह्याद्रीच्या वाटा शोधत निर्भिड अरण्याला भिडणार होतो . छोट्या रस्त्याला एक वळसा घालून कृष्णा नदीच्या लहान पुल ओलांडुन उजव्या हाताला वळण घेत पुढे निघालो . भाताच्या खाचरात आता गव्हाचे पीक डोलत होते . पाणी नसताना केवळ दवबिंदूवर नैसर्गिकरित्या गहू पिकवणाऱ्या या  शेतीच्या बांधावरून जाताना प्रसन्न वाटत होते . डाव्या बाजूला पाण्याचा मोठा डोह पण बहुतांशी रिता झाला आहे . शेताच्या बांधावरुन उडया घेत  जंगलात प्रवेश केला . आता दाट जंगल सुरु झाले होते . सकाळच्या प्रहरी पक्षांचा किलकिलाट फक्त ऐकू येत होता . हिरव्यागार झाडीतून जाताना मन प्रसन्न झाले . काही तासांचाच प्रवास असल्याने फोटो काढायला बराचसा अवधी मिळत होता . 



गेल्यावेळी पावसाळी ट्रेकला या जंगलात 'जळवांचा जलवा ' चांगलाच अनुभवला होता . पण ती भिती आता नव्हती . मजल दरमजल करीत डोंगराच्या कुशीतून आणि दाट झाडीतून ओढया ओघळीच्या पात्रातून पुढे मार्गक्रमण करत होतो .  या  प्रवासात  निसर्गाचे विहंगम दृष्य नजरेस पडत होतं . सूर्यकिरणं कशीबशी धरणीला स्पर्श करीत होते . चालण्याचा थकवा जाणवावा असं काहीच वाटत नव्हतं . मध्येच फोटो काढण्यात मजा येत होती . एका ठिकाणी झाडांच्या वेलींचे विळखे असे काही पडले होते की त्यांचा मजबूत झुला तयार झाला होता . मिलिंद सरांनी झोक्याचा आस्वादही घेतला . पुढे थोडी चढण चढून गेल्यावर सुमारे दोन अडीच तासाच्या पायपीटीनंतर बहिरीचं जंगलातील देवस्थान आलं . उंच डोंगरावर स्थित असलेलं हे ठिकाण . एका मोठ्या दगडाच्या आडोशाला देवांच्या मूर्ती विराजमान झाल्या होत्या . समोरचा परिसर छोटाच पण स्वच्छ होता . स्थानिक ग्रामस्थ येथे नियमित दर्शनाला येतात . आम्ही सगळयांनी बॅगा बाजूला ठेवल्या . देवाचं दर्शन घेतलं . पाठीमागच्या बाजूला एका खडकावरून कोकणातील परिसर दृष्टीस पडत होता . दूरवर दिसणारा मोहनगड , रायरेश्वराचा नाकिंडा , अस्वल खिंडीचा परिसर , पश्चिमेकडे बळकट आणि उंच उंच असणारा चंद्रगड , सापूळ खिंड , गडाकडे जाणारी अवघड वाट , दक्षिण - पश्चिमेला असणारा प्रतापगड आणि खोल दरीत विसावलेली कोकणातील छोटी गावे असा परिसर न्याहाळता येतो . थोडा विसावा घेऊन पुढे निघायच होतं . दुसऱ्या एका ग्रुपला वाट मार्गी लावून विठ्ठलराव आणि बाळू कदम दोघे समोरून आलेच होते . त्यांनाही सोबत घ्यायचं ठरलं  . पुढे घुमटीचा खडा डोंगर चढून जायचं होतं . पण त्यांच्यात कोणी जायचं यावर निर्णय होत नव्हता . जाधव साहेबांनी खिशातील दोन रुपयाचं नाणं काढून छापा काटा करायचं ठरवलं . दोनचा आकडा आला तर दोघांनी यायचं आणि छापा पडला तर पुन्हा नाणं टाकून दोघांपैकी कोण ते ठरवू असं सांगीतलं . खर तर यामागचं गोडबंगाल त्या दोघांच्या ध्यानी आलं नाही . नाण्यानं क्षणार्धात उंच भरारी घेतली आणि ते जमिनीवर विसावलं . छापा मातीमध्ये चितपट झाला होता . दोनचा काटा अभिमानानं आभाळाच्या दिशेनं पहात होता . मग काय दोघांना येणं भागच पडलं . आणि पुढचा प्रवास सुरु झाला . 



      रस्त्यात पुढे चांगलीच चढण होती . त्यातून पुढे दाट झाडीतून अडचणीचा रस्ता होता . कुठे कार्वी तर कुठे बांबूची दाट झाडीतून वाकून चालावे लागत होते .  पुढे झाडातून एका जागी दगडी पायऱ्यांची चढण पार करून  निसर्गाचा आनंद घेत पुढे चालते झालो . आणखी काही अंतर वर चढून गेल्यानंतर एका उंच दगडी पॅच जवळ पोहचलो . 



       इथे थोडी विश्रांतीची गरज होतीच . मागून हळू हळू चढणारे सहकारी टप्पा जवळ करीत होते . इथून खोल दरीतील आणि डोंगरामधील दाट झाडीचे विहंगम दृश्य दिसत होते . उत्तरेला कोळेश्वराचे पठार , शेजारील कमळगडाचा कडा नजर खेळवून ठेवत होता .  तेवढयात कोणीतरी म्हणाले , अरे हॅलीकॉप्टर बघा .... सगळ्यांच्या नजरा आकाशाकडे वळल्या . पण आवाज नाही आणि तेही नाही , कृष्णा तर मोबाईल कॅमेरा काढून फोटोसाठी तयारच होता . अभिजीत सरांनी आकाशात उडणारी घार दाखवली तेव्हा गमतीचा भाग उलगडला .  मध्येच ही घार उंच भरारी घेऊन जात होती . तीच्या पसरलेल्या पंखांखाली अख्खं जंगल सामावलेच्या आवेशात ती फिरत होती . येथेही थोडे फोटो काढण्यात वेळ गेला .  तेवढयात खाली खोल जंगलात वाटाड्याला कसलीतरी हालचाल जाणवली . दाट झाडीतून एंका गवताच्या भागात एक प्राणी बाहेर येत होता . ते सांबर आहे असं वाटाड्याने सांगितलं . पण काहीच कळून येत नव्हते . जाधव साहेब म्हणाले , लांडगा आहे . पण जेव्हा ते आणखी पुढे सरकलं तेव्हा भलं मोठं सांबर असल्याचं दिसून आलं . त्याचाही फोटो घ्यायला सगळे सरसावले . बराच वेळ गेला . पुढे एक दगडी कडा चढून जायचं होतं . कपारीला हात घालून हळू हळू एक एक जण वर चढू लागला . थोडं अवघड पण धाडसं आणखी बळावणारा हा पॅच होता . सगळे वर चढून गेले . तेथील मोठ्या दगडी कडयाजवळ फोटो काढून आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली .   



        काही अंतर गेल्यावर आर्थरसीट पॉईंट दिसू लागला . सर्वांनी गगनभेदी ललकारी दिली . आसमंतात तो जयघोष घुमला . वर असणारे पर्यटकांच्या नजरा खाली आवाजाचा शोध घेऊ लागल्याचे आमच्या लक्षात आले . पर्यटक या ठिकाणाहून खोल दरीतील सहयाद्रीचं वैभव पाहण्यात दंग असतात . पाहूनच भीती वाटावी असा हा प्रचंड अवघड परिसर आणि वाटा चढून कोणी वरती येईल हे त्यांच्या ध्यानीमनीही नसावे . पण आम्ही ते धाडस केलं होतं . उर्वरीत टप्पा पार करुन ठरलेल्या ठिकाणी पोहचलो . ट्रेक पूर्ण करण्याचा संकल्प तडीस नेल्याचा आनंद मोठा होता . 



   गाडीत बसून विश्रामगृहावर पोहचल्यावर जेवणाचा मस्त बेत केला होता . चपाती , डाळीचे वरण , मटकीची आणि बटाटा वाटाण्याची सुकी भाजी , श्रीखंड , भजी , भात , पापड असा मस्त मेनू होता . सर्वानी यथेच्छ जेवण केलं .  आम्ही सर्वजण पुन्हा गाडीत बसलो आणि थेट वाई गाठले . 

       जोर ते आर्थर सीट हा छोटेखानी पण निसर्गाने भारलेला मार्ग ट्रेकर्सना निश्चित आनंद देणारा आहे . 


- दशरथ ननावरे ( श्रीमंत )

  इतिहास अभ्यासक 

Friday, 16 October 2020

॥ विचारवेध॥ - झुंज मृत्यूशी

 


॥ विचारवेध ॥ 

- दशरथ ननावरे ( श्रीमंत ) , इतिहास अभ्यासक

झुंज मृत्यूशी ...


काळ आला होता पण .....


॥मरणाच्या दारावरती मी मृत्यूशी झुंजत होतो, 

तरीही धीरोदात्तपणे जगण्याची आशा धरली होती 

कोरोनाच्या भयाण वेदना देहाला पिंजत होत्या ,

तरीही धीरोदात्तपणे जगण्याची आशा धरली होती 

मनामध्ये विविधांगी विचारांचे काहूर माजले होते ,

तरीही धीरोदात्तपणे जगण्याची आशा धरली होती ॥


'व्याधी' मग ती कोणतीही असो , माणसाचा जीव पिळवटून काढणारी असते . त्यातच सध्याच्या काळात कोरोनाचं भूत सगळ्यांच्या डोक्यावर घोंघावतयं . जो तो या कराल काळाच्या जबडयातून स्वतःला वाचवण्याची धडपड करीत आहे . पण लोकांच्यात राहून लोकांसाठी झटणाऱ्या माणसांना यापासून फार काळ दूर पळता येत नाही हेच खरं . त्यामुळं आजवर अनेकांच्या ऐकलेल्या कोरोनाच्या  कहाण्या प्रत्यक्ष अनुभवताना मात्र खूप विदारक वास्तव समोर ठाकलं होतं . पण लढण्याशिवाय पर्याय नव्हता . तसाही संघर्ष  आयुष्यात नवा नाही . पण संकट कितीही गंभीर असलं तरी खचून न जाता खंबीर मनाने सामना केला तर यश तुमच्या पायाशी लोटांगण घालतं हेच खरं . 

          संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले . सारं जग कोरोनाशी सामना करण्यात गेले दहा महिने व्यस्त आहे . भारतातही मार्चमध्ये शिरकाव झाला . सातारा जिल्हयात कोरोनाचा पहिला रुग्ण खंडाळ्यातच आढळला . आणि ज्याची भीती होती तेच समोर येऊन ठाकलं . 

   वास्तविक पहिल्यापासून समाजकार्याची कास धरलेली . लोकांसाठी सामाजिक बांधिलकी म्हणून आपण नेहमी कार्यरत रहावं हाच दृष्टीकोन कायम मनात ठेवलेला . त्यातच पत्रकारितेची आवड जोपासल्याने तालुक्यातील प्रत्येक गावाशी नाळ जोडलेली .  त्यामुळं बाहेर जबडा वासून काळ उभा आहे याची कल्पना असतानाही समाजसेवेचा पिंड कधी घरी बसू देत नव्हता . खंडाळा तालुक्यात कोरोनाचा प्रसार वाढत असताना त्याची बाधा आपल्या गावात होऊ नये . त्यामुळे गावातील लोकांची काळजी घेण्याच्या उद्देशाने संपूर्ण गाव बंदी करणे , सार्वजनिक ठिकाणी जंतूनाशक औषध फवारणी करणे , लोकांना घराबाहेर पडू नका याच्या सूचना करण्यासाठी  दररोज सगळी गावं धडपडत होती . त्यांच्या चांगल्या कामाचे कौतुक करणे , आरोग्य आणि महसूल प्रशासनाला मदत करणे , कुठल्याही गावातून कोणाचाही फोन आला तरी हाकेला धावून जाणे हा भाग क्रमप्राप्त होता . पण हे सगळं काळजी घेऊनच सुरू होतं . 

      लॉक डाऊनच्या काळात सहयाद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून भटकंती करण्याचा छंद ही  जोपासला होता . एक ट्रेक पूर्ण केला तर पुढील महिनाभर एकदम तजेलदार वाटायचं . शिवाय ऐतिहासिक अभ्यासालाही मदत व्हायची .  त्यामुळे ते अधिक नेटाने चालू ठेवलं . दिवसागणिक पंचवीस तीस किलोमीटर डोंगरदऱ्या पालथा घालण्याची कायम सवय होती . 

  ऑक्टोबर महिन्याची सुरुवातच काही दुःखदायक झाली . गुरुवार १ तारखेला माझ्या जीवलग मित्राच्या आईची तब्बेत अचानक बिघडली . कोरोनाचा काळ सुरु असल्याने इतर आजारांच्या रुग्णांनाही तातडीने उपचार मिळणे अवघड बनलयं. दिवसभर सर्व तपासण्या आणि उपचार शेवटी निरर्थक ठरले . आणि त्यांना देवाज्ञा झाली . हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का बसला . पण त्यातून सावरणे , त्याला धीर देणे आणि सर्व विधी पार पाडणे आवश्यक होते . तीन दिवस स्वब्धतेत गेले . 

     शनिवारी रात्री अंगात थोडी कणकण आणि ताप जाणवू लागला होता . घरीच पत्नी शलाकाने एक इंजेक्शन आणि औषधे दिली त्याने चांगला आराम पडला . पण रविवारी सकाळीच सहा वाजल्यापासून अंगात पुन्हा ताप भरू लागला . अंगदुखी वाढली . तातडीने रक्त तपासणी करून घेतली . तर प्लेटलेट कमी झाल्या होत्या . सीआरपी वाढला होता . लगेच घरी स्वतंत्र खोलीत सलाईन इंजेक्शन सुरू केले . आजाराची लक्षणे कोव्हिड सारखी भासू लागली होती . विनाकारण रिस्क घ्यायची नाही म्हणून सोमवारी सकाळी कोरोना चाचणी ( आरटीपीसीआर ) केली . पण दिवसभर अंगदुखी आणि ताप होताच . तीन चार दिवस अंग पिळवटून टाकणारी कणकणी आणि ताप यामुळे शरीराच्या रौंद्रारौंद्रातून असह्य वेदना उफाळून येत होत्या. पण सहन करण्यापलिकडे पर्याय नव्हता . उभ्या आयुष्यात एवढा त्रास कोणत्याच आजारात झाला नव्हता . मंगळवारी कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने जरा धीर आला . ही अंगदुखी आणि ताप हळूहळू कमी होऊ लागली तशी फुफ्फुसाची ऑक्सीजन लेव्हल घसरू लागली . बुधवारी रात्री पर्यंत चांगली धाप लागू लागली . पहाडासारखा माणूसही या आजाराने कोसळू शकतो याची जाणीव झाली . त्यामुळे आणखी टेन्शन वाढलं . डॉ . हाडंबर यांनी एचआरसीटी करण्याचा सल्ला दिला . रात्री दहा वाजता माझे मित्र हिरालाल घाडगे यांना फोन करुन शिरवळला जोगळेकर हॉस्पीटलला संपर्क करायला लावला .डॉ कोरडे यांनीही पुढे कल्पना दिली . हिरा म्हणजे खरचं अष्टपैलू हिरा आहे . कोणतीही तमा न बाळगता माझ्या सोबत आले .

 सीटी स्कॅन मशीनमध्ये पहिल्यांदा झोपलो .

कसला तरी आवाज आला मशीन गरागरा डोक्याच्या व छातीच्या भोवती फिरू लागले . मनात विचार आला आपल्या आयुष्याची चक्र फिरू लागली वाटतं . पुन्हा आवाज आला . मशीन थोडं सरकलं . पण माझ्या डोक्यात विचारांचं वादळं . पण मग मिनिटाभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा मशीन वर सरकलं, आवाज आला . 'श्वास घ्या ...... ' मग मी श्वास घेण्याचा प्रयत्न केला . पण पूर्ण क्षमतेने घेता येत नव्हता धाप लागत होती . पून्हा आवाज आला '  श्वास सोडा... पण हे ऐकण्यापूर्वी दोनदा घेऊन सोडून झालं होतं . ' असं दोन वेळा झालं . एकदाची मशीन वरुन खाली उतरलो . बाहेर कट्टयावर येऊन बसलो . दारातच हिरा मला क्रॉस करुन रुम मध्ये गेले . माझ्या अवताराने त्यांच्या लक्षात आलं नसावं . पण त्यांची नजर मला शोधत होती . हे मी ओळखलं . आणि आवाज दिला . त्यांनी घाबरू नका , लगेच उपचार घेऊया म्हणून धीर दिला .   

    सर्व तपासणी करून रात्री बारा वाजता माघारी आलो . एचआरसीटी मध्ये थोडं इन्फेक्शन फुफ्फुसात झाल्याचे निदर्शनात आले . रात्री लगेच ग्रामीण रुग्णालयात अॅडमीट झालो . ऑक्सीजन लावणे क्रमप्राप्त होते . आजवर कोरोनाचा त्रास ऐकत आलो होतो . आज स्वतः अनुभवत होते . 'जावे त्याच्या वंशा कळे .. ' हेच खरे.

        रात्री बारा वाजता खंडाळा रूग्णालयात गेलो . बेड तयार करून साडेबाराला ऑक्सीजन पुरवठा सुरू केला . काही तातडीची इंजेक्शन दिली . रात्री दोन वाजता शलाका व अक्षयला घरी जायला सांगीतले. 


गुरूवार दि . ८ - सकाळपासून थोडं आवरलं , फ्रेश झालो पण दम वाढला होता .थोडंटेन्शन सुध्दा ..  ऑक्सिजन सातत्याने सुरूच होता . सकाळी नाष्टा केला पण तोंडाची चव गेली होती . वास तर दोन दिवस कळतच नव्हता .  वैद्यकिय अधिक्षक डॉ कोरडे , डॉ . लोखंडे स्वतः येऊन तपासले . सर्वांना उपचाराच्या सूचना दिल्या . पटापट औषधे दिली . पुन्हा अॅन्टीजन टेस्ट केली ती पॉझिटिव्ह आली .  दुपारपर्यंत खूपच दमछाक झाली , तोपर्यंत फोन बंदच ठेवला होता . दुपारनंतर अनेकांचे फोन झाले .काहींचे उचलले, काहीचे उचलता आले नाही . अनेक विचारांचा कल्लोळ माजला होता . प्रशांतला फोन केला . 

पाच वाजता आमदार मकरंदआबांचा फोन आला त्यांनी बराच वेळ विचारपूस केली . त्यांनी खूपच धीर दिला . त्यांचे अनुभव सांगीतले . कुठलीही चिंता करू नका , काही अडचण वाटल्यास फक्त फोन करा . वाटेल ती मदत करू.   औषधाची चिंता करु नका म्हणाले. त्यांच्या सकारात्मक बोलण्याने चांगला धीर आला .  एकदम विचारात बदल झाला . त्यांनी डॉ . कोरडे यांनाही फोन करुन उपचाराबाबत काळजी घ्यायला सांगीतले होते . 

         परत साडेपाच वाजता कोरडे सर आले . दहा मिनिटे चालुन सॅच्युरेशन तपासले . काय करायचं ते सांगीतले . 

सहा वाजता सगळी जीवलग मित्र मंडळी प्रवीण , राजेंद्र भोसले , जीजाबा काळे , हिरा , उमेश पवार आणि आणखी दोघे थेट वॉर्ड बाहेर येऊन बघून गेले . सायंकाळी योगेश , सचिन , सत्यवान सगळी भेटली . बरं वाटलं . लोकांच्या मनात भीती कमी झाल्याची जाणीव झाली . 

रात्री जेवण मग थोडा वेळ कसाबसा बसून काढला  . मग १० .५५ ला इंजेक्शन काही सलाईनमध्ये , काही शिरेत व एक पोटात ... मग ऑक्सीजन लावून निवांत पडून राहिलो . अचानक थोडी उबळ आली  .जीव कासावीस झाला  पण मनाचा निर्धार करून सहन केलं . थोडया वेळाने बरं वाटू लागलं . रात्री १ वाजता अंग पुन्हा दुखायला लागलं होतं . विचार करत होतो की गोळी मागावी का ? की येईल कमी ! साधारण पंधरा मिनिटे यात गेली . तेवढ्यात सिस्टरांनी आवाज दिला . कोणीतरी आलं होतं . समोर शलाका होती . बिचारीला झोपच नाही . त्यांनी मग गोळ्या दिल्या . यावेळी नायगाववरून दोघे पाहुणे काही कामाने आले होते तेही भेटून गेले . गोळी खाऊन पुन्हा झोपण्याचा प्रयत्न सुरू केला . 

शुक्रवार - ९ - सकाळी फ्रेश झालो . आठ वाजता नाष्टा केला .  तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ . अविनाश पाटील, 

डॉ . येळे , डॉ . पडळकर यांनी विचारपूस केली.  

शलाकाने स्वतः जेवण आणले , औषधे , इंजेक्शन दिले . 

ऑक्सीजन लावून ओणवा झोपलो. सकाळी चंद्रकांत पाचे , प्रवीण पवार भेटून गेले .

      तीन वाजता डॉ . कोरडे यांनी तपासले .  ऑक्सीजन शिवाय सॅच्युरेशन लेव्हल पाहिली . खरं तर सॅच्युरेशन वाढणं अपेक्षित होत पण वाढल नाही . ब्लड रिपोर्ट आले होते त्याचे अवलोकन केले नंतर त्यांनी काही इंजेक्शन देण्यास सांगीतली . दिवसभर अनेक विचार डोक्यात घोळत होते .

सायंकाळी पाच वाजता डॉ . लोखंडे सर येऊन गेले . त्यांनी सॅच्युरेशन चेक केलं . ऑक्सीजन लावून पालथे जास्तीत झोपा म्हणून सांगितले . बहिणीचा फोन येऊन गेला . तिने टेन्शन घेतलं होतं . तीला खूप समजावलं . शेवटी बहिणीची माया असते हेच खरं . महेश नानांचा फोन आला त्यांनी हॉस्पीटल बदलायचं असेल तर सांगा तयारी करतो म्हणून बोलले . रात्री संजय खामकर भेटले . पुरुषोत्तम जाधव साहेब , बाळासाहेब साळुंखे , अनुप  सूर्यवंशी , नवनाथ ससाणे , संजय जाधव इतर माझे मित्र असे दिवसभरात अनेकांचे फोन आले . सर्वानी धीर दिला . सोशल मिडीयावर अनेकांनी काळजी घेण्याच्या सूचना केल्या होत्या . काहींनी देवाकडे साकडे घातले असल्याचे कळविले . हे लोकांचे प्रेम होते . रात्री ११ वाजता इंजेक्शन दिली गेली . डबा घेऊन आलेली शलाका रात्री अकरा वाजता घरी गेली . त्यानंतर ती जेवणार होती . 

शनिवार दि . १० - सकाळी लवकरच आटोपलं , कारण इंजेक्शन लवकर द्यायची होती . पण थोडं एक्झरशन झालं तरी धाप लागून श्वसनाला त्रास होतच होता . ऑक्सीजन लेव्हल वाढतं नव्हती . शलाका चहा नाष्टा देऊन आली . त्यांनीच सर्व इंजेक्शन दिली . श्वसन क्रीया सुधारत नसेल तर  मोठया हॉस्पीटलला शिफ्ट होण्याचा विचार सुरु होता . 

दुपारी १ वाजता आमदार मकरंद आबांचा  फोन आला . त्यांनी काळजी घेण्याविषयी सूचना केल्या . लागेल ती मदत करण्यात ते नेहमी अग्रेसर असतात . तोच अनुभव माझ्या बाबतीतही . आबांचा फोन आला की नेहमीच मोठा आधार वाटतो . सव्वा एक वाजता डॉ . कोरडे सरांनी राऊंड  केला . उपचाराच्या सूचना केल्या . दुपारचे एक इंजेक्शन व गोळ्या घेतल्या . पुरूषोत्तम जाधव साहेब , सुभाष भोसले साहेबांनी फोनवरून काळजी घेण्यास सांगीतले .  

चार वाजता सॅच्युरेशन व तापाची तपासणी केली . साडेचार वाजता चहा घेतला . बाहेर वादळं सुटलं , आभाळ गडगडू लागलं होतं, वीजांचा कडकडाट सुरू झाला . पावसाला सुरूवात झाली . मनात आलं देव करो नि पावसाबरोबर कोरोना वाहून जावो . 

सायंकाळी घरून फोन आला . मुलींच्या शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल आला होता . दोघींना चांगले गुण मिळाले होते . एक सुखद बातमी कानावर आल्याने मन प्रसन्न झालं . फोन वरून दोघींचे अभिनंदन केले . 

आठ वाजता डाॅ . कोकरे यांनी फोनवरून माहिती घेतली . सुधारणा होतेय का याची चौकशी केली . 

पावसामुळे लाईट गेल्याने खूप गरम व्हायला लागलं होतं . त्यातच ऑक्सीजन वाढवला तरी कमी व्हायचा . काहीच कळेना . म्हटलं लाईट यायला वेळ लागला तर कसं होणार ?पण सिस्टरांना कल्पना देताच त्यांनी ऑक्सिजन व लाईटचा काही संबंध नसल्याचे सांगीतले . अमोलना नवीन सिलिंडर जोडायला लावला . ऑक्सीजन पुरवठा सुरळीत चालू झाला . मग बरं वाटू लागलं . 

रात्री नऊ वाजता डबा आला़. जेवण केलं . रोजची इंजेक्शन , औषधे घेतली . आता पोटातील इंजेक्शन तर नको वाटतं होत . रोज सकाळ संध्याकाळ ते सुरू होतं . पण नाइलाज होता . बाकी किरकोळ तपासण्या झाल्या . ऑक्सिजन सुरू केला . आज लाईट आलीच नाही त्यामुळे उकडून  जाम झालो त्यामुळे झोप लागेना . अधूनमधून पेपरने वारा घालत होतो पण निरर्थक ! रात्री सव्वा एक वाजता थोडं अस्वस्थ वाटलं , काहीतरी प्रॉब्लेम झाला . बघितलं तर ऑक्सीजन पुरवठा कमी झाला होता . लगेच धायगुडेंना कल्पना दिली . त्यांनी सिलिंडर बदलून तो सुरळीत केला . दीड वाजता पुन्हा कलंडलो . 

रविवार दि . ११ सकाळी लवकरच जाग आली . ऑक्सीजन बंद करून फ्रेश व्हायला गेलो . थोडं दमल्यासारखं झालं . पण नंतर सेट झालो . मग हातपाय धुवून कपडे बदलले . घरून नाष्टा , चहा आला होता . तो घेतला . जरा छान वाटलं . मग पाच मिनिटे चालून बघितले . सॅच्युरेशनमध्ये वाढ झाली होती . याचे मोठे समाधान वाटले . मग शलाकाने नेहमीची औषधे इंजेक्शन दिले . त्यानंतर आणखी बरं वाटलं . तशी कल्पना डॉ . कोरडे यांना दिली . प्रशांतला फोन करून कळवलं . अकरा वाजता त्यांनी राऊंड घेतला . कंडिशन सुधारते आहे असे सांगितले त्यामुळे काळजी कमी झाले . 

साडेबाराच्या सुमारास मनोज पवार येऊन चौकशी करुन गेले . तसे अनेकांचे फोनही आले . दुपारी जेवण छान झालं . दुपारचं एक इंजेक्शन देण्यात आलं . त्यानंतर ऑक्सिजन लावून निवांत पहुडलो असताना ' फरगॉटन आर्मी - बॅटल ऑफ १९४२ - ४३ ' पाहत बसलो . देशाच्या स्वातंत्र्यासाठी आझाद हिंद फौजेचे योगदान यातून समजले . 

सायंकाळी चहाच्या वेळी थोडं चालून बघितलं . काही फरक वाटतोय का चेक केलं . पण परिस्थिती सकाळ सारखीच होती . आठ वाजता डॉ. कोरडे सरांनी फोन करुन परिस्थिती विचारली . त्यांना आज राऊंडला येता आले नव्हते . त्यांचीच तब्बेत थोडी पावसात भिजल्याने बिघडली होती . महेश नानांचा सारखा पाठपुरावा होता . शिफ्ट करायचं असेल तर लगेच मला सांगा . मी बघतो पुढचं काय ते ? पण त्यांना म्हटलं जरा धीर धरा , उदया बघू काय करायचं ते ? गरज वाटली तर निर्णय घेऊ असं ठरवलं होतं . घरच्या सगळ्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता ही खूप समाधानाची बाब होती . 

रात्री नऊला जेवण झालं . तेव्हा डॉ़ . कोकरे यांनी राऊंड दिला . दहा वाजता रात्रीचे इंजेक्शन आणि औषधे नेहमीप्रमाणे घेतली . उदयाचा उष:कालापूर्वीची रात्र कशी जातेय याचा विचार करत बसलो . रात्री बारा , तीन वाजता दोनदा लक्षपूर्वक उठून ऑक्सीजन पुरवठा काही वेळ बंद केरुन पुन्हा सुरु केला . दर दोन तासांनी मध्ये बंद करणे गरजेचे असते . 

सोमवार दि . १२ - सकाळी लवकर उठून फ्रेश झालो . आज जरा स्वतःला तपासून बघायचं होतं . रोज फ्रेश होण्याच्या काळातही थोडा दम लागायचा . पण आज तो कमी जाणवला . त्यानंतर थोडे प्राणायाम करून पाहिले . पण म्हणाव्या तेवढया क्षमतेने ते करता आले नाहीत . आठ वाजता नाष्टा झाला त्यानंतर जरा चालून पाहिलं . सगळं ठीक होतं . सॅच्युरेशन थोडी वाढ होती . त्यामुळ बरं वाटलं . 

दहा वाजता डॉ . कोरडे यांचा राऊंड झाला , त्यांनी तपासणी केली . ऑक्सीजन चालू ठेवायला लावले . नेहमीची इंजेक्शन रेग्यूलर करायला लावली . साडेअकरा वाजता इंजेक्शन दिली गेली . त्यानंतर एक वाजता अक्षयने जेवण आणून दिले . त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते युवराज ढमाळ येऊन भेटून गेले . अनेकांचे फोन चालूच होते . 

आज दिवसभर पडून पुस्तक वाचत बसलो . रोजच पानं चाळतं होतो . पाच वाजता चहा घेऊन थोडं दहा मिनिटे चालण्याचा सराव केला . अजून थोडी धाप लागत होती . पण आता मागे हटायचं नव्हतं . 

रात्री आठ़ वाजता सिस्टरांनी नेहमीची तपासणी करून रिडींग घेतली . नऊ वाजता डॉ . कोरडे सरांनी राऊंड घेतला . परिस्थिती सुधारणा होईल असं सांगीतलं . आज थोडं अंग दुखत असल्याचं निदर्शनास आणून दिलं . तशा सूचना त्यांनी दिल्या . साडेनऊला डबा आला . पोटभर जेवण केलं . त्यानंतर शलाकाने रात्रीची सर्व इंजेक्शन दिली . तेवढयासाठी स्वतंत्र पीपीई कीट घालून रोज त्यांची सेवा सुरुच होती . त्यानंतर ऑक्सीजन लावून पुस्तक वाचत राहिलो . 

मंगळवार दि . १३- सकाळी साडेसहालाच उठलो . तसं रात्रीचं तीन चार वेळा उठणं व्हायचं . पण सकाळी लवकर आटोपलं . इतर पेशंटच्या लोडमध्ये फ्रेश व्हायचं म्हणजे थोडं रिस्की वाटायचं . त्यामुळं लवकर उरकलं . थोडं प्राणायाम केलं . अजूनही एक्झरशन झालं की थोडी धाप लागतच होती . त्यामुळे काळजी घेणं गरजेचं होतं . सकाळी शलाका व संगूचा फोन येऊन गेला . त्या नेहमीच योग्य मार्गदर्शन करतात त्यामुळं आधार येतो . चहा आला होता . त्यासोबत आज बिस्किट घेतलं . नंतर नाष्टाही केला . 

सकाळी दहा वाजता डॉ . कोरडे यांनी राउंड घेऊन सूचना केल्या . सकाळी ११ वाजता सर्व इंजेक्शन दिली गेली .. त्यानंतर पुस्तक पारायण सुरूच होते . आज नव्याने पुन्हा रक्त तपासणी करायची होती त्यामुळे ब्लड कलेक्शन दिले . दिवसभरात नेहमीप्रमाणे फोन , मेसेज सुरूच राहिले . पाच वाजता चहा नंतर पुन्हा चालून पाहिले . सगळं ठिक होत चाललयं पण सॅच्युरेशन वाढ अपेक्षित तेवढी अजून नाही . रात्री दहा वाजता डॉ . कोरडे यांनी पुन्हा तपासणी करून औषधे दिली . रात्रीचं जेवण , इंजेक्शन आणि झोप नियमित क्रमाने सुरुच राहिले . 

बुधवार दि . १४ - सकाळी उठून आटोपलं . आज चांगली सुधारणा होती . सकाळी नाष्टा , औषधे घेऊन एक राज्यस्तरीय गुगल शैक्षणिक ट्रेनिंग अटेंन्ड केले . खरं तर ऑक्सीजन व सलाईन यामुळे एका हातात मोबाईल घेऊन केवळ हजेरी लावून  ऐकण्याचे काम केले . कृती काहीच करता आली नाही . मग निवांत वाचत बसलो . दिवसभर फोन येतच होते . पण बोलताना धाप कमी झाल्याचे जाणवले . तसं सॅच्युरेशन आणखी वाढायला हवं पण डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ते हळूहळू वाढेल . त्यामुळे चिंता नाही . रात्री इंजेक्शन औषधे घेऊन झोपी गेलो . 

गुरुवार दि .१५ - सकाळी सहालाच आटोपलं . आज आणखी चांगलं वाटतं होतं . थोडी प्राणायाम केली . त्यामुळे तजेलदार वाटलं . सकाळपासूनच मन घराकडे ओढ घेत होतं . आज अंथरुणावर खिळून राहिलेले बारा दिवस झाले होते . हे बारा दिवस म्हणजे एक तपासारखे जाणवले . प्रत्येक दिवसाचा वेगळा अनुभव काही निराळाच . पण डॉक्टरांना विचारून आज घराची वाट धरायची हा निर्धार पक्का आहे . सकाळपासून व्हीटॅमीनचे दोन इंजेक्शन दिली .. त्यानंतर कालचे उर्वरीत ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण केले . 

 डॉ . कोरडे व डॉ . कोकरे सर यांनी पुढील सूचना केल्या . दुपारनंतर सोडण्याबाबत विचार करू असं त्यांना सांगितलं . सायंकाळी पाच वाजता शेवटी दवाखान्यातून सोडण्यात आले . 

घरी पत्नी , मुली , मित्र व शेजारी स्वागताची तयारी करून होते . सर्वानी छान औक्षण करून स्वागत केलं . घरी सुखरूप पोहचल्याचं मोठं समाधान होतं . आज कित्येक दिवसांनी मोकळा श्वास घेतला होता . घरी पोहचल्यानं बारा दिवस झालेल्या त्रासाचे विस्मरण झाले . आता पुढील महिनाभर  आरामच करावा लागणार आहे . 

    खरचं कोरोना काय आहे . याचा अनुभव याची देही घेतला होता . अतिशयोक्ती नव्हे पण मृत्यूच्या दाढेतून माघारी आलो हे तितकचं खरं आहे . देव करो आणि अशी वेळ कोणावरही न येवो . यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे .


 

॥ आधुनिक सावित्री ... यमाच्या तावडीतून सत्यवानाचा जीव वाचवून सावित्रीने आपल्या कुंकवाचं रक्षण केलं होतं हे पुराणकथात ऐकलं होतं . पण कोरोनाच्या भयाण काळाशी मी लढा देत होतो . त्या पाठीमागे घरची जबाबदारी सांभाळून हॉस्पीटलमध्ये सर्व औषधोपचारासह मानसिक आधार देऊन ज्यांनी अहोरात्र सुश्रूषा केली . त्या माझ्या अर्धांधांगिणी शलाका म्हणजे आधुनिक सावित्रीचं ! त्यांच्यामुळेच या सर्वाचा सामना करण्याचे धैर्य आले . आणि यातून सुखरूप बाहेर पडलो हे प्रांजळपणे कबूल करायलाच हवे . ॥ 


आयुष्य खूप अनमोल आहे . 

काळजी घ्या ... सुरक्षित रहा .. !! 


सेवेसाठी सदैव तत्पर ..

- दशरथ ननावरे [ श्रीमंत ]

        इतिहास- अभ्यासक 

        9922815133


Tuesday, 29 September 2020

॥ रानवाटा ॥ जोर ते क्षेत्र कोळेश्वर


 

॥ रानवाटा ॥ सफर निर्भिड जंगलाची 

- दशरथ ननावरे ( श्रीमंत ) , इतिहास अभ्यासक 

जोर ते क्षेत्र कोळेश्वर


सह्याद्रीचा उपरांगा मधील डोंगरांच्या दऱ्याखोऱ्यातील आडवाटेने मार्गक्रमण करायचं म्हणजे एक मोठी पर्वणीच असते . सह्याद्रीच्या माथ्यावर असलेलं निसर्ग सौदर्यं, डोंगराच्या कुशीतील धार्मिक ठिकाणे आणि घनदाट जंगलातील प्रवास यातून मिळणारा अफलातून आनंद हा केवळ स्वर्गसुखच !  आमचे मार्गदर्शक आणि ट्रेकर्स समूहाचे सर्वेसर्वा श्रीपाद जाधव साहेबांनी साद घातली . गतवेळी  जोर ते क्षेत्र महाबळेश्वर ट्रेक पूर्ण करताना कोळेश्वर पठारावरून दाट जंगलात रस्ता  चुकला . त्यामुळे सुमारे दोन तास वाट शोधण्यात गेले . पण ती सापडली नाही . त्याच चुकलेल्या वाटेचा शोध घेण्याचे निश्चित केले होते. 

      ठरल्याप्रमाणे आम्ही तयारीनिशी पहाटे पाच वाजता खंडाळा सोडून वाईकडे प्रस्थान केले . पहाटे सहा वाजता वाई विश्रामगृहावरून श्रीपाद जाधव साहेब , निलेश बोडके , निखिल काशिद , पांडूरंग भिलारे आणि मी जीपमधून जोर गावाच्या दिशेने निघालो . पहाटेच्या थंड आणि मंद वाऱ्यात दीड तासाभराचा प्रवास करून जोर गावात पोहचलो . जाताना बलकवडी धरणाचा रम्य परिसर आणि त्याच्या भोवतीने नागमोडी रस्ता म्हणजे सुखद प्रवास .   गावात पोहचल्यावर सकाळी सकाळी नारायणरावांच्या घरी मस्त चहाचा फुरका मारला . आणखी तजेलदार झालो . तेथून मार्ग दाखवणारे विठ्ठलराव सोबत आले .  

        जोरच्या उत्तरेला असणाऱ्या भल्या मोठ्या डोंगराला भिडायचं होतं . उंच डोंगरावर पसरलेलं कोळेश्वराचं पठार पादाक्रांत करायचं होतं . गतवेळी याच जंगलात जळवांनी घायाळ केलं होतं . त्यामुळे साहेबांनी सर्वांसाठी गुडघ्या पर्यंत पोहचणारे पायमोजे आणले होते . सर्वांनी पँटच्या वरून ते घातले . हातात काठी घेतली . शिकारीला निघालेली फौज वाटावी असं दिसत होतं . पूर्वेच्या दिशेला वीस मीटर डांबरी रस्त्याने जाऊन डाव्या हाताला रानातून टेकडी चढायला सुरुवात केली . भाताच्या आणि नाचणीच्या शेतीच्या बांधावरून पुढे जात टेकडीचा हिरवागार गवताच्या पात्यातून मार्ग काढत जंगलात प्रवेश केला . आता दाट जंगल सुरु झाले होते . सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहचणार नाही एवढी दाट झाडी होती . त्यातून चढणीला सुरुवात झाली आणि रिमझिम पावसालाही . सकाळच्या प्रहरी पक्षांचा किलकिलाट ऐकू येत होता . हिरव्यागार झाडीतून जाताना मन प्रसन्न झाले . मजल दरमजल करीत डोंगराच्या कुशीतून पुढे सरकत होतो . पावसाचं प्रमाण या भागात जास्त असल्याने झाडांची खोडं आणि फांदयाही शेवाळलेल्या होत्या . पावसाची रिमझिम आणि मध्येच वाऱ्याची झुळूक यामुळे अंगावर शहारा येत होता . हळूहळू पुढे जात होतो मात्र जंगल काही संपत नव्हते . 



पाऊण एक तासाच्या चालीनंतर एका उंच टेकाडाला वळसा घालून वर निघालो . वाटाडयांनी एका ठिकाणी वाढलेली झाडी व गवत तोडून जागा साफ करून एक मोठा दगड उघडा केला . आम्ही  विचारलं हे काय ? तर त्यांनी सांगितले हा देव आहे . मी म्हटलं असेल रानातला एखादा देव . पण उत्सुकतेपोटी मी विचारलं तेव्हा ते म्हणाले हा ' भूताचा देव ' आहे . मी मनातल्या मनात विचार करू लागलो . देव आणि तोही भूताचा , असं कसं असू शकतं . त्याच तंद्रीत एका छोटया दगडावरुन पाय घसरला आणि मी भानावर आलो . तोवर भूताचा देव मागे पडला होता . तेथून एका उंच उघडया जागी पोहचलो . या ठिकाणाहून बलकवडी धरणाचे विहंगम दृष्य नजरेस पडत होतं . धरणाचे अथांग पसरलेलं पाणी , त्यावर धुक्यांची झालर पसरलेली होती .  येथेही थोडे फोटो काढण्यात वेळ गेला . सर्वत्र दाट धुकं पसरलं असल्याने दुरवरचा परिसर दिसत नव्हता . अजून डोंगरमाथ्यावर पोहचायला बरचं अंतर बाकी होतं . त्यात वाट निसरडी झाली होती . आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली . 

    


  रस्त्यात पुढे चांगलीच चढण होती .एका वळणावर पानं झडलेल्या एका झाडाच्या फांदीवर गवती रानफुलाचा गुच्छ उगवलेला होता . एखादया कुंडीत लावलेल्या रोपांसारखा . झाडावरची ही फुलांची कुंडी मोबाईलमध्ये कैद केली .  त्यातून पुढे दाट झाडीतून जाताच जळवांनी आपला करिष्मा दाखवायला सुरुवात केली . पण साहेबांनी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं . आम्ही पण त्याच इराद्याने चाललो होतो . अचानक माझे लक्ष पायाकडे गेले . उजव्या पायावर बारा आणि डाव्या पायावर आठ जळवांनी हल्ला चढवला होता . मी चकितच झालो . कार्वीच्या पानाने पटापट खेचून काढून टाकल्या . आणि पुढे चालते झालो . आता दाट झाडीतून बाहेर पडून एका विस्तीर्ण पठारावर आलो होतो . दाट धुक्यांनी परिसर झाकोळलेला होता . पठारावर पिवळ्या , निळ्या , जांभळ्या फुलांचे आच्छादन मनमोहक वाटतं होतं . आणि अशा ठिकाणी फोटो काढला नाही असं कधी होत नाही . पुन्हा मागे फिरुन डाव्या हाताने थोडं खाली उतरून परत दाट झाडीतून रस्ता शोधत पुढे गेलो . खळाळत्या पाण्याचा आवाज लक्ष वेधून घेत होता . तेवढयात समोर ओढा दिसला त्याच पाण्यातून पुढे जायचं होतं . दगडावर पाय ठेवून जावे तर ती शेवाळलेली असल्याने घसरत होती . त्यामुळे गुडघाभर पाण्यात पाय बुडवण्यापलिकडे पर्याय नव्हता . एवढा वेळ चिखलाने रबडलेले बुट आपोआप धुवून निघाले . आणि भिजल्या पायाने पुन्हा रस्ता तुडवायला सुरुवात केली . 



     कोळेश्वरचे पठार म्हणजे घनदाट झाडीचा परिसर . लोकांच्या वर्दळी पासून कोसो दूर असल्याने आजही इथले जंगल अबाधित आहे . कोसळलेले मोठमोठे वृक्ष तसेच आहेत . रस्त्यात एखादे झाड पडले असेल तर वळसा घालून पुन्हा तोच रस्ता पकडावा लागत होता . शेवटी अर्धा तासाच्या पायपीटीनंतर कमळगड - कोळेश्वर रस्त्याला पोहचलो . गेल्यावेळी इथूनच जोरला जाण्यासाठी वळायला हवे होते . मात्र अगोदरच गुरांच्या वाटेने गेल्याने रस्ता चुकलो . मग मात्र आसण दऱ्याच्या मार्गे गेलो होतो . खरं तर या बेटकवणीच्या वाटेने जाणं गरजेचं होतं . त्याचाच शोध पुरा झाल्याचे समाधान होते . 

         पुढे रुळलेल्या वाटेने कोळेश्वर जवळ केले . कोळश्वर एक ऐतिहासिक धार्मिक स्थळ . जंगलाच्या मध्यावर दगडांचा एक चौथरा आहे . ना भिंती ना छत , त्याच्या मध्ये एक स्वयंभू शिवलिंग आहे . हेच ते कोळेश्वराचे पवित्र ठिकाण . बाहेरच्या बाजूला एक नंदी आहे . पण तो जीर्ण झालेला आहे .  श्रावण महिन्यात क्षेत्र महाबळेश्वराहून पाच नद्यांच्या उगमाचे पाणी पायी चालत आणून येथे जलाभिषेक केला जातो . या ठिकाणाचे विशेष महात्म्य आहे . सर्वानी पायातले बुट , सॉक्स काढुन मंदिर परिसरात जावून मनोभावे नमस्कार केला . इथं नेहमीच प्रसन्न वाटतं . पुन्हा परत फिरण्यासाठी बुट घालायला सुरुवात केली . पण इथेही जळवांचा कहर होता . काही बुटात तर काहींनी पायमोज्यावर आक्रमण केले होते . दगडावर उभे राहून एकमेकांच्या आधाराने बुट घातले आणि परत माघारी फिरलो . काही अंतरावर उघडया मैदानावर दगडी बैठक शोधून नाष्टयासाठी थांबलो . साहेबांनी स्वतः बनवलेले भोपळ्याचे पराठे आणि आवळयाची चटणी आणली होती . सर्वानी मस्त ताव मारला . शेवटी भिलारे सरांनी आणलेले खजुराने तोंड गोड केले . आणि पाणी पिऊन पुढे चालतो झालो . आता तोच परतीचा मार्ग होता . रस्ता चुकण्याचा संभव नव्हता . पण जळव्यांच्या जलव्याची काळजी घेणं गरजेचं होतं . कारण जळवाचा कहर साहेबांच्या पोटापर्यंत कधी पोहचला हे कळलंच नव्हतं . रक्ताचा डाग टी शर्ट वरुन झळकू लागला तेव्हा कुठं लक्षात आलं होतं . 

         परतीच्या रस्त्याने पाऊलं झपाझप पडत होती . पठाराचं जंगल पार करून डोंगर उतरणीला सुरुवात केली होती . आता बेटकवणी दऱ्याच्या निसरडया वाटेने उतरताना काळजी घेणे आवश्यक होतं . आजूबाजूचा परिसर न्याहळत आणि रान झाडांची ओळख घेत खाली उतरत होतो . रानातील कुरडू , भारंगी , थाळा , मुरुड , कवला , बरका, शेंडवाल , डहाण , आंबू , भाळगा , रानमूग या रानभाज्यांची ओळख झाली . चिचुर्डी , पाचरकुडी या औषधी वनस्पती पाहता आल्या . 



      धुकं आणि पावसाची रिमझिम यांचा खेळ सुरूच होता . एका टेकाडावर थोडा वेळ थांबून पुन्हा वाट धरली . जेवढं चढलो तेवढं उतरण्याशिवाय पर्याय नव्हता . आता तेच जंगल पार करुन खाली उघड्या टेकडीवर आलो . गवतातून जाणारा रस्ता मोकळा होता पण चांगलाच घसरडा होता . सहजच पाय घसरत होता . एका जागेवर साहेबांना त्याचा अनुभव आलाच, कधी त्यांचा तोल जावून दणका बसला ते कळलं नाही .  पण त्यांच्या दणकट शरीराने तो सहन केला . पुढे एका ओघळावर पाय स्वच्छ करून आम्ही जोर गावात पोहचलो . नारायणरावांच्या घरी जेवणाचा मस्त बेत केला होता . चपाती , डाळीची आमटी , बटाटयाची भाजी , भात आणि पापड अशा रुचकर जेवणाने मनसोक्त पोटपूजा झाली . त्यावर त्यांच्या घरचा गवती कोरा चहा म्हणजे अप्रतिमच .. तो घेऊन त्यांचा निरोप घेऊन आम्ही गाडीत बसून वाईच्या दिशेने गेलो . अर्थातच निखिलने यावेळीही शुटींग आणि फोटोचे काम चोख बजावले होते . त्याचा व्हीडीओ बघणे म्हणजे वेगळा आनंद असतो . 

       जोर ते क्षेत्र कोळेश्वर हा अवघड मार्ग पार केल्याचे समाधान प्रत्येकाच्या चेहर्‍यावर होते . पण निसर्गाने भारलेला मार्ग ट्रेकर्सना निश्चित आनंद देणारा तर आहेच पण निसर्गाची अदभुत किमया पाहणे म्हणजे एक वेगळी पर्वणी आहे , ती अनुभवने म्हणजे मोठे भाग्यच  . 


- दशरथ ननावरे ( श्रीमंत )

  इतिहास अभ्यासक