॥ रानवाटा ॥ सफर निर्भिड जंगलाची
- निखिल काशिद / कृष्णा तिकोणे
जोर - कोळेश्वर - कुंभळजाई - असानेश्वर - जननीमाता - उळुंब
एक अध्यात्मिक ट्रेक...
🧘🏻♂️🧘🏻♂️
सकाळची वेळ होती मी, निखिल यादव आणि कृष्णा निघालो पहाटे पाच वाजता श्रीपाद जाधव साहेबांकडे वाईला. एक अध्यात्मिक ट्रेक करायचं एवढंच माहित होत. रेस्ट हाऊसला त्यांच्या घरी पोहचताच त्यांनी वजनकाटा समोर आणून ठेवला. समोर असलेल्या पोत्यांतून वेगवेगळ्या जातीचे तांदूळ पाच पाच किलो वेगवेगळ्या पिशव्यांत काढायला लावले. हे साहित्य कोळेश्वर पठारावरील जंगम वस्तीवरील किसन अप्पांच्या घरी द्यायला घेतले होते. कृष्णाने पटकन पिशव्यांवर नावे टाकली. काळी कुसळ , काळी साळ आणि तांबसाळ अश्या 3 जातीचे ते तांदूळ होते. बोडके अण्णांनी पटापट वजन करून पिशव्या बांधून घेतल्या. बोलता बोलता लक्षात आलं आजच्या ट्रेक मध्ये एवढेच पाचजण आहेत. साहेबांनी पटकन बाहेर येऊन विचारलं चहा कोण कोण घेणार. आम्ही घेणार म्हणून होकार दिला. निखिल यादव चहा पित नाही त्यांने नको म्हणून सांगितले. तोच साहेब त्याला म्हणाले चालेल तुझ्या साठी मस्त काढा आणतो. पण त्याला ठाऊक होत घरी आलं की साहेब नेहमी आयुर्वेदिक कडवट वनस्पती खायला लावतात. क्षणात तो बोलला साहेब मला चहाच द्या. त्याच बोलणं लक्षात आलं , त्यामुळे साहेब त्याला बोलले असुदे तुला दोन्ही थोडं थोडं देतो. सोबत बोडके अण्णांनी सुद्धा काढा घेतला. साहेबांच्या हातचा एकदम कडक आयुर्वेदिक चहा पिऊन घेतला. आता तिघे आम्ही तरुण वर्ग प्रत्येकाच्या बॅगेत 5-5 किलो तांदूळ दिला.वरून अजून 1-2 पाण्याच्या बाटल्या आणि प्रत्येकाच्या बागेत किमान 1 किलो गूळ. आमच्या तिघांच्या बॅग आता जवळपास 9-10 किलो वाजनापर्यंत पोहचल्या.
सोनावणे मामांनी आम्हाला जोर पर्यंत गाडीने सोडलं.
जाता जाता बलकवडी धरणाशेजारी आम्हाला लागोपाठ 12 मोर दिसले. दिवसाची सुरुवात मस्त झाली. उगवतीचा सूर्य त्याबरोबर बलकवडी धरणाचे निळेशार अथांग पाणी आणि त्यापाठी दिसणारा एलिफन्ट पॉईंट च्या साक्षीने आम्ही एक फोटो घेतला. जोर मध्ये येऊन नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा अध्यक्षांच्या घरी चहा झाला. आमच्या बरोबर वाटाड्या म्हणून जोरचे पांडुरंग मामा आले. वेळ वाया न घालवता लगेच आम्ही पठाराकडे धाव घेतली. फोटो विडिओ काढत आम्ही अर्धा च्यावर चढ चढलो. वाटेत साहेबांनी हँड स्लीव्ह घालायला त्यांची बॅग कृष्णा ला दिली. त्यांच्या डोक्यात काय आलं त्यांनी कृष्णा ला विचारलं , आपण toss करू छापा आला तर ही पण बॅग उरलेला चढ संपेपर्यंत तूच घ्यायची आणि काटा पडला तर मीच घेणार. त्यांनी टॉस करायला नाणं मागितलं. मी विचार केला माझं काय जातंय बॅग तर कृष्णा घ्यावी लागेलं. मी पटकन नाणं काढलं अन दिल. छापा पडला बॅग कृष्णा ने घ्यायची होती. पण मी नाणं दिल म्हणून कृष्णाच्या अन माझ्यात परत टॉस उडवायच ठरलं , मनातल्या मनात मी विचार करायला लागलो उगाच दिलं नाणं. टॉस उडवला आणि मी वाचलो. मग पुन्हा दुसरा निखिल अन कृष्णा मध्ये टॉस उडवला गेला आणि निखिलला बॅग घ्यावी लागली. स्वतःची जवळपास 10 किलोची बॅग घेऊन वरून हि सुद्धा बॅग घायची होती. निखिल ने थोडा वेळ घेतली त्यानंतर कृष्णा आणि पुन्हा माझ्याकडे अशी तिघांत बॅग फिरली शेवटी माझ्याकडे आली. नाणं देऊन भयंकर मोठी चूक केली एवढंच माझ्या मनांत चालू होत. माझी 9 किलोची बॅग आणि त्यात हि साहेबांची 4 किलोची बॅग एवढं ओझं झालं होतं ना. त्यात मधून मधून जँगल सम्पयच मोठा चढ वरती उन पण लागायला सुरवात. एक एक पाऊल टाकणं कठीण जात होत. या दोघांपॆक्षा जास्त अंतर बॅग माझ्याकडे आली. कधी साहेब स्वतःहून बॅग घेतात असं वाटत होत. पण दुसऱ्याला त्रास व्हावा म्हणून चुकूनही कोणाला प्रतिसाद द्यायचा नाही हे आता कायमस्वरूपी लक्षात राहील.
या आधी एका झाडावर STF हि अक्षरे खडूने कोणीतरी लिहिली होती. त्यांचा अर्थ साहेबांना माहित होता पण बाकीच्या कोणाला तो समजेना आज ट्रेक च्या शेवटपर्यंत आठवून सांगा असं त्यांनी सांगितलं. ते शेवंतपर्यंत कोणी सांगितलं नाही. पण थोड्या वेळात मला पण ती अक्षरे उमगली होती. त्याच एवढा मोठा काही अर्थ न्हवता तर रस्ता चुकू नये म्हणून कोण्या ट्रेकर ने StraightForward हेच थोडक्यात लिहिलं होतं. आज आपण आध्यत्मिक ट्रेक साठी आलो होतो त्यामुळे सुरवातीलाच ,चालणे सुरु होतानाच आम्हाला जाधव साहेबांनी तीन प्रश्न देऊन ठेवले होते ते खालील प्रमाणे...
१) तुम्ही कोण आहात?
२) तुम्ही का जगताय?
३) तुमच्या जीवनाचं उद्दिष्ट्य काय?
याची उत्तर दुपारी जेवण झाल्यावर द्यायची होती त्यामुळं डोक्यात कायम यांची निरनिराळी उत्तर डॊक्यात घुमत होती. मस्त पक्षांचा किलबिलाट ऐकत जंगलवाटेने आम्ही कोळेश्वराला पोहचलो. आत्तापर्यंत चार की मी अंतर झाले होते .हे इथल स्वयंभू जागृत देवस्थान आहे. इथलं शिवलिंग नऊ फूट लांब आणि 6 फूट रुंद एवढं मोठं आहे बाजूला दगडी चौथरा आहे डोक्यावरती छत नाही पण जंगलातील झाडांनी नैसर्गिक छत तयार झाले आहे. या ठिकाणी खूप पालापाचोळा जमा झाला होता. सर्वांनी ठरवून तिथली स्वच्छता केली. त्या ठिकाणी दोन मिनिटं शांत बसलो , मन एकाग्र करण्याचा प्रयत्न केला. मग जाधव साहेब म्हणाले आपण आता ध्यान करू या , त्यांनी सांगितले मी व्यंकटेश स्तोत्र म्हणतो ते संपेपर्यंत सर्वांनी ध्यान करा ( डोळे बंद करून दोन्ही भुवयांच्या मध्यभागी लक्ष केंद्रीत करायला सांगितले ) . साहेबांनी व्यंकटस्रोत म्हणायला सुरवात केली. डोळे बंद करून सर्वांचे लक्ष त्यांच्या आवाजाकडे होते. सर्वजण मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. डोक्यात बरेच विचार येत होते. हळू हळू ते बाजूला होऊन मन एकाग्र होऊ लागले. पक्षांचा किलबिलाट पण बंद झाला जणू ते सुद्धा द्यान लावून ऐकत होते. थोड्या वेळानंतर सगळ्यांना डोळे उघडायला लावले. खरं तर डोळे उघडायची इच्छाच होत न्हवती. पण तेव्हा समजलं आपण एक दोन पाच मिनिटं न्हवे तर चक्क अर्धा तास ध्यान लावून बसलो होतो. मला तर स्वतःवर एवढा विश्वास बसत न्हवता एवढा वेळ आपण असे बसूच शकत नाही वाटत होत. जाधव साहेबानी प्रत्येकला ध्यानाचा अनुभव विचारला परंतु कोणीच काहिच बोलले नाही.......सर्वजण एका वेगळ्याच तनदरी मध्ये होते कोणालाच ध्याना मधून मिळालेली वेगळीच अशी शांतता तोडण्याची इच्छा होत न्हवती . काही वेळाने प्रत्येकाचे अनुभव घेण्यात आले सगळेजण शांत झाले होते.
बोडके अण्णांनी कोलेश्वराला गुळाचा नैवेद्य दाखवला आणि सगळ्यांनी प्रसाद म्हणून गूळ खायला दिला , नाश्ता केलेला नसल्या मुळे सर्वांनी गुळाच्या छोट्या ढेपा खाऊन पाणी पिले.तिथून जंगम वस्तीवर विठ्ठल अप्पांच्या घरि जायचं होत. कृष्णा ला तर सकाळपासूनच खूप भूक लागली होती. वस्तीवर ताक प्यायला मिळेल का हा त्याचा प्रश्न वारंवार आमच्या कानावर पडत होता. जंगमवस्तीवर जाताना वाटेत एक कुंभळजाई देवीचे मंदिर लागते दर्शन घेऊन पुढे निघताच जाधव साहेबांच्या पायाखालून एक फुरसे जातीचा साप जोरात वळवळत बाहेर आला. त्यांच्या पावलावर पाय ठेवत मी मागे चाललो होतो. माझा पाय त्यावर पडणार तोच मला जाणवलं. आणि मी जोरात ओरडून पाय हवेतच फिरून बाजूला टाकला. कृष्णा अन बोडके अण्णांनी त्याच निरीक्षण करून घेतलं. अश्या प्राण्यांपासून आपली काळजी घेण्यासाठी डोंगरावर आपल्या पायांत चांगले बूट आणि फुल पॅन्ट असावी. पुढं समोरून 3 आजीबाई चालत येत होत्या त्यांच्या मनात आमच्याबद्दल काय विचार आले असंतील काय माहित. पण जाधव साहेबांनी त्यांची विचारपूस केली. ते लोक गवत आणण्यासाठी चालले होते. आम्ही आणलेल्या तांदळातून एक पाच किलोची पिशवी आणि एक किलो सेंद्रिय गूळ त्यांना दिला. पण त्यांना ओझं होईल म्हणून जंगम वस्तीवर ठेवतो सांगून त्यांच्याबरोबर ग्रुप फोटो घेतला. सगळे जण त्यांच्या पाया पडले आणि जंगम वस्तीकडे पाऊले टाकायला सुरवात केली. त्या तीन आजीबाई बऱ्याच भावुक झालेल्या दिसल्या. त्यानंतर आम्ही भुके च्या पोटी सपासप पावले टाकत एकूण सात ते आठ की मी चालून कोळेश्वर ते किसन जंगमआप्पांचे घर हा टप्पा पार केला .
मुख्य पठारावर्ती दाट जंगलाच्या मधोमध जंगम वस्तीजवळ किसन अप्पांच घर आणि भलेमोठे गव्हाचे शेत होते.अद्याप किसन आप्पांच्या घरी लाईट पोहोचली नाही . खरं तर येथील गहू अत्यंत चविष्ट आणि उत्तम प्रतीचा असतो हा फक्त दवबिंदुवर पिकवला जातो (म्हणजे बिन पाण्याचा , पठार उंचावर असल्यामुळे सकाळी पडणाऱ्या दवा वर ते उगवतात ). अप्पांच्या घरी पोहचताच त्यांचा कुत्रा बंटी आमच्यावर जोरदार आवाज चढून भुंकत होता. त्यांच्या घरासमोर मोठं शेणाने सरावलेले अंगण आहे. गेल्या गेल्या हात पाय तोंड धून घेतले आणि झऱ्याचे मस्त थंडगार पाणी पिऊन मन तृप्त करून घेतले. तेवढ्यात माझी नजर कृष्णकडे गेली हा तिथंच अंगणात आडवा झाला होता. त्याची भुकेची तीव्रता पाहून त्याला ताकाचे आश्वासन देण्यात आले. जंगम कुटुंबियांसाठी आणलेला सेंद्रिय गूळ, काकवी आणि वेगवेगळे तांदूळ त्यांना देऊन टाकले आणि उत्तम जेवणावर ताव मारला. जेवण उत्तम झाले होते स्वयंपाकघरातून एकामागोमाग एक अश्या गरम गरम नाचणीच्या भाकरी आणि अप्रतिम गव्हाच्या चपात्या येत होत्या. सगळेजण फुल्ल जेवले. आणि अंगणात येऊन झोपून गेले.
जाधव साहेब मात्र झोपले न्हवते ते आत बसून जोर ते महादेवाचा मुरा या पुढील ट्रेक चे नियोजन करत होते .मला तर खूप गाढ झोप लागली होती. वेळ खूप झाली होती खाली तुपेवाडीत उतरायचं होत साडेचार वाजले. पण ज्या कारणासाठी ट्रेकचं नियोजन केलं होतं त्या विषयावर चर्चा बाकी होती. आप्पांच्या घराशेजारीच असनेश्वराचे मंदिर होत तिथं जाऊन चर्चा करायची असं ठरल मग आम्ही चौघेही डोळे चोळत आवरु लागलो, पटकन बुट घातले नि तोंडावर पाणी मारून मंदिराच्या दिशेने निघालो...किसन अप्पा जंगम जाधव साहेबाना म्हणाले ,सर आपण खपली गहू बघून मंदिरात जाऊ या . हे खपली गव्हाचे बी जाधव साहेबानी किसन अप्पां ना दिले होते , आणि साहेबाना सुद्धा खपली गहू कसा आला आहे हे पहायची उत्सुकता होती . मग आम्ही त्यांच्या शेता ला पूर्ण वेडा मारून मंदिरात गेलो . जंगम अप्पानी शेतामध्ये गहू हेच मुख्य पीक पेरले होते त्या मध्ये साहेबांनी दिलेला खपली गहू थोड्या प्रमाणात आणि त्यांचा नेहमी चा गहू सगळीकडे होता .या त्यांच्या नेहमी च्या गव्हाचे एक वैशिष्ट्य होते ते म्हणजे त्याला इतर गव्हा प्रमाणे तूस न्हवते . ते त्यांचे परंपरागत चालत आलेले देशी गव्हाचे बी होते . गव्हा व्यतिरिक्त त्यांनी थोडी ज्वारी , हरबरा ,पावटा ,असे थोडे थोडे खान्या पुरते त्यांनी पेरले होते......कारण कोणतीही गष्ट आणायची म्हंटले तर त्यांना दीड तास खाली जायची आणि दीड तास परत यायची पायपीट फक्त खालच्या गावात जायला करायाला लागते , आणि वाई सारख्या ठिकाणी यायची पायपीट वेगळीच . त्यामुळे त्यांना छोट्या छोट्या गोष्टी आणण्यासाठी होणाऱ्या त्रासाची जाणीव आम्हाला प्रकर्षांने झाली .आणि रोज किसनाप्पांचा मुलगा अनिकेत दूध घेऊन डेरी मधे घालण्यासाठी एकूण तीन तासाची उतर-चढ करून वाशिवली मध्ये येतो हे ऐकल्यावर आश्चर्याचा धक्काच बसला .
मग आम्ही पूर्ण शेताचा फेर फटका मारला ,आणि मंदिरा जवळ आलो . फेरफटका मारत असताना किसनाप्पां म्हणाले की या वर्षी निसर्गाने साथ दिली नाही त्या मुळे गहू जोमात आला नाही , त्यात माकडे ,खारुताई , रानडुकरे नुकसान करतात ती वेगळीच .त्यांनी नुकसान करू नये म्हणून दिवसरात्र डोळ्यात तेल घालून त्यांना राखण करायला लागते .किसन अप्पानी आणि आम्ही असनेश्वराच्या मंदिरात प्रवेश केला नि पुन्हा शांततेचा अनुभव आला अगदी सकाळी कोळेश्वराच्या मंदिरात आला तसा, विचारचक्र पुर्ण थांबलं होत मनात विचार येतच नव्हते तिथं असनेश्वराचं दर्शन घेऊन विषयावर चर्चा सुरू केली.
*हि चर्चा आपण कृष्णा च्या शब्दांतून पाहू ....*
कृष्णा : - [पुन्हा एकदा प्रश्न सांगितले गेले आता चर्चेत तिघांचा समावेश झाला होता (किसन अप्पा आणि त्यांची मूल)
काकांनी (जाधव साहेबानी )विचारले "सांग निखिल तु कोण आहेस, तु का जगतोय आणि तुझ जगण्याचे उद्दिष्ट काये?" निखिल म्हणाला "मी या पृथ्वीतलावर एक जिव आहे, मी जगतोय कारण माझ्याकडून लोकांची कामे व्हावीत, समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे व माझे उद्दिष्ट आहे की माझ्यामुळे कोणालाही त्रास नाही झाला पाहिजे उलट लोक माझ्यासोबत आनंदी असावीत आणि त्यांचा फायदा व्हावा. " काकांना निखिलचे उत्तर फार आवडले व ते म्हणाले सांग निखिल (यादव) तु बोल आता तर निखिल (यादव) म्हणाला "साहेब मी सगळ्यात शेवटी बोलतो अजून विचार केला नाही मी" यानंतर नंबर आला माझा मी म्हणालो कि, " मी शून्य आहे, मी का जगतोय याचे उत्तर नाही माहिती आणि उद्दिष्ट अजून ठरले नाही" पुढे बाकी सगळ्यांनी निखिलची (काशिद) वाक्ये आहे तशी forward केली नि सगळे शांत झाले... एकूणच महाभारतातील अर्जुनाप्रमाने आमची अवस्था होती, काकांनी सगळ्यांवरूण नजर फिरवत श्रीकृष्णाप्रमाने अध्यात्मिक चर्चेचा प्रारंभ केला, यापूर्वीही वरचेवर काकांनी अध्यात्मिक विषय मांडले होते आणि तसा सरावही करून घेतला होता. काका सांगू लागले, "पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे, मी आत्मा आहे, ना शरीर, ना हा चेहरा, ना मन, ना बुद्धी मी ईश्वर किंवा परमात्म्याचा एक अत्यंत सुक्ष्म भाग आहे, मी एक आत्मा आहे. आता दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर मी जगतोय कारण एक ना एक दिवस मला परमात्म्याचे दर्शन होईल किंवा व्हावे यासाठी भले मग ते या जन्मात होईल पुढच्या होईल येत्या हजारो, लाखो जन्मात होईल पण ते होणारच आणि यासाठीच ईश्वरप्राप्तीसाठीच आपण जगत असतो. प्रश्न तीनचे उत्तर माझं उद्दिष्ट आहे कि आत्मसाक्षात्कार घडावा, ईश्वरप्राप्ती व्हावी थोडक्यात मोक्ष हे अंतिम आणि एकमेव उद्दिष्ट आहे."
ईश्वर प्राप्ती , मोक्ष ही गोष्ट मिळवण्या साठी स्वामी विवेकानंदांनी सांगीतलेल्या कर्मयोग , भक्तियोग ,राजयोग आणि ज्ञानयोग या चार मार्गांविषयी काकांनी थोडक्यात आम्हाला प्रत्येक मार्गाबद्दल माहीती दिली .
तीन्ही प्रश्नांची उत्तरे देवून झाली होती आता कळू लागले कि रोजची धावपळ, क्लेश, थकवा, अपेक्षा, पैसा, सुख-दु:ख, जन्म आणि मृत्यू ह्या सगळ्या क्षणीक गोष्टी आहेत, तरी जीवन जगत असताना ते कसे जगावे याबद्दल काका सांगणार होते. तीन प्रश्नांची उत्तरे दिली पण उद्दिष्टाकडे जाण्याचा मार्गही माहिती असावा आणि तो मार्ग आहे अष्टांगयोग. मला याआधी काकांनी अष्टांगयोगाबद्दल सांगितले होते त्यामुळे आता बाकी लोकांना ते मी सांगावे असे त्यांचे म्हणणे होते, आणि मी सांगु लागलो, अष्ट म्हणजे आठ, याचा अर्थ असा नाही कि आठ मार्ग आहेत मार्ग हा एकच आहे आणि या मार्गामध्ये आठ पाय-या आहेत त्या म्हणजे *यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी* हे अष्टांगयोग आहेत. यांपैकी पहिलं म्हणजे यम यामध्ये अहिंसा , सत्य , अस्तेय , ब्रह्मचर्य आणि अपरिग्रहचा समावेश होतो .
अहिंसा म्हणजे कुठल्याही परिस्थितीत कोणत्याही जिवाला तन मन आणि वचनाने त्रास झाला नाही पाहिजे, सत्य म्हणजे कुठल्याही परिस्थितीत माणसानं सत्यच बोलल पाहिजे .
चोरीने, लाबाडीने किंवा बलपूर्वक कोणाचीही वस्तु न घेणे म्हणजे अस्तेय .
सर्व अवस्थेत तन, मन, वचनाने मैथूनचा त्याग करणे म्हणजे ब्रह्मचर्य , त्याच्या विचाराचा, बोलण्याचा त्याग म्हणजे ब्रम्हचर्य .
गरज असो किंवा कोणतीही परिस्थिती असो कोणाकडूनही कुठलीही वस्तू न स्वीकारने म्हणजे अपरिग्रह
हे यम आहेत यानंतर नियम यामध्ये तप, स्वाध्याय, शौच, संतोष आणि ईश्वर प्राणिधान यांचा समावेश होतो, तप म्हणजे व्रत, उपवास इत्यादीने शरीर संयम करणे .
मंत्रउच्चारण-वेदपठण इ. स्वाध्याय मध्ये येते मंत्रउच्चारणाचे तीन प्रकार असतात वाचिक, उपाशु, मानस यामध्ये मानस जप हा उत्तम मानला जातो, वाचिक म्हणजे इतरांना ऐकु जाईल असा स्वर, उपाशु म्हणजे पुटपुटने व मानस म्हणजे सतत मनातल्या मनात जप करणे.
बाह्य आणि अभ्यंतर शौच असे शौचचे दोन प्रकार आहेत, बाह्य म्हणजे शरीर शुद्धता आणि अभ्यंतर म्हणजे मनाची शुद्धता,
ईश्वकृपेने जे काही प्राप्त झाले आहे यातच समाधान शोधणे म्हणजे संतोष .
आणि सतत ईश्वर नामस्मरण करणे ईश्वर चिंतन करणे म्हणजे ईश्वर प्राणिधान.
हे झाले यम आणि नियम या दोनच योगामध्ये थोडी जरी प्रगती झाली तरी आयुष्य बदलेल कर्म सुधारणा होईल असे काकांचे सांगणे असते, पुढे
आसन म्हणजे पाठीचा कणा ताठ, मान सरळ व कोणत्याही आसन प्रकारात बसून राहणं,
प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण करणे, प्राणायामचा नियमित सराव करणे,
प्रत्याहार म्हणजे आपले इंद्रिये तसेच मन बहिर्मुख आहेत (जी सतत बाहेर कार्य करीत असतात ) त्यांना खेचून घेऊन नियमित करून ठेवणे म्हणजेच अंतर्मुख करणे .
धारणा म्हणजे डोळे मिटून मन दोन भुवयांच्यामध्ये धारण करून ठेवणे यापुढे ध्यान येते ध्यान म्हणजे दोन भुवयांच्यामध्ये असलेल्या मनाला बाकी विचारातून मुक्त करून एकाग्र करणे.
व सगळ्यात शेवटी येते समाधी, मन पूर्णपणे एकाग्र झालं कि चित्त स्थीर होते आणि जी निश्चल निरामय अवसंघ येते , त्याच अवस्थेत कायमस्वरूपी रहाण्याच्या क्रियेला समाधी म्हणतात.
अशाप्रकारे अष्टांगयोगबद्दल चर्चा झाली आणि थोडक्यात कर्मयोग, ध्यानयोग, राजयोग आणि ज्ञानयोगबद्दल सांगितले व इथे आमच्या अध्यात्मिक चर्चेची सांगता झाली.]
Yogeshvoice नावाच्या youtube chanel वरती ह्याबाबत सविस्तर वर्णन, चर्चा, माहिती असून काकांनी सगळ्यांना link share करतो असे सांगितले व आम्ही पुन्हा दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो.
दर्शन घेऊन आम्ही अप्पांच्या दारातील जंगली केळी पाहिली हि खूप उंच आणि थोडी आगळीवेगळी असतात. अजून चिवचिव असे नाव असलेले फळ पाहायला मिळाले. हि वेलवर्गीय वनस्पती आहे. दिसायला पेरू सारखं आणि यावर अलगत कोवळे काटे असतात. याची भाजी पण करता येते आणि काकडी सारखे चिरून सुद्धा खाऊ शकतो. आणखी म्हणजे दत्तोपंत सपकाळ यांनी बनवलेली आगळी वेगळी शेलीची केरसुणी पाहायला मिळाली. पावणेसहा वाजले होते तुपेवाडीत उतरायला दीड तास लागणार होता. म्हणून थोडी जवळची वाट उलूम्ब गावात उतरते त्याने जायचं ठरलं. हि वाट तीव्र उताराची आहे. या वाटेने बलकवडी धरणाच्या भिंतीजवळच आपण पोहचतो.
सूर्यास्त झाला फोटो काढले. तीव्र उतार असल्याने उतरताना पाय घसरत होते त्यात अंधार पडणार होता त्याआधी खाली जाण्यासाठी प्रयत्न चालू होते. लवकर घरी पोहचणार म्हणून आम्ही टॉर्च पण सोबत ठेवले न्हवते. अर्ध्या पर्यंत उतरताच अंधार झाला. आता मोबाईल चे टॉर्च काढून आमची पायपीट चालू होती. समोर पाचगणी महाबळेश्वर चे दिवे चमकत होते. काळीकुट्ट रात्र त्यात चांदण्यांचा मंद प्रकाश. अंधारात सुद्धा खाली लक्ष वेधून घेणारे मनमोहक बलकवडी धरणाचे पाणी चमकत होते. त्यामुळे उतरताना कोणताही थकवा जाणवत न्हवता. तेवढ्यात कृष्णाला मोरपीस सापडले त्यालाच कसे सापडले ते पण अंधारात यावर थोडा वेळ मजेशीर चर्चा रंगली. आणि आम्ही खाली बलकवडी धरणाच्या जवळ असणाऱ्या उलूम्ब गावातील दत्त मंदिराजवळ येऊन पोचलो. एकूण जवळ जवळ चौदा की मी चा ट्रेक आमचा पूर्ण झाला होता .मंदिरा जवळ गाडी आमची वाट पाहताच होती .
अश्या रीतीने आमचा हा एक अविस्मरणीय अध्यात्मिक दिवस ठरला. इतर ट्रेक पेक्षा काहीतरी वेगळं समाधान मिळालं होतं. एक शांत , सुखद ,अविस्मरणीय अनुभव घेतल्याची जाणीव होत होती . सकाळपासून तब्बल १४ किलोमीटर अंतर कापल होत.
प्रत्येक ट्रेकला श्रीमंत दशरथ ननावरे सर हे सविस्तर लेख लिहीत असतात. माझ्याकडे विडिओ बनवणे हेच काम आले पण ते या ट्रेक ला आले नसल्याने मला हे लिहिणे होते तरी ननावरे सरांनी हा ब्लॉग त्यांच्या ब्लॉगस्पॉट मध्ये घेतला तर आम्हाला प्रचंड आंनद आहे.
- निखिल काशिद आणि कृष्णा तिकोने