Pages

Sunday, 27 December 2020

॥ रानवाटा ॥ जोर -बहिरीची घुमटी - आर्थरसीट

 


॥ रानवाटा ॥ सफर निर्भिड जंगलाची 

- दशरथ ननावरे [ श्रीमंत ] , इतिहास अभ्यासक 

जन्नीमाता ( जोर ) - बहिरीची घुमटी ते आर्थरसीट 


सह्याद्रीचा उपरांगा मधील डोंगरांच्या दऱ्याखोऱ्यातील आडवाटेने मार्गक्रमण करायचं म्हणजे एक मोठी पर्वणीच असते . सह्याद्रीच्या माथ्यावर असलेलं निसर्ग सौदर्यं, डोंगराच्या कुशीतील धार्मिक ठिकाणे आणि घनदाट जंगलातील प्रवास यातून मिळणारा अफलातून आनंद हा केवळ स्वर्गसुखच !  आमचे मार्गदर्शक आणि ट्रेकर्स समूहाचे सर्वेसर्वा श्रीपाद जाधव साहेबांनी साद घातली आणि आम्ही लगेच तयारी केली .  जोर ( जन्नी माता ) - बहिरीची घुमटी ते आर्थरसीट महाबळेश्वर ट्रेक पूर्ण  करण्याचे निश्चित केले होते. 

      ठरल्याप्रमाणे आम्ही तयारीनिशी सकाळी सहा वाजता खंडाळा सोडून वाईकडे प्रस्थान केले . पुण्यावरून अभिजीत गोरे सर आणि त्यांचे मित्र ऋषीकेश दोघे आले होते . त्यांच्याच गाडीत बसून वाईकडे गेलो .  वाई विश्रामगृहावरून नाष्टा करून श्रीपाद जाधव साहेब , अभिजीत गोरे , मिलिंद दगडे , ऋषीकेश , कृष्णा तिकोणे , निखिल यादव  आणि मी जीपमधून जोर गावाच्या दिशेने निघालो . सकाळच्या थंड आणि मंद वाऱ्यात दीड तासाभराचा प्रवास करून जोर गावात पोहचलो . जाताना बलकवडी धरणाचा रम्य परिसर पहायला मिळाला . डोंगराच्या भोवतीने पसरलेलं अथांग पाणी आणि सकाळच्या सूर्यप्रकाशाने उजाळलेला परिसर डोळयाचे पारणे फेडून गेला . गावात पोहचल्यावर तेथून मार्ग दाखवणारे वाटाडे सोबत आले .  

        जोरच्या जन्नी माता मंदिरात दर्शन घेऊन ट्रेकला सुरुवात करायची होती पण फोटो काढल्याशिवाय कसा होणार ? मग काय एक क्लिक झालाच . सगळयांनी पाणी बॉटल बॅगमध्ये घेतली . सोबत छोटा चाकू , ट्रेकसाठी गॉगल अशा विषयावर चर्चा झाली . आणि ट्रेकला सुरुवात झाली . 



      मनी चंग बांधूनी वळली पाऊले जंगलात , 

       वेडात मराठे वीर दौडले सात ...     

हो आम्ही सात जण एका ध्येयाने प्रेरीत होऊन सह्याद्रीच्या वाटा शोधत निर्भिड अरण्याला भिडणार होतो . छोट्या रस्त्याला एक वळसा घालून कृष्णा नदीच्या लहान पुल ओलांडुन उजव्या हाताला वळण घेत पुढे निघालो . भाताच्या खाचरात आता गव्हाचे पीक डोलत होते . पाणी नसताना केवळ दवबिंदूवर नैसर्गिकरित्या गहू पिकवणाऱ्या या  शेतीच्या बांधावरून जाताना प्रसन्न वाटत होते . डाव्या बाजूला पाण्याचा मोठा डोह पण बहुतांशी रिता झाला आहे . शेताच्या बांधावरुन उडया घेत  जंगलात प्रवेश केला . आता दाट जंगल सुरु झाले होते . सकाळच्या प्रहरी पक्षांचा किलकिलाट फक्त ऐकू येत होता . हिरव्यागार झाडीतून जाताना मन प्रसन्न झाले . काही तासांचाच प्रवास असल्याने फोटो काढायला बराचसा अवधी मिळत होता . 



गेल्यावेळी पावसाळी ट्रेकला या जंगलात 'जळवांचा जलवा ' चांगलाच अनुभवला होता . पण ती भिती आता नव्हती . मजल दरमजल करीत डोंगराच्या कुशीतून आणि दाट झाडीतून ओढया ओघळीच्या पात्रातून पुढे मार्गक्रमण करत होतो .  या  प्रवासात  निसर्गाचे विहंगम दृष्य नजरेस पडत होतं . सूर्यकिरणं कशीबशी धरणीला स्पर्श करीत होते . चालण्याचा थकवा जाणवावा असं काहीच वाटत नव्हतं . मध्येच फोटो काढण्यात मजा येत होती . एका ठिकाणी झाडांच्या वेलींचे विळखे असे काही पडले होते की त्यांचा मजबूत झुला तयार झाला होता . मिलिंद सरांनी झोक्याचा आस्वादही घेतला . पुढे थोडी चढण चढून गेल्यावर सुमारे दोन अडीच तासाच्या पायपीटीनंतर बहिरीचं जंगलातील देवस्थान आलं . उंच डोंगरावर स्थित असलेलं हे ठिकाण . एका मोठ्या दगडाच्या आडोशाला देवांच्या मूर्ती विराजमान झाल्या होत्या . समोरचा परिसर छोटाच पण स्वच्छ होता . स्थानिक ग्रामस्थ येथे नियमित दर्शनाला येतात . आम्ही सगळयांनी बॅगा बाजूला ठेवल्या . देवाचं दर्शन घेतलं . पाठीमागच्या बाजूला एका खडकावरून कोकणातील परिसर दृष्टीस पडत होता . दूरवर दिसणारा मोहनगड , रायरेश्वराचा नाकिंडा , अस्वल खिंडीचा परिसर , पश्चिमेकडे बळकट आणि उंच उंच असणारा चंद्रगड , सापूळ खिंड , गडाकडे जाणारी अवघड वाट , दक्षिण - पश्चिमेला असणारा प्रतापगड आणि खोल दरीत विसावलेली कोकणातील छोटी गावे असा परिसर न्याहाळता येतो . थोडा विसावा घेऊन पुढे निघायच होतं . दुसऱ्या एका ग्रुपला वाट मार्गी लावून विठ्ठलराव आणि बाळू कदम दोघे समोरून आलेच होते . त्यांनाही सोबत घ्यायचं ठरलं  . पुढे घुमटीचा खडा डोंगर चढून जायचं होतं . पण त्यांच्यात कोणी जायचं यावर निर्णय होत नव्हता . जाधव साहेबांनी खिशातील दोन रुपयाचं नाणं काढून छापा काटा करायचं ठरवलं . दोनचा आकडा आला तर दोघांनी यायचं आणि छापा पडला तर पुन्हा नाणं टाकून दोघांपैकी कोण ते ठरवू असं सांगीतलं . खर तर यामागचं गोडबंगाल त्या दोघांच्या ध्यानी आलं नाही . नाण्यानं क्षणार्धात उंच भरारी घेतली आणि ते जमिनीवर विसावलं . छापा मातीमध्ये चितपट झाला होता . दोनचा काटा अभिमानानं आभाळाच्या दिशेनं पहात होता . मग काय दोघांना येणं भागच पडलं . आणि पुढचा प्रवास सुरु झाला . 



      रस्त्यात पुढे चांगलीच चढण होती . त्यातून पुढे दाट झाडीतून अडचणीचा रस्ता होता . कुठे कार्वी तर कुठे बांबूची दाट झाडीतून वाकून चालावे लागत होते .  पुढे झाडातून एका जागी दगडी पायऱ्यांची चढण पार करून  निसर्गाचा आनंद घेत पुढे चालते झालो . आणखी काही अंतर वर चढून गेल्यानंतर एका उंच दगडी पॅच जवळ पोहचलो . 



       इथे थोडी विश्रांतीची गरज होतीच . मागून हळू हळू चढणारे सहकारी टप्पा जवळ करीत होते . इथून खोल दरीतील आणि डोंगरामधील दाट झाडीचे विहंगम दृश्य दिसत होते . उत्तरेला कोळेश्वराचे पठार , शेजारील कमळगडाचा कडा नजर खेळवून ठेवत होता .  तेवढयात कोणीतरी म्हणाले , अरे हॅलीकॉप्टर बघा .... सगळ्यांच्या नजरा आकाशाकडे वळल्या . पण आवाज नाही आणि तेही नाही , कृष्णा तर मोबाईल कॅमेरा काढून फोटोसाठी तयारच होता . अभिजीत सरांनी आकाशात उडणारी घार दाखवली तेव्हा गमतीचा भाग उलगडला .  मध्येच ही घार उंच भरारी घेऊन जात होती . तीच्या पसरलेल्या पंखांखाली अख्खं जंगल सामावलेच्या आवेशात ती फिरत होती . येथेही थोडे फोटो काढण्यात वेळ गेला .  तेवढयात खाली खोल जंगलात वाटाड्याला कसलीतरी हालचाल जाणवली . दाट झाडीतून एंका गवताच्या भागात एक प्राणी बाहेर येत होता . ते सांबर आहे असं वाटाड्याने सांगितलं . पण काहीच कळून येत नव्हते . जाधव साहेब म्हणाले , लांडगा आहे . पण जेव्हा ते आणखी पुढे सरकलं तेव्हा भलं मोठं सांबर असल्याचं दिसून आलं . त्याचाही फोटो घ्यायला सगळे सरसावले . बराच वेळ गेला . पुढे एक दगडी कडा चढून जायचं होतं . कपारीला हात घालून हळू हळू एक एक जण वर चढू लागला . थोडं अवघड पण धाडसं आणखी बळावणारा हा पॅच होता . सगळे वर चढून गेले . तेथील मोठ्या दगडी कडयाजवळ फोटो काढून आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली .   



        काही अंतर गेल्यावर आर्थरसीट पॉईंट दिसू लागला . सर्वांनी गगनभेदी ललकारी दिली . आसमंतात तो जयघोष घुमला . वर असणारे पर्यटकांच्या नजरा खाली आवाजाचा शोध घेऊ लागल्याचे आमच्या लक्षात आले . पर्यटक या ठिकाणाहून खोल दरीतील सहयाद्रीचं वैभव पाहण्यात दंग असतात . पाहूनच भीती वाटावी असा हा प्रचंड अवघड परिसर आणि वाटा चढून कोणी वरती येईल हे त्यांच्या ध्यानीमनीही नसावे . पण आम्ही ते धाडस केलं होतं . उर्वरीत टप्पा पार करुन ठरलेल्या ठिकाणी पोहचलो . ट्रेक पूर्ण करण्याचा संकल्प तडीस नेल्याचा आनंद मोठा होता . 



   गाडीत बसून विश्रामगृहावर पोहचल्यावर जेवणाचा मस्त बेत केला होता . चपाती , डाळीचे वरण , मटकीची आणि बटाटा वाटाण्याची सुकी भाजी , श्रीखंड , भजी , भात , पापड असा मस्त मेनू होता . सर्वानी यथेच्छ जेवण केलं .  आम्ही सर्वजण पुन्हा गाडीत बसलो आणि थेट वाई गाठले . 

       जोर ते आर्थर सीट हा छोटेखानी पण निसर्गाने भारलेला मार्ग ट्रेकर्सना निश्चित आनंद देणारा आहे . 


- दशरथ ननावरे ( श्रीमंत )

  इतिहास अभ्यासक 

Friday, 16 October 2020

॥ विचारवेध॥ - झुंज मृत्यूशी

 


॥ विचारवेध ॥ 

- दशरथ ननावरे ( श्रीमंत ) , इतिहास अभ्यासक

झुंज मृत्यूशी ...


काळ आला होता पण .....


॥मरणाच्या दारावरती मी मृत्यूशी झुंजत होतो, 

तरीही धीरोदात्तपणे जगण्याची आशा धरली होती 

कोरोनाच्या भयाण वेदना देहाला पिंजत होत्या ,

तरीही धीरोदात्तपणे जगण्याची आशा धरली होती 

मनामध्ये विविधांगी विचारांचे काहूर माजले होते ,

तरीही धीरोदात्तपणे जगण्याची आशा धरली होती ॥


'व्याधी' मग ती कोणतीही असो , माणसाचा जीव पिळवटून काढणारी असते . त्यातच सध्याच्या काळात कोरोनाचं भूत सगळ्यांच्या डोक्यावर घोंघावतयं . जो तो या कराल काळाच्या जबडयातून स्वतःला वाचवण्याची धडपड करीत आहे . पण लोकांच्यात राहून लोकांसाठी झटणाऱ्या माणसांना यापासून फार काळ दूर पळता येत नाही हेच खरं . त्यामुळं आजवर अनेकांच्या ऐकलेल्या कोरोनाच्या  कहाण्या प्रत्यक्ष अनुभवताना मात्र खूप विदारक वास्तव समोर ठाकलं होतं . पण लढण्याशिवाय पर्याय नव्हता . तसाही संघर्ष  आयुष्यात नवा नाही . पण संकट कितीही गंभीर असलं तरी खचून न जाता खंबीर मनाने सामना केला तर यश तुमच्या पायाशी लोटांगण घालतं हेच खरं . 

          संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले . सारं जग कोरोनाशी सामना करण्यात गेले दहा महिने व्यस्त आहे . भारतातही मार्चमध्ये शिरकाव झाला . सातारा जिल्हयात कोरोनाचा पहिला रुग्ण खंडाळ्यातच आढळला . आणि ज्याची भीती होती तेच समोर येऊन ठाकलं . 

   वास्तविक पहिल्यापासून समाजकार्याची कास धरलेली . लोकांसाठी सामाजिक बांधिलकी म्हणून आपण नेहमी कार्यरत रहावं हाच दृष्टीकोन कायम मनात ठेवलेला . त्यातच पत्रकारितेची आवड जोपासल्याने तालुक्यातील प्रत्येक गावाशी नाळ जोडलेली .  त्यामुळं बाहेर जबडा वासून काळ उभा आहे याची कल्पना असतानाही समाजसेवेचा पिंड कधी घरी बसू देत नव्हता . खंडाळा तालुक्यात कोरोनाचा प्रसार वाढत असताना त्याची बाधा आपल्या गावात होऊ नये . त्यामुळे गावातील लोकांची काळजी घेण्याच्या उद्देशाने संपूर्ण गाव बंदी करणे , सार्वजनिक ठिकाणी जंतूनाशक औषध फवारणी करणे , लोकांना घराबाहेर पडू नका याच्या सूचना करण्यासाठी  दररोज सगळी गावं धडपडत होती . त्यांच्या चांगल्या कामाचे कौतुक करणे , आरोग्य आणि महसूल प्रशासनाला मदत करणे , कुठल्याही गावातून कोणाचाही फोन आला तरी हाकेला धावून जाणे हा भाग क्रमप्राप्त होता . पण हे सगळं काळजी घेऊनच सुरू होतं . 

      लॉक डाऊनच्या काळात सहयाद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून भटकंती करण्याचा छंद ही  जोपासला होता . एक ट्रेक पूर्ण केला तर पुढील महिनाभर एकदम तजेलदार वाटायचं . शिवाय ऐतिहासिक अभ्यासालाही मदत व्हायची .  त्यामुळे ते अधिक नेटाने चालू ठेवलं . दिवसागणिक पंचवीस तीस किलोमीटर डोंगरदऱ्या पालथा घालण्याची कायम सवय होती . 

  ऑक्टोबर महिन्याची सुरुवातच काही दुःखदायक झाली . गुरुवार १ तारखेला माझ्या जीवलग मित्राच्या आईची तब्बेत अचानक बिघडली . कोरोनाचा काळ सुरु असल्याने इतर आजारांच्या रुग्णांनाही तातडीने उपचार मिळणे अवघड बनलयं. दिवसभर सर्व तपासण्या आणि उपचार शेवटी निरर्थक ठरले . आणि त्यांना देवाज्ञा झाली . हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का बसला . पण त्यातून सावरणे , त्याला धीर देणे आणि सर्व विधी पार पाडणे आवश्यक होते . तीन दिवस स्वब्धतेत गेले . 

     शनिवारी रात्री अंगात थोडी कणकण आणि ताप जाणवू लागला होता . घरीच पत्नी शलाकाने एक इंजेक्शन आणि औषधे दिली त्याने चांगला आराम पडला . पण रविवारी सकाळीच सहा वाजल्यापासून अंगात पुन्हा ताप भरू लागला . अंगदुखी वाढली . तातडीने रक्त तपासणी करून घेतली . तर प्लेटलेट कमी झाल्या होत्या . सीआरपी वाढला होता . लगेच घरी स्वतंत्र खोलीत सलाईन इंजेक्शन सुरू केले . आजाराची लक्षणे कोव्हिड सारखी भासू लागली होती . विनाकारण रिस्क घ्यायची नाही म्हणून सोमवारी सकाळी कोरोना चाचणी ( आरटीपीसीआर ) केली . पण दिवसभर अंगदुखी आणि ताप होताच . तीन चार दिवस अंग पिळवटून टाकणारी कणकणी आणि ताप यामुळे शरीराच्या रौंद्रारौंद्रातून असह्य वेदना उफाळून येत होत्या. पण सहन करण्यापलिकडे पर्याय नव्हता . उभ्या आयुष्यात एवढा त्रास कोणत्याच आजारात झाला नव्हता . मंगळवारी कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने जरा धीर आला . ही अंगदुखी आणि ताप हळूहळू कमी होऊ लागली तशी फुफ्फुसाची ऑक्सीजन लेव्हल घसरू लागली . बुधवारी रात्री पर्यंत चांगली धाप लागू लागली . पहाडासारखा माणूसही या आजाराने कोसळू शकतो याची जाणीव झाली . त्यामुळे आणखी टेन्शन वाढलं . डॉ . हाडंबर यांनी एचआरसीटी करण्याचा सल्ला दिला . रात्री दहा वाजता माझे मित्र हिरालाल घाडगे यांना फोन करुन शिरवळला जोगळेकर हॉस्पीटलला संपर्क करायला लावला .डॉ कोरडे यांनीही पुढे कल्पना दिली . हिरा म्हणजे खरचं अष्टपैलू हिरा आहे . कोणतीही तमा न बाळगता माझ्या सोबत आले .

 सीटी स्कॅन मशीनमध्ये पहिल्यांदा झोपलो .

कसला तरी आवाज आला मशीन गरागरा डोक्याच्या व छातीच्या भोवती फिरू लागले . मनात विचार आला आपल्या आयुष्याची चक्र फिरू लागली वाटतं . पुन्हा आवाज आला . मशीन थोडं सरकलं . पण माझ्या डोक्यात विचारांचं वादळं . पण मग मिनिटाभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा मशीन वर सरकलं, आवाज आला . 'श्वास घ्या ...... ' मग मी श्वास घेण्याचा प्रयत्न केला . पण पूर्ण क्षमतेने घेता येत नव्हता धाप लागत होती . पून्हा आवाज आला '  श्वास सोडा... पण हे ऐकण्यापूर्वी दोनदा घेऊन सोडून झालं होतं . ' असं दोन वेळा झालं . एकदाची मशीन वरुन खाली उतरलो . बाहेर कट्टयावर येऊन बसलो . दारातच हिरा मला क्रॉस करुन रुम मध्ये गेले . माझ्या अवताराने त्यांच्या लक्षात आलं नसावं . पण त्यांची नजर मला शोधत होती . हे मी ओळखलं . आणि आवाज दिला . त्यांनी घाबरू नका , लगेच उपचार घेऊया म्हणून धीर दिला .   

    सर्व तपासणी करून रात्री बारा वाजता माघारी आलो . एचआरसीटी मध्ये थोडं इन्फेक्शन फुफ्फुसात झाल्याचे निदर्शनात आले . रात्री लगेच ग्रामीण रुग्णालयात अॅडमीट झालो . ऑक्सीजन लावणे क्रमप्राप्त होते . आजवर कोरोनाचा त्रास ऐकत आलो होतो . आज स्वतः अनुभवत होते . 'जावे त्याच्या वंशा कळे .. ' हेच खरे.

        रात्री बारा वाजता खंडाळा रूग्णालयात गेलो . बेड तयार करून साडेबाराला ऑक्सीजन पुरवठा सुरू केला . काही तातडीची इंजेक्शन दिली . रात्री दोन वाजता शलाका व अक्षयला घरी जायला सांगीतले. 


गुरूवार दि . ८ - सकाळपासून थोडं आवरलं , फ्रेश झालो पण दम वाढला होता .थोडंटेन्शन सुध्दा ..  ऑक्सिजन सातत्याने सुरूच होता . सकाळी नाष्टा केला पण तोंडाची चव गेली होती . वास तर दोन दिवस कळतच नव्हता .  वैद्यकिय अधिक्षक डॉ कोरडे , डॉ . लोखंडे स्वतः येऊन तपासले . सर्वांना उपचाराच्या सूचना दिल्या . पटापट औषधे दिली . पुन्हा अॅन्टीजन टेस्ट केली ती पॉझिटिव्ह आली .  दुपारपर्यंत खूपच दमछाक झाली , तोपर्यंत फोन बंदच ठेवला होता . दुपारनंतर अनेकांचे फोन झाले .काहींचे उचलले, काहीचे उचलता आले नाही . अनेक विचारांचा कल्लोळ माजला होता . प्रशांतला फोन केला . 

पाच वाजता आमदार मकरंदआबांचा फोन आला त्यांनी बराच वेळ विचारपूस केली . त्यांनी खूपच धीर दिला . त्यांचे अनुभव सांगीतले . कुठलीही चिंता करू नका , काही अडचण वाटल्यास फक्त फोन करा . वाटेल ती मदत करू.   औषधाची चिंता करु नका म्हणाले. त्यांच्या सकारात्मक बोलण्याने चांगला धीर आला .  एकदम विचारात बदल झाला . त्यांनी डॉ . कोरडे यांनाही फोन करुन उपचाराबाबत काळजी घ्यायला सांगीतले होते . 

         परत साडेपाच वाजता कोरडे सर आले . दहा मिनिटे चालुन सॅच्युरेशन तपासले . काय करायचं ते सांगीतले . 

सहा वाजता सगळी जीवलग मित्र मंडळी प्रवीण , राजेंद्र भोसले , जीजाबा काळे , हिरा , उमेश पवार आणि आणखी दोघे थेट वॉर्ड बाहेर येऊन बघून गेले . सायंकाळी योगेश , सचिन , सत्यवान सगळी भेटली . बरं वाटलं . लोकांच्या मनात भीती कमी झाल्याची जाणीव झाली . 

रात्री जेवण मग थोडा वेळ कसाबसा बसून काढला  . मग १० .५५ ला इंजेक्शन काही सलाईनमध्ये , काही शिरेत व एक पोटात ... मग ऑक्सीजन लावून निवांत पडून राहिलो . अचानक थोडी उबळ आली  .जीव कासावीस झाला  पण मनाचा निर्धार करून सहन केलं . थोडया वेळाने बरं वाटू लागलं . रात्री १ वाजता अंग पुन्हा दुखायला लागलं होतं . विचार करत होतो की गोळी मागावी का ? की येईल कमी ! साधारण पंधरा मिनिटे यात गेली . तेवढ्यात सिस्टरांनी आवाज दिला . कोणीतरी आलं होतं . समोर शलाका होती . बिचारीला झोपच नाही . त्यांनी मग गोळ्या दिल्या . यावेळी नायगाववरून दोघे पाहुणे काही कामाने आले होते तेही भेटून गेले . गोळी खाऊन पुन्हा झोपण्याचा प्रयत्न सुरू केला . 

शुक्रवार - ९ - सकाळी फ्रेश झालो . आठ वाजता नाष्टा केला .  तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ . अविनाश पाटील, 

डॉ . येळे , डॉ . पडळकर यांनी विचारपूस केली.  

शलाकाने स्वतः जेवण आणले , औषधे , इंजेक्शन दिले . 

ऑक्सीजन लावून ओणवा झोपलो. सकाळी चंद्रकांत पाचे , प्रवीण पवार भेटून गेले .

      तीन वाजता डॉ . कोरडे यांनी तपासले .  ऑक्सीजन शिवाय सॅच्युरेशन लेव्हल पाहिली . खरं तर सॅच्युरेशन वाढणं अपेक्षित होत पण वाढल नाही . ब्लड रिपोर्ट आले होते त्याचे अवलोकन केले नंतर त्यांनी काही इंजेक्शन देण्यास सांगीतली . दिवसभर अनेक विचार डोक्यात घोळत होते .

सायंकाळी पाच वाजता डॉ . लोखंडे सर येऊन गेले . त्यांनी सॅच्युरेशन चेक केलं . ऑक्सीजन लावून पालथे जास्तीत झोपा म्हणून सांगितले . बहिणीचा फोन येऊन गेला . तिने टेन्शन घेतलं होतं . तीला खूप समजावलं . शेवटी बहिणीची माया असते हेच खरं . महेश नानांचा फोन आला त्यांनी हॉस्पीटल बदलायचं असेल तर सांगा तयारी करतो म्हणून बोलले . रात्री संजय खामकर भेटले . पुरुषोत्तम जाधव साहेब , बाळासाहेब साळुंखे , अनुप  सूर्यवंशी , नवनाथ ससाणे , संजय जाधव इतर माझे मित्र असे दिवसभरात अनेकांचे फोन आले . सर्वानी धीर दिला . सोशल मिडीयावर अनेकांनी काळजी घेण्याच्या सूचना केल्या होत्या . काहींनी देवाकडे साकडे घातले असल्याचे कळविले . हे लोकांचे प्रेम होते . रात्री ११ वाजता इंजेक्शन दिली गेली . डबा घेऊन आलेली शलाका रात्री अकरा वाजता घरी गेली . त्यानंतर ती जेवणार होती . 

शनिवार दि . १० - सकाळी लवकरच आटोपलं , कारण इंजेक्शन लवकर द्यायची होती . पण थोडं एक्झरशन झालं तरी धाप लागून श्वसनाला त्रास होतच होता . ऑक्सीजन लेव्हल वाढतं नव्हती . शलाका चहा नाष्टा देऊन आली . त्यांनीच सर्व इंजेक्शन दिली . श्वसन क्रीया सुधारत नसेल तर  मोठया हॉस्पीटलला शिफ्ट होण्याचा विचार सुरु होता . 

दुपारी १ वाजता आमदार मकरंद आबांचा  फोन आला . त्यांनी काळजी घेण्याविषयी सूचना केल्या . लागेल ती मदत करण्यात ते नेहमी अग्रेसर असतात . तोच अनुभव माझ्या बाबतीतही . आबांचा फोन आला की नेहमीच मोठा आधार वाटतो . सव्वा एक वाजता डॉ . कोरडे सरांनी राऊंड  केला . उपचाराच्या सूचना केल्या . दुपारचे एक इंजेक्शन व गोळ्या घेतल्या . पुरूषोत्तम जाधव साहेब , सुभाष भोसले साहेबांनी फोनवरून काळजी घेण्यास सांगीतले .  

चार वाजता सॅच्युरेशन व तापाची तपासणी केली . साडेचार वाजता चहा घेतला . बाहेर वादळं सुटलं , आभाळ गडगडू लागलं होतं, वीजांचा कडकडाट सुरू झाला . पावसाला सुरूवात झाली . मनात आलं देव करो नि पावसाबरोबर कोरोना वाहून जावो . 

सायंकाळी घरून फोन आला . मुलींच्या शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल आला होता . दोघींना चांगले गुण मिळाले होते . एक सुखद बातमी कानावर आल्याने मन प्रसन्न झालं . फोन वरून दोघींचे अभिनंदन केले . 

आठ वाजता डाॅ . कोकरे यांनी फोनवरून माहिती घेतली . सुधारणा होतेय का याची चौकशी केली . 

पावसामुळे लाईट गेल्याने खूप गरम व्हायला लागलं होतं . त्यातच ऑक्सीजन वाढवला तरी कमी व्हायचा . काहीच कळेना . म्हटलं लाईट यायला वेळ लागला तर कसं होणार ?पण सिस्टरांना कल्पना देताच त्यांनी ऑक्सिजन व लाईटचा काही संबंध नसल्याचे सांगीतले . अमोलना नवीन सिलिंडर जोडायला लावला . ऑक्सीजन पुरवठा सुरळीत चालू झाला . मग बरं वाटू लागलं . 

रात्री नऊ वाजता डबा आला़. जेवण केलं . रोजची इंजेक्शन , औषधे घेतली . आता पोटातील इंजेक्शन तर नको वाटतं होत . रोज सकाळ संध्याकाळ ते सुरू होतं . पण नाइलाज होता . बाकी किरकोळ तपासण्या झाल्या . ऑक्सिजन सुरू केला . आज लाईट आलीच नाही त्यामुळे उकडून  जाम झालो त्यामुळे झोप लागेना . अधूनमधून पेपरने वारा घालत होतो पण निरर्थक ! रात्री सव्वा एक वाजता थोडं अस्वस्थ वाटलं , काहीतरी प्रॉब्लेम झाला . बघितलं तर ऑक्सीजन पुरवठा कमी झाला होता . लगेच धायगुडेंना कल्पना दिली . त्यांनी सिलिंडर बदलून तो सुरळीत केला . दीड वाजता पुन्हा कलंडलो . 

रविवार दि . ११ सकाळी लवकरच जाग आली . ऑक्सीजन बंद करून फ्रेश व्हायला गेलो . थोडं दमल्यासारखं झालं . पण नंतर सेट झालो . मग हातपाय धुवून कपडे बदलले . घरून नाष्टा , चहा आला होता . तो घेतला . जरा छान वाटलं . मग पाच मिनिटे चालून बघितले . सॅच्युरेशनमध्ये वाढ झाली होती . याचे मोठे समाधान वाटले . मग शलाकाने नेहमीची औषधे इंजेक्शन दिले . त्यानंतर आणखी बरं वाटलं . तशी कल्पना डॉ . कोरडे यांना दिली . प्रशांतला फोन करून कळवलं . अकरा वाजता त्यांनी राऊंड घेतला . कंडिशन सुधारते आहे असे सांगितले त्यामुळे काळजी कमी झाले . 

साडेबाराच्या सुमारास मनोज पवार येऊन चौकशी करुन गेले . तसे अनेकांचे फोनही आले . दुपारी जेवण छान झालं . दुपारचं एक इंजेक्शन देण्यात आलं . त्यानंतर ऑक्सिजन लावून निवांत पहुडलो असताना ' फरगॉटन आर्मी - बॅटल ऑफ १९४२ - ४३ ' पाहत बसलो . देशाच्या स्वातंत्र्यासाठी आझाद हिंद फौजेचे योगदान यातून समजले . 

सायंकाळी चहाच्या वेळी थोडं चालून बघितलं . काही फरक वाटतोय का चेक केलं . पण परिस्थिती सकाळ सारखीच होती . आठ वाजता डॉ. कोरडे सरांनी फोन करुन परिस्थिती विचारली . त्यांना आज राऊंडला येता आले नव्हते . त्यांचीच तब्बेत थोडी पावसात भिजल्याने बिघडली होती . महेश नानांचा सारखा पाठपुरावा होता . शिफ्ट करायचं असेल तर लगेच मला सांगा . मी बघतो पुढचं काय ते ? पण त्यांना म्हटलं जरा धीर धरा , उदया बघू काय करायचं ते ? गरज वाटली तर निर्णय घेऊ असं ठरवलं होतं . घरच्या सगळ्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता ही खूप समाधानाची बाब होती . 

रात्री नऊला जेवण झालं . तेव्हा डॉ़ . कोकरे यांनी राऊंड दिला . दहा वाजता रात्रीचे इंजेक्शन आणि औषधे नेहमीप्रमाणे घेतली . उदयाचा उष:कालापूर्वीची रात्र कशी जातेय याचा विचार करत बसलो . रात्री बारा , तीन वाजता दोनदा लक्षपूर्वक उठून ऑक्सीजन पुरवठा काही वेळ बंद केरुन पुन्हा सुरु केला . दर दोन तासांनी मध्ये बंद करणे गरजेचे असते . 

सोमवार दि . १२ - सकाळी लवकर उठून फ्रेश झालो . आज जरा स्वतःला तपासून बघायचं होतं . रोज फ्रेश होण्याच्या काळातही थोडा दम लागायचा . पण आज तो कमी जाणवला . त्यानंतर थोडे प्राणायाम करून पाहिले . पण म्हणाव्या तेवढया क्षमतेने ते करता आले नाहीत . आठ वाजता नाष्टा झाला त्यानंतर जरा चालून पाहिलं . सगळं ठीक होतं . सॅच्युरेशन थोडी वाढ होती . त्यामुळ बरं वाटलं . 

दहा वाजता डॉ . कोरडे यांचा राऊंड झाला , त्यांनी तपासणी केली . ऑक्सीजन चालू ठेवायला लावले . नेहमीची इंजेक्शन रेग्यूलर करायला लावली . साडेअकरा वाजता इंजेक्शन दिली गेली . त्यानंतर एक वाजता अक्षयने जेवण आणून दिले . त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते युवराज ढमाळ येऊन भेटून गेले . अनेकांचे फोन चालूच होते . 

आज दिवसभर पडून पुस्तक वाचत बसलो . रोजच पानं चाळतं होतो . पाच वाजता चहा घेऊन थोडं दहा मिनिटे चालण्याचा सराव केला . अजून थोडी धाप लागत होती . पण आता मागे हटायचं नव्हतं . 

रात्री आठ़ वाजता सिस्टरांनी नेहमीची तपासणी करून रिडींग घेतली . नऊ वाजता डॉ . कोरडे सरांनी राऊंड घेतला . परिस्थिती सुधारणा होईल असं सांगीतलं . आज थोडं अंग दुखत असल्याचं निदर्शनास आणून दिलं . तशा सूचना त्यांनी दिल्या . साडेनऊला डबा आला . पोटभर जेवण केलं . त्यानंतर शलाकाने रात्रीची सर्व इंजेक्शन दिली . तेवढयासाठी स्वतंत्र पीपीई कीट घालून रोज त्यांची सेवा सुरुच होती . त्यानंतर ऑक्सीजन लावून पुस्तक वाचत राहिलो . 

मंगळवार दि . १३- सकाळी साडेसहालाच उठलो . तसं रात्रीचं तीन चार वेळा उठणं व्हायचं . पण सकाळी लवकर आटोपलं . इतर पेशंटच्या लोडमध्ये फ्रेश व्हायचं म्हणजे थोडं रिस्की वाटायचं . त्यामुळं लवकर उरकलं . थोडं प्राणायाम केलं . अजूनही एक्झरशन झालं की थोडी धाप लागतच होती . त्यामुळे काळजी घेणं गरजेचं होतं . सकाळी शलाका व संगूचा फोन येऊन गेला . त्या नेहमीच योग्य मार्गदर्शन करतात त्यामुळं आधार येतो . चहा आला होता . त्यासोबत आज बिस्किट घेतलं . नंतर नाष्टाही केला . 

सकाळी दहा वाजता डॉ . कोरडे यांनी राउंड घेऊन सूचना केल्या . सकाळी ११ वाजता सर्व इंजेक्शन दिली गेली .. त्यानंतर पुस्तक पारायण सुरूच होते . आज नव्याने पुन्हा रक्त तपासणी करायची होती त्यामुळे ब्लड कलेक्शन दिले . दिवसभरात नेहमीप्रमाणे फोन , मेसेज सुरूच राहिले . पाच वाजता चहा नंतर पुन्हा चालून पाहिले . सगळं ठिक होत चाललयं पण सॅच्युरेशन वाढ अपेक्षित तेवढी अजून नाही . रात्री दहा वाजता डॉ . कोरडे यांनी पुन्हा तपासणी करून औषधे दिली . रात्रीचं जेवण , इंजेक्शन आणि झोप नियमित क्रमाने सुरुच राहिले . 

बुधवार दि . १४ - सकाळी उठून आटोपलं . आज चांगली सुधारणा होती . सकाळी नाष्टा , औषधे घेऊन एक राज्यस्तरीय गुगल शैक्षणिक ट्रेनिंग अटेंन्ड केले . खरं तर ऑक्सीजन व सलाईन यामुळे एका हातात मोबाईल घेऊन केवळ हजेरी लावून  ऐकण्याचे काम केले . कृती काहीच करता आली नाही . मग निवांत वाचत बसलो . दिवसभर फोन येतच होते . पण बोलताना धाप कमी झाल्याचे जाणवले . तसं सॅच्युरेशन आणखी वाढायला हवं पण डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ते हळूहळू वाढेल . त्यामुळे चिंता नाही . रात्री इंजेक्शन औषधे घेऊन झोपी गेलो . 

गुरुवार दि .१५ - सकाळी सहालाच आटोपलं . आज आणखी चांगलं वाटतं होतं . थोडी प्राणायाम केली . त्यामुळे तजेलदार वाटलं . सकाळपासूनच मन घराकडे ओढ घेत होतं . आज अंथरुणावर खिळून राहिलेले बारा दिवस झाले होते . हे बारा दिवस म्हणजे एक तपासारखे जाणवले . प्रत्येक दिवसाचा वेगळा अनुभव काही निराळाच . पण डॉक्टरांना विचारून आज घराची वाट धरायची हा निर्धार पक्का आहे . सकाळपासून व्हीटॅमीनचे दोन इंजेक्शन दिली .. त्यानंतर कालचे उर्वरीत ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण केले . 

 डॉ . कोरडे व डॉ . कोकरे सर यांनी पुढील सूचना केल्या . दुपारनंतर सोडण्याबाबत विचार करू असं त्यांना सांगितलं . सायंकाळी पाच वाजता शेवटी दवाखान्यातून सोडण्यात आले . 

घरी पत्नी , मुली , मित्र व शेजारी स्वागताची तयारी करून होते . सर्वानी छान औक्षण करून स्वागत केलं . घरी सुखरूप पोहचल्याचं मोठं समाधान होतं . आज कित्येक दिवसांनी मोकळा श्वास घेतला होता . घरी पोहचल्यानं बारा दिवस झालेल्या त्रासाचे विस्मरण झाले . आता पुढील महिनाभर  आरामच करावा लागणार आहे . 

    खरचं कोरोना काय आहे . याचा अनुभव याची देही घेतला होता . अतिशयोक्ती नव्हे पण मृत्यूच्या दाढेतून माघारी आलो हे तितकचं खरं आहे . देव करो आणि अशी वेळ कोणावरही न येवो . यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे .


 

॥ आधुनिक सावित्री ... यमाच्या तावडीतून सत्यवानाचा जीव वाचवून सावित्रीने आपल्या कुंकवाचं रक्षण केलं होतं हे पुराणकथात ऐकलं होतं . पण कोरोनाच्या भयाण काळाशी मी लढा देत होतो . त्या पाठीमागे घरची जबाबदारी सांभाळून हॉस्पीटलमध्ये सर्व औषधोपचारासह मानसिक आधार देऊन ज्यांनी अहोरात्र सुश्रूषा केली . त्या माझ्या अर्धांधांगिणी शलाका म्हणजे आधुनिक सावित्रीचं ! त्यांच्यामुळेच या सर्वाचा सामना करण्याचे धैर्य आले . आणि यातून सुखरूप बाहेर पडलो हे प्रांजळपणे कबूल करायलाच हवे . ॥ 


आयुष्य खूप अनमोल आहे . 

काळजी घ्या ... सुरक्षित रहा .. !! 


सेवेसाठी सदैव तत्पर ..

- दशरथ ननावरे [ श्रीमंत ]

        इतिहास- अभ्यासक 

        9922815133


Tuesday, 29 September 2020

॥ रानवाटा ॥ जोर ते क्षेत्र कोळेश्वर


 

॥ रानवाटा ॥ सफर निर्भिड जंगलाची 

- दशरथ ननावरे ( श्रीमंत ) , इतिहास अभ्यासक 

जोर ते क्षेत्र कोळेश्वर


सह्याद्रीचा उपरांगा मधील डोंगरांच्या दऱ्याखोऱ्यातील आडवाटेने मार्गक्रमण करायचं म्हणजे एक मोठी पर्वणीच असते . सह्याद्रीच्या माथ्यावर असलेलं निसर्ग सौदर्यं, डोंगराच्या कुशीतील धार्मिक ठिकाणे आणि घनदाट जंगलातील प्रवास यातून मिळणारा अफलातून आनंद हा केवळ स्वर्गसुखच !  आमचे मार्गदर्शक आणि ट्रेकर्स समूहाचे सर्वेसर्वा श्रीपाद जाधव साहेबांनी साद घातली . गतवेळी  जोर ते क्षेत्र महाबळेश्वर ट्रेक पूर्ण करताना कोळेश्वर पठारावरून दाट जंगलात रस्ता  चुकला . त्यामुळे सुमारे दोन तास वाट शोधण्यात गेले . पण ती सापडली नाही . त्याच चुकलेल्या वाटेचा शोध घेण्याचे निश्चित केले होते. 

      ठरल्याप्रमाणे आम्ही तयारीनिशी पहाटे पाच वाजता खंडाळा सोडून वाईकडे प्रस्थान केले . पहाटे सहा वाजता वाई विश्रामगृहावरून श्रीपाद जाधव साहेब , निलेश बोडके , निखिल काशिद , पांडूरंग भिलारे आणि मी जीपमधून जोर गावाच्या दिशेने निघालो . पहाटेच्या थंड आणि मंद वाऱ्यात दीड तासाभराचा प्रवास करून जोर गावात पोहचलो . जाताना बलकवडी धरणाचा रम्य परिसर आणि त्याच्या भोवतीने नागमोडी रस्ता म्हणजे सुखद प्रवास .   गावात पोहचल्यावर सकाळी सकाळी नारायणरावांच्या घरी मस्त चहाचा फुरका मारला . आणखी तजेलदार झालो . तेथून मार्ग दाखवणारे विठ्ठलराव सोबत आले .  

        जोरच्या उत्तरेला असणाऱ्या भल्या मोठ्या डोंगराला भिडायचं होतं . उंच डोंगरावर पसरलेलं कोळेश्वराचं पठार पादाक्रांत करायचं होतं . गतवेळी याच जंगलात जळवांनी घायाळ केलं होतं . त्यामुळे साहेबांनी सर्वांसाठी गुडघ्या पर्यंत पोहचणारे पायमोजे आणले होते . सर्वांनी पँटच्या वरून ते घातले . हातात काठी घेतली . शिकारीला निघालेली फौज वाटावी असं दिसत होतं . पूर्वेच्या दिशेला वीस मीटर डांबरी रस्त्याने जाऊन डाव्या हाताला रानातून टेकडी चढायला सुरुवात केली . भाताच्या आणि नाचणीच्या शेतीच्या बांधावरून पुढे जात टेकडीचा हिरवागार गवताच्या पात्यातून मार्ग काढत जंगलात प्रवेश केला . आता दाट जंगल सुरु झाले होते . सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहचणार नाही एवढी दाट झाडी होती . त्यातून चढणीला सुरुवात झाली आणि रिमझिम पावसालाही . सकाळच्या प्रहरी पक्षांचा किलकिलाट ऐकू येत होता . हिरव्यागार झाडीतून जाताना मन प्रसन्न झाले . मजल दरमजल करीत डोंगराच्या कुशीतून पुढे सरकत होतो . पावसाचं प्रमाण या भागात जास्त असल्याने झाडांची खोडं आणि फांदयाही शेवाळलेल्या होत्या . पावसाची रिमझिम आणि मध्येच वाऱ्याची झुळूक यामुळे अंगावर शहारा येत होता . हळूहळू पुढे जात होतो मात्र जंगल काही संपत नव्हते . 



पाऊण एक तासाच्या चालीनंतर एका उंच टेकाडाला वळसा घालून वर निघालो . वाटाडयांनी एका ठिकाणी वाढलेली झाडी व गवत तोडून जागा साफ करून एक मोठा दगड उघडा केला . आम्ही  विचारलं हे काय ? तर त्यांनी सांगितले हा देव आहे . मी म्हटलं असेल रानातला एखादा देव . पण उत्सुकतेपोटी मी विचारलं तेव्हा ते म्हणाले हा ' भूताचा देव ' आहे . मी मनातल्या मनात विचार करू लागलो . देव आणि तोही भूताचा , असं कसं असू शकतं . त्याच तंद्रीत एका छोटया दगडावरुन पाय घसरला आणि मी भानावर आलो . तोवर भूताचा देव मागे पडला होता . तेथून एका उंच उघडया जागी पोहचलो . या ठिकाणाहून बलकवडी धरणाचे विहंगम दृष्य नजरेस पडत होतं . धरणाचे अथांग पसरलेलं पाणी , त्यावर धुक्यांची झालर पसरलेली होती .  येथेही थोडे फोटो काढण्यात वेळ गेला . सर्वत्र दाट धुकं पसरलं असल्याने दुरवरचा परिसर दिसत नव्हता . अजून डोंगरमाथ्यावर पोहचायला बरचं अंतर बाकी होतं . त्यात वाट निसरडी झाली होती . आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली . 

    


  रस्त्यात पुढे चांगलीच चढण होती .एका वळणावर पानं झडलेल्या एका झाडाच्या फांदीवर गवती रानफुलाचा गुच्छ उगवलेला होता . एखादया कुंडीत लावलेल्या रोपांसारखा . झाडावरची ही फुलांची कुंडी मोबाईलमध्ये कैद केली .  त्यातून पुढे दाट झाडीतून जाताच जळवांनी आपला करिष्मा दाखवायला सुरुवात केली . पण साहेबांनी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं . आम्ही पण त्याच इराद्याने चाललो होतो . अचानक माझे लक्ष पायाकडे गेले . उजव्या पायावर बारा आणि डाव्या पायावर आठ जळवांनी हल्ला चढवला होता . मी चकितच झालो . कार्वीच्या पानाने पटापट खेचून काढून टाकल्या . आणि पुढे चालते झालो . आता दाट झाडीतून बाहेर पडून एका विस्तीर्ण पठारावर आलो होतो . दाट धुक्यांनी परिसर झाकोळलेला होता . पठारावर पिवळ्या , निळ्या , जांभळ्या फुलांचे आच्छादन मनमोहक वाटतं होतं . आणि अशा ठिकाणी फोटो काढला नाही असं कधी होत नाही . पुन्हा मागे फिरुन डाव्या हाताने थोडं खाली उतरून परत दाट झाडीतून रस्ता शोधत पुढे गेलो . खळाळत्या पाण्याचा आवाज लक्ष वेधून घेत होता . तेवढयात समोर ओढा दिसला त्याच पाण्यातून पुढे जायचं होतं . दगडावर पाय ठेवून जावे तर ती शेवाळलेली असल्याने घसरत होती . त्यामुळे गुडघाभर पाण्यात पाय बुडवण्यापलिकडे पर्याय नव्हता . एवढा वेळ चिखलाने रबडलेले बुट आपोआप धुवून निघाले . आणि भिजल्या पायाने पुन्हा रस्ता तुडवायला सुरुवात केली . 



     कोळेश्वरचे पठार म्हणजे घनदाट झाडीचा परिसर . लोकांच्या वर्दळी पासून कोसो दूर असल्याने आजही इथले जंगल अबाधित आहे . कोसळलेले मोठमोठे वृक्ष तसेच आहेत . रस्त्यात एखादे झाड पडले असेल तर वळसा घालून पुन्हा तोच रस्ता पकडावा लागत होता . शेवटी अर्धा तासाच्या पायपीटीनंतर कमळगड - कोळेश्वर रस्त्याला पोहचलो . गेल्यावेळी इथूनच जोरला जाण्यासाठी वळायला हवे होते . मात्र अगोदरच गुरांच्या वाटेने गेल्याने रस्ता चुकलो . मग मात्र आसण दऱ्याच्या मार्गे गेलो होतो . खरं तर या बेटकवणीच्या वाटेने जाणं गरजेचं होतं . त्याचाच शोध पुरा झाल्याचे समाधान होते . 

         पुढे रुळलेल्या वाटेने कोळेश्वर जवळ केले . कोळश्वर एक ऐतिहासिक धार्मिक स्थळ . जंगलाच्या मध्यावर दगडांचा एक चौथरा आहे . ना भिंती ना छत , त्याच्या मध्ये एक स्वयंभू शिवलिंग आहे . हेच ते कोळेश्वराचे पवित्र ठिकाण . बाहेरच्या बाजूला एक नंदी आहे . पण तो जीर्ण झालेला आहे .  श्रावण महिन्यात क्षेत्र महाबळेश्वराहून पाच नद्यांच्या उगमाचे पाणी पायी चालत आणून येथे जलाभिषेक केला जातो . या ठिकाणाचे विशेष महात्म्य आहे . सर्वानी पायातले बुट , सॉक्स काढुन मंदिर परिसरात जावून मनोभावे नमस्कार केला . इथं नेहमीच प्रसन्न वाटतं . पुन्हा परत फिरण्यासाठी बुट घालायला सुरुवात केली . पण इथेही जळवांचा कहर होता . काही बुटात तर काहींनी पायमोज्यावर आक्रमण केले होते . दगडावर उभे राहून एकमेकांच्या आधाराने बुट घातले आणि परत माघारी फिरलो . काही अंतरावर उघडया मैदानावर दगडी बैठक शोधून नाष्टयासाठी थांबलो . साहेबांनी स्वतः बनवलेले भोपळ्याचे पराठे आणि आवळयाची चटणी आणली होती . सर्वानी मस्त ताव मारला . शेवटी भिलारे सरांनी आणलेले खजुराने तोंड गोड केले . आणि पाणी पिऊन पुढे चालतो झालो . आता तोच परतीचा मार्ग होता . रस्ता चुकण्याचा संभव नव्हता . पण जळव्यांच्या जलव्याची काळजी घेणं गरजेचं होतं . कारण जळवाचा कहर साहेबांच्या पोटापर्यंत कधी पोहचला हे कळलंच नव्हतं . रक्ताचा डाग टी शर्ट वरुन झळकू लागला तेव्हा कुठं लक्षात आलं होतं . 

         परतीच्या रस्त्याने पाऊलं झपाझप पडत होती . पठाराचं जंगल पार करून डोंगर उतरणीला सुरुवात केली होती . आता बेटकवणी दऱ्याच्या निसरडया वाटेने उतरताना काळजी घेणे आवश्यक होतं . आजूबाजूचा परिसर न्याहळत आणि रान झाडांची ओळख घेत खाली उतरत होतो . रानातील कुरडू , भारंगी , थाळा , मुरुड , कवला , बरका, शेंडवाल , डहाण , आंबू , भाळगा , रानमूग या रानभाज्यांची ओळख झाली . चिचुर्डी , पाचरकुडी या औषधी वनस्पती पाहता आल्या . 



      धुकं आणि पावसाची रिमझिम यांचा खेळ सुरूच होता . एका टेकाडावर थोडा वेळ थांबून पुन्हा वाट धरली . जेवढं चढलो तेवढं उतरण्याशिवाय पर्याय नव्हता . आता तेच जंगल पार करुन खाली उघड्या टेकडीवर आलो . गवतातून जाणारा रस्ता मोकळा होता पण चांगलाच घसरडा होता . सहजच पाय घसरत होता . एका जागेवर साहेबांना त्याचा अनुभव आलाच, कधी त्यांचा तोल जावून दणका बसला ते कळलं नाही .  पण त्यांच्या दणकट शरीराने तो सहन केला . पुढे एका ओघळावर पाय स्वच्छ करून आम्ही जोर गावात पोहचलो . नारायणरावांच्या घरी जेवणाचा मस्त बेत केला होता . चपाती , डाळीची आमटी , बटाटयाची भाजी , भात आणि पापड अशा रुचकर जेवणाने मनसोक्त पोटपूजा झाली . त्यावर त्यांच्या घरचा गवती कोरा चहा म्हणजे अप्रतिमच .. तो घेऊन त्यांचा निरोप घेऊन आम्ही गाडीत बसून वाईच्या दिशेने गेलो . अर्थातच निखिलने यावेळीही शुटींग आणि फोटोचे काम चोख बजावले होते . त्याचा व्हीडीओ बघणे म्हणजे वेगळा आनंद असतो . 

       जोर ते क्षेत्र कोळेश्वर हा अवघड मार्ग पार केल्याचे समाधान प्रत्येकाच्या चेहर्‍यावर होते . पण निसर्गाने भारलेला मार्ग ट्रेकर्सना निश्चित आनंद देणारा तर आहेच पण निसर्गाची अदभुत किमया पाहणे म्हणजे एक वेगळी पर्वणी आहे , ती अनुभवने म्हणजे मोठे भाग्यच  . 


- दशरथ ननावरे ( श्रीमंत )

  इतिहास अभ्यासक 

Friday, 25 September 2020

॥ रानवाटा ॥ - जन्नीमाता ते क्षेत्र महाबळेश्वर


 

॥ रानवाटा ॥ सफर निर्भिड जंगलाची 

-दशरथ ननावरे ( श्रीमंत ) , इतिहास अभ्यासक 

जन्नीमाता ( जोर ) ते क्षेत्र महाबळेश्वर


सह्याद्रीचा उपरांगा मधील डोंगरांच्या दऱ्याखोऱ्यातील आडवाटेने मार्गक्रमण करायचं म्हणजे एक मोठी पर्वणीच असते . सह्याद्रीच्या माथ्यावर असलेलं निसर्ग सौदर्यं, डोंगराच्या कुशीतील धार्मिक ठिकाणे आणि घनदाट जंगलातील प्रवास यातून मिळणारा अफलातून आनंद हा केवळ स्वर्गसुखच !  आमचे मार्गदर्शक आणि ट्रेकर्स समूहाचे सर्वेसर्वा श्रीपाद जाधव साहेबांनी साद घातली आणि आम्ही लगेच तयारी केली . गतवेळी अपूर्ण राहिलेला जोर ते क्षेत्र महाबळेश्वर ट्रेक पूर्ण  करण्याचे निश्चित केले होते. 

      ठरल्याप्रमाणे आम्ही तयारीनिशी पहाटे पाच वाजता खंडाळा सोडून वाईकडे प्रस्थान केले . पहाटे सहा वाजता वाई विश्रामगृहावरून श्रीपाद जाधव साहेब , निलेश बोडके , अतुल गाढवे, शेखर खंडागळे , निखिल काशिद  आणि मी जीपमधून जोर गावाच्या दिशेने निघालो . पहाटेच्या थंड आणि मंद वाऱ्यात दीड तासाभराचा प्रवास करून जोर गावात पोहचलो . जाताना बलकवडी धरणाचा रम्य परिसर पहायला मिळाला . डोंगराच्या भोवतीने पसरलेलं अथांग पाणी आणि सकाळच्या संधीप्रकाशाने उजाळलेला परिसर डोळयाचे पारणे फेडून गेला . गावात पोहचल्यावर सकाळी सकाळी नारायणरावांच्या घरी मस्त चहाचा फुरका मारला . आणखी तजेलदार झालो . तेथून मार्ग दाखवणारे विठ्ठलराव सोबत आले .  

        जोरच्या जन्नी माता मंदिरात दर्शन घेऊन ट्रेकला सुरुवात झाली . छोट्या रस्त्याला एक वळसा घालून कृष्णा नदीच्या लहान पुल ओलांडुन डाव्या हाताला वळण घेत पुढे निघालो . भाताच्या शेतीच्या बांधावरून जाताना जरा जपून जावे लागते कारण डाव्या बाजूला पाण्याचा मोठा डोह आहे . उडया घेत पाण्याचा परिसर पार करून जंगलात प्रवेश केला . आता दाट जंगल सुरु झाले होते . सकाळच्या प्रहरी पक्षांचा किलकिलाट फक्त ऐकू येत होता . हिरव्यागार झाडीतून जाताना मन प्रसन्न झाले . काही तासांचाच प्रवास असल्याने फोटो काढायला बराचसा अवधी मिळत होता . गेल्या ट्रेकला 'जळवांचा जलवा ' चांगलाच अनुभवला होता . त्यामुळे या वेळी पूर्ण तयारीनेच गेलो होतो . मात्र जळवांचा त्रास जाणवलाच नाही . मजल दरमजल करीत डोंगराच्या मध्यावर पोहचलो होतो . या ठिकाणाहून बलकवडी धरणाचे विहंगम दृष्य नजरेस पडत होतं . धरणाचे अथांग पसरलेलं पाणी , त्यावर धुक्यांची झालर त्यामुळे चित्रपटात एखादे परदेशातील परिसर पाहतोय असं भासत होते . मध्येच एखादी घार उंच भरारी घेऊन जात होती . तीच्या पसरलेल्या पंखांखाली अख्खं धरणं सामावलेच्या आवेशात ती फिरत होती . येथेही थोडे फोटो काढण्यात वेळ गेला . महाबळेश्वरला कामासाठी जाणारे दोघेजण पाठीमागून येऊन पुढे निघून गेले . आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली . 



      रस्त्यात पुढे चांगलीच चढण होती . त्यातच मोठे ओघळ वाहिल्याने रस्ता खचलेला होता . त्यातून पुढे दाट झाडीतून जाताच अतुलच्या पायावर एक जळवा चिकटलाच . पठ्ठ्यानं चक्क चप्पल घालून येण्याचं धाडस केलं होतं . बाकी आम्ही सगळेच सुरक्षित होतो . पुढे झाडातून दगडी पायऱ्यांची चढण पार करून  निसर्गाचा आनंद घेत पुढे गणेशदऱ्यात पोहचलो . छोटेखानी मंदिरात गणेशाची सुंदर मुर्ती विराजमान होती . पाहताक्षणी वाईच्या महागणपतीची मुर्ती डोळयासमोर उभी राहिली . सर्वानी मनोभावे दर्शन घेतले . साहेबांनी नेहमीप्रमाणे गणेशस्तोस्त्र म्हटले . आम्ही आपलं डोळे मिटून आराधना केली . 



थोडा वेळ घालविल्यानंतर पुढे चालते झालो . रस्त्यातच कामावर निघालेल्या एका तरुणाची ओळख झाली . तो लिंगमळा येथे कामासाठी दररोज जात असतो .  आणखी काही मिनिटे गेल्यानंतर क्षेत्र महाबळेश्वरला पोहचलो . बाहेरुनच देवदर्शन करुन आम्ही गाडीत बसलो आणि थेट वाई गाठले . सकाळी अकरा वाजेपर्यत ट्रेक पूर्ण झाला होता . मात्र गतवेळचा अपूर्ण ट्रेक पूर्ण करण्याचा संकल्प तडीस नेल्याचा आनंद मोठा होता . 

    वाई विश्रामगृहावर पोहचल्यावर जेवणाचा मस्त बेत केला होता . भाकरी , घेवडयाच्या डाळीची आमटी , भरलेली भेंडी आणि साहेबांनी मोठया कष्टाने बनवलेला भोपळ्याचा हलवा . ( आजवर भोपळयाचा असा हलवा मी कधीच खाल्ला नव्हता )  एकंदर अप्रतिम जेवण झाले . साहेबांनी दिलेली दोन रोपे घेऊन घरी परतलो . 

       जोर ते क्षेत्र महाबळेश्वर हा छोटेखानी पण निसर्गाने भारलेला मार्ग ट्रेकर्सना निश्चित आनंद देणारा आहे . 


- दशरथ ननावरे ( श्रीमंत )

  इतिहास अभ्यासक 

Monday, 21 September 2020

॥ विचारवेध॥ - शिवबा घडवायचा असेल तर ...

 


  ॥ विचारवेध  ॥ 

-दशरथ ननावरे ( श्रीमंत ) , इतिहास अभ्यासक 

- शिवबा घडवायचा असेल तर ...

        आदर्श माता माता म्हणून नावलौकिक मिळवावा ही प्रत्येक आईच्या मनातील इच्छा !  पण त्यासाठी स्वकर्तृत्वाने प्रयत्न करणाऱ्या माता दुर्मिळच म्हणाव्या लागतील. आपल्या मुलांनी खूप शिकावे , मोठा अधिकारी व्हावे. त्याने कर्तृत्ववान यशस्वी पुरुष म्हणून समाजात नाव मिळवावे. हे प्रत्येक आईचे स्वप्न ! पण हेच स्वप्न वास्तवात उतरविण्यासाठी सुसंस्कारांच्या फुलांची माळ किती मुलांच्या गळ्यात पडते हा चिंतनाचा विषय आहे. 

      भारत वर्षामध्ये घडलेल्या अनेक थोर पुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून किती माता आपल्या मुलांना घडवतात. समाजात सर्वच स्तरातून शिवाजी महाराजांचे नाव आदरपूर्वक घेतले जाते. शिवाजी हे नाव जरी उच्चारले तरी अंगात वीरश्री संचारते. ही महानता शिवरायांची आहे. त्यांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊची आहे. शिवरायांच्या चरित्रात कार्यकर्तृत्वाचा व त्यांच्या जडणघडणीमध्ये जिजाबाईंचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. या मातेने बालपणापासून आपल्या मुलावर अत्यंत उत्तम संस्कार केले . शहाजी राजांसोबत लग्नानंतर अनेक अडचणींना तोंड देत ही आई अत्यंत खंबीरपणे आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहिली.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत ते काही काळ बंगळूर या ठिकाणी शहाजी राजांकडे राहिले. शहाजी राजांनी युद्धकलेचे शिक्षण शिवबांना दिले. शहाजीराजांनी दिलेल्या युद्ध कलेचा जिजाऊंनी कसून सराव घेतला.  राजांना न्याय नीतीचे शिक्षण दिले.  जिजाऊंनी स्वराज्यातील अनेक न्याय निवाडे शिवबांना बरोबर घेऊन केले.  त्यातील सत्यासत्यता पडताळून पाहिल्या. लहानपणापासून प्रत्येक गोष्ट धाडसाने करायला शिकवली . साहसी कार्याचा पाठीवर शाबासकीची थाप देऊन सन्मान केला.  स्वराज्य कार्यासाठी प्रेरित केले. 

         याउलट आजची आई आपल्या मुलांशी अशी वागते का?  आज आई मुलाला सांगते , बाळ झाडावर चढवू नको,  मातीमध्ये खेळू नको आणि तरीही एखादी गोष्ट मुलाने आवडी खातर केली तर त्याबद्दल शाबासकी ऐवजी पाठीवर चोप दिला जातो.  मुलाच्या मनामध्ये प्रत्येक गोष्टीची भीती निर्माण केली जाते.  बेगडी वात्सल्यापोटी त्याच्या निष्पाप मनावर , बालवयातील खेळण्यावर निर्बंध घातले जातात . आणि घरामध्ये शिवबा घडण्याची अपेक्षा धरतात.  या विचारांनी कोणतीही आई एखादा शिवाजी निर्माण करू शकत नाही.

         जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना वीर पुरुषांच्या कथा सांगून धार्मिकतेचे आणि नीतिमत्तेचे उच्चकोटीचे अधिष्ठान मिळवून दिले . दऱ्याखोऱ्यातील गरिबांच्या शेतकऱ्यांच्या मुलांना आपलेसे करायला शिकविले. जिजाऊंनी पुण्याला बाल शिवबाच्या हातात नांगर देऊन शेती करण्यास सुरुवात केली.  छत्रपती शिवाजी राजांना स्वराज्याचे बाळकडू पाजले.  इ.स. १६३० ते १६७४ या आपल्या अखंड आयुष्यात जिजाऊंनी शिवबाची पाठराखण केलेली प्रत्येक गोष्ट त्यांना हिरीरीने शिकवली, संस्कार घडविले. 

 आजच्या पालकांना स्वतःच्या मुलाकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही . संस्कार घडवणे तर दूरच . खेडोपाड्यात दिवसभर रानात कष्ट करणारी स्त्री घर कामात आणि शेतात देहभान विसरते. कामाच्या व्यापात मुलांना शिकविणे दुरापास्त होते . शहरी भागातही वेगळी परिस्थिती नाही. आई वडील दिवसभर नोकरीनिमित्त बाहेर असतात. मुलं मात्र पाळणाघरात वाढते. अशी मुले मातृत्वाच्या प्रेमापासून वंचित राहतात . या मुलांवर संस्काराची बीजे पेरली जातील का ? हा विवंचनेचा भाग आहे . पैशाच्या मागे धावणारी दुनिया स्वतःच्या मुलांच्या भवितव्याबाबत निष्काळजी वाटते . त्यांच्या हातून एखादा शिवबा घडेल अशी अपेक्षा धरणे कितपत योग्य आहे . 

     एकदा कोकण भटकंती करताना सिंधुदूर्ग किल्ला पाहण्यासाठी मित्रांसमवेत गेलो. खर तरं महाराजांचे अनेक किल्ले पाहताना जी ओढ मनामध्ये असते तीच यावेळीही होती . किल्ला समुद्रातील बेटावर बांधलेला . तीथे पोहचायचे  तर छोटया बोटीतून किल्ल्याच्या तटापर्यंत जावे लागते . तिकीट घरातून तिकीट घेऊन आम्ही सर्वजण एका बोटीत बसलो . नावाडयाला बोट चालू करायला सांगीतली . पण नावाडी म्हणाला , ' सर , वीस प्रवासी झाल्याशिवाय बोट नेता येणार नाही . मग काय आणखी प्रवाशांची वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता . माझे डोळे तर किनाऱ्यावर येणाऱ्या इतर वाहनांकडे लागले होते . तेवढयात एक जीप आल्याची दिसली . त्यातून काही प्रवासी उतरले . तिकीट घेऊन तेही लगबगीने बोटीच्या दिशेने आले . आता आपल्याला निघता येणार याची खात्री झाल्याने बरं वाटलं . नवीन सहकारी काही महिला तर काही पुरुष मंडळी बोटीत विसावले . त्यांच्याही मनात किल्ल्याविषयी कुतुहल होते हे जाणवले . त्यांच्या एकमेकांशी गप्पा सुरू होत्या . त्यातीलच एक महिला किल्ल्याकडे पाहून म्हणाली , केवढा बेलाग किल्ला आहे . किती मजबूत आणि समुद्रात असूनही विस्तृत आहे . एवढा प्रचंड वाटणारा हा किल्ला कसा बांधला असेल ? आणि हे सर्व घडवून आणणारे शिवाजी राजेही कसे असतील ? खरचं शिवरायांचं कार्य महानच . नाहीतर आजचे शिवाजी बघा , नुसते नावापुरतेच . ( समोर बसलेल्या तीच्या नवऱ्याचे नाव शिवाजी होते ) त्यांचा हा संवाद ऐकून मला रहावले नाही . मध्येच त्यांना थांबवत मी म्हणालो , 'ताई , शिवरायांसारखा दुसरा राजा होणे नाही . त्यांचे कार्य खरोखर महान आहे . शिवचरित्र आपण समजून घेत नाही हे दुर्देव ! पण शिवाजी हे नाव केवळ नावाने का होईना पण घराघरात पोहचले आहे . पण आधुनिक काळात प्रत्येकाच्या अंगणात शिवबा घडवायचा असेल तर घराघरात जिजाऊ घडली पाहिजे . आणि ती जबाबदारी प्रत्येक मातेने उचलली पाहिजे . यावर बोटीतील सर्वच महिला विचारमग्न झाल्या . 


- दशरथ ननावरे ( श्रीमंत )

  इतिहास- अभ्यासक 

.................................................................

Tuesday, 15 September 2020

॥ रानवाटा ॥ किल्ले रायरेश्वर ते क्षेत्र कोळेश्वर


 ॥ रानवाटा ॥ सफर निर्भिड जंगलाची

-दशरथ ननावरे ( श्रीमंत ) 

किल्ले रायरेश्वर ते क्षेत्र कोळेश्वर 


' राकट देशा , कणखर देशा , दगडांच्या देशा .... ' असे महाराष्ट्राचे वर्णन अभिमानाने केले जाते . सहयाद्रीच्या दऱ्याखोऱ्यात पसरलेल्या पर्वतरांगातून सामावलेली महाराष्ट्राची भूमी म्हणजे एक स्वर्गच ! स्वराज्य संकल्पनेची शपथ ज्या भूमीवर गर्जली तो किल्ले रायरेश्वर ते सह्यशिखरातील जावळीच्या खोऱ्यातील शंभू महादेवाचे पवित्र ठिकाण असलेले क्षेत्र कोळेश्वर हा निर्भिड अरण्यातील एक साहसी , शारीरिक कस लावणारा , विलोभणीय निसर्गाचे दर्शन घडवणारा रेंज ट्रेक .  

       सह्याद्रीचा पर्वत असो वा त्याच्या उपरांगा मधील विविध डोंगरांच्या दऱ्याखोऱ्यातील आडवाटा असो , त्या वाटेने मार्गक्रमण करायचं .सह्याद्रीच्या माथ्यावर विराजमान झालेले ऐतिहासिक गड किल्ले , डोंगराच्या कुशीतील धार्मिक ठिकाणे अथवा जंगलाच्या आडवाटा असो त्याच्याशी आपलेपणाचं नातं जोडायचं हा 'शिवसह्याद्री पायदळ ' ट्रेकर्सचा छंदच . आमचे मार्गदर्शक आणि ट्रेकर्स समूहाचे सर्वेसर्वा श्रीपाद जाधव साहेबांनी साद घातली आणि आम्ही प्रतिसाद दिला नाही असं आजवर तरी घडलं नाही . नेहमीप्रमाणे त्यांनी ही मोहिम करण्याचे निश्चित केले . 

      ठरल्याप्रमाणे आम्ही तयारीनिशी पहाटे साडेतीन वाजता खंडाळा सोडून वाईकडे प्रस्थान केले . पहाटे चार वाजता वाई विश्रामगृहावरून श्रीपाद जाधव साहेब , पुण्याहून आवर्जुन आलेले अभिजीत गोरे , निलेश बोडके , अतुल गाढवे,  गौरव पवार  आणि मी जीपमधून जांभळी गावाच्या दिशेने निघालो . पहाटेच्या थंड आणि मंद वाऱ्यात तासाभराचा प्रवास करून जांभळी गावात पोहचलो . तेथून सोबत मार्ग दाखवणारे स्थानिक दोन गावकरी वाटाडया म्हणून घेतले . परत माघारी फिरुन किल्ले रायरेश्वराच्या दिशेने घाटरस्त्याने जाऊ लागलो . पंधरा मिनिटांच्या प्रवासानंतर साडेपाच वाजता किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचलो . 

      डोंगराच्या उंचीवर पोहचल्याने गार वारा अंगाला झोंबत होता . गाडीतून आपापली बॅग पाठीला अडकवली. सर्वानी जीपच्या हेडलाईटच्या प्रकाशात एक फोटो घेतला . एका हातात काठी अन् दुसऱ्या हातात विजेरी घेऊन पाऊलं गडाच्या दिशेने चालू लागली . पूर्वेला तांबडं फुटू लागलं होतं . पावसाळ्याचे दिवस असतानाही आभाळात लाल छटा रेखाटल्या गेल्या होत्या . काळया ढगांच्या आडून पसरलेल्या लाल रंगामुळे मनमोहक दृश्य दिसत होते . त्यामुळे कॅमेरात ते टिपण्याचा मोह आवरला नाही . 

          रायरेश्वरला तसं पाच सहा वेळा येणं झालं होतं . पण पहाटे येण्याची ही पहिलीच वेळ होती . त्यामुळे पहाटे गडावरचं वातावरण अनुभवता येणार होतं . काही पाऊलं पुढं गेलो अन् पहिली चढण लागली . दहा मिनिटाच्या अंतरावर पोहचलो समोर लोखंडी शिडी कडयाला लावलेली होती . एका दमातचं सर्वजण किल्ल्यावर पोहचले आणि गार वाऱ्याची झुळूक अंगाला झोंबू लागली . मात्र वातावरण प्रसन्न आणि आल्हाददायक होतं . एव्हाना चांगलं उजाडलं होतं . परिसर स्वच्छ होऊ लागला होता . आभाळातून वाहणारे काळे - पांढरे ढग समोरच्या केंजळगडाच्या टोकाला भिडत होते . एक नयनरम्य दृश्य डोळयांचे पारणे फेडत होते . सर्वानी मिळून हर हर महादेवची गर्जना केली . आसमंतात आवाज घुमला . शरीरात नवी ऊर्जा उत्पन्न झाली  आणि रायरेश्वराच्या देवालयाकडे प्रस्थान केले . 

        आजूबाजूचा हिरवागार परिसर न्याहाळत रमत गमत पुढे चालत होतो . वाऱ्याने हिरव्यागार गवताची पाती डुलत होती . चवर, सोनके , मिकीमाऊस, लालटाका यासह अनेक प्रकारच्या  रानफुलांनी लाल , गुलाबी , पिवळे , पांढरा , निळा  , जांभळ्या रंगांची निसर्गात मुक्त उधळण केली होती .बघता बघता तलावाच्या जवळ पोहचलो . आजूबाजूच्या झाडांच्या फांदया पाण्यात डोकावत होत्या . पावसाच्या पाण्याने तुडुंब भरलेल्या तलावाला वळसा घालून पुढे गेलो . काही अंतरावर पाण्याचे टाके होते . गोमुखातून टाक्यात पाणी पडत होते . स्वच्छ , निर्मळ पाण्यात टाक्याचा तळ दिसत होता . आमची चाहूल लागताच खेकड्यांनी दगडाच्या कपारीकडे पळ काढला आणि आम्ही मंदिराकडे ! 



     रायरेश्वर देवालयाच्या प्रांगणात प्रवेश केला . शिवालयाचे  दगडी बांधकाम आजही मजबूत आहे . पूर्वीच्या छताची जागा पत्र्याने घेतली आहे . मंदिराच्या गाभाऱ्यात दगडी शिवलिंग व पिंड आहे . शेजारी दगडी पणतीचा दिवा तेवत होता . अगरबत्तीचा वास सर्वत्र दरवळत होता . 'ओम नमः शिवाय ' चा जप आतून कानावर पडत होता . सर्वानी नतमस्तक होऊन मनोभावे दर्शन घेतले . मंदिरात शिवकालीन इतिहासाची जुजबी माहिती आणि शिवरायांच्या स्वराज्य शपथेचा फोटो लावलेला आहे . मंदिराच्या समोरच एका चौथऱ्यावर छत्रपती शिवाजी राजांचा अर्धपुतळा बसवलेला आहे. शेजारीच छोटेखानी शाळेची इमारत आहे . 

         दर्शन घेऊन पश्चिमेच्या दिशेने पायवाटेने चालू लागलो . भाताच्या शेतीला वळसा घालून पुढे गेल्यावर रायरेश्वरावरील वस्ती आहे . इथे काही मोजकीच घरे आहेत . सध्या पावसामुळे ती झावळयांनी व कुडांनी झाकलेली आहेत . कुत्र्यांच्या आवाजाने आम्ही आल्याची कानकून वस्तीवाल्यांना झाली . जाता जाता सोमनाथ जंगमांना आवाज देऊन पुढे चालतो झालो . मागच्या ओघळीच्या वाटेने चिखल तुडवत आणि मागच्या ट्रेकच्या वेळी कोणत्या रस्त्याने गेलो याचा अंदाज लावत चाललो होतो . सोबत वस्तीवरचा एक कुत्रा होताच . केसाळ शरीर अन् झुबकेदार शेपटी यामुळे गडयाचा रुबाब वाढला होता . नेहमीप्रमाणे गडाच्या टोकापर्यत हा सोबत करणार याची खात्री होती . पाऊण तासाभराच्या अंतरात रायरेश्वराचे भले मोठे पठार मागे टाकले होते . आता कड्याच्या टोकावर पोहचलो होतो . तिथूनच दूरवर खोल जांभळी गाव दिसत होते . पलीकडे उंचच्या उंच डोंगर दिसत होता . वर विस्तीर्ण पठार दिसत होते . साहेबांनी हातानेच ते दाखवून ' सवंगडयांनो , आपणाला त्या समोरच्या डोंगराच्या मध्यावर असणाऱ्या कोळेश्वराला जायचं आहे . ' असं सांगीतलं . तेव्हा कुठं या ट्रेकची भव्यता आणि कसरतीची दृश्ये डोळयापुढे तरळू लागली . 



          रायरेश्वर उतरण्यासाठी इथून पुढं ' निसणीची वाट ' वाट सुरु होत होती . त्या वाटेनेच आता कसरत करावी लागणार होती . निसणीची वाट उतरण्यास प्रारंभ केला . रायरेश्वरपासून सोबत आलेला मोती कुत्रा इथूनच परत फिरला . या उतरणीच्या सुरवातीलाच कातळ खडकातून खाली जावे लागते . डोंगर उताराची ही अतिशय अवघड वाट आहे . तीव्र उतार , निसरडया वाटा , पाऊल टाकता येईल एवढीच वाट त्यामुळे जपून पाऊले टाकावी लागत होती . खोल दरी उतरुन पुढे जांभळी गावात पोहचणार होतो . खरं तर बिकट वाट वहिवाट नसावी पण तीच आता वाटयाला आली होती . एकमेकांना सूचना करीत पुढे सरकत होतो . एका उतारावर जाधव साहेबांचा पाय घसरला . आणि काळजाचा ठोका चुकला . त्यांनी स्वतःला सावरलं . त्यांच्या बुटाची ग्रीप खराब झाल्याने पाय खूपच सटकत होता . त्यांना मी म्हणालो , साहेब माझे बुट तुम्ही घाला . पण नेहमी दुसऱ्याचा विचार करणारे साहेब ऐकतीलच कसे . काही अंतर गेल्यावर त्यांचा पुन्हा एकदा पाय सटकला . पण त्यांनी हार मानली नाही . सावध पावले टाकत आणि काठीचा आधार घेत ते पुढे चालत राहिले . पहिला टप्पा उतरल्यानंतर अतिशय तीव्र उतार लागला . पण इथे सर्वत्र गवत पसरले होते . डोंगरानं हिरव्यागार गवताचा शालू पांघरलेला होता असं भासत होत . वाट धोक्याची असतानाही अतुलला एक फोटो काढायला लावलाच . मजल दर मजल करीत कसे बसे जांभळी गावापर्यत आलो . रस्त्याला लागण्यापूर्वी एका ठिकाणी मिकी माऊसच्या ( बरखा म्हणून ओळखली जाणारी ही रानभाजी )पिवळ्या फुलांचे आच्छादन पसरले होते . एखादया चित्रपटात विदेशी डोंगरातील शुटींगसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रेक्षणीय स्थळाप्रमाणे ते दिसत होते . चालून चालुन कंटाळलेल्या मनाला नवी पालवीच फुटली . सर्वानी आपापले फोटो काढून हा परिसर चित्रबद्ध केला . माझ्या पाठोपाठ फोटोसाठी गेलेल्या अतुलने एक चांगली आपटी खाल्ली . पण गडयानं फोटो काढायची मात्र हौस पुरी केली .



 तिथून कोळीवाडयापर्यंत जायचे होते . पहाटेपासून चालून थोडी भूक लागली होती . कोळीवाड्यातील सोबतच्या वाटाडयांच्या घरीच नाष्टयाची सोय केली होती . बाहेर ठेवलेल्या बादलीतील पाणी घेऊन सर्वांनी हात धुतला . घराबाहेरच्या सोप्यात खुर्च्या ठेवल्या होत्या . अवघ्या मिनिटाभरात खमंग पोह्यांची प्लेट प्रत्येकाच्या हातात होती . लिंबू पिळून त्यावर शेव चिवडा टाकून यथेच्छ ताव मारला . पाठोपाठ दुपारच्या जेवणासाठी बनवलेल्या चपाती आणि भाजीची टेस्ट जाधव साहेबांनी आणि मी घेतली . कोळीवाडा तसा वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील शेवटचे टोक , शहरापासून कायम दूर राहिलेले . त्यामुळे अनेक सुविधांपाससून दूरच ! तेवढ्यात एक टेम्पोचा आवाज आला . टेम्पो आला ... टेम्पो आला . भंगार घेणार , लोखंडी तुकडे , . तुटलेली सायकल घेणार ... भांडी घेणार .... पत्रा घेणार . लवकर या .. लवकर या . खरं तर हे ऐकून आमच्या गावच्या जुन्या काळाची आठवण झाली . पोटभर नाष्ट्यानंतर एक कप गरम चहा शरीराला तजेलदार पणा देऊन गेला . आता सगळेच पुढच्या प्रवासाला सज्ज झाले होते . 



        जांभळी धरणाच्या वरच्या बाजूला कमंडलू नदी पार करुन कोळेश्वर पठावरावर जायचे होते . डोंगर खड्या चढणीचा होता . त्यात दाट जंगलाची वाट . डोंगराची भव्यता बघून धडकी भरावी अशी त्याची ठेवण . कोळीवाड्याच्या पश्चिमेकडून एका ठिकाणाहून नदी पार करण्यासाठी पोहचलो . नदीला खळाळते पाणी पण गुडघा मांडयाभरच . पण त्याखालची दगडधोंडे गुळगुळीत आणि शेवाळलेली होती . त्यामुळे पाऊल टाकलं की पाय घसरायचा . साहेब म्हणाले साखळी करून नदी पार करू पण प्रत्येकाने स्वतंत्रपणे तोल सांभाळून जाऊ असं अभिजीत सरांनी स्पष्ट केलं . एकएकट्याने नदी पार केली . आणि दाट जंगलात प्रवेश केला . एव्हाना पावसाची रिमझिम सुरू झाली होती . जंगलातील झाडांची गर्दी एवढी की आमचा पुढचा सवंगडी मागच्याला दिसत नव्हता . त्यामुळे कोणी रस्ता चुकू नये याची काळजी घेत होतो . वरचेवर एकमेकांना आवाज देऊन कानोसा घेत होतो . 

   


  आठ दिवस अगोदर पाऊस नव्हता त्यामुळे जंगलातील प्रवास चांगला होईल अशी आशा होती . पण रात्री पाऊस झालेला आणि आत्ताही पडत होता . त्यामुळे जंगलवाटेतील जळू ( कांटे ) जीवंत झाले होते . भररस्त्यात त्यांची वळवळ सुरु होती .त्यांना चुकवून पुढे जावे लागत होते . पण जळवे सुध्दा चिवटच त्यांनी आमचा पिच्छा सोडला नाही . कुठून तरी पायावर चढायचाच . त्यांना काठीने ढकलून ते पडायचे नाहीत . हाताने ओढून फेकून दयावे लागत होते . काळजी घेऊनही जाधव साहेबांना आणि गोरे सरांना दोन जळवांनी गाठलेच . पायाला कधी चिकटले कळले नाही . रक्त वाहू लागले तेव्हा कुठं लक्षात आले . चिकटलेले जळू रक्त पिऊन चांगले टम्म फुगले होते . ते ओढून काढले . 

     एक तर जंगलातील उराटीची वाट . त्यात पाऊस पडल्याने निसरडी झालेली . एक पाय उचलला तर दूसरा घसरायचा . काठीचा आधार घेऊन कसं बसं पाऊल पुढे टाकावं लागत होतं . त्यात जळवांचं नवं संकट समोर उभं ठाकलं होतं . पाय टाकण्यासाठी पुढं रस्ता बघावा की पायाला जळू लागतोय हे पहावं हे काहीच  सुचत नव्हतं . 'जळवा का जलवा ' नं चांगलचं थैमान घातलं होतं . तेवढयात मागून आवाज आला . लागला.. लागला .. लागला .. आरं मला बी जळवा लागला . पाठीमागून गौरव मोठयाने ओरडत होता . गडी जागेवरच उभा राहिला . लागलेला एक जळू काढेपर्यत दुसऱ्याने दुसऱ्या पायावर हल्ला केलेला . त्यामुळं गडी पुरता घायाळ झालेला . आम्ही पण त्यांचं आक्रमण परतवून लावत होतो . 



     पुढे काही अंतर गेल्यावर एका ठिकाणी रस्त्यातच मांडूळ साप निवांत पहुडलेला . त्याला धक्का न लावता आम्ही पुढे झालो . जळवापासून वाचण्यासाठी एक नामी युक्ती डोक्यात आली .  मी म्हटलं , साहेब पँटचा खालचा भाग पायमोज्यात घाला म्हणजे पायावर जळू चढलाच तर तो कापडावरच राहिल . आमची शक्कल कामी आली होती . साहेबांनी गौरवलाही पायमोज्याची जोडी दिली . त्यानेही आमचं अनुकरण केलं . पण जळवा पायावर चढायच्या थांबत नव्हत्या . खडी चढण असल्याने दम लागत होता . घामाच्या धारा निथळतं होत्या . पण थांबायची धडगत नव्हती . कारण थांबलं की आणखी जळवा चिकटायच्या .दुपारच्या जेवणासाठी घेतलेलं थोडं मीठ बुटावर टाकलं . पण त्याचा फारसा काही फरक पडला नाही . जळवांनी सर्वांची चांगलीच दमछाक केली होती . जंगलातील एवढा मनमोहक निसर्ग पण त्याकडे कोणाचेच लक्ष नव्हते . साधारण तासाभरात दोन मोठे टप्पे चढून आलो तेव्हा एका वळणावर दगडांचा भाग लागला . त्यावर थांबून सर्वांनी पायावरच्या जळवा काढल्या. दगडाच्या बाजूला असणाऱ्या एका छोटया झाडाच्या आडुशाला फुरसे सापाचं एक पिल्लू आसरा घेऊन बसलं होतं . त्याचा फोटो घेऊन आम्ही पुढे झालो . 



पठारावर पोहचण्यासाठी आणखी बरचं अंतर चढायचं होतं . जळवांना चकवा देत कसंबसं पुढचा टप्पा पार केला . आणि कड्याच्या खाली पोहचलो . पुढे शिवकालीन पायऱ्यांचा रस्ता होता . तेथे चित्रफित काढून सर्वजण वर चढले . वरती अथांग पठार पसरलेलं होतं . सर्वत्र हिरवंगार गवत अन् झाडी होती . त्यामुळे त्याचं सौदर्य आणखी खुललेलं दिसत होतं . गार वाऱ्याची झुळूक आल्याने आल्हाददायक वाटलं . कुठेही न थांबता दोन तासाची केलेली चढण अन् त्यामुळे आलेला थकवा कुठल्याकुठं गायब झाला . हर हर महादेवचा जयघोष करून कोळेश्वराच्या मंदीराकडे चालायला सुरुवात केली . 



               या पठारावर एकमेव घर आहे . पावसामुळे झावळयांनी ते लपेटलेले होते . आमची चाहुलं लागताच एक कुत्रा भुंकतच पुढे आला . गौरवने त्याला लडीवाळपणे कुरवाळले . मागच्या कमळगड ट्रेकच्या वेळी आमची ओळख झालेली . त्या घरातून दोन मुलं पुढे आली . मळकटलेली कपडे घातलेली . त्यांना जवळ बोलवले . गेल्यावेळी मी त्यांचा छान फोटो काढलेला . विशेष म्हणजे दैनिक लोकमतला तो छापून आलेला . त्यांना तो दाखवला . पोरं जाम खूश झाली . त्यांच्या हातात बिस्कीटचा पुडा देऊन आम्ही पुढे निघालो . पुन्हा जंगलाची वाट सुरु झाली . अर्ध्या तासात श्रीक्षेत्र कोळेश्वर मंदीरा जवळ पोहचलो . जंगलाच्या मध्यावर दगडांचा एक चौथरा आहे . ना भिंती ना छत , त्याच्या मध्ये एक स्वयंभू शिवलिंग आहे . हेच ते कोळेश्वराचे पवित्र ठिकाण . बाहेरच्या बाजूला एक नंदी आहे . पण तो जीर्ण झालेला आहे .  श्रावण महिन्यात क्षेत्र महाबळेश्वराहून पाच नद्यांच्या उगमाचे पाणी पायी चालत आणून येथे जलाभिषेक केला जातो . या ठिकाणाचे विशेष महात्म्य आहे . सर्वानी मनोभावे नमस्कार केला .  आणि पुढे चालते झालो . [जावळीचे खोरे - जोर व जांभळी सुभ्याचा इतिहास , जावळी प्रांताच्या तर्फाची यादी आणि शिवकालीन मार्ग , रायरेश्वर व कोळेश्वरचे महत्व याची माहिती स्वतंत्रपणे दिली जाईल ]

        यापुढेही दाट जंगलच होते .आम्हाला कोळेश्वर पठार पार करुन जोर गावच्या बाजूला उतरायचे होते . बरच अंतर चालून गेल्यावर वाटाडयाने उजव्या बाजूला थोडया चढणीच्या रस्त्याने नेले . पुढे पुढे तर झाडातून रस्ता शोधावा लागत होता . त्यात जळवांचं संकट अद्याप संपलेलं नव्हतं . पावसाळ्यात हा ट्रेक करण्यासारखा नाही असं मत गोरे सरांनी व्यक्त केलं . झाडाझुडपातून कसाबसा मार्ग काढत पुढे सरकत होतो . जंगलाच्या एका टप्प्यातून बाहेर पडलो की पुन्हा नव्या जंगलात प्रवेश व्हायचा . पण रस्ता संपत नव्हता . अर्धा तास असच चालत राहिल्यानंतर आपला रस्ता चुकला आहे हे लक्षात आलं . वाटाडया तर पुरते गोंधळून गेले होते . जंगलात एकदा रस्ता भरकटलो तर कुठे जाईल याचा काही नेम नसतो . इकडे तिकडे अंदाज घेऊन रस्ता शोधत होतो . पण काही केल्या सापडत नव्हता . आता मात्र आम्ही चांगलेच हबकलो . नियोजीत वेळेत जोर गावात पोहचू शकलो नाही तर क्षेत्र महाबळेश्वर पर्यंत पोहचणे अवघड होते . शेवटी आल्या पावली परत मागचा रस्ता पकडला . रस्ता चुकल्याने एक तास जाणार होता . पुन्हा अर्धा तास खाली उतरून आलो . आणि कमळगडाच्या रस्त्याने पुढे गेलो . जळवांचा जलवा सुरुच होता . माझ्या पायावरून त्रेपन्न जळू मी काढून टाकले होते . मात्र त्वचेला एकही चिकटू दिला नाही . चालता चालता जंगल संपलं आणि पुढे एखादया बागेत छोटी पण डेरेदार झुडपं लावल्यासारखे पूर्ण मैदान भरून आले होते . एक समूह फोटो घेतला . आणि पुढची चाल धरली . 



चालत चालत बरेच पुढे आलो . आणि आपण जोरच्या रस्त्याला न जाता कमळगडाकडे जातोय हे लक्षात आलं . वाटाडयाला पण काहीच सांगता येईना . दोन वाजता जोर गावात पोहचायचे ठरले होते . पण इथेच तीन वाजून गेले होते . शेवटी दुपारची न्यारी इथेच करायची ठरवली . तोपर्यंत वाटाडे रस्ता शोधायला दक्षिण दिशेने जंगलात शिरले . पावसाची थुईथुई सुरूच होती . उभं राहून हातावरच चपाती अन् बटाट्याची भाजी घेतली . जेवण चविष्ट होतं . दोन चपात्या खाल्ल्या आणि वाट सापडल्याचा आवाज वाटाडयांनी दिला .आम्हाला हायसं वाटलं .  त्यांच्या पाठोपाठ आम्हीही जंगलात वाट धरली . थोडया अंतराने कड्यावर आलो . तिथून जोर गाव खोल दूरवर नजरेस पडत होतं . साहेबांनी गावाचे ठिकाण दाखवलं . तिथून पुढे आणखी मोठा डोंगर होता . तो चढून क्षेत्र महाबळेश्वरला पोहचणार होतो . पण अजुन तरी इथेच अडकलो होतो . 



       जोरच्या बाजूने डोंगर उताराने चालायला सुरुवात केली . वाट तशी अवघड होती . सर्वजण सांभाळून चालत होतो . इकडे जळवांचा फारसा त्रास नव्हता त्यामुळे काळजी नव्हती . पण तसाही दीड दोन तास लागणार होते . आडवळणाच्या रस्त्याने अर्धा डोंगर उतरलो . खालून दोन चार लोक वर निघाले होते . जवळ आल्यावर त्यांना विचारलं खाली पोहचायला आणखी किती वेळ लागेल . ते सपकाळ काका होते . कमळगड ट्रेकच्या वेळी त्यांनी दुपारचे जेवण पोहचवले होते . ते मांडगणीला घरी निघाले होते . त्यांनी पाऊण तासाचा अंदाज सांगितला . मग विसावा न घेता एकसारखी पाऊले टाकीत कुठं दाट झाडातून तर कुठं गवतातून मार्ग काढीत खाली उतरत आलो . आता चालून चालून फारच कंटाळा आला होता , मात्र मन थकलं नव्हतं . शेवटी डोंगराच्या तळाला जोर गावात पोहचलो . जोरचा डोंगर उतरताना चांगलाच जोर लावावा लागला होता .  तिथून पुढे कातकरी वस्तीपर्यंत रस्त्याने चालत गेलो . 

       साडेपाच वाजून गेले होते . पावसाची रिमझिम वाढली होती . क्षेत्र महाबळेश्वरचा डोंगर चढायचा तर आणखी दोन अडीच तास लागणार होते. अभिजीत सर कंटाळले नव्हते पण काळजी घेणे गरजेचे होते . त्यांच्या पायाच्या शस्त्रक्रियेनंतर ते पहिल्यांदाच एवढं अंतर चालले होते . त्यामुळे ते पुढे चालतील की नाही ही शंका होती . पण आम्ही पुढे चालत राहिलो . साहेब हळूच मला म्हणाले, सर कसं करायचं, जायचं की नाही . मी म्हणालो , सेनापती तुम्ही आहात , तुम्ही म्हणाल तसं . तसं साहेब म्हणाले , पुढच्या वळणावर जननी माता मंदीर आहे. तीथं थांबून निर्णय घेऊ . मध्यम स्वरूपाच्या या मंदिरात अनेक मुर्त्या होत्या . आम्ही दर्शन घेतलं . पायरीवर बसताच साहेब म्हणाले , पुढं जायचं आणि जंगलात अंधार पडला तर बॅटरी सोबत हवी . माझ्याकडे दोन होत्या . साहेबांकडे एक होती . तेवढयावर काम चालणार होते . सर्वानी जाण्याचा निर्धार केला . त्यामुळे गोरे सरांनीही सहमती दर्शवली . पुन्हा पुढची मोहिम सुरू झाली . बलकवडी धरणाच्या जलाशयाच्या मागील कृष्णा नदीवरील एक पूल ओलांडून पुढे डोंगर चढणीला लागायचे होते . नदीच्या पाण्यात काही स्थानिक लोक मासे पकडण्यासाठी जाळे टाकत होते . आम्ही रस्त्याची चौकशी करून पुढे गेलो . एका मुलाने सांगितले इथल्या वाटेने ओढयाला पाणी आले आहे त्यामुळे वाट बंद पडली आहे . पुढच्या धनगरवस्तीच्या वाटेने जाता येईल . साधारण एक किलोमीटर डोंगराच्या बाजूने चालत वस्तीकडे निघालो . आता पावसाने चांगलाच जोर धरला होता . सर्वजण ओलेचिंब भिजले होते . साहेबांना पुन्हा प्रश्न पडला आता काय करायचं . मी म्हटलं वस्तीवरच्या शाळेत आसरा घेऊन निर्णय घेऊ . रस्त्यातच एक महिला रानातून येताना दिसली . त्यांच्याकडे रस्त्याची  विचारपूस केली . पावसाने वाटा निसरडया झाल्या आहेत . जाण्यास खूप वेळ जाईल असं सांगीतलं . पण रस्त्यात जळू आहेत का ? हळुच गौरवने चौकशी केली . त्या असणारच की , असं सांगताच त्याच्या अंगावर काटा उभा राहिला . आम्ही सगळे शाळेच्या व्हरांडयात थांबलो . एक दहावीच्या वर्गातील मुलगी तीथे अभ्यास करत होती . आम्हाला बघून ती दप्तर उचलून घरी गेली . पावसाची एकूण परिस्थिती व झालेला उशीर यामुळे शेवटी ही मोहिम इथेच थांबवायचा निर्णय झाला . क्षेत्र महाबळेश्वर गाठायचं स्वप्न अधुरं राहिलं . सगळे जण माघारी फिरलो . पुन्हा जोरला पोहचलो . एव्हाना अंधार पडला होता . एका घरात चहा घेतला . दिवसभराचा शिणवटा गेला . स्वप्नील धवन साहेब गाडी घेऊन आले होते . आम्ही गाडीत बसलो पण पुन्हा अपुरं स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प करूनच ! एक अफलातून साहसी ट्रेक पूर्ण केल्याचं समाधान मात्र प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होतं . 


  ........................................

- दशरथ ननावरे ( श्रीमंत ) 

   इतिहास अभ्यासक 


Thursday, 10 September 2020

॥ रानवाटा ॥ - हरेश्वर ते पालपेश्वर

 




॥ रानवाटा ॥ सफर जंगलातील आडवाटेची

दशरथ ननावरे ( श्रीमंत ) , इतिहास अभ्यासक 

कडजाई- हरेश्वर ते पालपेश्वर 


सहयाद्रीच्या रांगेला पूर्व पश्चिम पसरलेली हरेश्वराची ( महादेवाची ) डोंगररांग आहे . याच डोंगररांगेत हरळी गावाच्या पश्चिमेला कडजाई मातेचे मंदिर डोंगरकपारीत आहे . कडजाई पासून उंच डोंगरावर हरेश्वराचे मंदिर आणि तीथून डोंगराच्या पश्चिम दिशेने आडवळणाच्या आणि दगडधोंड्यातून , झाडाझुडपातून मार्ग काढत पायवाटेने बालेघर व पुढे पालपेश्वर पर्यंत सुमारे २५ किलोमीटरचा नयनरम्य निसर्ग पहात अफलातून हा ट्रेक करता येतो . 

          वास्तविक हा ट्रेक शिवसह्याद्री पायदळ ... एक वादळ या समूहाने पहिल्यांदाच केला . यापूर्वी अशी वाट कोणी शोधून काढल्याचे ऐकीवात नाही . हा ट्रेक करण्याचे आमचे मार्गदर्शक श्रीपाद जाधव साहेबांनी निश्चित केल्यावर पहाटे पाच वाजताच खंडाळयातील शिवसहयाद्री पायदळाचे मावळे तयार झाले . वाईवरून साहेबांचे सहकारीही आले . सकाळी सूर्यदर्शनापूर्वीच साधारण सहा वाजता हरळी गावच्या हद्दीत आम्ही पोहचलो . एकदा हरहर महादेवची गर्जना आसमंतात घुमली आणि मोठया उत्साहाने वीस जणांची टीम डोंगर चढू लागली . पहिल्या दमातच न थांबता टेकडीवरील कडजाई मातेच्या मंदिरापर्यत मजल मारली . विसावा न घेता पुढे चालत राहिलो . कडजाई मातेच्या वरच्या मंदिरापर्यंत पटकन पोहचण्याची आस होती . थोडं थांबत , थोडं फोटो शुट करीत पण उत्साहाने सर्वजण पुढे चालत होते . अवघ्या अर्ध्या तासात कडजाई मातेच्या मंदिरात पोहचलो . सर्वानी दर्शन घेतले . साहेबांनी भला मोठा संस्कृत श्लोक म्हटला . आम्ही आपलं डोळे मिटून देवीपुढे ध्यान धारणा केली . देवीची काळया पाषाणातील मूर्ती , शेजारी असलेलं पाण्याचं टाकं आणि मंदिराचा भोवतालचा प्रदेश न्याहाळत दहा मिनिटं सर्वांनी आरामात वेळ घालवला . 

      ट्रेकच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली . आणि इथेच पहिला कस लागतो . मंदिराच्या बाहेरच्या बाजूला असलेला काताळ कडा चढून वर जायचे होते . एका मागे एक ओळीने सर्वजण कातळाला भिडले . हरहर महादेवचा जयघोष गगनाला भिडला . कपारीत हात घालून तोल सांभाळत सर्वांनी हा कडा पार केला . आणि हरेश्वराच्या दिशेने आगेकूच केले . खरं तर वाट चढणीची होती . त्यातच पाऊस झाल्याने रस्ते निसरटे झाले होते . एक पाय उचलला की दुसरा पाय घसरायचा . अशा वेळेला आधार मिळायचा तो गवताचा अथवा एखादया झाडाच्या फांदीचा . महतप्रयासाने सरासरी दोन तासाच्या चढणीनंतर डोंगर माथ्यावर पोहचलो . वरच्या सपाटीने दाट धुक्यात हरेश्वराच्या मंदिरात पोहचलो . तसं हरेश्वर मंदिरात अनेकदा आलो होतो . त्यामुळे बाहेरूनच सर्वानी दर्शन घेतले . पुन्हा हर हर महादेवचा जयघोष केला . तीथून धारेश्वर मंदिरापर्यंत पायवाटेने आलो . सकाळच्या नाष्टयाची वेळ झाली होती . सर्वांनी वर्तुळाकार रांगेत बैठक मारली . वाईवरून येताना साहेबांनी सर्वांसाठी पोहे बनवून आणले होते . कागदी प्लेटमध्ये थोडे थोडे घेतले .  जोडीला शेंगदाणे लाडू अन् चिवडा होताच . चार फेऱ्या झाल्या तरीही पोहे उरलेच होते . अगदी पोट भरेपर्यंत यथेच्छ ताव मारला . आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली . 

         डोंगराचा एक टप्पा उतरून पश्चिमेच्या दिशेने सर्वजण चालू लागले . इथून पुढची वाट डोंगरातून शोध काढत जाणारी होती . मोठमोठ्या दगडाच्या आडून आणि झाडातून पुढे जात होतो . एका उताराला साहेबांच्या पायाखालचा दगड निसटला त्यामुळे पाय थोडा दुखावला . पण मोठ्या धैर्याने त्यांनी चाल पुढे ठेवली . 

     खंबाटकीचा घाटमाथा ओलांडून पुढच्या डोंगराच्या चढणीला लागलो . डोंगराच्या उंच भागातून कड्याकडयाने वाट काढत होतो . ढगेवाडीच्या पुढे बुवासाहेब मंदिरापर्यंत पोहचायचे होते . या ठिकाणी अतिशय दाट झाडी होती तरीही मार्ग काढत पुढे जात होतो . वरच्या टप्प्यावर पोहचल्यावर डोंगरात एक गुराखी भेटला . त्याने सांगितले पुढच्या टेकडीच्या उजव्या अंगाने पंचवीस तीस बैलांचा कळप आहे . ते मारके आहेत .  तुम्ही डाव्या अंगाने जावा . त्यामुळे आम्ही टेकडी पर्यंत गेलो . बाटल्यांमधील पाणी संपल्याने शेजारच्या विहिरीवर चार जणांना पाणी भरण्यासाठी पाठवले . आणि नंतर टेकडीच्या डाव्या बाजूने पुढे जाऊ लागलो . काही अंतरावर गेल्यावर नेमका बैलांचा कळप चरत चरत इकडेच आला होता . आता मोठी पंचायत झाली . समोर जावे तर बैल हमखास हल्ला करणार याची भीती होती . सर्वानी थोडं खाली उतरून झाडाआडुन जायचे ठरवले . जेणेकरून बैलांच्या नजरेस पडणार नाही . काही अंतर गेल्यावर पुन्हा चढ चढून वर निघालो . आता बैलांचा कळप मागे राहिला होता . सर्वांनी निश्वास सोडला . जवळच बुवासाहेबाचे छोटेखानी  मंदिर एका वडाच्या झाडाखाली होते . सर्वानी दर्शन घेतले . झाडाच्या बुंध्यात एक मोठी तलवार ठेवली होती . ती देवाची असल्याचे सांगतात . तलवार उचलून हातात घेतली तर ती मराठा बांधणीची मूठ असलेली होती . एका सरळ रेषेत धारदार पाते निमुळते होते गेले होते . तलवार मस्तकी लावून ती जागेवर ठेवली आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली . 

      इथून पुढच्या डोंगरात वाट जरा मळलेली होती . पण चिखलाने माखलेली आणि दोन्ही बाजूंनी दाट झाडीने वेढलेली होती . उजव्या बाजूला खंडाळा तालुक्यातील अनेक गावे दिसत होती . वरुनच आम्ही कोणते गाव कुठे आहे याचा अंदाज बांधत होतो .  वाटेत आवळयाची अनेक झाडे होती . त्याला लगडलेली आवळे पाहून खाण्याचा मोह आवरता आला नाही . काही आवळे काढून खिशात घातले .एक तोंडातही टाकला . ट्रेकमध्ये आवळा खाल्ला तर सारखे पाणी पिण्याची गरज भासत नाही . डोंगरात अनेक प्रकारच्या रानभाज्या पहायला मिळतात . काहींनी भारंग्याची ( ब्राम्ही रंग ) फुले तोडून घेतली . भारंग्याची फुले आणि पानांची अतिशय चवदार भाजी करता येते . आणि ती पौष्टिकही असते .  बरेच अंतर चालत पुढे गेल्यावर बालेघर गावाची हद्द लागली . डोंगराच्या सपाटीवरच लोकांनी शेती तयार केली होती . त्यासाठी मोठ मोठे दगड काढून त्याच्या ताली रचल्या होत्या . त्या पाहून अवाक् झालो . शेतातील पिकांच्या राखणीसाठी जागोजागी मचान उभारण्यात आल्याचे दिसले . या रानातून तांबड्या मातीत वाटाणा , पावटा , घेवडा , जवस अशा विविध प्रकारची पिके केली होती . बाले घरचा टॉवर नजरेस पडला पण अजून बराच दूर होता . दुपारचे जेवणाची सोय तेथेच केली असल्याने कधी पोहचतो असे झाले होते . पण जीव व्याकूळ झाला होता . काहींच्या पायात त्राण उरला नव्हता . पण पुढे चालणे क्रमप्राप्त होते . शेजारच्या एका रानात साधारण सहा वर्ष वयाची दोन लहान मुले लोखंडी छोटी गाडी ओढत होते . कुणब्याच्या पोरांना काम करायला शिकवावं लागत नाही हेच खरं . त्यातच शाळा बंद असल्याने सगळा वेळ त्यांचा रानातच जात असावा . मनोमन छोटया लेकरांचं कौतुक करीत आम्ही गावच्या चढणीला लागलो . गावातील रस्त्याने पुढे जात असतानाच समोरुन एक जीप आली . याचा अर्थ गावात कुठून तरी डांबरी रस्ता येत होता . या जीपला सर्व बाजूंनी दूधाच्या किटल्या अडकवलेल्या होत्या त्यामुळे ती लक्ष वेधून घेत होती . बहुधा गावातील सर्वदूध डेअरी पर्यंत पोहचवण्याचे काम तीच करत असावी . शेवटी डाव्या हाताला वळण घेऊन आम्ही जेवणाच्या ठिकाणी पोहोचलो . 

         सकाळपासूनच्या चालण्याने पोटात कावळे ओरडू लागले होते . पटापट सर्वानी हात धुतले . एका छोटेखानी घरात घरगुती स्वयंपाक बनवला होता . भाकरी , काळ्या घेवडयाची आमटी , बटाटयाची सुक्की भाजी , भात , लोणचं , पापड अशा पंचपक्वांनावर सर्वांनी यथेच्छ ताव मारला . खरं तर चालण्याने कंटाळा आलाच होता . शिवाय पोटभर जेवण झाले होते . आराम करा म्हणून सांगीतलं असतं तर सर्वजण लगेच झोपी गेले असते . 

      पण पुढचा पल्ला गाठायचा होता . सर्वानी पुन्हा तयारी केली . बाहेर जोरदार पावसाने सुरुवात केली होती . पण थांबण्यात काहीच अर्थ नव्हता . ओल्याचिंब शरीराने पुढे चालू लागलो . पुन्हा तसाच डोंगर , आडवाटा आणि झाडी . इथला रस्ता म्हणजे जरा अजबच होता . खडतरपणे मार्ग काढत जाणे भाग होते . साधारणपणे सहा किलोमीटरचे अंतर कापून आम्ही पालपेश्वर लेणीत ( ग्रामीण भागात पाल्कोबा असेही म्हणतात ) पोहचलो . 

    

      वाई पश्चिम महाराष्ट्रातील एक इतिहासप्रसिद्ध गाव. कृष्णातीरावरचे एक टुमदार शहर. खूप पूर्वीपासून या गावाला महत्व आहे.  परिसरात अनेक किल्ले, धरणे, आणि लेणी आहेत. त्यातीलच एक पालपेश्वर.  लोहारे गावाजवळच्या डोंगरात या लेण्या खोदल्या आहेत. मूलतः ही लेणी बौद्ध-हीनयान पंथाच्या असून नंतरच्या काळात तेथील स्तूप हे शिवलिंग समजून पालपेश्वर हे नाव रूढ झाले.

    या ठिकाणी ५ ते ६ वेगवेगळ्या लेण्या आहेत . याठिकाणी असलेली चैत्यगृहे त्यांची बांधणी आणि स्तूप यावरून ही लेणी बौद्ध हीनयान पंथी आहेत हे समजून येते . लेण्यांचा बांधणी-काळ इ .स. २ रे ते ३ रे शतक, देव देवतांच्या मूर्ती, नंदी हे नंतर च्या कालखंडात आले असावेत. 

     डाव्या हाताच्या पहिल्या लोण्यामध्ये उजवीकडच्या भिंतीमध्ये कोरलेल्या ४ मूर्ती, नक्की कोणाच्या मूर्ती आहेत ते सांगता येत नाही, परंतु लक्ष्मी सरस्वती विष्णू गरुड यांच्या त्या असाव्यात, लक्ष्मीच्या हातामध्ये बांगड्या कोरलेल्या कळतात .  मूर्तींच्या शेजारीच थोड्या उंचीवर  चौथरा, अन त्याच्या वर पोट माळा आहे.

      पुढच्या दुसऱ्या लेण्यामध्ये आत आणि बाहेर असे मिळून दोन विहार आहेत, पावसाळ्यात दोन्ही विहारात पाणी भरते, आतील बाजूस सुबक घडणीचा नंदी आणि एक शिवपिंड आहे.

    त्याला लागूनच असलेल्या तिसऱ्या लोण्यामध्ये  हे सर्वात मोठे आणि प्रमुख लेणे आहे. यामध्ये डाव्या बाजूस खिडकी युक्त १ दालन, एका खिडकीजवळ पूर्णपणे भंगलेल्या ५ मूर्ती आहेत, त्यात गणपती आणि कुठल्याशा देवीची मूर्ती ओळखता येते, मुख्य दालनात गुडघाभर पाणी कायमच भरलेले असते, बाजूला बसायचे ओटे आहेत, समोरच्या विहारात प्रचंड आकाराचा स्तूप ( उंची सुमारे ५ फुट) या स्तूपाचे रुपांतर कालांतराने शिवलिंगामध्ये झाले असावे. याच स्तुपाला स्थानिक लोक पालपेश्वर किंवा दागोबा ( पाल्कोबा ) असं समजतात, त्याच्या समोर पाण्यात एक नंदी, आणि एक मूर्ती , स्तुपाला टेकून ठेवलेला एक अंडाकृती दगड हा स्तुपाचाच एक भाग असावा.

   चौथ्या लेण्यामध्ये  अर्धवट खोदाई, उजवीकडे पाण्याचे टाके, डावीकडे एक विहार, आत मध्ये गाळ आणि माती भरल्याने अर्धवट बुजले आहे.

   पाचवे लेणे पाण्याचे टाके, दगड माती भरल्याने बुजून गेलेलं आहे. त्यापुढे एक छोटीशी गुहा आहे . 

     डोंगर भागात असलेल्या या गुहा अथवा लेणी फारच प्रेक्षणीय आहेत. 

   लेण्या पाहून झाल्यावर त्याच ठिकाणी रिमझिम पावसात नेहमीप्रमाणे पहिल्यांदा ट्रेकमध्ये सामील झालेल्या मावळयांचे अनुभव कथन झाले . असूनही थोडी टेकडी उतरून पांदीच्या रस्त्याने गावापर्यत जायचे होते . पण ट्रेक पूर्ण झाल्याचे समाधान प्रत्येकाच्या चेहर्‍यावर होते . शेवटी जाधव साहेबांनी सर्वांचे आभार मानले. 

    पावसाळ्यात हा ट्रेक अतिशय सुंदर आहे . प्रत्येक ट्रेकर्सने एकदा तरी हा अनुभव घ्यावा . 


- दशरथ ननावरे ( श्रीमंत ) 

   इतिहास अभ्यासक 

.......................................................

(संदर्भ : माझ्या भटकंतीच्या नोंदी , भटकंती अपरिचित साताऱ्याची).

Thursday, 3 September 2020

॥ विचारवेध ॥ मनाची श्रीमंती

 


॥ विचारवेध ॥ 

- दशरथ ननावरे ( श्रीमंत ) , इतिहास अभ्यासक

मनाची श्रीमंती..

     'श्रीमंती ' या शब्दाचा अर्थ खूप वेगळा आहे . माणूस केवळ पैशाने श्रीमंत होत नाही तर तो विचारांनी श्रीमंत होत असतो . भरपूर पैसा कमावल्याने पैसेवाला होता येते परंतु तो मनाने श्रीमंत होईलच असे नाही . पैशाने सुखवस्तू खरेदी करता येतील पण सुख नाही . माणसाचे मन विशाल , विचार समृद्ध आणि आचरण सद्शील असेल तर मानसिक सुख त्याच्या जवळ वास करते . या सुखाचा खजीना ज्याच्या जवळ अधिक तो खरा श्रीमंत होय . 

       परवाच एका मित्राच्या लग्न समारंभासाठी पंढरपूरला जाणं झालं. लग्नाची वेळ लवकर असल्याने सकाळी लवकर निघालो . कारण एसटी बसने प्रवास करायचा होता .रस्त्यात काही अडचण आली तर उगीचच वेळ व्हायला नको . तसा  वेळेतच लग्नाला पोहोचलो . लग्न आटपून थोडीशी पोटपूजा करून मंगल कार्यालयातून बाहेर आलो. दिवस बाकी होता . पंढरपूरला आलो अन् पांडूरंगाच्या दर्शनाला गेला नाही असा महाराष्ट्रीयन माणूस शोधून सापडणे कठीणच ! साहजिकच माझेही मन ओढ घेत होते आणि पाऊले आपोआपच विठ्ठल मंदिराकडे वळली.  देवदर्शनाची मनाची इच्छा पूर्ण होणार होती. लवकर पोहचावे म्हणून रिक्षाने जायचे ठरवले .  रिक्षावाल्याने मंदिराजवळ सोडले . 

            उन्हाळ्याचे दिवस होते . पण भर उन्हाळ्यात वातावरण पावसाळी झाले होते.  अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे उन्हाळ्यात भर दुपारी पाऊस कोसळत होता. रिक्षातून उतरलो अन् भिजतच मंदिराकडे गेलो . मंदिरात प्रवेश करताना पायातली चप्पल कोठे काढावी असा प्रश्न पडला . जिथं चप्पल ठेवायला जावे तिथं हारवाले काढू देत नव्हते . शेवटी एका ठिकाणी चप्पल काढली तर शेजारचा हारवाला म्हणाला , साहेब , दहा रुपयांचा हार घ्या . मी नाही म्हणून सांगितलं तर तो म्हणाला , ' चप्पल इथे सोडू नका , गेली तर काय भरवसा ' . मी ओळखून गेलो . खरंतर मंदिरात जावे, मनोभावे परमेश्वराला शरण जावे , दर्शन घ्यावे. कारण प्रत्येकाची श्रध्दा असते . या विचारांचा मी पक्का होतो . त्यामुळे हार , नारळ घेऊन मंदिरात जावे हे पटतच नव्हते . त्यापेक्षा शाळेत एखादया गरजू मुलांना शालेय साहित्यासाठी मदत केलेली केव्हाही चांगली असं मी मानत होतो . आणि तसंच वागत आलो होतो पण नाइलाजास्तव दहा रुपयांचा हार घेऊन मंदिरात प्रवेश केला . 

    संत नामदेवाच्या पायरीचे दर्शन घेऊन डाव्या बाजूने पायऱ्या चढून गेलो . समोरच हवालदार बसले होते . हवालदाराने विचारले , साहेब , मोबाईल आहे का ? मी आहे म्हणून सांगितल्यावर त्यांनी तो बाहेर ठेवण्यास सांगितले . मी परत माघारी फिरलो . आसपासच्या सर्वच दुकानावर बोर्ड लावले होते , येथे मोबाईल ठेवण्याची व्यवस्था केली जाईल . मनात विचार आला . देवाचं दर्शन घ्याययं तर एवढ करायला हवं . दक्षिण भारतात मंदिरात दर्शनासाठी  जाताना भक्तांच्या चप्पल, पिशवी , मोबाईल ठेवण्याची व्यवस्था मंदीर प्रशासनाने केलेली आहे . इथे मात्र देव महाग व्हायला लागलाय असं वाटलं . त्यातीलच एका दुकानात मोबाईल ठेवून दहा रुपयांचे टोकन घेतले . 

       पुन्हा मंदिराच्या पायऱ्या चढुन रांगेत उभा राहिलो . मुंगीच्या पावलाने रांग पुढे सरकत होती . भक्तगण , वारकरी , पर्यटक अन् सर्वसामान्य भाविक सगळेच रांगेत उभे होते . दर्शनाला खूप वेळ लागणार हे मी जाणले . तेवढयात धोतर , पंचा घातलेल्या एका पुजाऱ्याचा आवाज ऐकू आला . ५१ रूपये , १०१ रुपये अभिषेक घालणाऱ्याला थेट दर्शन दिले जाईल . हे ऐकूऩ काही लोकांनी रांग सोडून पळापळ सुरु केली . पुन्हा एकदा मनात विचार डोकावला . देवांचाही बाजार भरू लागलाय की काय . 

    दैनंदिन व्यवहारात , सामाजिक , राजकीय क्षेत्रात श्रीमंत मंडळी नेहमीच गरीबांची हेटाळणी करतात . पण गरीबांनी ताठ कळत तासनतास रांगेत उभे रहायचं आणि श्रीमंतांनी पैशाच्या जोरावर लगेच दर्शन घ्यायचं . पण त्यांना खरचं देव भेटतो का ? असा प्रश्न पडला . भाविकांकडून पैसे उकळण्याचा हा गोरख धंदा चालुच कसा दिला जातो . 

     शेवटी कसा बसा गाभाऱ्यात प्रवेश मिळाला . दर्शन घेणाऱ्याला झटपट पुढे ओढले जात होते . मी हात जोडले तोच मला पुढे ढकलले जावू लागले . मी पटकन म्हणालो , अहो , दर्शन तरी घेऊ दया ? लगेच पुजाऱ्याने हात पाठीमागे केला . मला वाटले पुजारी मनाने चांगला वाटतो . मी डोकं टेकून दर्शन घेतले . पण लगेच पुजारी म्हणाला , दहा रुपये दक्षिणा ठेवा . पैसे घेतल्याशिवाय पुढे सोडलेच नाही . विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन बाहेर आलो . चप्पल पायात घातली अन् दुकानदाराला दहा रुपये देऊ लागलो तर तो लगेच म्हणाला १२ रूपये झाले .  मी कसे म्हणून विचारल तर म्हणाला पहिले १० रुपये हाराचे , आत्ताचे दोन रुपये चप्पलाचे ! मी चक्रावलोच पण पर्याय नव्हता अखेर पैसे दिले . शेजारीच दुकानात टोकन देऊन मोबाईल घेतला . आणि विचार करतच चालू लागलो . वाटलं खरचं देव आता गरीबांचा उरलाय का ? दुकानातून प्रसाद घेण्याचीही इच्छा राहिली नाही . शेवटी तसाच बसस्थानकापर्यंत चालत गेलो . 

    एसटी बसचा प्रवास सुरु झाला . मी जिथं बसलो होतो तिथेच एक व्यक्ती बसलेली . पोशाखावरून कोणीतरी महाराज असावेत असं वाटलं . अंगात पांढरा कुर्ता , धोतर अन् डोक्यावर टोपी घातली होती . नमस्कार करून मी त्यांची विचारपूस केली तर ते म्हणाले , देहूला किर्तनाच्या कार्यक्रमाला चाललोय . थोडं पुढे आल्यावर अचानक फोन वाजला . तो महाराजांचा होता . त्यांच्या संभाषणावरून मला कळलं की त्यांच्या पंढरपुरातील मठात २४ वारकरी उतरलेत . त्यांनी लगेच पत्नीला सूचना केल्या . त्यांची खाण्याची , चहापानाची उत्तम सोय करा . काही कमी पडू देऊ नका .  

    माझ्या मनात विचार आला एकिकडे मंदिरात पुजारी आणि मंदिराबाहेर दुकानदार भाविकांना अडवणूक करुन लुटतात . आणि दुसऱ्या बाजूला समाजप्रबोधन करणारे हे महाराज जे वारकऱ्यांचीही सेवा करतात . खरचं त्यांच्या मनाची ही मोठी श्रीमंती होती . त्यांच्या ठायी जी आपुलकी होती त्यांचे मोजमाप करणे कठीण ! माणूस केवळ पैशाने मोठा होत नाही . मनाचा उदारपणा महत्वाचा आहे . पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती अधिक श्रेष्ठ असते . माझ्या मनात गाडगेबाबांचा मंत्र चमकून गेला . 'देव माणसात शोधावा ' आणि ते खरचं होतं . त्याचं उदाहरण मी अनुभवत होतो .  मी महाराजांना मंदिरातील दर्शनाविषयी विचारले तर महाराज म्हणाले , संत सावता महाराजांनी देव मळ्यात अनुभवला , पाहिला . आपल्या कर्मात त्याचा वास असतो . संत जनाबाईने तर देव हृदयात बंदिस्त केला होता . पण पुजाऱ्यांनी तो गाभाऱ्याच्या पिंजऱ्यात बंद केलाय . देव आता गरीबांचा उरलाच नाही . 

          


[या घटनेला आता एक तप उलटून गेले आहे . आता परिस्थिती बदलली सुध्दा असेल पण अनेक ठिकाणी असा अनुभव आजही येतो . ]


- दशरथ ननावरे ( श्रीमंत )

  इतिहास अभ्यासक 

Monday, 31 August 2020

॥ विचारवेध ॥ चेतनाभूमी नायगाव

 


॥ विचारवेध ॥ 

दशरथ ननावरे ( श्रीमंत ) , इतिहास अभ्यासक


चेतनाभूमी नायगाव ...  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मभूमी ...

     ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव म्हणजे महाराष्ट्रासह देशभरातील जनतेची चेतनाभूमी . खंडाळा तालुक्यातील नायगाव हे तसं खेडेगाव पण सावित्रीबाईंच्या जन्माने पुनित झालेलं हे ठिकाण आजही महाराष्ट्राला नव्हे तर जगाला प्रेरणादायी ठरत आहे . तसचं ते पर्यटनस्थळ म्हणूनही विकसीत होत आहे . 

       महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला याच बरोबर स्त्री पुरुष समता आणि जातीयता निर्मूलन इत्यादी क्षेत्रातील मोलाचे कार्य केले. या कार्याचे महत्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांचे नायगाव येथील जन्मघर ” राज्य संरक्षित स्मारक ” म्हणून घोषित केले आहे. जन्मघराच्या जतनापूर्वी हि जागा दुर्लक्षित होती. नंतर महाराष्ट्र शासनाने या वास्तूच्या तत्कालीन स्वरूपानुसार तिची पुनर्निर्माण केला.

ज्या काळात स्त्रीला समाजात मनाचे स्थान मिळत नव्हते ; शिक्षणापासून आणि स्वातंत्र्यापासून दूर ठेवून स्त्रीला परावलंबी आणि पारतंत्र्यात ठेवले जात होते त्या काळात सावित्रीबाईचा जन्म झाला . पुढे मात्र सावित्रीबाईना, ज्योतिबा फुले यांचा उदार दृष्टी कोण असल्याने , स्वतःचे व्यक्तिमत्व घडविण्याची संधी प्राप्त झाली.

महाराष्ट्रातील महान समाज सुधारक व दलितांचे उद्धारकर्ते महात्मा जोतीराव फुले यांच्या संघर्षमय  समाजसुधारणाच्या कार्यात त्यांना खांद्याला खांदा लावून स्त्री – शिक्षण व दलित उद्धारक कार्य करणाऱ्या त्यांच्या सौभाग्यवती सावित्रीबाई फुले या सातारा जिल्हयातील शिरवळपासून जवळच असलेल्या नायगावच्या खंडोजी नेवसे पाटील याच्या घरी ३ जानेवारी १८३१ रोजी सावित्री हि कन्या जन्मली . त्याची हि एकुलती एक लाडकी मुलगी होती. त्या काळात बालविवाहाची प्रथा होती. त्यामुळे सावित्री सात वर्षाची होताच तिच्यासाठी नवरामुलगा शोधण्यासाठी मोहीम सुरु झाली. शिवाय सावित्री हाडापेराने मजबूत आणि थोराड असल्याने सावित्रीबाईच्या आई – वडीलांनी मोहीम जरात सुरु केली. नेवसे पाटील आणि धनकवडीचे पाटील यांचा घरोबा होता. त्यातून जोतीराव बारा वर्षाचे आणि सावित्रीबाई नऊ वर्षाच्या  होत्या .

    सावित्रीबाई आणि जोतीराव यांना अपत्य नव्हते . त्यांनी यशवंत  नावाचा मुलगा आणि त्याच्या विधवा आईला आपल्या घरी साभाळले. पुढे सावित्रीबाईनी जोतीरावांशी विचारविनिमय करून यशवंतलाच दत्तकच घेतले . यशवंतच्या खऱ्या आईला सावित्रीबाईंनी अत्यंत प्रेमाने वागविले हि त्यांच्या मनाच्या मोठेपणाची साक्ष . सावित्रीबाईंना बालपणी घरच्याकडून शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळणे त्या काळात शक्यच नव्हते. सावित्रीबाईना मात्र बालवयापासून शिकावे असे मनातून वाटत होते.

     जोतीरावांबरोबर सावित्रीबाईंना विवाह झाल्यावर त्यांना त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करण्याची संधी चालून आली जोतीरावांच्याच मनाने स्त्रियांनी शिकावे असा विचार केलेला असल्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीपासूनच स्त्रीशिक्षणाला आरंभ  केला होता. जोतीरावांच्या वडीलांनी आपल्या मुलाच्या शिक्षणाबाबद्च विरोध प्रकट केला होता. तिथे सुनेच्या शिक्षणाला ते नकार देतील यात काय आश्चर्य .  पण जोतीरावांच्या मुलींसाठी शाळा काढण्याचा विचार निश्चित झाला . त्यामुळे त्याचा आरंभ त्यांनी आपल्या पत्नीपासूनच  म्हणजे सावित्रीबाईपासूनच केला. शेतात काम करतांनाच झाडाखाली बसून काळ्या मातीत अक्षरे गिरवत सावित्रीबाई शिकू लागल्या . या मध्ये प्रगती झाल्यावर त्यांनी एका सरकारी शाळेत प्रवेश घेवून पुढचे शिक्षण चालू ठेवले .

     १४ जानेवारी १८४८ साली जोतीरावांनी पुण्यास मुलींची पहिली शाळा काढली. पण मुलीना शिकवयाचे धाडस करायला कुणी शिक्षक पुढे येईना . तेव्हा सावित्रीबाई शाळेत जावून मुलीना शिकवू लागल्या . बायकांनी शिकणे हे महापाप . आणि त्यांना शिकवणे हे तर महाभयंकर पाप, असे त्या काळी सर्वच समाज समजत असल्याने, सावित्रीबाई शाळेत मुलीना शिकवायला जाऊ लागल्या की पुण्यातले अतिकर्मठ लोकं त्याचावर दगड, शेण, चिखल वैगरे फेकीत. पण सावित्रीबाईना या सर्व छळाला शांतपणे तोंड देवून मुलीना शिक्षण देण्याचे कार्य चालू ठेवले . सावित्रीबाई आणि जोतीराव फुले यांनी नंतर दोन शाळा काढल्या . त्या व्यवस्थित चलल्या पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून १९५२ म्स्ध्ये इंग्रज सरकारने फुले पतीपत्नीचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही जाहीर केला . भारतातल्या मुलीना पहिल्या शाळेतील या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले.

     ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव येथील राष्ट्रीय स्मारक व शिल्प सृष्टीस भेट देण्यासाठी राज्यातून आणि राज्या बाहेरुन हजारो पर्यटक येत असतात . पर्यटकांच्या निवासाची सोय व्हावी तसेच त्यांना फुले साहित्याचा अभ्यास करता यावा यासाठी राज्य शासनाने येथे पर्यटक निवास उभारले आहे मात्र काही अपूर्ण कामामुळे हे पर्यटक निवास धूळ खात पडले आहे . याचे उद्घाटन होऊन ते वापरात यावे अशी अपेक्षा पर्यटक व नायगाव ग्रामस्थांची आहे .

        बहुजनांच्या आणि गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध करण्यासाठी व त्यांच्या उद्धारासाठी संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या फुले दाम्पत्यांचे नायगाव ता . खंडाळा येथे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात आले आहे . त्याचबरोबर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याची महती दर्शवणारी शिल्पसृष्टीही निर्माण केली आहे . देशभरातून हजारो पर्यटक येथे राष्ट्रपुरुषांना अभिवादन करण्यासाठी वर्षभरात येत असतात . त्यांच्या राहण्याची सोय व्हावी तसेच फुले दाम्पत्यांच्या जीवनकार्याचा अभ्यास करता यावा यासाठी स्मारक विकास आराखडयात पर्यटक निवासाचा समावेश करण्यात आला होता . राज्य शासनाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून या इमारतीच्या उभारणीस सुरवात केली यासाठी डिसेंबर २०११ मध्ये मंजूरी देऊन पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला होता . या इमारतीत पर्यटकांसाठी राहण्याच्या खोल्या , सुसज्ज ग्रंथालय तसेच अभ्यास केंद्राची सुविधा करण्यात येणार आहे . इमारतीचे बांधकाम बहुतांशी पूर्ण असले तरी अदयाप इमारती बाहेरील बाग , पाण्याची व्यवस्था तसेच अन्य किरकोळ कामे अपूर्ण आहेत . त्याचबरोबर गावापासून या पर्यटन निवासापर्यंत जाण्यासाठी रस्त्याची सोय नाही . या रस्त्यासाठी भूसंपादनाचा प्रश्न प्रलंबित आहे . यावर प्रशासनाने तोडगा काढला नाही . त्यामुळे कोट्यावधी रुपये खर्च करून बांधलेली ही इमारत अद्याप वापरात आली नाही . रस्त्यासह उर्वरित कामे कधी पूर्ण होणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागलेले आहे . 

॥ हे जरुर पहा ....

   नायगाव येथील सावित्रीबाई फुले स्मारक हा एक ऐतिहासिक ठेवा आहे . त्यांच्या जन्मघरात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे अस्सल छायाचित्र , काही स्वलिखित पत्रे आहेत तसेच स्वयंपाकघर त्यामध्ये तत्कालीन स्वयंपाक व पाण्याची भांडी , चूल व इतर साहित्य आहे . शेजारीच माजघर आहे . त्याशेजारी तळघर असून त्यात धान्याची कोठी आहेत . हा ऐवज जसाच्या तसा जपून ठेवलेला आहे . त्याबरोबरच फुले दाम्पत्यांच्या जीवनाशी निगडीत विविध साहित्य येथे पहायला मिळते . ॥ 

॥ सावित्री शिल्पसृष्टी ...

   राष्ट्रीय स्मारकाच्या शेजारी स्वतंत्र शिल्पसृष्टी उभारण्यात आली आहे . यात सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या जीवनकार्याची स्मृति  जागृत ठेवणारे शिल्प घडविण्यात आली आहेत . यामध्ये मुलींची पहिली शाळा , हरिजनांसाठी  घरातील रिकामा केलेला हौद , केशवपन विरोधी काढलेला मोर्चा , विधवा विवाह पुरस्कृत कार्य , अनाथ मुलांचे पाळणाघर , महात्मा फुले यांचा अंत्यविधी यांसह विविध चौदा शिल्प रेखाटलेली आहेत . ॥ 


॥ सावित्रीबाई फुले स्मारकास भेट देणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे . पण पर्यटक निवास इमारत अपूर्ण असल्याने त्यांना थांबता येत नाही . उर्वरित कामे पूर्ण करण्यासह ग्रंथालय व अभ्यासकेंद्र लगेच सुरू करण्यात यावे त्यामुळे फुले दाम्पत्यांचा कार्याचा अभ्यास करून त्याचा प्रसार होणे सोईचे ठरणार आहे ॥ 


॥ ऑडीटोरियल रुम - सावित्रीबाई फुले यांचे जीवनकार्य , त्यांचा धगधगता प्रवास व महात्मा फुले यांचे मानवतावादी विचार सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी शिल्पसृष्टीच्या शेजारील रुममध्ये ऑडीटोरियल सुविधा तयार करून फुले दाम्पत्यांच्या जीवनावरील लघुपट तयार करून त्याचे प्रसारण व्हावे . येथे येणाऱ्या सहलीतील शालेय मुलांना व अनुयायांना ते पाहण्याचा लाभ घेता येणार आहे . ॥

   II एक रस्त्याने जोडणार दोन पर्यटनस्थळे ....

आदय स्त्री समाजसुधारक ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव ते महाराष्ट्राची कुलदेवता काळूबाईचे अधिष्ठान मांढरदेव हे एकाच रस्त्याने जोडण्याचा प्रस्ताव शासन दरबारी असल्याने  रस्त्याच्या मंजूरीचा प्रश्न मार्गी लागणार आहे .  त्यामुळे राज्यातील पर्यटकांना एकाच वेळी नायगावचे विचारपीठ आणि मांढरदेवचे शक्तीपीठ पाहता येणार आहे . 

स्त्री शिक्षणाचा पाया रचनाऱ्या व सामाजिक क्रांती घडवून समतेचा संदेश देशाला देणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव ही महाराष्ट्राची चेतनाभूमी आहे . तर मांढरदेव येथील कुलदैवत माता काळूबाई हे भक्तांसाठी जागरूक अधिष्ठान आहे . नायगावचे हे विचारपीठ आणि मांढरदेवचे शक्तीपीठ एकाच मार्गाने जोडावे यासाठी सुरु असलेल्या संघर्षाला यश मिळाले आहे . त्यामुळे येथे येणाऱ्या हजारो पर्यटकांना ही दोन्ही ठिकाणे एकाच वेळी पाहता येणार आहे . ॥


- दशरथ ननावरे ( श्रीमंत )

   इतिहास अभ्यासक