Pages

Thursday, 3 September 2020

॥ विचारवेध ॥ मनाची श्रीमंती

 


॥ विचारवेध ॥ 

- दशरथ ननावरे ( श्रीमंत ) , इतिहास अभ्यासक

मनाची श्रीमंती..

     'श्रीमंती ' या शब्दाचा अर्थ खूप वेगळा आहे . माणूस केवळ पैशाने श्रीमंत होत नाही तर तो विचारांनी श्रीमंत होत असतो . भरपूर पैसा कमावल्याने पैसेवाला होता येते परंतु तो मनाने श्रीमंत होईलच असे नाही . पैशाने सुखवस्तू खरेदी करता येतील पण सुख नाही . माणसाचे मन विशाल , विचार समृद्ध आणि आचरण सद्शील असेल तर मानसिक सुख त्याच्या जवळ वास करते . या सुखाचा खजीना ज्याच्या जवळ अधिक तो खरा श्रीमंत होय . 

       परवाच एका मित्राच्या लग्न समारंभासाठी पंढरपूरला जाणं झालं. लग्नाची वेळ लवकर असल्याने सकाळी लवकर निघालो . कारण एसटी बसने प्रवास करायचा होता .रस्त्यात काही अडचण आली तर उगीचच वेळ व्हायला नको . तसा  वेळेतच लग्नाला पोहोचलो . लग्न आटपून थोडीशी पोटपूजा करून मंगल कार्यालयातून बाहेर आलो. दिवस बाकी होता . पंढरपूरला आलो अन् पांडूरंगाच्या दर्शनाला गेला नाही असा महाराष्ट्रीयन माणूस शोधून सापडणे कठीणच ! साहजिकच माझेही मन ओढ घेत होते आणि पाऊले आपोआपच विठ्ठल मंदिराकडे वळली.  देवदर्शनाची मनाची इच्छा पूर्ण होणार होती. लवकर पोहचावे म्हणून रिक्षाने जायचे ठरवले .  रिक्षावाल्याने मंदिराजवळ सोडले . 

            उन्हाळ्याचे दिवस होते . पण भर उन्हाळ्यात वातावरण पावसाळी झाले होते.  अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे उन्हाळ्यात भर दुपारी पाऊस कोसळत होता. रिक्षातून उतरलो अन् भिजतच मंदिराकडे गेलो . मंदिरात प्रवेश करताना पायातली चप्पल कोठे काढावी असा प्रश्न पडला . जिथं चप्पल ठेवायला जावे तिथं हारवाले काढू देत नव्हते . शेवटी एका ठिकाणी चप्पल काढली तर शेजारचा हारवाला म्हणाला , साहेब , दहा रुपयांचा हार घ्या . मी नाही म्हणून सांगितलं तर तो म्हणाला , ' चप्पल इथे सोडू नका , गेली तर काय भरवसा ' . मी ओळखून गेलो . खरंतर मंदिरात जावे, मनोभावे परमेश्वराला शरण जावे , दर्शन घ्यावे. कारण प्रत्येकाची श्रध्दा असते . या विचारांचा मी पक्का होतो . त्यामुळे हार , नारळ घेऊन मंदिरात जावे हे पटतच नव्हते . त्यापेक्षा शाळेत एखादया गरजू मुलांना शालेय साहित्यासाठी मदत केलेली केव्हाही चांगली असं मी मानत होतो . आणि तसंच वागत आलो होतो पण नाइलाजास्तव दहा रुपयांचा हार घेऊन मंदिरात प्रवेश केला . 

    संत नामदेवाच्या पायरीचे दर्शन घेऊन डाव्या बाजूने पायऱ्या चढून गेलो . समोरच हवालदार बसले होते . हवालदाराने विचारले , साहेब , मोबाईल आहे का ? मी आहे म्हणून सांगितल्यावर त्यांनी तो बाहेर ठेवण्यास सांगितले . मी परत माघारी फिरलो . आसपासच्या सर्वच दुकानावर बोर्ड लावले होते , येथे मोबाईल ठेवण्याची व्यवस्था केली जाईल . मनात विचार आला . देवाचं दर्शन घ्याययं तर एवढ करायला हवं . दक्षिण भारतात मंदिरात दर्शनासाठी  जाताना भक्तांच्या चप्पल, पिशवी , मोबाईल ठेवण्याची व्यवस्था मंदीर प्रशासनाने केलेली आहे . इथे मात्र देव महाग व्हायला लागलाय असं वाटलं . त्यातीलच एका दुकानात मोबाईल ठेवून दहा रुपयांचे टोकन घेतले . 

       पुन्हा मंदिराच्या पायऱ्या चढुन रांगेत उभा राहिलो . मुंगीच्या पावलाने रांग पुढे सरकत होती . भक्तगण , वारकरी , पर्यटक अन् सर्वसामान्य भाविक सगळेच रांगेत उभे होते . दर्शनाला खूप वेळ लागणार हे मी जाणले . तेवढयात धोतर , पंचा घातलेल्या एका पुजाऱ्याचा आवाज ऐकू आला . ५१ रूपये , १०१ रुपये अभिषेक घालणाऱ्याला थेट दर्शन दिले जाईल . हे ऐकूऩ काही लोकांनी रांग सोडून पळापळ सुरु केली . पुन्हा एकदा मनात विचार डोकावला . देवांचाही बाजार भरू लागलाय की काय . 

    दैनंदिन व्यवहारात , सामाजिक , राजकीय क्षेत्रात श्रीमंत मंडळी नेहमीच गरीबांची हेटाळणी करतात . पण गरीबांनी ताठ कळत तासनतास रांगेत उभे रहायचं आणि श्रीमंतांनी पैशाच्या जोरावर लगेच दर्शन घ्यायचं . पण त्यांना खरचं देव भेटतो का ? असा प्रश्न पडला . भाविकांकडून पैसे उकळण्याचा हा गोरख धंदा चालुच कसा दिला जातो . 

     शेवटी कसा बसा गाभाऱ्यात प्रवेश मिळाला . दर्शन घेणाऱ्याला झटपट पुढे ओढले जात होते . मी हात जोडले तोच मला पुढे ढकलले जावू लागले . मी पटकन म्हणालो , अहो , दर्शन तरी घेऊ दया ? लगेच पुजाऱ्याने हात पाठीमागे केला . मला वाटले पुजारी मनाने चांगला वाटतो . मी डोकं टेकून दर्शन घेतले . पण लगेच पुजारी म्हणाला , दहा रुपये दक्षिणा ठेवा . पैसे घेतल्याशिवाय पुढे सोडलेच नाही . विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन बाहेर आलो . चप्पल पायात घातली अन् दुकानदाराला दहा रुपये देऊ लागलो तर तो लगेच म्हणाला १२ रूपये झाले .  मी कसे म्हणून विचारल तर म्हणाला पहिले १० रुपये हाराचे , आत्ताचे दोन रुपये चप्पलाचे ! मी चक्रावलोच पण पर्याय नव्हता अखेर पैसे दिले . शेजारीच दुकानात टोकन देऊन मोबाईल घेतला . आणि विचार करतच चालू लागलो . वाटलं खरचं देव आता गरीबांचा उरलाय का ? दुकानातून प्रसाद घेण्याचीही इच्छा राहिली नाही . शेवटी तसाच बसस्थानकापर्यंत चालत गेलो . 

    एसटी बसचा प्रवास सुरु झाला . मी जिथं बसलो होतो तिथेच एक व्यक्ती बसलेली . पोशाखावरून कोणीतरी महाराज असावेत असं वाटलं . अंगात पांढरा कुर्ता , धोतर अन् डोक्यावर टोपी घातली होती . नमस्कार करून मी त्यांची विचारपूस केली तर ते म्हणाले , देहूला किर्तनाच्या कार्यक्रमाला चाललोय . थोडं पुढे आल्यावर अचानक फोन वाजला . तो महाराजांचा होता . त्यांच्या संभाषणावरून मला कळलं की त्यांच्या पंढरपुरातील मठात २४ वारकरी उतरलेत . त्यांनी लगेच पत्नीला सूचना केल्या . त्यांची खाण्याची , चहापानाची उत्तम सोय करा . काही कमी पडू देऊ नका .  

    माझ्या मनात विचार आला एकिकडे मंदिरात पुजारी आणि मंदिराबाहेर दुकानदार भाविकांना अडवणूक करुन लुटतात . आणि दुसऱ्या बाजूला समाजप्रबोधन करणारे हे महाराज जे वारकऱ्यांचीही सेवा करतात . खरचं त्यांच्या मनाची ही मोठी श्रीमंती होती . त्यांच्या ठायी जी आपुलकी होती त्यांचे मोजमाप करणे कठीण ! माणूस केवळ पैशाने मोठा होत नाही . मनाचा उदारपणा महत्वाचा आहे . पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती अधिक श्रेष्ठ असते . माझ्या मनात गाडगेबाबांचा मंत्र चमकून गेला . 'देव माणसात शोधावा ' आणि ते खरचं होतं . त्याचं उदाहरण मी अनुभवत होतो .  मी महाराजांना मंदिरातील दर्शनाविषयी विचारले तर महाराज म्हणाले , संत सावता महाराजांनी देव मळ्यात अनुभवला , पाहिला . आपल्या कर्मात त्याचा वास असतो . संत जनाबाईने तर देव हृदयात बंदिस्त केला होता . पण पुजाऱ्यांनी तो गाभाऱ्याच्या पिंजऱ्यात बंद केलाय . देव आता गरीबांचा उरलाच नाही . 

          


[या घटनेला आता एक तप उलटून गेले आहे . आता परिस्थिती बदलली सुध्दा असेल पण अनेक ठिकाणी असा अनुभव आजही येतो . ]


- दशरथ ननावरे ( श्रीमंत )

  इतिहास अभ्यासक 

No comments:

Post a Comment