॥ रानवाटा ॥ सफर निर्भिड जंगलाची
-दशरथ ननावरे ( श्रीमंत )
किल्ले रायरेश्वर ते क्षेत्र कोळेश्वर
' राकट देशा , कणखर देशा , दगडांच्या देशा .... ' असे महाराष्ट्राचे वर्णन अभिमानाने केले जाते . सहयाद्रीच्या दऱ्याखोऱ्यात पसरलेल्या पर्वतरांगातून सामावलेली महाराष्ट्राची भूमी म्हणजे एक स्वर्गच ! स्वराज्य संकल्पनेची शपथ ज्या भूमीवर गर्जली तो किल्ले रायरेश्वर ते सह्यशिखरातील जावळीच्या खोऱ्यातील शंभू महादेवाचे पवित्र ठिकाण असलेले क्षेत्र कोळेश्वर हा निर्भिड अरण्यातील एक साहसी , शारीरिक कस लावणारा , विलोभणीय निसर्गाचे दर्शन घडवणारा रेंज ट्रेक .
सह्याद्रीचा पर्वत असो वा त्याच्या उपरांगा मधील विविध डोंगरांच्या दऱ्याखोऱ्यातील आडवाटा असो , त्या वाटेने मार्गक्रमण करायचं .सह्याद्रीच्या माथ्यावर विराजमान झालेले ऐतिहासिक गड किल्ले , डोंगराच्या कुशीतील धार्मिक ठिकाणे अथवा जंगलाच्या आडवाटा असो त्याच्याशी आपलेपणाचं नातं जोडायचं हा 'शिवसह्याद्री पायदळ ' ट्रेकर्सचा छंदच . आमचे मार्गदर्शक आणि ट्रेकर्स समूहाचे सर्वेसर्वा श्रीपाद जाधव साहेबांनी साद घातली आणि आम्ही प्रतिसाद दिला नाही असं आजवर तरी घडलं नाही . नेहमीप्रमाणे त्यांनी ही मोहिम करण्याचे निश्चित केले .
ठरल्याप्रमाणे आम्ही तयारीनिशी पहाटे साडेतीन वाजता खंडाळा सोडून वाईकडे प्रस्थान केले . पहाटे चार वाजता वाई विश्रामगृहावरून श्रीपाद जाधव साहेब , पुण्याहून आवर्जुन आलेले अभिजीत गोरे , निलेश बोडके , अतुल गाढवे, गौरव पवार आणि मी जीपमधून जांभळी गावाच्या दिशेने निघालो . पहाटेच्या थंड आणि मंद वाऱ्यात तासाभराचा प्रवास करून जांभळी गावात पोहचलो . तेथून सोबत मार्ग दाखवणारे स्थानिक दोन गावकरी वाटाडया म्हणून घेतले . परत माघारी फिरुन किल्ले रायरेश्वराच्या दिशेने घाटरस्त्याने जाऊ लागलो . पंधरा मिनिटांच्या प्रवासानंतर साडेपाच वाजता किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचलो .
डोंगराच्या उंचीवर पोहचल्याने गार वारा अंगाला झोंबत होता . गाडीतून आपापली बॅग पाठीला अडकवली. सर्वानी जीपच्या हेडलाईटच्या प्रकाशात एक फोटो घेतला . एका हातात काठी अन् दुसऱ्या हातात विजेरी घेऊन पाऊलं गडाच्या दिशेने चालू लागली . पूर्वेला तांबडं फुटू लागलं होतं . पावसाळ्याचे दिवस असतानाही आभाळात लाल छटा रेखाटल्या गेल्या होत्या . काळया ढगांच्या आडून पसरलेल्या लाल रंगामुळे मनमोहक दृश्य दिसत होते . त्यामुळे कॅमेरात ते टिपण्याचा मोह आवरला नाही .
रायरेश्वरला तसं पाच सहा वेळा येणं झालं होतं . पण पहाटे येण्याची ही पहिलीच वेळ होती . त्यामुळे पहाटे गडावरचं वातावरण अनुभवता येणार होतं . काही पाऊलं पुढं गेलो अन् पहिली चढण लागली . दहा मिनिटाच्या अंतरावर पोहचलो समोर लोखंडी शिडी कडयाला लावलेली होती . एका दमातचं सर्वजण किल्ल्यावर पोहचले आणि गार वाऱ्याची झुळूक अंगाला झोंबू लागली . मात्र वातावरण प्रसन्न आणि आल्हाददायक होतं . एव्हाना चांगलं उजाडलं होतं . परिसर स्वच्छ होऊ लागला होता . आभाळातून वाहणारे काळे - पांढरे ढग समोरच्या केंजळगडाच्या टोकाला भिडत होते . एक नयनरम्य दृश्य डोळयांचे पारणे फेडत होते . सर्वानी मिळून हर हर महादेवची गर्जना केली . आसमंतात आवाज घुमला . शरीरात नवी ऊर्जा उत्पन्न झाली आणि रायरेश्वराच्या देवालयाकडे प्रस्थान केले .
आजूबाजूचा हिरवागार परिसर न्याहाळत रमत गमत पुढे चालत होतो . वाऱ्याने हिरव्यागार गवताची पाती डुलत होती . चवर, सोनके , मिकीमाऊस, लालटाका यासह अनेक प्रकारच्या रानफुलांनी लाल , गुलाबी , पिवळे , पांढरा , निळा , जांभळ्या रंगांची निसर्गात मुक्त उधळण केली होती .बघता बघता तलावाच्या जवळ पोहचलो . आजूबाजूच्या झाडांच्या फांदया पाण्यात डोकावत होत्या . पावसाच्या पाण्याने तुडुंब भरलेल्या तलावाला वळसा घालून पुढे गेलो . काही अंतरावर पाण्याचे टाके होते . गोमुखातून टाक्यात पाणी पडत होते . स्वच्छ , निर्मळ पाण्यात टाक्याचा तळ दिसत होता . आमची चाहूल लागताच खेकड्यांनी दगडाच्या कपारीकडे पळ काढला आणि आम्ही मंदिराकडे !

रायरेश्वर देवालयाच्या प्रांगणात प्रवेश केला . शिवालयाचे दगडी बांधकाम आजही मजबूत आहे . पूर्वीच्या छताची जागा पत्र्याने घेतली आहे . मंदिराच्या गाभाऱ्यात दगडी शिवलिंग व पिंड आहे . शेजारी दगडी पणतीचा दिवा तेवत होता . अगरबत्तीचा वास सर्वत्र दरवळत होता . 'ओम नमः शिवाय ' चा जप आतून कानावर पडत होता . सर्वानी नतमस्तक होऊन मनोभावे दर्शन घेतले . मंदिरात शिवकालीन इतिहासाची जुजबी माहिती आणि शिवरायांच्या स्वराज्य शपथेचा फोटो लावलेला आहे . मंदिराच्या समोरच एका चौथऱ्यावर छत्रपती शिवाजी राजांचा अर्धपुतळा बसवलेला आहे. शेजारीच छोटेखानी शाळेची इमारत आहे .
दर्शन घेऊन पश्चिमेच्या दिशेने पायवाटेने चालू लागलो . भाताच्या शेतीला वळसा घालून पुढे गेल्यावर रायरेश्वरावरील वस्ती आहे . इथे काही मोजकीच घरे आहेत . सध्या पावसामुळे ती झावळयांनी व कुडांनी झाकलेली आहेत . कुत्र्यांच्या आवाजाने आम्ही आल्याची कानकून वस्तीवाल्यांना झाली . जाता जाता सोमनाथ जंगमांना आवाज देऊन पुढे चालतो झालो . मागच्या ओघळीच्या वाटेने चिखल तुडवत आणि मागच्या ट्रेकच्या वेळी कोणत्या रस्त्याने गेलो याचा अंदाज लावत चाललो होतो . सोबत वस्तीवरचा एक कुत्रा होताच . केसाळ शरीर अन् झुबकेदार शेपटी यामुळे गडयाचा रुबाब वाढला होता . नेहमीप्रमाणे गडाच्या टोकापर्यत हा सोबत करणार याची खात्री होती . पाऊण तासाभराच्या अंतरात रायरेश्वराचे भले मोठे पठार मागे टाकले होते . आता कड्याच्या टोकावर पोहचलो होतो . तिथूनच दूरवर खोल जांभळी गाव दिसत होते . पलीकडे उंचच्या उंच डोंगर दिसत होता . वर विस्तीर्ण पठार दिसत होते . साहेबांनी हातानेच ते दाखवून ' सवंगडयांनो , आपणाला त्या समोरच्या डोंगराच्या मध्यावर असणाऱ्या कोळेश्वराला जायचं आहे . ' असं सांगीतलं . तेव्हा कुठं या ट्रेकची भव्यता आणि कसरतीची दृश्ये डोळयापुढे तरळू लागली .

रायरेश्वर उतरण्यासाठी इथून पुढं ' निसणीची वाट ' वाट सुरु होत होती . त्या वाटेनेच आता कसरत करावी लागणार होती . निसणीची वाट उतरण्यास प्रारंभ केला . रायरेश्वरपासून सोबत आलेला मोती कुत्रा इथूनच परत फिरला . या उतरणीच्या सुरवातीलाच कातळ खडकातून खाली जावे लागते . डोंगर उताराची ही अतिशय अवघड वाट आहे . तीव्र उतार , निसरडया वाटा , पाऊल टाकता येईल एवढीच वाट त्यामुळे जपून पाऊले टाकावी लागत होती . खोल दरी उतरुन पुढे जांभळी गावात पोहचणार होतो . खरं तर बिकट वाट वहिवाट नसावी पण तीच आता वाटयाला आली होती . एकमेकांना सूचना करीत पुढे सरकत होतो . एका उतारावर जाधव साहेबांचा पाय घसरला . आणि काळजाचा ठोका चुकला . त्यांनी स्वतःला सावरलं . त्यांच्या बुटाची ग्रीप खराब झाल्याने पाय खूपच सटकत होता . त्यांना मी म्हणालो , साहेब माझे बुट तुम्ही घाला . पण नेहमी दुसऱ्याचा विचार करणारे साहेब ऐकतीलच कसे . काही अंतर गेल्यावर त्यांचा पुन्हा एकदा पाय सटकला . पण त्यांनी हार मानली नाही . सावध पावले टाकत आणि काठीचा आधार घेत ते पुढे चालत राहिले . पहिला टप्पा उतरल्यानंतर अतिशय तीव्र उतार लागला . पण इथे सर्वत्र गवत पसरले होते . डोंगरानं हिरव्यागार गवताचा शालू पांघरलेला होता असं भासत होत . वाट धोक्याची असतानाही अतुलला एक फोटो काढायला लावलाच . मजल दर मजल करीत कसे बसे जांभळी गावापर्यत आलो . रस्त्याला लागण्यापूर्वी एका ठिकाणी मिकी माऊसच्या ( बरखा म्हणून ओळखली जाणारी ही रानभाजी )पिवळ्या फुलांचे आच्छादन पसरले होते . एखादया चित्रपटात विदेशी डोंगरातील शुटींगसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रेक्षणीय स्थळाप्रमाणे ते दिसत होते . चालून चालुन कंटाळलेल्या मनाला नवी पालवीच फुटली . सर्वानी आपापले फोटो काढून हा परिसर चित्रबद्ध केला . माझ्या पाठोपाठ फोटोसाठी गेलेल्या अतुलने एक चांगली आपटी खाल्ली . पण गडयानं फोटो काढायची मात्र हौस पुरी केली .

तिथून कोळीवाडयापर्यंत जायचे होते . पहाटेपासून चालून थोडी भूक लागली होती . कोळीवाड्यातील सोबतच्या वाटाडयांच्या घरीच नाष्टयाची सोय केली होती . बाहेर ठेवलेल्या बादलीतील पाणी घेऊन सर्वांनी हात धुतला . घराबाहेरच्या सोप्यात खुर्च्या ठेवल्या होत्या . अवघ्या मिनिटाभरात खमंग पोह्यांची प्लेट प्रत्येकाच्या हातात होती . लिंबू पिळून त्यावर शेव चिवडा टाकून यथेच्छ ताव मारला . पाठोपाठ दुपारच्या जेवणासाठी बनवलेल्या चपाती आणि भाजीची टेस्ट जाधव साहेबांनी आणि मी घेतली . कोळीवाडा तसा वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील शेवटचे टोक , शहरापासून कायम दूर राहिलेले . त्यामुळे अनेक सुविधांपाससून दूरच ! तेवढ्यात एक टेम्पोचा आवाज आला . टेम्पो आला ... टेम्पो आला . भंगार घेणार , लोखंडी तुकडे , . तुटलेली सायकल घेणार ... भांडी घेणार .... पत्रा घेणार . लवकर या .. लवकर या . खरं तर हे ऐकून आमच्या गावच्या जुन्या काळाची आठवण झाली . पोटभर नाष्ट्यानंतर एक कप गरम चहा शरीराला तजेलदार पणा देऊन गेला . आता सगळेच पुढच्या प्रवासाला सज्ज झाले होते .

जांभळी धरणाच्या वरच्या बाजूला कमंडलू नदी पार करुन कोळेश्वर पठावरावर जायचे होते . डोंगर खड्या चढणीचा होता . त्यात दाट जंगलाची वाट . डोंगराची भव्यता बघून धडकी भरावी अशी त्याची ठेवण . कोळीवाड्याच्या पश्चिमेकडून एका ठिकाणाहून नदी पार करण्यासाठी पोहचलो . नदीला खळाळते पाणी पण गुडघा मांडयाभरच . पण त्याखालची दगडधोंडे गुळगुळीत आणि शेवाळलेली होती . त्यामुळे पाऊल टाकलं की पाय घसरायचा . साहेब म्हणाले साखळी करून नदी पार करू पण प्रत्येकाने स्वतंत्रपणे तोल सांभाळून जाऊ असं अभिजीत सरांनी स्पष्ट केलं . एकएकट्याने नदी पार केली . आणि दाट जंगलात प्रवेश केला . एव्हाना पावसाची रिमझिम सुरू झाली होती . जंगलातील झाडांची गर्दी एवढी की आमचा पुढचा सवंगडी मागच्याला दिसत नव्हता . त्यामुळे कोणी रस्ता चुकू नये याची काळजी घेत होतो . वरचेवर एकमेकांना आवाज देऊन कानोसा घेत होतो .

आठ दिवस अगोदर पाऊस नव्हता त्यामुळे जंगलातील प्रवास चांगला होईल अशी आशा होती . पण रात्री पाऊस झालेला आणि आत्ताही पडत होता . त्यामुळे जंगलवाटेतील जळू ( कांटे ) जीवंत झाले होते . भररस्त्यात त्यांची वळवळ सुरु होती .त्यांना चुकवून पुढे जावे लागत होते . पण जळवे सुध्दा चिवटच त्यांनी आमचा पिच्छा सोडला नाही . कुठून तरी पायावर चढायचाच . त्यांना काठीने ढकलून ते पडायचे नाहीत . हाताने ओढून फेकून दयावे लागत होते . काळजी घेऊनही जाधव साहेबांना आणि गोरे सरांना दोन जळवांनी गाठलेच . पायाला कधी चिकटले कळले नाही . रक्त वाहू लागले तेव्हा कुठं लक्षात आले . चिकटलेले जळू रक्त पिऊन चांगले टम्म फुगले होते . ते ओढून काढले .
एक तर जंगलातील उराटीची वाट . त्यात पाऊस पडल्याने निसरडी झालेली . एक पाय उचलला तर दूसरा घसरायचा . काठीचा आधार घेऊन कसं बसं पाऊल पुढे टाकावं लागत होतं . त्यात जळवांचं नवं संकट समोर उभं ठाकलं होतं . पाय टाकण्यासाठी पुढं रस्ता बघावा की पायाला जळू लागतोय हे पहावं हे काहीच सुचत नव्हतं . 'जळवा का जलवा ' नं चांगलचं थैमान घातलं होतं . तेवढयात मागून आवाज आला . लागला.. लागला .. लागला .. आरं मला बी जळवा लागला . पाठीमागून गौरव मोठयाने ओरडत होता . गडी जागेवरच उभा राहिला . लागलेला एक जळू काढेपर्यत दुसऱ्याने दुसऱ्या पायावर हल्ला केलेला . त्यामुळं गडी पुरता घायाळ झालेला . आम्ही पण त्यांचं आक्रमण परतवून लावत होतो .

पुढे काही अंतर गेल्यावर एका ठिकाणी रस्त्यातच मांडूळ साप निवांत पहुडलेला . त्याला धक्का न लावता आम्ही पुढे झालो . जळवापासून वाचण्यासाठी एक नामी युक्ती डोक्यात आली . मी म्हटलं , साहेब पँटचा खालचा भाग पायमोज्यात घाला म्हणजे पायावर जळू चढलाच तर तो कापडावरच राहिल . आमची शक्कल कामी आली होती . साहेबांनी गौरवलाही पायमोज्याची जोडी दिली . त्यानेही आमचं अनुकरण केलं . पण जळवा पायावर चढायच्या थांबत नव्हत्या . खडी चढण असल्याने दम लागत होता . घामाच्या धारा निथळतं होत्या . पण थांबायची धडगत नव्हती . कारण थांबलं की आणखी जळवा चिकटायच्या .दुपारच्या जेवणासाठी घेतलेलं थोडं मीठ बुटावर टाकलं . पण त्याचा फारसा काही फरक पडला नाही . जळवांनी सर्वांची चांगलीच दमछाक केली होती . जंगलातील एवढा मनमोहक निसर्ग पण त्याकडे कोणाचेच लक्ष नव्हते . साधारण तासाभरात दोन मोठे टप्पे चढून आलो तेव्हा एका वळणावर दगडांचा भाग लागला . त्यावर थांबून सर्वांनी पायावरच्या जळवा काढल्या. दगडाच्या बाजूला असणाऱ्या एका छोटया झाडाच्या आडुशाला फुरसे सापाचं एक पिल्लू आसरा घेऊन बसलं होतं . त्याचा फोटो घेऊन आम्ही पुढे झालो .

पठारावर पोहचण्यासाठी आणखी बरचं अंतर चढायचं होतं . जळवांना चकवा देत कसंबसं पुढचा टप्पा पार केला . आणि कड्याच्या खाली पोहचलो . पुढे शिवकालीन पायऱ्यांचा रस्ता होता . तेथे चित्रफित काढून सर्वजण वर चढले . वरती अथांग पठार पसरलेलं होतं . सर्वत्र हिरवंगार गवत अन् झाडी होती . त्यामुळे त्याचं सौदर्य आणखी खुललेलं दिसत होतं . गार वाऱ्याची झुळूक आल्याने आल्हाददायक वाटलं . कुठेही न थांबता दोन तासाची केलेली चढण अन् त्यामुळे आलेला थकवा कुठल्याकुठं गायब झाला . हर हर महादेवचा जयघोष करून कोळेश्वराच्या मंदीराकडे चालायला सुरुवात केली .

या पठारावर एकमेव घर आहे . पावसामुळे झावळयांनी ते लपेटलेले होते . आमची चाहुलं लागताच एक कुत्रा भुंकतच पुढे आला . गौरवने त्याला लडीवाळपणे कुरवाळले . मागच्या कमळगड ट्रेकच्या वेळी आमची ओळख झालेली . त्या घरातून दोन मुलं पुढे आली . मळकटलेली कपडे घातलेली . त्यांना जवळ बोलवले . गेल्यावेळी मी त्यांचा छान फोटो काढलेला . विशेष म्हणजे दैनिक लोकमतला तो छापून आलेला . त्यांना तो दाखवला . पोरं जाम खूश झाली . त्यांच्या हातात बिस्कीटचा पुडा देऊन आम्ही पुढे निघालो . पुन्हा जंगलाची वाट सुरु झाली . अर्ध्या तासात श्रीक्षेत्र कोळेश्वर मंदीरा जवळ पोहचलो . जंगलाच्या मध्यावर दगडांचा एक चौथरा आहे . ना भिंती ना छत , त्याच्या मध्ये एक स्वयंभू शिवलिंग आहे . हेच ते कोळेश्वराचे पवित्र ठिकाण . बाहेरच्या बाजूला एक नंदी आहे . पण तो जीर्ण झालेला आहे . श्रावण महिन्यात क्षेत्र महाबळेश्वराहून पाच नद्यांच्या उगमाचे पाणी पायी चालत आणून येथे जलाभिषेक केला जातो . या ठिकाणाचे विशेष महात्म्य आहे . सर्वानी मनोभावे नमस्कार केला . आणि पुढे चालते झालो . [जावळीचे खोरे - जोर व जांभळी सुभ्याचा इतिहास , जावळी प्रांताच्या तर्फाची यादी आणि शिवकालीन मार्ग , रायरेश्वर व कोळेश्वरचे महत्व याची माहिती स्वतंत्रपणे दिली जाईल ]
यापुढेही दाट जंगलच होते .आम्हाला कोळेश्वर पठार पार करुन जोर गावच्या बाजूला उतरायचे होते . बरच अंतर चालून गेल्यावर वाटाडयाने उजव्या बाजूला थोडया चढणीच्या रस्त्याने नेले . पुढे पुढे तर झाडातून रस्ता शोधावा लागत होता . त्यात जळवांचं संकट अद्याप संपलेलं नव्हतं . पावसाळ्यात हा ट्रेक करण्यासारखा नाही असं मत गोरे सरांनी व्यक्त केलं . झाडाझुडपातून कसाबसा मार्ग काढत पुढे सरकत होतो . जंगलाच्या एका टप्प्यातून बाहेर पडलो की पुन्हा नव्या जंगलात प्रवेश व्हायचा . पण रस्ता संपत नव्हता . अर्धा तास असच चालत राहिल्यानंतर आपला रस्ता चुकला आहे हे लक्षात आलं . वाटाडया तर पुरते गोंधळून गेले होते . जंगलात एकदा रस्ता भरकटलो तर कुठे जाईल याचा काही नेम नसतो . इकडे तिकडे अंदाज घेऊन रस्ता शोधत होतो . पण काही केल्या सापडत नव्हता . आता मात्र आम्ही चांगलेच हबकलो . नियोजीत वेळेत जोर गावात पोहचू शकलो नाही तर क्षेत्र महाबळेश्वर पर्यंत पोहचणे अवघड होते . शेवटी आल्या पावली परत मागचा रस्ता पकडला . रस्ता चुकल्याने एक तास जाणार होता . पुन्हा अर्धा तास खाली उतरून आलो . आणि कमळगडाच्या रस्त्याने पुढे गेलो . जळवांचा जलवा सुरुच होता . माझ्या पायावरून त्रेपन्न जळू मी काढून टाकले होते . मात्र त्वचेला एकही चिकटू दिला नाही . चालता चालता जंगल संपलं आणि पुढे एखादया बागेत छोटी पण डेरेदार झुडपं लावल्यासारखे पूर्ण मैदान भरून आले होते . एक समूह फोटो घेतला . आणि पुढची चाल धरली .

चालत चालत बरेच पुढे आलो . आणि आपण जोरच्या रस्त्याला न जाता कमळगडाकडे जातोय हे लक्षात आलं . वाटाडयाला पण काहीच सांगता येईना . दोन वाजता जोर गावात पोहचायचे ठरले होते . पण इथेच तीन वाजून गेले होते . शेवटी दुपारची न्यारी इथेच करायची ठरवली . तोपर्यंत वाटाडे रस्ता शोधायला दक्षिण दिशेने जंगलात शिरले . पावसाची थुईथुई सुरूच होती . उभं राहून हातावरच चपाती अन् बटाट्याची भाजी घेतली . जेवण चविष्ट होतं . दोन चपात्या खाल्ल्या आणि वाट सापडल्याचा आवाज वाटाडयांनी दिला .आम्हाला हायसं वाटलं . त्यांच्या पाठोपाठ आम्हीही जंगलात वाट धरली . थोडया अंतराने कड्यावर आलो . तिथून जोर गाव खोल दूरवर नजरेस पडत होतं . साहेबांनी गावाचे ठिकाण दाखवलं . तिथून पुढे आणखी मोठा डोंगर होता . तो चढून क्षेत्र महाबळेश्वरला पोहचणार होतो . पण अजुन तरी इथेच अडकलो होतो .

जोरच्या बाजूने डोंगर उताराने चालायला सुरुवात केली . वाट तशी अवघड होती . सर्वजण सांभाळून चालत होतो . इकडे जळवांचा फारसा त्रास नव्हता त्यामुळे काळजी नव्हती . पण तसाही दीड दोन तास लागणार होते . आडवळणाच्या रस्त्याने अर्धा डोंगर उतरलो . खालून दोन चार लोक वर निघाले होते . जवळ आल्यावर त्यांना विचारलं खाली पोहचायला आणखी किती वेळ लागेल . ते सपकाळ काका होते . कमळगड ट्रेकच्या वेळी त्यांनी दुपारचे जेवण पोहचवले होते . ते मांडगणीला घरी निघाले होते . त्यांनी पाऊण तासाचा अंदाज सांगितला . मग विसावा न घेता एकसारखी पाऊले टाकीत कुठं दाट झाडातून तर कुठं गवतातून मार्ग काढीत खाली उतरत आलो . आता चालून चालून फारच कंटाळा आला होता , मात्र मन थकलं नव्हतं . शेवटी डोंगराच्या तळाला जोर गावात पोहचलो . जोरचा डोंगर उतरताना चांगलाच जोर लावावा लागला होता . तिथून पुढे कातकरी वस्तीपर्यंत रस्त्याने चालत गेलो .
साडेपाच वाजून गेले होते . पावसाची रिमझिम वाढली होती . क्षेत्र महाबळेश्वरचा डोंगर चढायचा तर आणखी दोन अडीच तास लागणार होते. अभिजीत सर कंटाळले नव्हते पण काळजी घेणे गरजेचे होते . त्यांच्या पायाच्या शस्त्रक्रियेनंतर ते पहिल्यांदाच एवढं अंतर चालले होते . त्यामुळे ते पुढे चालतील की नाही ही शंका होती . पण आम्ही पुढे चालत राहिलो . साहेब हळूच मला म्हणाले, सर कसं करायचं, जायचं की नाही . मी म्हणालो , सेनापती तुम्ही आहात , तुम्ही म्हणाल तसं . तसं साहेब म्हणाले , पुढच्या वळणावर जननी माता मंदीर आहे. तीथं थांबून निर्णय घेऊ . मध्यम स्वरूपाच्या या मंदिरात अनेक मुर्त्या होत्या . आम्ही दर्शन घेतलं . पायरीवर बसताच साहेब म्हणाले , पुढं जायचं आणि जंगलात अंधार पडला तर बॅटरी सोबत हवी . माझ्याकडे दोन होत्या . साहेबांकडे एक होती . तेवढयावर काम चालणार होते . सर्वानी जाण्याचा निर्धार केला . त्यामुळे गोरे सरांनीही सहमती दर्शवली . पुन्हा पुढची मोहिम सुरू झाली . बलकवडी धरणाच्या जलाशयाच्या मागील कृष्णा नदीवरील एक पूल ओलांडून पुढे डोंगर चढणीला लागायचे होते . नदीच्या पाण्यात काही स्थानिक लोक मासे पकडण्यासाठी जाळे टाकत होते . आम्ही रस्त्याची चौकशी करून पुढे गेलो . एका मुलाने सांगितले इथल्या वाटेने ओढयाला पाणी आले आहे त्यामुळे वाट बंद पडली आहे . पुढच्या धनगरवस्तीच्या वाटेने जाता येईल . साधारण एक किलोमीटर डोंगराच्या बाजूने चालत वस्तीकडे निघालो . आता पावसाने चांगलाच जोर धरला होता . सर्वजण ओलेचिंब भिजले होते . साहेबांना पुन्हा प्रश्न पडला आता काय करायचं . मी म्हटलं वस्तीवरच्या शाळेत आसरा घेऊन निर्णय घेऊ . रस्त्यातच एक महिला रानातून येताना दिसली . त्यांच्याकडे रस्त्याची विचारपूस केली . पावसाने वाटा निसरडया झाल्या आहेत . जाण्यास खूप वेळ जाईल असं सांगीतलं . पण रस्त्यात जळू आहेत का ? हळुच गौरवने चौकशी केली . त्या असणारच की , असं सांगताच त्याच्या अंगावर काटा उभा राहिला . आम्ही सगळे शाळेच्या व्हरांडयात थांबलो . एक दहावीच्या वर्गातील मुलगी तीथे अभ्यास करत होती . आम्हाला बघून ती दप्तर उचलून घरी गेली . पावसाची एकूण परिस्थिती व झालेला उशीर यामुळे शेवटी ही मोहिम इथेच थांबवायचा निर्णय झाला . क्षेत्र महाबळेश्वर गाठायचं स्वप्न अधुरं राहिलं . सगळे जण माघारी फिरलो . पुन्हा जोरला पोहचलो . एव्हाना अंधार पडला होता . एका घरात चहा घेतला . दिवसभराचा शिणवटा गेला . स्वप्नील धवन साहेब गाडी घेऊन आले होते . आम्ही गाडीत बसलो पण पुन्हा अपुरं स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प करूनच ! एक अफलातून साहसी ट्रेक पूर्ण केल्याचं समाधान मात्र प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होतं .
........................................
- दशरथ ननावरे ( श्रीमंत )
इतिहास अभ्यासक