॥ रानवाटा ॥ सफर जंगलातील आडवाटेची
दशरथ ननावरे ( श्रीमंत ) , इतिहास अभ्यासक
कडजाई- हरेश्वर ते पालपेश्वर
सहयाद्रीच्या रांगेला पूर्व पश्चिम पसरलेली हरेश्वराची ( महादेवाची ) डोंगररांग आहे . याच डोंगररांगेत हरळी गावाच्या पश्चिमेला कडजाई मातेचे मंदिर डोंगरकपारीत आहे . कडजाई पासून उंच डोंगरावर हरेश्वराचे मंदिर आणि तीथून डोंगराच्या पश्चिम दिशेने आडवळणाच्या आणि दगडधोंड्यातून , झाडाझुडपातून मार्ग काढत पायवाटेने बालेघर व पुढे पालपेश्वर पर्यंत सुमारे २५ किलोमीटरचा नयनरम्य निसर्ग पहात अफलातून हा ट्रेक करता येतो .
वास्तविक हा ट्रेक शिवसह्याद्री पायदळ ... एक वादळ या समूहाने पहिल्यांदाच केला . यापूर्वी अशी वाट कोणी शोधून काढल्याचे ऐकीवात नाही . हा ट्रेक करण्याचे आमचे मार्गदर्शक श्रीपाद जाधव साहेबांनी निश्चित केल्यावर पहाटे पाच वाजताच खंडाळयातील शिवसहयाद्री पायदळाचे मावळे तयार झाले . वाईवरून साहेबांचे सहकारीही आले . सकाळी सूर्यदर्शनापूर्वीच साधारण सहा वाजता हरळी गावच्या हद्दीत आम्ही पोहचलो . एकदा हरहर महादेवची गर्जना आसमंतात घुमली आणि मोठया उत्साहाने वीस जणांची टीम डोंगर चढू लागली . पहिल्या दमातच न थांबता टेकडीवरील कडजाई मातेच्या मंदिरापर्यत मजल मारली . विसावा न घेता पुढे चालत राहिलो . कडजाई मातेच्या वरच्या मंदिरापर्यंत पटकन पोहचण्याची आस होती . थोडं थांबत , थोडं फोटो शुट करीत पण उत्साहाने सर्वजण पुढे चालत होते . अवघ्या अर्ध्या तासात कडजाई मातेच्या मंदिरात पोहचलो . सर्वानी दर्शन घेतले . साहेबांनी भला मोठा संस्कृत श्लोक म्हटला . आम्ही आपलं डोळे मिटून देवीपुढे ध्यान धारणा केली . देवीची काळया पाषाणातील मूर्ती , शेजारी असलेलं पाण्याचं टाकं आणि मंदिराचा भोवतालचा प्रदेश न्याहाळत दहा मिनिटं सर्वांनी आरामात वेळ घालवला .
ट्रेकच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली . आणि इथेच पहिला कस लागतो . मंदिराच्या बाहेरच्या बाजूला असलेला काताळ कडा चढून वर जायचे होते . एका मागे एक ओळीने सर्वजण कातळाला भिडले . हरहर महादेवचा जयघोष गगनाला भिडला . कपारीत हात घालून तोल सांभाळत सर्वांनी हा कडा पार केला . आणि हरेश्वराच्या दिशेने आगेकूच केले . खरं तर वाट चढणीची होती . त्यातच पाऊस झाल्याने रस्ते निसरटे झाले होते . एक पाय उचलला की दुसरा पाय घसरायचा . अशा वेळेला आधार मिळायचा तो गवताचा अथवा एखादया झाडाच्या फांदीचा . महतप्रयासाने सरासरी दोन तासाच्या चढणीनंतर डोंगर माथ्यावर पोहचलो . वरच्या सपाटीने दाट धुक्यात हरेश्वराच्या मंदिरात पोहचलो . तसं हरेश्वर मंदिरात अनेकदा आलो होतो . त्यामुळे बाहेरूनच सर्वानी दर्शन घेतले . पुन्हा हर हर महादेवचा जयघोष केला . तीथून धारेश्वर मंदिरापर्यंत पायवाटेने आलो . सकाळच्या नाष्टयाची वेळ झाली होती . सर्वांनी वर्तुळाकार रांगेत बैठक मारली . वाईवरून येताना साहेबांनी सर्वांसाठी पोहे बनवून आणले होते . कागदी प्लेटमध्ये थोडे थोडे घेतले . जोडीला शेंगदाणे लाडू अन् चिवडा होताच . चार फेऱ्या झाल्या तरीही पोहे उरलेच होते . अगदी पोट भरेपर्यंत यथेच्छ ताव मारला . आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली .
डोंगराचा एक टप्पा उतरून पश्चिमेच्या दिशेने सर्वजण चालू लागले . इथून पुढची वाट डोंगरातून शोध काढत जाणारी होती . मोठमोठ्या दगडाच्या आडून आणि झाडातून पुढे जात होतो . एका उताराला साहेबांच्या पायाखालचा दगड निसटला त्यामुळे पाय थोडा दुखावला . पण मोठ्या धैर्याने त्यांनी चाल पुढे ठेवली .
खंबाटकीचा घाटमाथा ओलांडून पुढच्या डोंगराच्या चढणीला लागलो . डोंगराच्या उंच भागातून कड्याकडयाने वाट काढत होतो . ढगेवाडीच्या पुढे बुवासाहेब मंदिरापर्यंत पोहचायचे होते . या ठिकाणी अतिशय दाट झाडी होती तरीही मार्ग काढत पुढे जात होतो . वरच्या टप्प्यावर पोहचल्यावर डोंगरात एक गुराखी भेटला . त्याने सांगितले पुढच्या टेकडीच्या उजव्या अंगाने पंचवीस तीस बैलांचा कळप आहे . ते मारके आहेत . तुम्ही डाव्या अंगाने जावा . त्यामुळे आम्ही टेकडी पर्यंत गेलो . बाटल्यांमधील पाणी संपल्याने शेजारच्या विहिरीवर चार जणांना पाणी भरण्यासाठी पाठवले . आणि नंतर टेकडीच्या डाव्या बाजूने पुढे जाऊ लागलो . काही अंतरावर गेल्यावर नेमका बैलांचा कळप चरत चरत इकडेच आला होता . आता मोठी पंचायत झाली . समोर जावे तर बैल हमखास हल्ला करणार याची भीती होती . सर्वानी थोडं खाली उतरून झाडाआडुन जायचे ठरवले . जेणेकरून बैलांच्या नजरेस पडणार नाही . काही अंतर गेल्यावर पुन्हा चढ चढून वर निघालो . आता बैलांचा कळप मागे राहिला होता . सर्वांनी निश्वास सोडला . जवळच बुवासाहेबाचे छोटेखानी मंदिर एका वडाच्या झाडाखाली होते . सर्वानी दर्शन घेतले . झाडाच्या बुंध्यात एक मोठी तलवार ठेवली होती . ती देवाची असल्याचे सांगतात . तलवार उचलून हातात घेतली तर ती मराठा बांधणीची मूठ असलेली होती . एका सरळ रेषेत धारदार पाते निमुळते होते गेले होते . तलवार मस्तकी लावून ती जागेवर ठेवली आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली .
इथून पुढच्या डोंगरात वाट जरा मळलेली होती . पण चिखलाने माखलेली आणि दोन्ही बाजूंनी दाट झाडीने वेढलेली होती . उजव्या बाजूला खंडाळा तालुक्यातील अनेक गावे दिसत होती . वरुनच आम्ही कोणते गाव कुठे आहे याचा अंदाज बांधत होतो . वाटेत आवळयाची अनेक झाडे होती . त्याला लगडलेली आवळे पाहून खाण्याचा मोह आवरता आला नाही . काही आवळे काढून खिशात घातले .एक तोंडातही टाकला . ट्रेकमध्ये आवळा खाल्ला तर सारखे पाणी पिण्याची गरज भासत नाही . डोंगरात अनेक प्रकारच्या रानभाज्या पहायला मिळतात . काहींनी भारंग्याची ( ब्राम्ही रंग ) फुले तोडून घेतली . भारंग्याची फुले आणि पानांची अतिशय चवदार भाजी करता येते . आणि ती पौष्टिकही असते . बरेच अंतर चालत पुढे गेल्यावर बालेघर गावाची हद्द लागली . डोंगराच्या सपाटीवरच लोकांनी शेती तयार केली होती . त्यासाठी मोठ मोठे दगड काढून त्याच्या ताली रचल्या होत्या . त्या पाहून अवाक् झालो . शेतातील पिकांच्या राखणीसाठी जागोजागी मचान उभारण्यात आल्याचे दिसले . या रानातून तांबड्या मातीत वाटाणा , पावटा , घेवडा , जवस अशा विविध प्रकारची पिके केली होती . बाले घरचा टॉवर नजरेस पडला पण अजून बराच दूर होता . दुपारचे जेवणाची सोय तेथेच केली असल्याने कधी पोहचतो असे झाले होते . पण जीव व्याकूळ झाला होता . काहींच्या पायात त्राण उरला नव्हता . पण पुढे चालणे क्रमप्राप्त होते . शेजारच्या एका रानात साधारण सहा वर्ष वयाची दोन लहान मुले लोखंडी छोटी गाडी ओढत होते . कुणब्याच्या पोरांना काम करायला शिकवावं लागत नाही हेच खरं . त्यातच शाळा बंद असल्याने सगळा वेळ त्यांचा रानातच जात असावा . मनोमन छोटया लेकरांचं कौतुक करीत आम्ही गावच्या चढणीला लागलो . गावातील रस्त्याने पुढे जात असतानाच समोरुन एक जीप आली . याचा अर्थ गावात कुठून तरी डांबरी रस्ता येत होता . या जीपला सर्व बाजूंनी दूधाच्या किटल्या अडकवलेल्या होत्या त्यामुळे ती लक्ष वेधून घेत होती . बहुधा गावातील सर्वदूध डेअरी पर्यंत पोहचवण्याचे काम तीच करत असावी . शेवटी डाव्या हाताला वळण घेऊन आम्ही जेवणाच्या ठिकाणी पोहोचलो .
सकाळपासूनच्या चालण्याने पोटात कावळे ओरडू लागले होते . पटापट सर्वानी हात धुतले . एका छोटेखानी घरात घरगुती स्वयंपाक बनवला होता . भाकरी , काळ्या घेवडयाची आमटी , बटाटयाची सुक्की भाजी , भात , लोणचं , पापड अशा पंचपक्वांनावर सर्वांनी यथेच्छ ताव मारला . खरं तर चालण्याने कंटाळा आलाच होता . शिवाय पोटभर जेवण झाले होते . आराम करा म्हणून सांगीतलं असतं तर सर्वजण लगेच झोपी गेले असते .
पण पुढचा पल्ला गाठायचा होता . सर्वानी पुन्हा तयारी केली . बाहेर जोरदार पावसाने सुरुवात केली होती . पण थांबण्यात काहीच अर्थ नव्हता . ओल्याचिंब शरीराने पुढे चालू लागलो . पुन्हा तसाच डोंगर , आडवाटा आणि झाडी . इथला रस्ता म्हणजे जरा अजबच होता . खडतरपणे मार्ग काढत जाणे भाग होते . साधारणपणे सहा किलोमीटरचे अंतर कापून आम्ही पालपेश्वर लेणीत ( ग्रामीण भागात पाल्कोबा असेही म्हणतात ) पोहचलो .
वाई पश्चिम महाराष्ट्रातील एक इतिहासप्रसिद्ध गाव. कृष्णातीरावरचे एक टुमदार शहर. खूप पूर्वीपासून या गावाला महत्व आहे. परिसरात अनेक किल्ले, धरणे, आणि लेणी आहेत. त्यातीलच एक पालपेश्वर. लोहारे गावाजवळच्या डोंगरात या लेण्या खोदल्या आहेत. मूलतः ही लेणी बौद्ध-हीनयान पंथाच्या असून नंतरच्या काळात तेथील स्तूप हे शिवलिंग समजून पालपेश्वर हे नाव रूढ झाले.
या ठिकाणी ५ ते ६ वेगवेगळ्या लेण्या आहेत . याठिकाणी असलेली चैत्यगृहे त्यांची बांधणी आणि स्तूप यावरून ही लेणी बौद्ध हीनयान पंथी आहेत हे समजून येते . लेण्यांचा बांधणी-काळ इ .स. २ रे ते ३ रे शतक, देव देवतांच्या मूर्ती, नंदी हे नंतर च्या कालखंडात आले असावेत.
डाव्या हाताच्या पहिल्या लोण्यामध्ये उजवीकडच्या भिंतीमध्ये कोरलेल्या ४ मूर्ती, नक्की कोणाच्या मूर्ती आहेत ते सांगता येत नाही, परंतु लक्ष्मी सरस्वती विष्णू गरुड यांच्या त्या असाव्यात, लक्ष्मीच्या हातामध्ये बांगड्या कोरलेल्या कळतात . मूर्तींच्या शेजारीच थोड्या उंचीवर चौथरा, अन त्याच्या वर पोट माळा आहे.
पुढच्या दुसऱ्या लेण्यामध्ये आत आणि बाहेर असे मिळून दोन विहार आहेत, पावसाळ्यात दोन्ही विहारात पाणी भरते, आतील बाजूस सुबक घडणीचा नंदी आणि एक शिवपिंड आहे.
त्याला लागूनच असलेल्या तिसऱ्या लोण्यामध्ये हे सर्वात मोठे आणि प्रमुख लेणे आहे. यामध्ये डाव्या बाजूस खिडकी युक्त १ दालन, एका खिडकीजवळ पूर्णपणे भंगलेल्या ५ मूर्ती आहेत, त्यात गणपती आणि कुठल्याशा देवीची मूर्ती ओळखता येते, मुख्य दालनात गुडघाभर पाणी कायमच भरलेले असते, बाजूला बसायचे ओटे आहेत, समोरच्या विहारात प्रचंड आकाराचा स्तूप ( उंची सुमारे ५ फुट) या स्तूपाचे रुपांतर कालांतराने शिवलिंगामध्ये झाले असावे. याच स्तुपाला स्थानिक लोक पालपेश्वर किंवा दागोबा ( पाल्कोबा ) असं समजतात, त्याच्या समोर पाण्यात एक नंदी, आणि एक मूर्ती , स्तुपाला टेकून ठेवलेला एक अंडाकृती दगड हा स्तुपाचाच एक भाग असावा.
चौथ्या लेण्यामध्ये अर्धवट खोदाई, उजवीकडे पाण्याचे टाके, डावीकडे एक विहार, आत मध्ये गाळ आणि माती भरल्याने अर्धवट बुजले आहे.
पाचवे लेणे पाण्याचे टाके, दगड माती भरल्याने बुजून गेलेलं आहे. त्यापुढे एक छोटीशी गुहा आहे .
डोंगर भागात असलेल्या या गुहा अथवा लेणी फारच प्रेक्षणीय आहेत.
लेण्या पाहून झाल्यावर त्याच ठिकाणी रिमझिम पावसात नेहमीप्रमाणे पहिल्यांदा ट्रेकमध्ये सामील झालेल्या मावळयांचे अनुभव कथन झाले . असूनही थोडी टेकडी उतरून पांदीच्या रस्त्याने गावापर्यत जायचे होते . पण ट्रेक पूर्ण झाल्याचे समाधान प्रत्येकाच्या चेहर्यावर होते . शेवटी जाधव साहेबांनी सर्वांचे आभार मानले.
पावसाळ्यात हा ट्रेक अतिशय सुंदर आहे . प्रत्येक ट्रेकर्सने एकदा तरी हा अनुभव घ्यावा .
- दशरथ ननावरे ( श्रीमंत )
इतिहास अभ्यासक
.......................................................
(संदर्भ : माझ्या भटकंतीच्या नोंदी , भटकंती अपरिचित साताऱ्याची).
आदरणीय श्री.ननावरे सर आपण आपल्या भटकंतीचे वर्णन अतिशय सुंदर पद्धतीने शब्दबदध केले आहे. अतिशय ओघवत्या शैलीमध्ये केलेले हे भटकंतीचे वर्णन माणसाची जिज्ञासा वाढवणारे आहे. हे वर्णन वाचून असा अनुभव " याची देही याची डोळा " घेण्याचा मोह अनेकांना झाल्याशिवाय राहाणार नाही.आपणास भटकंतीच्या पुढील मोहिमेसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !
ReplyDelete-श्री.किरवे सर (कण्हेरी)
खूप छान वर्णन आणि नवीन माहिती मिळाली. कोरोना संपला की नक्की लेणी बघणार. ननावरे सर' भटकंती' लेख खूप वाचनीय असतात.
ReplyDeleteसुंदर लेख आहे सर्वांनी आवर्जून भेट द्यावी.
ReplyDeleteट्रेक च्या शेवटी तुम्ही कोरोना संदर्भात दिलेली माहिती सुद्धा अत्यंत उपयोगी आणि महत्वाची होती बाकी ट्रेक बद्दल तर तुम्ही मस्तच सांगितलंय 🔥♥️😍🙏
ReplyDelete- निखिल काशिद
अविस्मरणीय असा हा ट्रेक रोमांचकारी तसेच ऊन पावसाचा खेळ अनुभवलेला जाधव साहेबांचे अतिशय सुरेख नियोजन आणि सरतेशेवटी ननावरे सरांचे कोरोना विषयावर विस्तृत माहिती व हा छान लेख
ReplyDeleteखुप छान माहिती दिली सर तुम्ही
ReplyDeleteNice Treak
ReplyDeleteNice Information
ReplyDeleteMast Ekada visit dyach Hareshvar Temple la..
ReplyDelete