Pages

Tuesday, 29 September 2020

॥ रानवाटा ॥ जोर ते क्षेत्र कोळेश्वर


 

॥ रानवाटा ॥ सफर निर्भिड जंगलाची 

- दशरथ ननावरे ( श्रीमंत ) , इतिहास अभ्यासक 

जोर ते क्षेत्र कोळेश्वर


सह्याद्रीचा उपरांगा मधील डोंगरांच्या दऱ्याखोऱ्यातील आडवाटेने मार्गक्रमण करायचं म्हणजे एक मोठी पर्वणीच असते . सह्याद्रीच्या माथ्यावर असलेलं निसर्ग सौदर्यं, डोंगराच्या कुशीतील धार्मिक ठिकाणे आणि घनदाट जंगलातील प्रवास यातून मिळणारा अफलातून आनंद हा केवळ स्वर्गसुखच !  आमचे मार्गदर्शक आणि ट्रेकर्स समूहाचे सर्वेसर्वा श्रीपाद जाधव साहेबांनी साद घातली . गतवेळी  जोर ते क्षेत्र महाबळेश्वर ट्रेक पूर्ण करताना कोळेश्वर पठारावरून दाट जंगलात रस्ता  चुकला . त्यामुळे सुमारे दोन तास वाट शोधण्यात गेले . पण ती सापडली नाही . त्याच चुकलेल्या वाटेचा शोध घेण्याचे निश्चित केले होते. 

      ठरल्याप्रमाणे आम्ही तयारीनिशी पहाटे पाच वाजता खंडाळा सोडून वाईकडे प्रस्थान केले . पहाटे सहा वाजता वाई विश्रामगृहावरून श्रीपाद जाधव साहेब , निलेश बोडके , निखिल काशिद , पांडूरंग भिलारे आणि मी जीपमधून जोर गावाच्या दिशेने निघालो . पहाटेच्या थंड आणि मंद वाऱ्यात दीड तासाभराचा प्रवास करून जोर गावात पोहचलो . जाताना बलकवडी धरणाचा रम्य परिसर आणि त्याच्या भोवतीने नागमोडी रस्ता म्हणजे सुखद प्रवास .   गावात पोहचल्यावर सकाळी सकाळी नारायणरावांच्या घरी मस्त चहाचा फुरका मारला . आणखी तजेलदार झालो . तेथून मार्ग दाखवणारे विठ्ठलराव सोबत आले .  

        जोरच्या उत्तरेला असणाऱ्या भल्या मोठ्या डोंगराला भिडायचं होतं . उंच डोंगरावर पसरलेलं कोळेश्वराचं पठार पादाक्रांत करायचं होतं . गतवेळी याच जंगलात जळवांनी घायाळ केलं होतं . त्यामुळे साहेबांनी सर्वांसाठी गुडघ्या पर्यंत पोहचणारे पायमोजे आणले होते . सर्वांनी पँटच्या वरून ते घातले . हातात काठी घेतली . शिकारीला निघालेली फौज वाटावी असं दिसत होतं . पूर्वेच्या दिशेला वीस मीटर डांबरी रस्त्याने जाऊन डाव्या हाताला रानातून टेकडी चढायला सुरुवात केली . भाताच्या आणि नाचणीच्या शेतीच्या बांधावरून पुढे जात टेकडीचा हिरवागार गवताच्या पात्यातून मार्ग काढत जंगलात प्रवेश केला . आता दाट जंगल सुरु झाले होते . सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहचणार नाही एवढी दाट झाडी होती . त्यातून चढणीला सुरुवात झाली आणि रिमझिम पावसालाही . सकाळच्या प्रहरी पक्षांचा किलकिलाट ऐकू येत होता . हिरव्यागार झाडीतून जाताना मन प्रसन्न झाले . मजल दरमजल करीत डोंगराच्या कुशीतून पुढे सरकत होतो . पावसाचं प्रमाण या भागात जास्त असल्याने झाडांची खोडं आणि फांदयाही शेवाळलेल्या होत्या . पावसाची रिमझिम आणि मध्येच वाऱ्याची झुळूक यामुळे अंगावर शहारा येत होता . हळूहळू पुढे जात होतो मात्र जंगल काही संपत नव्हते . 



पाऊण एक तासाच्या चालीनंतर एका उंच टेकाडाला वळसा घालून वर निघालो . वाटाडयांनी एका ठिकाणी वाढलेली झाडी व गवत तोडून जागा साफ करून एक मोठा दगड उघडा केला . आम्ही  विचारलं हे काय ? तर त्यांनी सांगितले हा देव आहे . मी म्हटलं असेल रानातला एखादा देव . पण उत्सुकतेपोटी मी विचारलं तेव्हा ते म्हणाले हा ' भूताचा देव ' आहे . मी मनातल्या मनात विचार करू लागलो . देव आणि तोही भूताचा , असं कसं असू शकतं . त्याच तंद्रीत एका छोटया दगडावरुन पाय घसरला आणि मी भानावर आलो . तोवर भूताचा देव मागे पडला होता . तेथून एका उंच उघडया जागी पोहचलो . या ठिकाणाहून बलकवडी धरणाचे विहंगम दृष्य नजरेस पडत होतं . धरणाचे अथांग पसरलेलं पाणी , त्यावर धुक्यांची झालर पसरलेली होती .  येथेही थोडे फोटो काढण्यात वेळ गेला . सर्वत्र दाट धुकं पसरलं असल्याने दुरवरचा परिसर दिसत नव्हता . अजून डोंगरमाथ्यावर पोहचायला बरचं अंतर बाकी होतं . त्यात वाट निसरडी झाली होती . आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली . 

    


  रस्त्यात पुढे चांगलीच चढण होती .एका वळणावर पानं झडलेल्या एका झाडाच्या फांदीवर गवती रानफुलाचा गुच्छ उगवलेला होता . एखादया कुंडीत लावलेल्या रोपांसारखा . झाडावरची ही फुलांची कुंडी मोबाईलमध्ये कैद केली .  त्यातून पुढे दाट झाडीतून जाताच जळवांनी आपला करिष्मा दाखवायला सुरुवात केली . पण साहेबांनी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं . आम्ही पण त्याच इराद्याने चाललो होतो . अचानक माझे लक्ष पायाकडे गेले . उजव्या पायावर बारा आणि डाव्या पायावर आठ जळवांनी हल्ला चढवला होता . मी चकितच झालो . कार्वीच्या पानाने पटापट खेचून काढून टाकल्या . आणि पुढे चालते झालो . आता दाट झाडीतून बाहेर पडून एका विस्तीर्ण पठारावर आलो होतो . दाट धुक्यांनी परिसर झाकोळलेला होता . पठारावर पिवळ्या , निळ्या , जांभळ्या फुलांचे आच्छादन मनमोहक वाटतं होतं . आणि अशा ठिकाणी फोटो काढला नाही असं कधी होत नाही . पुन्हा मागे फिरुन डाव्या हाताने थोडं खाली उतरून परत दाट झाडीतून रस्ता शोधत पुढे गेलो . खळाळत्या पाण्याचा आवाज लक्ष वेधून घेत होता . तेवढयात समोर ओढा दिसला त्याच पाण्यातून पुढे जायचं होतं . दगडावर पाय ठेवून जावे तर ती शेवाळलेली असल्याने घसरत होती . त्यामुळे गुडघाभर पाण्यात पाय बुडवण्यापलिकडे पर्याय नव्हता . एवढा वेळ चिखलाने रबडलेले बुट आपोआप धुवून निघाले . आणि भिजल्या पायाने पुन्हा रस्ता तुडवायला सुरुवात केली . 



     कोळेश्वरचे पठार म्हणजे घनदाट झाडीचा परिसर . लोकांच्या वर्दळी पासून कोसो दूर असल्याने आजही इथले जंगल अबाधित आहे . कोसळलेले मोठमोठे वृक्ष तसेच आहेत . रस्त्यात एखादे झाड पडले असेल तर वळसा घालून पुन्हा तोच रस्ता पकडावा लागत होता . शेवटी अर्धा तासाच्या पायपीटीनंतर कमळगड - कोळेश्वर रस्त्याला पोहचलो . गेल्यावेळी इथूनच जोरला जाण्यासाठी वळायला हवे होते . मात्र अगोदरच गुरांच्या वाटेने गेल्याने रस्ता चुकलो . मग मात्र आसण दऱ्याच्या मार्गे गेलो होतो . खरं तर या बेटकवणीच्या वाटेने जाणं गरजेचं होतं . त्याचाच शोध पुरा झाल्याचे समाधान होते . 

         पुढे रुळलेल्या वाटेने कोळेश्वर जवळ केले . कोळश्वर एक ऐतिहासिक धार्मिक स्थळ . जंगलाच्या मध्यावर दगडांचा एक चौथरा आहे . ना भिंती ना छत , त्याच्या मध्ये एक स्वयंभू शिवलिंग आहे . हेच ते कोळेश्वराचे पवित्र ठिकाण . बाहेरच्या बाजूला एक नंदी आहे . पण तो जीर्ण झालेला आहे .  श्रावण महिन्यात क्षेत्र महाबळेश्वराहून पाच नद्यांच्या उगमाचे पाणी पायी चालत आणून येथे जलाभिषेक केला जातो . या ठिकाणाचे विशेष महात्म्य आहे . सर्वानी पायातले बुट , सॉक्स काढुन मंदिर परिसरात जावून मनोभावे नमस्कार केला . इथं नेहमीच प्रसन्न वाटतं . पुन्हा परत फिरण्यासाठी बुट घालायला सुरुवात केली . पण इथेही जळवांचा कहर होता . काही बुटात तर काहींनी पायमोज्यावर आक्रमण केले होते . दगडावर उभे राहून एकमेकांच्या आधाराने बुट घातले आणि परत माघारी फिरलो . काही अंतरावर उघडया मैदानावर दगडी बैठक शोधून नाष्टयासाठी थांबलो . साहेबांनी स्वतः बनवलेले भोपळ्याचे पराठे आणि आवळयाची चटणी आणली होती . सर्वानी मस्त ताव मारला . शेवटी भिलारे सरांनी आणलेले खजुराने तोंड गोड केले . आणि पाणी पिऊन पुढे चालतो झालो . आता तोच परतीचा मार्ग होता . रस्ता चुकण्याचा संभव नव्हता . पण जळव्यांच्या जलव्याची काळजी घेणं गरजेचं होतं . कारण जळवाचा कहर साहेबांच्या पोटापर्यंत कधी पोहचला हे कळलंच नव्हतं . रक्ताचा डाग टी शर्ट वरुन झळकू लागला तेव्हा कुठं लक्षात आलं होतं . 

         परतीच्या रस्त्याने पाऊलं झपाझप पडत होती . पठाराचं जंगल पार करून डोंगर उतरणीला सुरुवात केली होती . आता बेटकवणी दऱ्याच्या निसरडया वाटेने उतरताना काळजी घेणे आवश्यक होतं . आजूबाजूचा परिसर न्याहळत आणि रान झाडांची ओळख घेत खाली उतरत होतो . रानातील कुरडू , भारंगी , थाळा , मुरुड , कवला , बरका, शेंडवाल , डहाण , आंबू , भाळगा , रानमूग या रानभाज्यांची ओळख झाली . चिचुर्डी , पाचरकुडी या औषधी वनस्पती पाहता आल्या . 



      धुकं आणि पावसाची रिमझिम यांचा खेळ सुरूच होता . एका टेकाडावर थोडा वेळ थांबून पुन्हा वाट धरली . जेवढं चढलो तेवढं उतरण्याशिवाय पर्याय नव्हता . आता तेच जंगल पार करुन खाली उघड्या टेकडीवर आलो . गवतातून जाणारा रस्ता मोकळा होता पण चांगलाच घसरडा होता . सहजच पाय घसरत होता . एका जागेवर साहेबांना त्याचा अनुभव आलाच, कधी त्यांचा तोल जावून दणका बसला ते कळलं नाही .  पण त्यांच्या दणकट शरीराने तो सहन केला . पुढे एका ओघळावर पाय स्वच्छ करून आम्ही जोर गावात पोहचलो . नारायणरावांच्या घरी जेवणाचा मस्त बेत केला होता . चपाती , डाळीची आमटी , बटाटयाची भाजी , भात आणि पापड अशा रुचकर जेवणाने मनसोक्त पोटपूजा झाली . त्यावर त्यांच्या घरचा गवती कोरा चहा म्हणजे अप्रतिमच .. तो घेऊन त्यांचा निरोप घेऊन आम्ही गाडीत बसून वाईच्या दिशेने गेलो . अर्थातच निखिलने यावेळीही शुटींग आणि फोटोचे काम चोख बजावले होते . त्याचा व्हीडीओ बघणे म्हणजे वेगळा आनंद असतो . 

       जोर ते क्षेत्र कोळेश्वर हा अवघड मार्ग पार केल्याचे समाधान प्रत्येकाच्या चेहर्‍यावर होते . पण निसर्गाने भारलेला मार्ग ट्रेकर्सना निश्चित आनंद देणारा तर आहेच पण निसर्गाची अदभुत किमया पाहणे म्हणजे एक वेगळी पर्वणी आहे , ती अनुभवने म्हणजे मोठे भाग्यच  . 


- दशरथ ननावरे ( श्रीमंत )

  इतिहास अभ्यासक 

7 comments:

  1. खूपच सुंदर सर



    ReplyDelete
  2. खूप छान आहे साहेब

    ReplyDelete
  3. छान, सोप्या, ओघवत्या भाषेत केलेलं प्रवास वर्णन.माझ्या सारख्या निसर्ग प्रेमी वाचकाला प्रत्यक्ष प्रवासाचा अनुभव मिळतोय.

    ReplyDelete