॥ विचारवेध ॥
दशरथ ननावरे ( श्रीमंत ) , इतिहास अभ्यासक
चेतनाभूमी नायगाव ... क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मभूमी ...
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव म्हणजे महाराष्ट्रासह देशभरातील जनतेची चेतनाभूमी . खंडाळा तालुक्यातील नायगाव हे तसं खेडेगाव पण सावित्रीबाईंच्या जन्माने पुनित झालेलं हे ठिकाण आजही महाराष्ट्राला नव्हे तर जगाला प्रेरणादायी ठरत आहे . तसचं ते पर्यटनस्थळ म्हणूनही विकसीत होत आहे .
महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया घातला याच बरोबर स्त्री पुरुष समता आणि जातीयता निर्मूलन इत्यादी क्षेत्रातील मोलाचे कार्य केले. या कार्याचे महत्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांचे नायगाव येथील जन्मघर ” राज्य संरक्षित स्मारक ” म्हणून घोषित केले आहे. जन्मघराच्या जतनापूर्वी हि जागा दुर्लक्षित होती. नंतर महाराष्ट्र शासनाने या वास्तूच्या तत्कालीन स्वरूपानुसार तिची पुनर्निर्माण केला.
ज्या काळात स्त्रीला समाजात मनाचे स्थान मिळत नव्हते ; शिक्षणापासून आणि स्वातंत्र्यापासून दूर ठेवून स्त्रीला परावलंबी आणि पारतंत्र्यात ठेवले जात होते त्या काळात सावित्रीबाईचा जन्म झाला . पुढे मात्र सावित्रीबाईना, ज्योतिबा फुले यांचा उदार दृष्टी कोण असल्याने , स्वतःचे व्यक्तिमत्व घडविण्याची संधी प्राप्त झाली.
महाराष्ट्रातील महान समाज सुधारक व दलितांचे उद्धारकर्ते महात्मा जोतीराव फुले यांच्या संघर्षमय समाजसुधारणाच्या कार्यात त्यांना खांद्याला खांदा लावून स्त्री – शिक्षण व दलित उद्धारक कार्य करणाऱ्या त्यांच्या सौभाग्यवती सावित्रीबाई फुले या सातारा जिल्हयातील शिरवळपासून जवळच असलेल्या नायगावच्या खंडोजी नेवसे पाटील याच्या घरी ३ जानेवारी १८३१ रोजी सावित्री हि कन्या जन्मली . त्याची हि एकुलती एक लाडकी मुलगी होती. त्या काळात बालविवाहाची प्रथा होती. त्यामुळे सावित्री सात वर्षाची होताच तिच्यासाठी नवरामुलगा शोधण्यासाठी मोहीम सुरु झाली. शिवाय सावित्री हाडापेराने मजबूत आणि थोराड असल्याने सावित्रीबाईच्या आई – वडीलांनी मोहीम जरात सुरु केली. नेवसे पाटील आणि धनकवडीचे पाटील यांचा घरोबा होता. त्यातून जोतीराव बारा वर्षाचे आणि सावित्रीबाई नऊ वर्षाच्या होत्या .
सावित्रीबाई आणि जोतीराव यांना अपत्य नव्हते . त्यांनी यशवंत नावाचा मुलगा आणि त्याच्या विधवा आईला आपल्या घरी साभाळले. पुढे सावित्रीबाईनी जोतीरावांशी विचारविनिमय करून यशवंतलाच दत्तकच घेतले . यशवंतच्या खऱ्या आईला सावित्रीबाईंनी अत्यंत प्रेमाने वागविले हि त्यांच्या मनाच्या मोठेपणाची साक्ष . सावित्रीबाईंना बालपणी घरच्याकडून शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळणे त्या काळात शक्यच नव्हते. सावित्रीबाईना मात्र बालवयापासून शिकावे असे मनातून वाटत होते.
जोतीरावांबरोबर सावित्रीबाईंना विवाह झाल्यावर त्यांना त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करण्याची संधी चालून आली जोतीरावांच्याच मनाने स्त्रियांनी शिकावे असा विचार केलेला असल्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीपासूनच स्त्रीशिक्षणाला आरंभ केला होता. जोतीरावांच्या वडीलांनी आपल्या मुलाच्या शिक्षणाबाबद्च विरोध प्रकट केला होता. तिथे सुनेच्या शिक्षणाला ते नकार देतील यात काय आश्चर्य . पण जोतीरावांच्या मुलींसाठी शाळा काढण्याचा विचार निश्चित झाला . त्यामुळे त्याचा आरंभ त्यांनी आपल्या पत्नीपासूनच म्हणजे सावित्रीबाईपासूनच केला. शेतात काम करतांनाच झाडाखाली बसून काळ्या मातीत अक्षरे गिरवत सावित्रीबाई शिकू लागल्या . या मध्ये प्रगती झाल्यावर त्यांनी एका सरकारी शाळेत प्रवेश घेवून पुढचे शिक्षण चालू ठेवले .
१४ जानेवारी १८४८ साली जोतीरावांनी पुण्यास मुलींची पहिली शाळा काढली. पण मुलीना शिकवयाचे धाडस करायला कुणी शिक्षक पुढे येईना . तेव्हा सावित्रीबाई शाळेत जावून मुलीना शिकवू लागल्या . बायकांनी शिकणे हे महापाप . आणि त्यांना शिकवणे हे तर महाभयंकर पाप, असे त्या काळी सर्वच समाज समजत असल्याने, सावित्रीबाई शाळेत मुलीना शिकवायला जाऊ लागल्या की पुण्यातले अतिकर्मठ लोकं त्याचावर दगड, शेण, चिखल वैगरे फेकीत. पण सावित्रीबाईना या सर्व छळाला शांतपणे तोंड देवून मुलीना शिक्षण देण्याचे कार्य चालू ठेवले . सावित्रीबाई आणि जोतीराव फुले यांनी नंतर दोन शाळा काढल्या . त्या व्यवस्थित चलल्या पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून १९५२ म्स्ध्ये इंग्रज सरकारने फुले पतीपत्नीचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही जाहीर केला . भारतातल्या मुलीना पहिल्या शाळेतील या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव येथील राष्ट्रीय स्मारक व शिल्प सृष्टीस भेट देण्यासाठी राज्यातून आणि राज्या बाहेरुन हजारो पर्यटक येत असतात . पर्यटकांच्या निवासाची सोय व्हावी तसेच त्यांना फुले साहित्याचा अभ्यास करता यावा यासाठी राज्य शासनाने येथे पर्यटक निवास उभारले आहे मात्र काही अपूर्ण कामामुळे हे पर्यटक निवास धूळ खात पडले आहे . याचे उद्घाटन होऊन ते वापरात यावे अशी अपेक्षा पर्यटक व नायगाव ग्रामस्थांची आहे .
बहुजनांच्या आणि गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध करण्यासाठी व त्यांच्या उद्धारासाठी संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या फुले दाम्पत्यांचे नायगाव ता . खंडाळा येथे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात आले आहे . त्याचबरोबर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याची महती दर्शवणारी शिल्पसृष्टीही निर्माण केली आहे . देशभरातून हजारो पर्यटक येथे राष्ट्रपुरुषांना अभिवादन करण्यासाठी वर्षभरात येत असतात . त्यांच्या राहण्याची सोय व्हावी तसेच फुले दाम्पत्यांच्या जीवनकार्याचा अभ्यास करता यावा यासाठी स्मारक विकास आराखडयात पर्यटक निवासाचा समावेश करण्यात आला होता . राज्य शासनाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून या इमारतीच्या उभारणीस सुरवात केली यासाठी डिसेंबर २०११ मध्ये मंजूरी देऊन पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला होता . या इमारतीत पर्यटकांसाठी राहण्याच्या खोल्या , सुसज्ज ग्रंथालय तसेच अभ्यास केंद्राची सुविधा करण्यात येणार आहे . इमारतीचे बांधकाम बहुतांशी पूर्ण असले तरी अदयाप इमारती बाहेरील बाग , पाण्याची व्यवस्था तसेच अन्य किरकोळ कामे अपूर्ण आहेत . त्याचबरोबर गावापासून या पर्यटन निवासापर्यंत जाण्यासाठी रस्त्याची सोय नाही . या रस्त्यासाठी भूसंपादनाचा प्रश्न प्रलंबित आहे . यावर प्रशासनाने तोडगा काढला नाही . त्यामुळे कोट्यावधी रुपये खर्च करून बांधलेली ही इमारत अद्याप वापरात आली नाही . रस्त्यासह उर्वरित कामे कधी पूर्ण होणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागलेले आहे .
॥ हे जरुर पहा ....
नायगाव येथील सावित्रीबाई फुले स्मारक हा एक ऐतिहासिक ठेवा आहे . त्यांच्या जन्मघरात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे अस्सल छायाचित्र , काही स्वलिखित पत्रे आहेत तसेच स्वयंपाकघर त्यामध्ये तत्कालीन स्वयंपाक व पाण्याची भांडी , चूल व इतर साहित्य आहे . शेजारीच माजघर आहे . त्याशेजारी तळघर असून त्यात धान्याची कोठी आहेत . हा ऐवज जसाच्या तसा जपून ठेवलेला आहे . त्याबरोबरच फुले दाम्पत्यांच्या जीवनाशी निगडीत विविध साहित्य येथे पहायला मिळते . ॥
॥ सावित्री शिल्पसृष्टी ...
राष्ट्रीय स्मारकाच्या शेजारी स्वतंत्र शिल्पसृष्टी उभारण्यात आली आहे . यात सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या जीवनकार्याची स्मृति जागृत ठेवणारे शिल्प घडविण्यात आली आहेत . यामध्ये मुलींची पहिली शाळा , हरिजनांसाठी घरातील रिकामा केलेला हौद , केशवपन विरोधी काढलेला मोर्चा , विधवा विवाह पुरस्कृत कार्य , अनाथ मुलांचे पाळणाघर , महात्मा फुले यांचा अंत्यविधी यांसह विविध चौदा शिल्प रेखाटलेली आहेत . ॥
॥ सावित्रीबाई फुले स्मारकास भेट देणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे . पण पर्यटक निवास इमारत अपूर्ण असल्याने त्यांना थांबता येत नाही . उर्वरित कामे पूर्ण करण्यासह ग्रंथालय व अभ्यासकेंद्र लगेच सुरू करण्यात यावे त्यामुळे फुले दाम्पत्यांचा कार्याचा अभ्यास करून त्याचा प्रसार होणे सोईचे ठरणार आहे ॥
॥ ऑडीटोरियल रुम - सावित्रीबाई फुले यांचे जीवनकार्य , त्यांचा धगधगता प्रवास व महात्मा फुले यांचे मानवतावादी विचार सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी शिल्पसृष्टीच्या शेजारील रुममध्ये ऑडीटोरियल सुविधा तयार करून फुले दाम्पत्यांच्या जीवनावरील लघुपट तयार करून त्याचे प्रसारण व्हावे . येथे येणाऱ्या सहलीतील शालेय मुलांना व अनुयायांना ते पाहण्याचा लाभ घेता येणार आहे . ॥
II एक रस्त्याने जोडणार दोन पर्यटनस्थळे ....
आदय स्त्री समाजसुधारक ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव ते महाराष्ट्राची कुलदेवता काळूबाईचे अधिष्ठान मांढरदेव हे एकाच रस्त्याने जोडण्याचा प्रस्ताव शासन दरबारी असल्याने रस्त्याच्या मंजूरीचा प्रश्न मार्गी लागणार आहे . त्यामुळे राज्यातील पर्यटकांना एकाच वेळी नायगावचे विचारपीठ आणि मांढरदेवचे शक्तीपीठ पाहता येणार आहे .
स्त्री शिक्षणाचा पाया रचनाऱ्या व सामाजिक क्रांती घडवून समतेचा संदेश देशाला देणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव ही महाराष्ट्राची चेतनाभूमी आहे . तर मांढरदेव येथील कुलदैवत माता काळूबाई हे भक्तांसाठी जागरूक अधिष्ठान आहे . नायगावचे हे विचारपीठ आणि मांढरदेवचे शक्तीपीठ एकाच मार्गाने जोडावे यासाठी सुरु असलेल्या संघर्षाला यश मिळाले आहे . त्यामुळे येथे येणाऱ्या हजारो पर्यटकांना ही दोन्ही ठिकाणे एकाच वेळी पाहता येणार आहे . ॥
- दशरथ ननावरे ( श्रीमंत )
इतिहास अभ्यासक