Pages

Sunday, 23 August 2020

॥ विचारवेध ॥ मृत्यूच्या दारातून ...

 

॥ विचारवेध ॥ 

*मृत्यूच्या दारातून ....* 


' का जडला हा रोग मजला , का जडली ही विदिर्ण व्याधी 

 दिसले माझे मरणच मजला , जीवन जगण्या आधी ' 

     कोरोना सारख्या भीषण विषाणूचा सामना करुन मरणाच्या दारातून माघारी आल्याचे समाधान असले तरी देवाघरची वाट कशी बिकट आहे . त्या वाटेवरची पाऊलं कशी जडावतात . आयुष्य म्हणजे काय ? आणि ते व्यतीत करताना माणसाचा स्वभाव कसा असायला हवा याचा प्रत्यक्ष अनुभवच कोरोनाशी लढताना आला . आज केवळ कोरोनाला हरवलं नाही तर प्रत्यक्ष मृत्यूलाच हरवल्याचा अभिमान वाटतो . काळ आला होता पण वेळ आली नव्हती . खरचं अशी वेळ कोणावरही येऊ नये . 

          संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले . सारं जग कोरोनाशी सामना करण्यात व्यस्त आहे . भारतातही मार्चमध्ये शिरकाव झाला . सातारा जिल्हयात कोरोनाचा पहिला रुग्ण खंडाळ्यातच आढळला . आणि ज्याची भीती होती तेच समोर येऊन ठाकले होते . 

   वास्तविक खंडाळा तालुक्यात कोरनाचा प्रसार वाढत असताना त्याची बाधा आपल्या गावात होऊ नये . यासाठी घाटदरे भोसलेवाडी ग्रामपंचायतीचा सरपंच या नात्याने गावांमध्ये सर्व काळजी घेतली  होती.  परंतु फोफावणाऱ्या या विषाणूने आमच्या गावात पाय ठेवले . त्यामुळे गावातील लोकांची काळजी घेण्याच्या उद्देशाने संपूर्ण गाव बंदी करणे , सार्वजनिक ठिकाणी जंतूनाशक औषध फवारणी करणे , लोकांना घराबाहेर पडू नका याच्या सूचना करण्यासाठी  दररोज घराबाहेर पडून मला हे काम करणं गरजेचं होतं. या कामात ग्राम सुरक्षा समिती , ग्रामसेवक , तलाठी , अंगणवाडी सेविका , आशा सेविका , ग्रामपंचायत कर्मचारी यांची मोलाची साथ मिळाली . 

   एकतर कोरोनाच्या भयाण भीतीने माणुस माणसापासून दूरावला गेलाय .   संकटाच्या काळात माणुसकीचे दर्शन घडत असले तरी दैनंदिन व्यवहारात मानवाला अनेक मर्यादा आल्या आहेत . याच कालावधीत तालुक्याच्या ठिकाण म्हणून खंडाळ्यात जाणं येणं ,  माझ्या वैयक्तिक कामाच्या निमित्ताने, ऑफिसच्या कामाच्या निमित्ताने बाहेर फिरावे लागत होते . मी ही काळजी घेऊन वावरत होतो पण मनातून निर्धास्त राहिलो होतो पण काही दिवसानंतर मला थोडा ताप येऊ लागला . खोकल्याने जखडलं .  मनामध्ये शंका राहू नये म्हणून खासगी डॉक्टरांकडे गेलो . आणि उपचारही घेतले. अगदी पुढची काळजी घेण्यासाठी डेंग्यू, मलेरिया यासारख्या आजारांची तपासणी केली. परंतु सर्वच रिपोर्ट नॉर्मल आले.  पण गोळ्या घेतल्या की तेवढ्यापुरता ताप जायचा, आणि पुन्हा यायचा. काहीतरी बिघडलंय खरं अस वाटायचं म्हणून अशा परिस्थितीत घरीच थांबलो होतो.  आजारी असल्याने पत्नी आणि मुलगी दोघेही काळजी घेत होते.  परंतु तीन-चार दिवसांनी त्यांनाही थोडा ताप आल्याचं दिसून आलं . मग मात्र मी कोणालाही न सांगता शिरवळ या ठिकाणी जाऊन कोरोनाच्या तपासणीसाठी घशाच्या श्रावाचे नमुने दिले . 

    दोनच दिवसात ३१ जुलै रोजी माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं मला समजलं.  आणि खरं तर आभाळच कोसळल्या सारखं वाटलं. चार महिन्यात ज्यापासून आपण दूर पळत होतो ते आता आपल्या जवळ पोहचलं होतं . पण हिंमत हरलो नाही . पुढच्या उपचारासाठी पाचगणीला जावे लागेल असं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुचवलं.  सरकारी गाडीची अपेक्षा न धरता मी माझ्या गाडीने स्वतः गाडी चालवत पाचगणी या ठिकाणी गेलो.  मी तिथे पोहोचण्यापूर्वी माझ्यासाठी स्वतंत्र बेडची व्यवस्था करण्यात आली होती.  अहिरे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेली चिठ्ठी दाखवताच पाचगणी येथील बेललेअर हॉस्पिटलमध्ये मला दाखल करण्यात आले . गेल्यानंतर शेजारीच गजेंद्र मुसळे उपचारासाठी माझ्या अगोदर दाखल झाले होते त्यांची भेट झाली . तेवढचं मनाला दिलासा वाटला .  खरं तर तिथे जेवणाची ,राहण्याची उत्तम सोय होती अन् उपचारही चांगले होते .  साधारणपणे तीन दिवस मी तिथे उपचार घेतले . पण ताप काही कमी होत नव्हता.  खोकलाही वाढला होता,  श्वसनाचा त्रास अधिकच जाणवू लागला. मग मात्र धरणी माय कोपल्यासारखी भासू लागली . आभाळ फाटल्यासारखं वाटू लागलं . यातून आपण बाहेर पडणार का ? अशी अनामिक भीती मनात घर करू लागली होती .  औषधोपचाराचा आपल्या शरीरावर कोणताही परिणाम होत नाही हे कळून आल्यावर मी त्याबाबत  तेथील डॉक्टरांना कल्पना दिली .  खरं तर त्यांनी धीर देण्याचा प्रयत्न केला पण श्वसनाचा त्रास अधिक वाढू लागला होता. असहय वेदनांनी जीव घामाघूम होत होता . कोरोनाच्या या विषाणूमुळे आपल्याला चांगलं घेरलं आहे याची जाणीव झाली.  आणि मनामध्ये असंख्य विचारांचं काहूर माजलं .  खरंतर ताप आल्यानंतरचे आजारपण जवळपास दहा दिवस अंगावरच काढल्याचे हे परिणाम होते . शरीरात खूप अशक्तपणा ही जाणवत होता , काय करावे सुचतच नव्हतं.  पुढचा उपचार इथेच घ्यावा की एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जावं अशा द्विधा मनस्थितीमध्ये मी होतो. 

     माझे मित्र महेशनाना यांना पहिला फोन केला आणि मला होणारा त्रासाची त्यांना कल्पना दिली.  त्यानंतर त्याने काळजी करू नका आपण काहीतरी व्यवस्था करू असा नानांनी आधार दिला.  त्यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य मनोजभाऊ पवार,  डॉक्टर नितीन सावंत , डॉक्टर निंबाळकर, पोलिस उपअधिक्षक तानाजी बरडे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि आमदार मकरंद पाटील यांनाही त्याची कल्पना दिली.  तातडीने आबांचा फोन आला.  मी आबांना फोनवरच होणाऱ्या त्रासाची कल्पना दिली.  खरं तर त्यांनी मानसिक आधारही दिला आणि पुढच्या उपचारासाठी पुण्याला व्यवस्था करण्यासंदर्भात त्यांनी चर्चा केली.  माझ्या अगोदर खंडाळ्याचे पोलीस निरीक्षक गायकवाड साहेब यांनाही उपचारासाठी हडपसर येथील नोबेल हॉस्पिटल या ठिकाणी नेण्यात आले होते.  त्यामुळे माझी व्यवस्था तेथेच करावी असं मी सुचवलं होतं.  त्याप्रमाणे या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नाने मला नोबेल हॉस्पिटलला हलवण्याचा निर्णय झाला . 

     शरीरात अशक्तपणा असतानाही पाचगणी पासून  मी स्वतः गाडी चालवत खंडाळा पर्यंत पोहोचलो . परंतु अवस्था खूप बिकट होती . श्वास घेताना त्रास होत होता अशा परिस्थितीत पुण्यापर्यंत गाडी चालवणे मला शक्य होणार नव्हतं.  मग माझ्यासोबत प्रवीण पवार आणि युवराज ढमाळ हे दोघेजण पुण्याला येण्यास तयार झाले .  कोरोनाचा पेशंट म्हटलं की कोणी जवळपासही फिरकत नाही परंतु या दोघांनी आपला जीव धोक्यात घालून माझ्यासोबत येण्याचं ठरवलं.  खरंतर त्यांच्या धैर्याचे कौतुकच करायला हवे .  कृष्णाने लढाईत अर्जुनाचे स्वारथ्य केले . तशी साथ या दोघांनी कोरोनाशी लढताना मला हॉस्पिटलमध्ये पोहोचवणे पर्यंत केली.  त्यांचे धैर्य अफाट म्हणायला हवे .  पुण्यातील नोबेल हॉस्पिटल तसं नावाजलेलं ! मी पोहचल्याबरोबर त्या ठिकाणी आयसीयू मध्ये मला दाखल केले.  गेल्या गेल्या ऑक्सीजन लावण्यात आला होता . पण ताप कमी येत नव्हता , खोकल्याच्या त्रासाने जीव कासावीस व्हायचा .  शरीर थकल्यासारखं वाटतं होतं . खूप त्रास होत होता. तोंडाला चव नव्हती . त्यातच पहिले तीन दिवस तर जेवण गेलं नाही . त्यामुळे आणखी अशक्तपणा वाढला . काय होतंय हे सुचतच नव्हतं.  बीपी सुद्धा वाढला होता.  त्यामुळे आपण पण मरणाच्या विळख्यात आहोत याची पुसटशी जाणीव झाली . " कोरोना काय कुणाला पण होतोय . तपासणी केली की रिपोर्ट पॉझिटिव्ह येतोय . सगळं बंडलबाज आहे . " असं काहीसं मागील काही दिवसात ऐकलं होतं . परंतु ' जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे ' या उक्तीप्रमाणे प्रत्यक्ष वास्तव अनुभव घेत होतो . मनातल्या मनात कोरोनाविषयी गैरसमज पसरविणाऱ्यांची आणि शासनाला दोष देणाऱ्यांची कीव करावी वाटत होती . पण कोरोना खरचं भयानक आहे याचा अनुभव मी घेत होतो . मनातून खूप घाबरलो होतो . कधी कधी अवघा जीवनपट डोळयापुढे तरळून जायचा . जीवनात अनेक संकटांशी आणि पडत्या काळाशी सामना केला पण मनातून कधी खचलो नव्हतो . 'बचेंगे तो और भी लढेंगे ' अशी धारणा नेहमी बाळगली होती .  पण या सर्व प्रकाराने पुरता घाबरलो होतो .  परंतु डॉक्टर खान आणि त्यांच्या सर्व सहकारी परिचारिका यांनी अतिशय उत्तम पद्धतीने माझ्यावर उपचार केलेच पण मानसिक आधारही दिला . जवळपास सात दिवस आयसीयू मध्ये होतो. याकाळात अनेकांचे फोन यायचे ,   त्यामुळे मनाला आधार वाटायचा . 

          माझ्या संपर्कात आलेल्या चोवीस लोकांपैकी चौदा लोकांना कोरोनाची बाधा झाली होती.  यामध्ये माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य, माझी बहीण, दाजी, चुलते यांचाही त्यात समावेश होता. आपण कोरोनाग्रस्त आहोत, उपचारही घेत आहोत अशा परिस्थितीत घरच्यांना बाधा झाल्याचे समजताच खूपच वाईट वाटले.  आता त्यांच्या उपचाराचीही चिंता लागून राहिली . पण स्थानिक प्रशासनातील तहसिलदार दशरथ काळे साहेब , तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ . अविनाश पाटील , अहिरे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ . पडळकर , आरोग्य सेवक मानकुमरे यांनी मोलाचे सहकार्य केले . सर्वांना उपचारासाठी स्थलांतरीत करून कोव्हिड हॉस्पीटलला दाखल केले . त्यांना या सगळ्यातून लढण्यासाठी बळ मिळावं एवढाच देवाकडं धावा होता . परंतु आलेल्या संकटाचा सामना करणं एवढंच आपल्या हातात असतं . 

      सात दिवस उपचार घेताना बाहेरच्या जगाशी कुठलाही संपर्क नव्हता केवळ फोनवरून कोणाशी तरी बोलणं व्हायचं.  आयसीयुच्या बाजूलाच एक खिडकी होती. त्या खिडकीच्या तावदानातून बाहेर एक हिरवंगार झाड नजरेस पडायचं. कधीतरी एखादा पक्षी किलबिल करत त्यावर बसायचा आणि माझी नजर त्याकडे जायची . खरंतर ते दृष्य पाहिल्यानंतर मनाला बरं वाटायचं.  तेवढाच काय तो विरंगुळा वाटायचा. त्या झाडाप्रमाणे आपलं जीवन पुन्हा बहरेल . त्या पक्षाप्रमाणे आपणही पुन्हा मुक्तपणे संचार करू असा मनात विश्वास वाटायचा . 

     नोबेल हॉस्पिटल मध्ये बारा दिवस होतो . सात दिवसानंतर मिनी आयसीयूमध्ये मला ठेवण्यात आले. याठिकाणी जवळपास तीन दिवस होतो. आयुष्यात कधीही दवाखान्यात अॅडमिट होण्याचा प्रसंग माझ्यावर आला नव्हता. ही पहिलीच वेळ होती . गेल्या चाळीस वर्षात जेवढी इंजेक्शन आणि औषध मी घेतली नसतील, तेवढी या बारा दिवसात घ्यावी लागली. नुसत्या पोटात पंधरा इंजेक्शन घेतले होते . रोज रक्त तपासणीसाठी घेतले जात होते . इंजेक्शनच्या टोचणीने हातांची चाळण झाली होती . पण सहन करण्यापलिकडे दुसरा मार्ग नव्हता . हळूहळू तब्बेत सुधारत होती . जेवणाचा डबा बहिणीच्या घरुन यायचा . घरच्या जेवणामुळे ताकद वाढत होती . आयसीयू मधून बाहेर पडल्यावर काही दिवस अंडरऑब्जर्वेशन स्वतंत्र खोलीत ठेवण्यात आले . 

         या संपूर्ण पंधरावड्यात आमदार मकरंद पाटील यांनी वारंवार माझ्याशी फोनवरून संपर्क करून संवाद साधला आधार देण्याचा प्रयत्न केला. तसा घरच्या लोकांचा आणि इतरही मित्रांचा फोन करून आधार देण्याचा प्रयत्न होता .  राजकीय क्षेत्रात असल्याने माझ्या बाबत आस्था असलेल्या तालुक्यातील आणि खेड गणातील पदाधिकाऱ्यांचे आणि राजकारणातील अनेक छोटया मोठया कार्यकर्त्याचेही फोन आले. गावातील सर्वांनीच माझ्यासाठी देवाकडं साकडं घातलं .  कठीण काळात ही मोलाची साथ ठरली.  त्यामुळे आयुष्यात वैरी कुणी असतच नाही याची प्रचिती मला आली.  बारा दिवसाचा उपचार काळ पण तो एका तपासारखा वाटला . कधी एकदा आपल्या माणसांमध्ये जातोय असं वाटायचं अन् मन घरी ओढ घ्यायचं . अखेर १५ ऑगस्ट रोजी माझी दवाखान्यातून सुटका झाली . बाहेरच्या हवेचा मोकळा श्वास घेतला आणि खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाल्याची भावना मनात आली . घरी आलो तेव्हा दारातच स्वागत करण्यात आलं . औक्षण करून घराची पायरी चढलो . त्यांच्या प्रेमाने मी पुरता भारावून गेलो . 

      ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रसार वाढतोय तशी चिंताही वाढते आहे.  एखादी बाधित व्यक्ती हा स्वतःहून कधीही पॉझिटिव्ह येत नाही.  परंतु त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा अतिशय वाईट असल्याचे दिसून येत आहे.  अशा बिकट प्रसंगी एकमेकांना आधार देणे हाच खरा माणुसकी धर्म आहे . परंतु अशा लोकांना वाळीत टाकल्यासारखे वागवले जाते.  खरंतर माझ्याबाबतीत असं मला अजिबात जाणवलं नाही . परंतु ही वस्तुस्थिती आहे.  म्हणूनच समाजाची धारणा बदलली गेली पाहिजे. तसं पाहिलं तर  यापूर्वी आयुष्यात अनेक विधायक कामात हातभार लावला होता. अडल्या नडलेल्यांच्या , दीनदुबळ्यांच्या अडचणीच्या काळात मदतीचा हात पुढे केला होता . त्यांचे आशीर्वाद आणि अनेक मित्र जोडले होते त्यांचं बळ आणि घरच्यांचं प्रेम माझ्या पाठीशी होतं . त्याचं फळ म्हणून मला या मृत्यूच्या जबड्यातून बाहेर पडताना आधार दिला.  आयुष्य खूप मोठं आहे पण ते महान बनवण्यासाठी आपली कृती , आचरण महत्त्वाचे असते.  याची जाणीव या काळात निश्चितपणे झाली.  आज कोरोनाशी यशस्वी लढा देऊन पुन्हा समाजात वावरत असताना मनाला आनंद वाटतो. परंतु अशी वेळ कोणावरही येऊ नये असं वाटतं. 

     एक गोष्ट मात्र निश्चित आहे . या लढ्यात जगण्याची इच्छा आणि आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे . एकमेकांना साथ देऊया आणि कोरोनाला हद्दपार करुया ! 


         - सुभाषराव भोसले

            सरपंच ग्रामपंचायत घाटदरे -भोसलेवाडी

[शब्दांकन - दशरथ ननावरे ( श्रीमंत ), खंडाळा ]

7 comments:

  1. सर अतिशय संत्य परीस्थिती आहे. आणि खरच छान शब्दात लिखाण केले आहे.

    ReplyDelete
  2. या रोगाची व्याप्ती लक्षात घेता सर्वांनी आपापल्या परीने काळजी घ्यावी आनि बाधितांना सहकार्य करण्याची भावना आनि भूमिका ठेवावे.... ईश्वर सर्वांचे रक्षण करो.... गणपती बाप्पा मोरया

    ReplyDelete
  3. सुंदर ह्रुदय स्पर्शी अनुभव

    ReplyDelete
  4. सरपंच कोरोनाकाळात तुम्ही केलेली जनसेवा आणि तुमची जीवन जगण्याबाबत असलेली सकारात्मकता यामुळेच कोरोनावर मात करून पुन्हा जनसेवेसाठी सज्ज झाले आहात.तुमचा अनुभव पॉझिटिव्ह रिपोर्ट्स आलेल्या रुग्णांमध्ये नक्कीच उमेद आणेल हे नक्की.

    ReplyDelete
  5. खुप छान लढले बाप्पू.
    आपन लवकरच भेटुयात.
    काळजी घ्या.
    👌👌👍💐💐

    ReplyDelete
  6. Heartiest congratulations sir excellent battle with deasis 👏👏👏👏

    ReplyDelete
  7. सरपंच साहेब
    खरच आपण सांगितलेला अनुभव वाचून अंगावर शहारे आले.

    ReplyDelete