Pages

Monday, 3 August 2020

॥ विचारवेध ॥ - रक्षाबंधन




॥ विचारवेध ॥ 

- दशरथ ननावरे ( श्रीमंत ) , इतिहास अभ्यासक

रक्षाबंधन


    भारतीय संस्कृतीमध्ये बहिण भावाच्या नात्याचे अतुट बंधन 'रक्षाबंधन ' सणाच्या निमित्ताने दिसून येते . बहीण भावाचे निस्वार्थी व पवित्र प्रेमाचे हे बंधन आहे . राखी बांधून केवळ स्वसंरक्षणाचा हक्क अबाधित राखणे एवढीच यामागची भावना नसून समस्त स्त्री जातीच्या संरक्षणाची इच्छा यानिमित्ताने ठेवली जाते . म्हणूनच आज प्रत्येक पुरुषाने महिलांचा बाह्यशत्रूपासून आणि अंतर्गत विकारांपासून रक्षण करण्याचा संकल्प करायला हवा .
       पौर्णिमेला पूर्ण चंद्राचे दर्शन होत असल्याने हिंदू वर्षाप्रमाणे पहिली पौर्णिमा चैत्र पौर्णिमा असते त्यावेळी हनुमान जयंती साजरी होते . दुसरी पौर्णिमा बुध्दपौर्णिमा , तिसरी पौर्णिमा वटपौर्णिमा या दिवशी पतीच्या आयुष्याची मनोकामना मागीतली जाते , चौथी पौर्णिमा गुरुपौर्णिमा यादिवशी शिक्षकांना- गुरूला वंदन करण्याची प्रथा आहे , तर पाचवी पौर्णिमा श्रावणातील  नारळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते . याच दिवशी 'रक्षाबंधन ' सण साजरा केला जातो .
    रक्षाबंधन करण्या पाठीमागे काही पौराणिक , धार्मिक , सामाजिक , ऐतिहासिक घटनांना अनुसरले जाते . पुरानात देव आणि असूर यांच्या संग्रामात देवांच्या विजयासाठी इंद्राणीने हिम्मत हरवलेल्या इंद्राच्या हातात रक्षासूत्र बांधले असे वेदात सां‍गितले आहे. श्रीकृष्णाच्या बोटाला जखम झाल्यानंतर द्रोपदीने साडीची किनार ( जरतारी शेल्याची चिंधी ) बांधले , त्यामुळे कृष्णाने भावाच्या नात्याने द्रोपदीचे रक्षण केले . अभिमन्यूच्या सुरक्षेसाठी कुंतीने त्याला राखी बांधली होती . इतिहासात चितोडची राणी कर्मावती हिने  हुमायूँला राखी पाठवली होती. त्यानुसार मुघल हुमायूने कर्मावतीचे रक्षण केले . राजपूत स्त्रीया रक्षणासाठी शत्रूच्या हाती रक्षासूत्र बांधत असल्याचे अनेक दाखले आहेत . अगदी अलिकडच्या काळात बंगालच्या विभाजनानंतर रविंद्रनाथ टागोर यांनी हिंदू मुस्लिम बंधू भगिनींना एकमेकांना रक्षा सूत्र बांधण्यास सांगितले होते . या राखीमध्ये सुरक्षिततेची भावना होती.
      राखीच्या पवित्र धाग्यात आपल्या ध्येयापासून विचलीत न होण्याची शक्ती असते . त्यामुळेच रक्षाबंधन हे सुरक्षिततेचे स्मारक बनते . त्याला स्मरुन प्रत्येक पुरुषाने ध्येयपथावर मार्गक्रमण करावे असा संदेश या पवित्र धाग्यातून मिळतो .
     स्त्री ही पवित्र देव्हाऱ्यातील देवता आहे . महिलांकडे विकृत दृष्टीने न पाहता त्यांच्या प्रती पवित्र दृष्टी ठेवली जावी अशी शिकवण भारतीय संस्कृतीमधून मिळते .  आजही समाजात स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे.  राखी मग तो साधा धागा असो , रंगीबेरंगी धाग्यावर लपेटलेली नक्षी असो , धाग्यात ओवलेले मणी असो , चांदीने मढवलेली राखी असो की सोन्याच्या धाग्याची असो . तो विश्वासाचा धागा बंधनाचे दयोतक आहे . एकाच कुटुंबात बहिण भावाला राखी बांधते . कधी मानलेला भाऊ ( गुरु भाऊ ) असो , की शेजारधर्म पाळताना जपलेले नाते संबंध असो . अगदी अलिकडच्या काळात इंटरनेटद्वारे पाठवलेली राखी असो वा रक्षाबंधनाचा संदेश. बहिण भावाचे नाते अधिक दृढ झाल्याचे दिसून येते . 
     रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या शुद्ध प्रेमाचा वाहता झरा ! पराक्रम , प्रेम , साहस व संयम यांचा पवित्र संगम . या सणाच्या निमित्ताने प्रत्येकाने दायित्वाची भावना जपून सामाजिक नातं प्रेमळ , सहिष्णू , सामंज्यसाचे आणि परस्पर विश्वासाचे बनवूया . तरच हा उत्सव भारतीय संस्कृतीचं अनमोल ठेवा बनेल .

- दशरथ ननावरे ( श्रीमंत )
  इतिहास - अभ्यासक 

6 comments: