॥ विचारवेध ॥
-दशरथ ननावरे ( श्रीमंत ) , इतिहास अभ्यासक
विचारांचा मळा
'विचार आणि आचरण ' ही दोन चाके सत्प्रवृत्तीने चालू लागली तर मनुष्याची गाडी आयुष्याच्या वाटेवर सतत मार्गाने धावते. माणसाचे विचार जेवढे प्रगल्भ असतात, त्यानुसारच त्याचे आचरण आदर्शवत ठरते . मानवाच्या अंगी बानलेल्या सद्गुणांचा सुंदर पाया म्हणजे त्याच्या अनमोल विचारांची परिसीमा असते. तुम्ही जसा विचार करता तसेच आचरण असते. म्हणूनच चांगले विचार यशाच्या शिखरावर उत्तुंग भरारी मारण्याचा मार्ग आहे.
"मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण " या उपदेशानुसार मानवाचे मन प्रसन्न असेल तर मनामध्ये चांगल्या विचारांचे अंकुर फुटतात. त्याला सद्गुणांची पालवी फुटते . या विचारांवर मानवाचे श्रेष्ठत्व सिद्ध होत असते . छत्रपती शिवाजी राजांचे राज्य हे एका पूर्ण विधायक विचारांवर आधारित होते . या शिवरायांच्या स्वराज्याचे एकच विचार आजही जनमानसाच्या हृदयसिंहासनावर कोरलेले आहेत . महाराष्ट्रात अशाच विचारांची पेरणी संत सज्जनांनी करून महाराष्ट्राला राकट आणि कणखर बनवण्याचे सत्कार्य केले. विचारांच्या देवाण-घेवाणीवर समाजाची संस्कृती आधारलेली असते. या संस्कृतीचे जतन करण्यासाठी अखिल मानव जातीचे सद्विचार आचरणात आणले पाहिजेत.
जगात ज्या ज्या ठिकाणी सामाजिक क्रांती घडली त्याच्या पाठीमागे महत्त्वकांक्षी विचारांची गुंफण होती. एका विचाराच्या ध्येयाने प्रेरित झालेल्या महान विभूतिमुळेच भारताला स्वातंत्र्याचा राजमार्ग दिसला . एक व्यक्ती, कुटुंब , समाज, गाव, राज्य आणि देश हे समृद्ध विचारांनी बांधले गेले पाहिजेत . त्यांच्यात चांगले सुसंवाद घडले पाहिजेत तरच देशाच्या उज्ज्वल विकासाची स्वप्न साकारलेली दिसतील.
मनुष्याचा स्वभाव हा विचारांवर आधारित असतो . विनाकारण एखाद्या गोष्टीचा अधिक विचार करत बसलो तर मनाला त्याची चिंता लागून राहते. चिंता हा मनाचा असाध्य विकार आहे. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे
चिता चिंता समानस्ती, बिंदू मात्र विशेषतः
चिता दहती निर्जीव, चिंता दहती सजीव ॥
चिता आणि चिंता या शब्दांमध्ये फक्त अनुस्वाराचा फरक आहे. परंतु त्याचे परिणाम मात्र भिन्न आहेत. चिता ही निर्जीव देहाला जाळते तर चिंता ही सजीव देहाला जाळत असते. चिंता करणारा मनुष्य मानसिक विकृती असलेला दिसून येतो. त्यामुळे जीवनात त्याला सहजासहजी यश सिद्धी प्राप्त होत नाही. म्हणूनच विचार हा प्रसन्न मनाने करायला हवा म्हणजे तो सत्मार्गावर नेणारा ठरेल.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिलेले विचार, आईने मुलाला दिलेले विचार, गरूने शिष्यांना दिलेले विचार आणि राजकीय गुरूंनी राज्यकर्त्यांना दिलेले विचार जर उत्कर्ष करणारे असतील तर समाजाची मानसिकता सदृढ राहणार आहे . मनुष्य कोणत्याही जाती-धर्माचा असो, तो एका राष्ट्रीय ध्येयाने प्रेरित विचारांशी समरस असायला हवा. कारण राष्ट्रकार्यात हातभार लावणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपण दुसऱ्याबद्दल जसा विचार करतो तसाच विचार इतरही आपल्याबद्दल करत असतात . शेवटी हे विचारच प्रत्येकाला उच्च अधिष्ठान आणि देवपण प्राप्त करून देणारे ठसतात . म्हणूनच समृद्ध विचारांचा मळा प्रत्येकाच्या मनात फुलला पाहिजे.
- दशरथ ननावरे (श्रीमंत )
इतिहास अभ्यासक
खरचं खूप समृद्ध आणि सुदृढ विचारांचे महत्त्व डोळसपणे मांडले आहेत.🙏🙏🌹
ReplyDelete