Pages

Monday, 10 August 2020

॥ विचारवेध ॥ स्वातंत्र्याच्या लढयाची चळवळ -ऑगस्ट क्रांती

 

॥ विचारवेध ॥ 

- दशरथ ननावरे ( श्रीमंत ) , इतिहस अभ्यासक 

स्वातंत्र्यलढयाची चळवळ - ऑगस्ट क्रांती 


      इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले . त्यांच्या स्मृतीचा ऐतिहासिक दिन म्हणजे ९ ऑगस्ट क्रांती दिन अर्थात क्रांती दिन !        

      इंग्रजांनी भारताला स्वतंत्र करण्यासाठी दिलेला शब्द न पाळल्यामुळे या आंदोलनाला सुरुवात झाली होती. ८ ऑगस्ट १९४२ रोजी भारताला स्वातंत्र करणार असल्याचे इंग्रजांनी म्हटले होते. मात्र, ऐनवेळी इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य देणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे महात्मा गांधींनी देशभर ऑगस्ट क्रांती आंदोलनाची घोषणा केली. या आंदोलनाला 'भारत छोडो' असे नाव देण्यात आले होते. 'करो या मरो' अशी या आंदोलनाची घोषणा होती. 

       ८ ऑगस्ट हा दिवस भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईतील शेवटचा दिवस म्हणून स्मरण केला जातो. महात्मा गांधींच्या नेतृत्वात भारत छोडो आंदोलनाला या दिवशी सुरुवात झाली होती. मुंबईत भऱलेल्या कॉंग्रेस अधिवेशनात महात्मा गांधींनी ‍केलेली 'छोडो भारत'ची गर्जना ‍आणि दिलेला ''करेंगे या मरेंगे'' हा मंत्र ९ ऑगस्टच्या दिवशी संपूर्ण देशात पसरला होता. त्यामुळे यादिवशी क्रांतीची ज्योतच जणू पेटली. देशभरात ब्रिटिश सत्तेला हाकलून लावण्यासाठी आंदोलनांना सुरवात झाली. प्रत्येकाला जे योग्य वाटेल ते तो करत होता. ब्रिटिश सत्ता पार हादरून गेली होती. हे रोखायचे कसे असा प्रश्न पडला होता. त्याची पूर्वसूचना आदल्या रात्रीच्या भाषणातच मिळाल्याने ब्रिटिशांनी पहाटे पाच वाजताच मुंबईत बिर्ला हाऊसमधून गांधीजी आणि त्यांच्या कुटुंबीयांना ताब्यात घेतले. यावेळी गांधीजींनी जनतेला संदेश दिला, ''आता प्रत्येकजणच पुढारी होईल.''  ९ ऑगस्ट रोजी गांधींसह ज्येष्ठ नेत्यांना अटक करण्यात आली होती.     

      ब्रिटिशांनी काँग्रेसच्या सर्व नेतेमंडळींना अधिवेशनाच्या जागीच अटक केली होती. त्यांना सर्वांना पुण्यात हलविण्यात आले. चिंचवड स्टेशनवर गाडी थांबवून महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेवभाई देसाई आणि मीराबेन या चौघांना खाली उतरवून त्यांची रवानगी गुप्त ठिकाणी करण्यात आली. बाकीच्यांना पुढे नेण्यात आले. सरकारने गुप्तता पाळली तरी बातमी फुटलीच. गांधीजींना पुण्यात आगाखान पॅलेसमध्ये आणि नेहरू, पटेल, आझाद या मंडळींना अहमदनगरच्या किल्ल्यात ठेवण्यात आल्याचे समजले.  त्यावेळी, तरुण कार्यकर्त्या अरुणा असिफ अली यांनी ९ ऑगस्ट रोजी मुंबईतील ग्वालिया टँक मैदानात तिरंगा फडकावत भारत छोडो आंदोलनाचा शंखनाद केला. मात्र, गांधीजींनी हेही आंदोलन अहिंसक मार्गानेच करावे, असे आवाहन देशवासियांना केले होते. 

        तरीही संपूर्ण भारत इंग्रजांविरुद्ध एकवटला होता. नेत्यांची धरपकड झाल्याने आंदोलन लोकांच्या ताब्यात गेले. देशभर जागजागी हरताळ, मिरवणुका, मोर्चे यांना ऊत आला. सरकारने लोकांना एकत्र जमण्यास बंदी घातली. पण लोक आता आदेश मानायला तयार नव्हते. पोलिसांच्या लाठीहल्ल्याला, गोळीबाराला जुमानत नव्हते. जाळपोळ, पोलिसांचे खून, टेलिफोन व तारा कापणे असे प्रकार सुरू झाले. जणू लोकांनी ब्रिटिश सत्तेविरूद्ध युद्ध पुकारले होते. संपूर्ण देश पेटला होता. दंगल जाळपोळ, गोळीबार, रेल्वेचे अपघात, सरकारी कार्यालयांना आगी लावणे, सरकारी खजिन्यांची लुटालूट असे प्रकार सुरू होते. सरकार दडपशाही करून पाहिजे त्याला विनाचौकशी अटक करत होती. सारा देश गोंधळलेल्या अस्थिर परिस्थितीत सापडला होता. देशावासियांच्या या एकजुटीने इंग्रज सरकारला गुडघे टेकायला भाग पाडले. 

     भारतीयांनी पुकारलेला १८५७ नंतरचा हा सर्वात मोठा स्वातंत्र्य लढा होता. दुसऱ्या महायुद्धामुळे ब्रिटीश सरकार अगोदरच खिळखिळे बनले होते. तर, या आंदोलनामुळे ब्रिटीशांची उरली-सुरली ताकदही लोप पावत गेली. त्यानंतर देशवासियांनी इंग्रजांना हाकलून लावेपर्यंत हे आंदोलन सुरुच ठेवले. भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले.  या आंदोलनात आपले बलिदान देणाऱ्या नागरिकांना श्रद्धांजली म्हणून ऑगस्ट क्रांती दिन साजरा केला जातो.   


        - दशरथ ननावरे ( श्रीमंत )

          इतिहास अभ्यासक








No comments:

Post a Comment