॥ विचारवेध॥
-दशरथ ननावरे ( श्रीमंत ) , इतिहास अभ्यासक
आई
' न मातु: परम दैवतम I ' आईविना दुसरे दैवत नाही. आई म्हणजे विधात्याला पडलेले सुंदर स्वप्न... असे म्हणतात , ईश्वराला प्रत्येक घरी जाणं शक्य झाले नाही म्हणून त्यांने निर्माण केली आई ! 'आ' म्हणजे आत्मा, ' ई ' म्हणजे ईश्वराचं देणं . आई ही अक्षरे दोनच आहेत. परंतु त्यात ओतप्रोत अर्थ समाविष्ट झाला आहे. मांगल्य, उदारता , लीनता , सहनशीलता, त्याग, सेवा , दातृत्व, क्षमाशीलता ,संयम , शांती , तेजस्विता आणि कर्तव्यतत्परता या सर्वच गुणांचा समावेश तिच्यात आहे. अशा मातांचे मोल समजून तिची पूजा बांधणी प्रत्येकाचे परम कर्तव्य आहे.
आईची मांडी म्हणजे सर्वश्रेष्ठ विद्यापीठ आहे. तिथं जीवनाच शिक्षण असं दिलं जातं की, ते जगाच्या पाठीवर कोणत्याही विद्यापीठात मिळणार नाही . लहानपणापासून बाळाच्या सुखदुःखाची जाणीव मनामध्ये ठेवून त्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारी, प्रसंगी स्वतः ओलावा सहन करून बाळाला ऊब देणारी ईश्वरी ममता म्हणजे आई !
'बाळा होऊ कशी उतराई I
तुझ्यामुळे मी झाले आई ॥
अशी भावना सदैव मनामध्ये बाळगणाऱ्या आईचे खरे मोल मुलांनी समजून घेणे यातच तिच्या कष्टांची सार्थकता आहे .
छत्रपती शिवाजी महाराज यांना आपल्या मायेच्या छत्राखाली वाढविणारी राजमाता जिजाऊ महाराष्ट्रावर मोगलांच्या रूपाने येणाऱ्या काळावर घाला घालण्यासाठी शिवाजीराजेंसारखा कर्दनकाळ तिने निर्माण केला. राजांनीही जिजाऊंच्या कष्टाची सार्थकता पूर्ण केली. म्हणूनच राजे थोर व जिजाऊ या वंदनीय राजमाता !
' स्वामी तिन्ही जगाचा , आई विना भिकारी ' या सुवचनातून आईचे महात्म्य व्यक्त होते . भारतातील अनेक राष्ट्रपुरुषांना देशाच्या सेवेसाठी घडविणारे विचार आणि हात हे एका मातेचे होते . किंबहुना अनेकांना भारत देशालाच आपली माता समजून सेवा केली आजही देशसीमेवर आपले प्राण पणाला लावून लढणारे निधड्या छातीचे सैनिक भारतमातेचे संरक्षण करीत आहेत . आपल्या मातेप्रती असलेली कर्तव्य भावना यातून दिसून येते . जन्म देणारी आई आणि ज्या भूमीत जन्म घेतला ती माता एकसमानच आहे . आपल्या हातून विविधांगी सेवा घडावी यासाठी प्रयत्न करणे एवढं तर आपण निश्चितच करु शकतो .
आई हीच अपत्याच्या जीवनाला आकार व वळण देणारी किंबहुना अस्तित्व देणारी , जगण्याला ध्येय , हेतू व अर्थ देणारी माय माऊली ! म्हणूनच उत्तुंग प्रतिभेच्या मातांमुळे आईची प्रतिमा अभंग आहे .आईचे मूल्य, वृत्ती आणि महात्म्य भावी पिढ्यांसाठी आदर्श ठरावी यासाठी प्रत्येक मुलाने आई विषयीचे कर्तव्य पार पाडायला हवे . आपली मुले हीच आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती मानणाऱ्या आईची शिकवण ही गतिमानतेने बदलणाऱ्या जगताच्या निरंतरतेची खरी गरज आहे .
- दशरथ ननावरे (श्रीमंत )
इतिहास अभ्यासक
No comments:
Post a Comment