॥ विचारवेध ॥
- दशरथ ननावरे ( श्रीमंत ) , इतिहास अभ्यासकभोसलेवाडीचं अष्टप्रधान मंडळ ....
सहयाद्रीच्या कुशीत आपला थाट रूबाबदारपणे सांभाळत उभ्या असणाऱ्या खंबाटकी घाटाची डोंगररांग पूर्वेकडे तशीच विस्तारलेली आहे . हिरवाई पांघरलेल्या याच डोंगराच्या बाजूला असणारी भोसलेवाडी . इन मीन वीस तीस घरांची ही वाडी तशी घाटदरे गावाची पोटवाडी पण आपले स्वतंत्र अस्तित्व जपलेली . खरं तरं विविध कार्यक्रमांच्या निमिताने वाडीत अनेकदा येणं झालेलं पण आजचा योगायोग काही वेगळाच होता . इथल्या प्राथमिक शाळेत एक दिवसासाठी काम करण्याची ही संधी होती .
सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत पोहचलो . गावच्या एका बाजूला भवानीमाता मंदिराशेजारीच शाळेची एकमेव टुमदार इमारत होती . व्हरांड्यातच छोट्या कुंडीतील सुंदर बाग . चौथीपर्यंतचे वर्ग अन् विदयार्थी संख्या केवळ आठच . वर्गात शिवरायांचं अष्टप्रधान मंडळच असल्याचा भास झाला . 'गुड मॉर्निंग सर , वेलकम सर ' चिमुकल्यांच्या ओठावरील या गोड शब्दांनी मुलांच्या मनातील आपुलकीची जाणीव झाली . चुणचुणीत , निरागस आणि बोलकी मुलं समोर असली की अध्यापनाला बहर येतो . सुरुवात परिपाठाने झाली . सत्यमं शिवमं सुंदरा ... या सुरबद्ध प्रार्थनेने या ज्ञान मंदिरात वातावरण मंत्रमुग्ध झालं . त्यानंतर सिद्धीला दुकानातून राख्या आणायला सांगितल्या समीरने हळद , कुंकू आणले . वैष्णवीने ओवाळणीचे ताट तयार केले . तीनही मुलांना राखी बांधून रक्षाबंधनाचा छोटेखाणी समारंभ घेतला . मुलांना आनंद वाटला . 'सर , राखी आणायला पैसे दिलेत त्याबद्दल थ्यँक यू ! ' मुलींच्या या बोलण्याने मी अवाक् झालो . एवढयाशा लहान वयात केवढा समजूतदारपणा . हजेरी घेताना तर गंमतच झाली, तिसरीतील पूजाचं नाव घेतलं तर सिद्धी लगेचचं म्हणाली .सर , ही नेपाळची आहे . हीचे आई बाबा गावचे सरपंच सुभाष आबांच्या घरी कामाला असतात. सर हीच्या मोठया बहिणीचं नाव आरती अन् छोट्या भावाचं नाव प्रसाद असायला पाहिजे होतं . मग आरती , पूजा , प्रसाद असं झालं असतं . किती शब्दांची उकल या मुलांकडे . पहिलीतला गणराज तर खूप बडबडा ... वास्तविक अंगात ताप होता पण बळेच वर्गात बसवून ठेवलेला . अगोबाई , ढग्गोबाई ... कविता त्याने छान म्हटली. 'र ' चा उच्चार 'ल ' होत असल्याने त्याच्या तोंडून आलेले ' वाला वाला गला गला सो सो सूम ' ही ओळ लडीवाळी वाटली . दुसरीतील सर्जा ( समीर ) - राजाची जोडी तुफान होती . मुलांचे वाचन , सुंदर हस्ताक्षरातील लेखन , इंग्रजी वाचन , गणिताचे आकलन , गीत गायन, शाळेची शिस्त सारचं अफलातून होतं . खरं तर एक शिक्षकी शाळा असताना इथली प्रगती पाहता शिक्षकाचे कौतुकच करावे लागेल . त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मुलं पुढे उत्तुंग भरारी घेतील अन् अनेक क्षितीजं पादाक्रांत करतील यात शंका नाही .
दुपारपर्यंत अध्यापन अन् नंतर मनोरंजक खेळ त्यामुळे मुलांच्या आनंदाला पारावरच उरला नाही . मुलांशी गप्पा मारण्यात दिवस कधी सरला हे कळलं देखील नाही . शाळेची, मुलांची तयारी पाहून भारावून गेलो . वाटलं असं काही आपल्या शाळेत करता आलं तर ... आणि हीच प्रेरणा मनामध्ये देऊन नव्या उमेदीनं घरी परतलो .
- दशरथ ननावरे (श्रीमंत )
इतिहास- अभ्यासक , व्याख्याते
९९२२८१५१३३
No comments:
Post a Comment