॥ विचारवेध ॥
- दशरथ ननावरे ( श्रीमंत ) , इतिहास अभ्यासकअहिरे प्राथमिक केंद्रशाळा - एक बोलकं बालविद्यापीठ
आनंददायी शिक्षण , बोलक्या भिंती , रंगीबेरंगी फुलांच्या ताटव्यांनी बहरलेली बाग , त्यामध्ये झुलणारे झोपाळे , भव्य क्रीडांगण , डिजिटीलायझेशनच्या आधुनिकीकरणासह अस्खलीत इंग्रजी वाचणारी मुले अन् कोटीपर्यंतच्या संख्या सहजगत्या अवगत झालेली चौथीपर्यंतचे विद्यार्थी आणि त्यांचा चौरस विकास हे सारचं आपल्या कवेत घेऊन शिरपेचात आयएसओ मानांकन झळकवणारी खंडाळा तालुक्यातील अहिरे येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक केंद्रशाळा ! शाळेने मिळवलेला हा नावलौकीक सहजासहजी प्राप्त झाला नाही त्यासाठी बाळगली मनाशी जिद्द आणि केलेत अपार कष्ट ! अहिरे शाळेच्या मेहनतीची ही यशोगाथा.....
बहुजनांना शिक्षणाची कवाडं मोकळी करून देणारे आणि शिक्षणाचं महत्व पटवून देणाऱ्या भारतातील आदयस्त्रीशिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असणाऱ्या खंडाळा तालुक्यातील अहिरे हे गाव तसं मोठं आणि प्रगल्भ . राजकीयदृष्टया तर पुढारलेलं गाव पण मराठी शाळेकडे नेहमीच दुर्लक्ष केलं जात होतं . पण गावचेच सुपूत्र प्रशांत गंधाले सर यांची बदली या शाळेत झाली योगायोगाने शाळेच्या प्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्यावर आली . त्यानंतर आपल्या गावच्या शाळेचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय घेतला . शाळेचे परिवर्तन हाच ध्यास घेऊन कामाला सुरुवात केली . याबाबत ते सांगतात , ' खरं तर आभाळ फाटलेलं होतं मग सुरुवात कोठून करावी हा यक्ष प्रश्न समोर होता . या ज्ञानमंदीराला कळस चढवायचा होता पण त्यापूर्वी या मंदीरातील देव घडवले पाहिजेत या विचारावर ठाम राहून शाळेतील मुले प्रथम घडविण्यास सुरुवात केली .
पहिली ते चौथीपर्यंतच्या वर्गाचे अध्यापनाचे नियोजन करून वर्षभर मेहनत घेतली . राज्याला शैक्षणिक क्षेत्रामध्ये दिशादर्शक ठरलेल्या सातारा जिल्हयात उगवलेल्या ज्ञानरचनावादी अध्यापनाचे पीक याही शाळेत रुजविण्यात शिक्षकांना यश मिळाले . खरं तर यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागली . बौद्धीक क्षमतेबरोबर मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी खेळ , स्पर्धा , अवांतर वाचन , परिसर सहली अशा विविध उपक्रमांचे आयोजन तर केलेच पण दर शनिवारी दफ्तराविना शाळा हा नाविण्यपूर्ण उपक्रम घेऊन सर्वांचेच लक्ष वेधले . बघता बघता विद्यार्थी चांगलेच तयार झाले . पहिलीतील विद्यार्थ्यांनी वाचलेले जोडशब्द , दुसरीतील मुलांचे संख्याज्ञान, अन् चौथीतील मुलांचे अस्खलित इंग्रजी वाचन व आकलन सगळच कसं अफलातून घडलं .
शाळेतील विद्यार्थी चमकू लागले पण त्याबरोबर शाळाही झळकली पाहिजे यासाठी प्रयत्न गरजेचे होते . यासाठी खूप कामे नजरेसमोर होती . पण त्यासाठी हवे होते आर्थिक बळ . पण ग्रामीण भागात नेमकं याचीच वाणवा होती . खेडोपाडयातील प्राथमिक शाळांना नवं रुप दयायचं असेल तर लोकसहभाग हा एक मार्ग असतो पण तोही तुटपुंजाच . मग एखादा मोठा वरदहस्त असावा असा मनात विचार येत असतानाच गावचे सूपूत्र रमेश धायगुडे पाटील यांना तालुक्याचे सभापतीपद मिळाले अन् शाळेच्या अडचणीचा मार्ग सुखर वाटू लागला . भौतिक सुविधा पूर्ण करण्याबरोबरच बांधकाम आराखडा तयार करून क्रीडांगण सपाटीकरणाचे काम सुरू केले . यासाठी गावातील तरुणांनी मोठी मदत केली . त्यानंतर स्टेजचे बांधकाम , बागेचे कट्टे , मैदानातील खेळणी , प्रवेशद्वार , वर्गांचं सुशोभिकरण , बागेतील वृक्षारोपण, वर्गातील साऊंड सिस्टीम , ई -लर्निंग प्रोजेक्ट , स्वतंत्र वाचनालय व यशवंत प्रयोगशाळा, अंतर्बाह्य रंगरंगोटी या सर्वच उत्तम प्रतीच्या कामकाजावर कढी करत शाळेच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले . आणि पाहता पाहता शाळेचा चेहराच बदलून गेला .
अवघ्या दोन तीन वर्षात शाळेने घेतलेली गरुडभरारी अचंबित करणारी असली तरी यासाठी शिक्षकांचे अपार कष्ट आहेत हे दुर्लक्षित करून चालणार नाही . क्रांतीज्योतीच्या तालुक्यात अहिरे प्राथमिक शाळेने राबविलेले उपक्रम शैक्षणिक क्षेत्राला झळाळी देणारे तर आहेतच त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या शाळांना नवी उभारी घेण्यास प्रेरणादायी आहेत .
No comments:
Post a Comment