Pages

Saturday, 22 August 2020

॥ विचारवेध ॥ स्त्री - महिमा

 

॥ विचारवेध ॥ 

- दशरथ ननावरे ( श्रीमंत ) , इतिहास- अभ्यासक 

स्त्री -महिमा 


जगाच्या पाठीवर मातृत्व आणि दातृत्व यांचं लेणं होऊन अवतरलेली स्त्री ही महान आहे . 'स्त्री जन्मा ही तुझी कहाणी ' असं म्हणताना खरोखरच स्त्रियांच्या वाट्याला आज काय आहे. काल स्त्री काय होती याचा विचार मनामध्ये डोकावतो.

        छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रीला मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील देवता मानलं. इतकी स्त्री श्रेष्ठ होती.  शिवशाहीमध्ये जेव्हा जेव्हा स्त्रियांवर अत्याचार झाले त्या प्रत्येक वेळी राजांनी स्त्रियांना न्याय दिला.  एका गरीब शेतकऱ्याच्या मुलीवर अत्याचार केला म्हणून रांझ्याच्या गुजर पाटलाचे हातपाय तोडून चौरंग्या केला . सरदार गायकवाड यांनी विजयाच्या धुंदीत परस्त्रीशी गैरवर्तन केले म्हणून राजांनी या विजयी सरदाराला शासन केले.  न्यायदान करताना राजांनी कधीही आप्त स्वकीयांचाही मुलाहिजा राखला नाही.  स्त्रियांच्या बरोबर कित्येक प्रसंगी त्यांचा उचित सन्मान करायला ते विसरले नाहीत.  कैद केलेल्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला देखील मानाने वागवले .धाडसी हिरकणीचा ही यथोचित सत्कार केला. लढाईत पराजित झालेल्या सावित्रीबाई देसाई हीला बहिण मानून तीच्या जहागिरीची व्यवस्था लावली .  ही न्यायबुद्धी आणि परस्त्री सहिष्णुता राजांजवळ होती. म्हणूनच शिवस्वराज्य यशस्वी ठरले.

        भारताच्या आजच्या लोकशाहीत स्त्रीला खरंच न्याय उरला आहे का? किरण बेदी सारख्या कर्तव्यदक्ष पोलिस अधिकार्‍याला केवळ स्त्रीधर्म म्हणून उच्च पदापासून दूर ठेवले गेले . एकीकडे देशाचे राष्ट्रपती पद एक महिलेने  भूषविले तर दुसरीकडे त्याच देशात अनेक स्त्रिया पुरुष प्रधान संस्कृती खाली भरडल्या जातात.  यासारखा विरोधाभास व शोकांतिका दुसरी नाही.  या देशात कायद्यानुसार कागदावरच स्त्रीला हक्क मिळाले असे खेदाने म्हणावे लागते . कारण आजही प्रत्यक्ष काम करताना अनेक ठिकाणी  पुरुषी अंमल दिसतो.  

     आजवर देशामध्ये अशा असंख्य घटना आहेत जिथं स्त्रीवर अत्याचार घडले. परंतु न्यायालयाच्या दरबारी तिच्या वाट्याला फक्त उपेक्षाच आली.  ज्या स्त्रीच्या पोटी मनुष्यजन्म आहे, त्या स्त्रीला न्याय मिळणे गरजेचे आहे.  सहनशीलतेची जन्मजात देणगी व आपले जीवन ध्येय गाठण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करणारी आजची स्त्री सबला करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे . स्त्रीच्या करूण कहाणीकडे समाजाने उघड्या डोळ्यांनी पाहिले पाहिजे . घरापासून वेशीपर्यंत आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत स्त्रीला सन्मानाने वागवले जाईल. तेव्हा कुठे लोकशाहीची बीजे समाजात रुजली असं म्हणावं लागेल. नाहीतर पुरुष प्रधान संस्कृती खाली दडपली जाणारी स्त्री समाजात अबलाच दिसून येईल . भारतीय इतिहासात अनेक स्त्रीयांनी आपल्या कर्तत्वाने अजरामर इतिहास रेखाटला . आधुनिक काळात अनेकांनी आपापल्या क्षेत्रात गगनभरारी घेऊन देशाचे नाव सातासमुद्रापार पोहचवले आहे . काळाच्या ओघात हा स्त्री -महिमा अबाधित राखण्यासाठी आणि तीच्या कर्तृत्वाला उंच भरारी घेण्यासाठी पाठबळ देणे आपले कर्तव्य ठरते . 




- दशरथ ननावरे (श्रीमंत )

   इतिहास अभ्यासक

11 comments: